Total Pageviews

Friday, 9 June 2017

कोकणातील माजी आमदार आणि दैनिक ‘सागर’ वृत्तपत्राचे संस्थापक, संपादक निशिकांत जोशी यांचे नुकतेच अल्पशा आजाराने निधन झाले. एक स्वच्छ मनाचा राजकारणी, सव्यसाची पत्रकार, सांस्कृतिक क्षेत्राचा आधारस्तंभ आणि अभ्यासू नेता अशी ओळख असलेल्या निशिकांत उपाख्य नाना जोशी यांच्या निधनाने कोकणचे विद्यापीठच हरपले

निशिकांत जोशी हे एक अजब व्यक्तिमत्त्व होते. व्यवहारात जी स्वप्न कधी उतरतील की नाही अशी धाकधूक एखाद्याला वाटेल अशी स्वप्न ते सहज बघायचे आणि त्यासाठी झपाटून कामाला लागायचे. चिपळुणातील परशुराम येथे प्राथमिक शिक्षण घेतल्यानंतर ते मुंबईत आले. गिरगावातील चिकित्सक समूह शिरोळकर हायस्कूलमधून मॅट्रिक झाले. घरची आर्थिक परिस्थिती ओढाताणीची असल्याने पेइंग गेस्ट म्हणून राहिले. दोन पैसे मिळावेत म्हणून मोठय़ा भावाच्या साथीने त्यांनी काही काळ रोडवरच्या पाटय़ाही रंगविल्या. शिकता शिकता ते पोस्टात पॅकर म्हणून कामाला लागले आणि नंतर बॉम्बे स्टीममध्ये नोकरी केली. समीक्षक राम मनोहर यांच्याकडे त्यांनी काही काळ लेखनीक म्हणूनही काम केले. सांस्कृतिक आणि साहित्याची आवड असलेल्या नानांच्या मनात इथेच पत्रकारितेची बीजे रुजली. बी.ए. आणि बी.एड झाल्यानंतर ते पुन्हा चिपळूणमध्ये आले आणि युनायटेड इंग्लिश स्कूलमध्ये शिक्षक म्हणून रुजू झाले. खिशात अवघे दोनशे रुपये असताना २० जून १९६५ रोजी त्यांनी दैनिक ‘सागर’ नावाचे साप्ताहिक त्यांनी सुरू केले. त्या काळात वृत्तपत्र चालविणे हे दिव्य होते. साधा फोटो छापायचा असेल तर तो एसटीमधून साताऱयाला पाठवावा लागे आणि तेथून ब्लॉक करून आणावा लागे. जेवण खाण्याचा पत्ता नाही, रात्रभर जागरण पण नाना हटले नाहीत. साप्ताहिक ‘सागर’चे आता दैनिकात रूपांतर झाले होते. कोकणचे मुखपत्र अशी सागरची ओळख निर्माण करण्यात नाना यशस्वी झाले होते. ‘एन. एम.’ या टोपण नावाने त्यांचा सागरमधील ‘प्रवाह’ हा स्तंभ म्हणजे विचारांचा अव्याहत वाहणारा प्रवाहच होता. कोणतीही गोष्ट करायची ती भव्य आणि नेटकी हा त्यांचा ध्यास असे. त्यांच्या संपर्कात येणारा प्रत्येक माणूस हा त्यांचा कायमस्वरूपी मित्र, हितचिंतक होत असे. कोकणातील अनेक सामाजिक संस्था उभारण्यात त्यांचा सिंहाचा वाटा होता. आमदार म्हणून त्यांची कारकीर्द संस्मरणीय ठरली. गावागावात त्यांनी विकासकामांचा धडाका उडवून दिला. रस्ते, धरणे, शाळा अशा कामांचा सपाटा त्यांनी लावला. मुंबई विद्यापीठाचे सिनेट सदस्य, एमआयडीसीचे संचालक, रोजगार हमी योजनेचे कार्यकारिणी सदस्य, कोकण सिंचन अभ्यास मंडळाचे सदस्य, राज्य व केंद्र सरकारच्या माजी सैनिक सल्लागार समिती सदस्य या नात्याने नानांनी आपल्या कामाचा ठसा उमटवला. कोकण वैधानिक विकास महामंडळ स्थापन करण्यामागे त्यांनी अथक पाठपुरावा केला. मॉस्को महापालिकेने त्यांचा विशेष सत्कार केला होता. विलक्षण लोकसंग्रह हा नानांचा हातखंडा होता. केवळ नेता आणि पत्रकार म्हणून नव्हे तर सांस्कृतिक क्षेत्रातही नाना जोशी यांनी कोकणात मोठे योगदान दिले. साहित्य संमेलनाचे आयोजन, नाटय़संमेलनाचे आयोजन, कोकण सांस्कृतिक अकादमीतर्फे १६ वर्षे कुमार गंधर्व संगीत संमेलनाचे आयोजन, चतुरंगचे आश्रयदाते अशा असंख्य उपक्रमात नानांचा सहभाग होता. अभिजात कलेची आवड असणाऱया नानांची स्मरणशक्तीही अफाट होती. एकदा वाचले की त्यांच्या कायम लक्षात असायचे. त्यांच्या वक्तृत्वाचा रसास्वाद घेण्यासाठी रसिकांची गर्दी होई. तळागाळातल्या माणसाशी जुळलेली नाळ, त्यासाठी काम करण्याची तळमळ आणि वागण्यातली सच्चाई या गुणांच्या जोरावर ते कोकणातील घराघरात पोहचले. माणसात रमणारा लोकसंग्राहक पत्रकार अशी त्यांची ओळख होती. पत्रकारितेतील विविध पुरस्कारांबरोबरच सह्याद्री वाहिनीचा ‘रत्नदर्पण’ पुरस्कार त्यांना मिळाला होता. त्यांच्या जाण्याने उमद्या मनाचा लोकमित्र, सर्व संग्राहक पत्रकार आणि महाराष्ट्रातील सर्वात अभ्यासू नेता हरपला आहे

No comments:

Post a Comment