Total Pageviews

Wednesday 7 June 2017

झळाळले अंतराळ -अंतराळातील भारतीय दबदबा आता चांगलाच वाढला आहे. भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या नव्या यशाने समस्त भारतीयांचा माथा अभिमानाने उन्नत केला.Maharashtra Times


२१ लाख कोटींच्या अंतराळ व्यवसायात जीसॅट १९ उपग्रह उड्डाणाने नवी क्रांती केली. आजवर अप्राप्य समजल्या जाणाऱ्या क्षेत्रात प्रभुत्वाच्या दिशेने अग्रेसर होण्याची संधी या उड्डाणाने भारताला दिली. २०० हत्तींचे बळ पेलणारा अग्निबाण आहे म्हणून इस्रोचे अभिनंदन करायचे, असे नाही. जगातील सगळ्यात वजनदार अग्णिबाण नासाचा आहे. त्याचे वजन २९७० टन आहे. आपल्या अग्णिबाणाचे वजन ६४० टन आहे. पण मुख्य बाब म्हणजे, आपली एकूणच प्रक्षेपण क्षमता या उड्डाणाने दुप्पट केली आहे. भारतीय वैज्ञानिकांची तोंडभरून प्रशंसा त्यासाठी व्हायला हवी. मंगळ मोहीम पहिल्याच टप्प्यात यशस्वी केल्यामुळे जगापुढे आपली कामगिरी सिद्ध झाली होती. एकाचवेळी एकाच प्रक्षेपकाच्या साह्याने तब्बल १०४ उपग्रह प्रक्षेपित करण्याचा इतिहासही इस्रोने घडविला होता. भारतीय भूमीवरून पहिल्या अंतराळवीराचे महत्त्वाकांक्षी प्रयाणही आपल्याला लवकरच बघायला मिळेल. हा बहुप्रतीक्षित विश्वास या उड्डाणाने दिला. भारतीयांची हृदये उचंबळून आणणाऱ्या या कामगिरीसाठी मागील ३० वर्षांपासून इस्रोचे संशोधक सतत झटत होते. हे यश संयमाचे आणि प्रतीक्षेचे आहे. अथक प्रयत्नांचेही आहे. अंतराळ संशोधन क्षेत्रातील आजच्या यशामागे पंडित नेहरूंसारख्या द्रष्ट्या नेत्याची भूमिकाही कारणीभूत आहे. त्यांच्या झपाट्यामुळे भारतीय संशोधन क्षेत्रातील गतिमानता वाढली, ही बाब लक्षात घ्यायला हवी. आज सभोवतालचे वातावरण स्फोट आणि दहशतीने भारले गेले आहे. या पार्श्वभूमीवर अंतराळातील भारतीय मिळकतीचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. मानवी सभ्यतेला आणि संशोधनाला झळाळी मिळवून देणाऱ्या आजवरच्या हयात असलेल्या आणि नसलेल्या सर्वच भारतीय शास्त्रज्ञांना आपण अभिवादन करायला हवे. या शक्तिशाली अग्णिबाणाच्या यशस्वी चाचणीमुळे मानवाला अंतराळात सोडण्याची क्षमता असलेल्या मोजक्या देशांमध्ये भारताला मान्यता मिळाली. पहिल्या अंतराळवीराचा सन्मान महिलेला मिळावा, ही इस्रोची इच्छा खरोखरच फलद्रूप झाली तर संशोधनासाठी सुधारणावादाचे कोंदण घेऊन आपला अग्णिबाण अंतराळात झेपावेल. ती आणखी एक नवी क्रांती असेल. सन २०२४ पर्यंतची कळ मात्र त्यासाठी सोसावी लागेल. १२ हजार कोटींच्या अतिरिक्त खर्चाला निश्चितच मंजुरी मिळेल. भारतीय अंतराळवीराचे स्वप्न प्रत्यक्षात येईल. जीएसएलव्ही-एमके ३डी मोहिमेसाठी तीनशे कोटींचा खर्च झाला. फ्रान्सच्या मदतीवर अवलंबून राहण्याची गरज मात्र त्यातून दूर सारली गेली. उपग्रहांचे उड्डाण खगोलशास्त्रीय संशोधनाखेरीज कृषी, शिक्षण आणि हवामान अंदाजासाठीही प्रेरक ठरते. नव्या उपग्रह उड्डाणांमुळे इंटरनेट सेवेची गती वाढणार आहे. मोबाइल सिग्नलसाठी नुकतेच एका मंत्र्याला झाडावर चढावे लागण्याची घटना राजस्थानात घडली. श्रीहरीकोटातील यशस्वी चढाईने अशा नामुष्कीचा अंत व्हावा. फोन कॉल्सच्या दर्जाचे गुणांकन करणारे अॅप मोबाइल कंपन्यांकडे असते. त्याच पद्धतीने अंतराळ क्षेत्रातील क्षमतेचे रेटिंग काढायचे झाले तर भारताला डावलून जगाला आता पुढे जाता येणार नाही. अंतराळक्रांतीने अवघे भूमंडळही आपल्याशी जोडले जाईल. इस्रोच्या परिश्रमातून गवसलेले हे शुभसंकेत आहेत. केवळ अलीकडच्या नव्हे तर आजवरच्या अंतराळ मुशाफिरीला अभिवादन करायचे, ते त्यासाठीच

No comments:

Post a Comment