SPREAD MESSAGE OF INDIAN NATIONAL SECURITY TO AS MANY INDIANS AS POSSIBLE. LET US FREE INDIA OF CORRUPTION BY SPREADING THE MESSAGE TO AS MANY PEOPLE.MANY OF THE ARTICLES HAVE BEEN RECEIVED AS FORWARDED MAIL FROM VARIOUS FRIENDS . SHOULD SOME FACTS BE NOT CORRECT , YOU ARE REQUESTED TO PUT IT IN REMARKS BELOW THE ARTICLE. THIS WILL ENSURE A MORE BALANCED PERSPECTIVE OF THE SUBJECT DISCUSSED.
Total Pageviews
Saturday, 3 June 2017
भारताचे अंतराळ सहकार्य आणि पाकिस्तान-DR SUDHIR AGRAWAL
June 3, 2017 04:30:36 AM प्रा. डॉ. सुधीर अग्रवाल 0 Comment
अंतर्गत, बाह्य आणि नैसर्गिक अशा विविध बाजूंनी येणा-या संकटांवर मात करून आपला भारत देश विविध क्षेत्रांत नेटाने प्रगती साधत पुढे जात आहे, हे सर्व पाहून सर्व भारतीयांचा ऊर अभिमानाने फुलून येत आहे. स्वातंत्र्य प्राप्तीनंतर भारताने विविध क्षेत्रांत केलेली प्रगती ही निश्चितच कौतुकास्पद आहे. अशाच एक गगनभेदी व तितकीच ऐतिहासिक प्रगतीची झेप भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात इस्त्रोने घेतली आहे. दक्षिण आशियातील शेजारी राष्ट्रांसाठी भारताची अनमोल भेट असलेल्या दक्षिण आशिया उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण केल्याने ‘इस्त्रो’च्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला. याआधी फेब्रुवारी महिन्यात इस्त्रोने एकाच वेळी १०४ उपग्रह अवकाशात प्रक्षेपित करून नवा इतिहास रचला होता.
दक्षिण आशिया उपग्रह (जी सॅट-९)च्या माध्यमातून विभागीय सहकार्याला नवीन आयाम देत दक्षिण आशियायी देशांना या सॅटेलाईट डिप्लोमसीद्वारे भारताने अगदी जवळ करून घेतले आहे. सहकार्याची मनापासून इच्छा असली तर त्याला सीमाच नसते. या उपग्रहाच्या माध्यमातून भारतासह दक्षिण आशियातील श्रीलंका, भूतान, अफगाणिस्तान, बांगलादेश, नेपाळ आणि मालदीव या सहा राष्ट्रांना दूरसंचार, दळणवळण आणि नैसर्गिक आपत्तीत मदत अशा सेवा मिळणार आहेत. या उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण करून विभागीय सहकार्यासाठी आकाश ठेंगणे असल्याचा प्रत्यय देत भारताने सहकार्यासाठी आकाश ठेंगणे असल्याचा नवीन आयाम दिला आहे.
जमीन व सीमेत आम्ही वाटले गेलो. अंतराळात मात्र आम्ही एक आहोत, याचा प्रत्यय भारताने आणून देत ‘सबका विकास’ला प्राधान्य दिले. भारतीय अंतराळ संशोधन केंद्राने तयार केलेल्या जी-सॅट-९ (एसएएस) या उपग्रहाचे भारतीय बनावटीच्या क्रायोजेविक इंजिनसज्ज जी-एसएलव्ही-एफओ-९ द्वारे प्रक्षेपित करण्यात आले. आंध्र प्रदेशातील श्रीहरीकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रावरून या उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण करण्यात आले. ५० मीटर लांब आणि २,२३० वजनी हा भूस्थीर उपग्रह आहे. या उपग्रहाला पाठकुली सवारी (रोड पीग्गीबँक) असेही म्हटले जाते. दूरसंचार टेलिव्हिजन डायरेक्ट टू-होम टेली एज्युकेशन आणि टेली मेडिसीनसह भारताच्या शेजारी देशाना सेवा उपलब्ध होणार आहेत. विशेष म्हणजे या देशांदरम्यान सुरक्षित हॉटलाईन (संपर्क सेवा) उपलब्ध होणार असल्याने भुकंप, चक्रीवादळ, पूर, त्सुनामी यासारख्या नैसर्गिक आपत्तीच्या व्यवस्थापनासाठी मोठी मदत होणार आहे. या उपग्रहाची किंमत जवळपास २३५ कोटी रुपये असून हा सर्व खर्च भारताने उचलून बिग ब्रदरची भूमिका पार पाडली आहे. या उपग्रहाचे आयुष्य १२ वर्षे असेल.
जागतिक स्तरावर राष्ट्रा-राष्ट्रांमध्ये मतभेद, संघर्ष विकोपाला गेले असताना, एक दुस-याचे दरवाजे बंद करत असताना भारताने मात्र आपले दरवाजे उघडे करत सबका साथ-सबका विकास या संकल्पनेला प्राधान्य दिले आहे. त्याचाच हा पुरावा.
भारताच्या विकासासोबत शेजारी देशांचा देखील विकास व्हावा या भावनेने भारताने सामूहिक हिताला, सामूहिक विकासाला प्राधान्य देत शेजारी देशात देखील विकास आणण्याचा प्रयत्न या उपक्रमाद्वारे केला आहे. सबका सॅटेलाईट, सबका विकास या संकल्पनेनुसार आपल्या तांत्रिक प्रगतीच्या लाभात इतरांनाही सामील करून घेत भारताने मुत्सद्देगिरी दाखवत सॅटेलाईट डिप्लोमसीच्या माध्यमातून प्रादेशिक संतुलन राखत असतानाच विभागीय सहका-याला महत्त्व दिले आहे.
अंतराळ क्षेत्रातील सहकार्य सार्क देशांसाठीच आखण्यात आले होते. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सार्क देशांच्या परिषदेत सार्क सॅटेलाईटची कल्पना मांडली होती. परंतु पाकिस्तानने या प्रकल्पात भाग घ्यायला नकार दिल्यानंतर ते बदलून साऊथ आशिया सॅटेलाईट असे करण्यात आले. पाकिस्तानचा हेकेखोरपणा व काही तांत्रिक कारणांमुळे हा उपग्रह मागील वर्षी प्रक्षेपित करता आला नाही. २०१४ मध्ये झालेल्या सार्क परिषदेत दिलेले वचन भारताने ५ मे २०१७ रोजी पूर्ण करत आपला शब्द पाळला. दक्षिण आशियाई उपग्रह भारताची अंतराळ क्षेत्रातील उच्च भरारी असून या उपग्रहाच्या माध्यमातून भारताने एक मोठा प्रादेशिक विजय मिळविला आहे. यामुळे भारताची प्रतिमा उज्ज्वल तर होईलच पण आंतरराष्ट्रीय दहशतवादासारख्या समस्येलाही त्यामुळे हाताळता येईल. दोन देशातील सीमावाद, वांशिक प्रश्न यासारख्या समस्या सोडविण्यासाठी आवश्यक आणि त्यासाठीची मुत्सद्देगिरीही यातून साधली जाणार आहे.
डीटीएच, नैसर्गिक आपत्ती, वैद्यकीय, शिक्षण, आयटी यासारख्या अनेक क्षेत्रांमध्ये दक्षिण आशियातील सर्व देशांना अवकाश तंत्रज्ञानाचा फायदा व्हावा यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सार्क उपग्रहाची कल्पना मांडली होती. बांगला देशाच्या पंतप्रधान शेख हसीना यांनी देखील या उपग्रह प्रक्षेपणामुळे आपल्यातील परस्पर मैत्रीचे संबंध वाढणार असल्याचे म्हटले. भुतानचे पंतप्रधान शेरिंग तोबगे यांनी हा ऐतिहासिक क्षण असल्याचे म्हटले. मालदीवचे राष्ट्रपती अब्दुल गयूम आणि नेपाळचे पंतप्रधान पुष्प कमल दहल यांनीही उपग्रह प्रक्षेपणासाठी भारताचे अभिनंदन केले आहे.
थोडक्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यांच्या कल्पनेतील सबका साथ सबका विकास या संकल्पनेनुसार शेजारी राष्ट्रांना प्रथम प्राधान्य देत सॅटेलाईटच्या माध्यमातून शेजारी देशांना एका सूत्रात बांधले. जल सीमेप्रमाणेच अवकाशातूनही परस्पर सहकार्य वाढविले जाऊ शकते, हे मोदींनी जगाला दाखवून दिले. या उपग्रहामुळे दीड अब्ज लोकांना फायदा होणार आहे. हवामान अंदाज, बँकिंग सेवा, दूरसंचार व्यवस्थेला मदत होणार आहे. त्यामुळे या देशांमध्ये संपन्नताही वाढणार आहे
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment