Maharashtra Times | Updated: Jun 25, 2017, 12:13PM IST
मटा ऑनलाइन वृत्त । सिडनी
गेल्याच आठवड्यात इंडोनेशिया सुपर सीरिजचं जेतेपद पटकावणाऱ्या भारताच्या कदाम्बी श्रीकांतनं आज ऑस्ट्रेलियन ओपन सुपर सीरिजमध्ये विजयाचा झेंडा फडकवला आहे. शक्ती आणि युक्तीच्या जोरावर त्यानं चीनच्या चेन लाँगचं आव्हान २२-२०, २१-१६ असं मोडीत काढलं.
भारतात आवडीचा खेळ कोणता असे जर विचारले, तर क्रिकेटचे नाव डोळ्यासमोर येतो. त्यापाठोपाठ हॉकी आणि अन्य मैदानी खेळांचा क्रमांक लागतो. जिम्नॅस्टिक, पोहणे, टेबल टेनिस यासारख्या खेळांत भारताचा दबदबा कधीच नव्हता. कारण, यासाठी असणारे हवामान, मेहनतीची तयारी, सोयीसुविधांचा आपल्याकडे अभाव असल्याने खेळाडूंच्या यशाचे प्रमाण नगण्यच राहिले आहे. असे असले तरी बॅडमिंटनसारख्या खेळात आता भारताच्या खेळाडूंनी जगात स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. किदंबी श्रीकांतने इंडोनेशियन खुली बॅडमिंटन स्पर्धा जिंकून इतिहास घडवला आहे. इंग्लंडच्या मैदानावर चॅम्पियन करंडकच्या अंतिम सामन्यात भारताचा पराभव होत असताना, किदंबीने इंडोनेशियात तिरंगा उंचावत देशाची शान राखली. इंडोनेशिया ओपनची अंतिम फेरी गाठताना श्रीकांतने दक्षिण कोरियाच्या अव्वल मानांकित खेळाडूला पराभूत केले होते, हे विशेष. दक्षिण कोरियाचा के सोन वान याला एक तास 12 मिनिटांतच श्रीकांतने गारद केले. 21-15, 14-21 आणि 24-22 असे पराभूत केले. अंतिम सामन्यात तर जपानच्या काजूमासा साकाईला दोन सेटमध्ये हरविण्याची किमया श्रीकांतने साधली. केवळ 35 मिनिटे चाललेल्या खेळात 24 वर्षीय श्रीकांतने काजूमासाला नामोहरम केले होते. जागतिक क्रमवारीत 22 व्या स्थानावर असलेल्या श्रीकांतचा हा दुसरा सुपर सीरिज विजय आहे. याअगोदर त्याने 2014 मध्ये चायना ओपन जिंकली होती. श्रीकांतसाठी हा चौथा सुपर सीरिज अंतिम सामना होता. 2015 मध्ये त्याने इंडियन ओपनवर मोहर उमटवली होती.
असे म्हटले जाते की, भारतात क्रिकेटपुढे अन्य खेळांतील यशांना फारसे महत्त्व दिले जात नाही. कारण, याचा प्रत्यय वारंवार आपल्याला येतो. याचे ताजे उदाहरण म्हणजे, चॅम्पियन करंडकमधील भारताचा पराभव हा माध्यमांचा मुख्य मथळा ठरला, तर किदंबीने मिळवलेले यश हे मात्र एखाद्या कॉलमचा भाग राहिला. यावरून क्रिकेटचा प्रभाव दिसून येतो. किदंबी हा ग्रां.प्री., सुवर्ण चषक, सुपर सीरिज प्रीमिअर आणि सुपर सीरिज अशा तिन्ही स्पर्धा जिंकणारा पहिलाच भारतीय बॅडमिंटनपटू ठरला आहे. श्रीकांतने आपला मोठा भाऊ नंद गोपाळकडून प्रेरणा घेतली आणि या क्षेत्रात करिअर करण्याचे निश्चित केले. श्रीकांतच्या जडणघडणीत गोपाळचा वाटा निश्चितच मोठा आहे. श्रीकांतने आतापर्यंत आंतरराष्ट्रीय पातळीवर दक्षिण आशियायी, राष्ट्रकुल स्पर्धा, आशियायी कनिष्ठ अजिंक्यपद, राष्ट्रकुल युवा स्पर्धा आदी अनेक स्पर्धांत पदकावर नाव कोरले आहे. त्याने ऑलिम्पिक आणि विश्वविजेता लिन दान याच्यासह जागतिक क्रमवारीतील नामांकित खेळाडूंना पराभवाचा धक्का दिला आहे.
तसे पाहिले तर जागतिक पातळीवर बॅडमिंटनमध्ये चीनने दादागिरी केली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून जागतिक बॅडमिंटन स्पर्धा असो किंवा ऑलिम्पिक असो, चीनचे खेळाडू सहजपणे या स्पर्धा खिशात घालत. चीनच्या खेळाडूंनी आपल्या कर्तृत्वाने प्रभाव टिकून ठेवला. मात्र, गेल्या दशकापासून भारतीय खेळाडूदेखील यशाचे दरवाजे ठोठावत आहेत. सायना नेहवाल, पी. व्ही. सिंधू यांनी मात्र भारताचे नाव अधिकच उंचावत नेले. आजही भारतात प्रकाश पदुकोनमुळेच बॅडमिंटनचे नाव घराघरांत पोहोचल्याचे सांगितले जाते. साधारणत:, तीन दशकांपूर्वी प्रकाश पदुकोनने चीनच्या विश्वविजेत्याला हरवून जगाचे लक्ष वेधून घेतले होते. त्यानंतर बॅडमिंटनकडे सर्वांचे लक्ष गेले. बॅडमिंटनला भारतात प्रतिष्ठा, मानसन्मान मिळवून देण्याचे काम प्रकाश पदुकोन यांनी केले आहे. त्यानंतर पुलेला गोपीचंदने वारसा पुढे नेला. अलीकडच्या काळात सायनाने जागतिक क्रमवारीत पहिले स्थान मिळवून देशाचा गौरव वाढवला. रिओ ऑलिम्पिकमध्ये तर पी. व्ही. सिंधू सोनेरी उंबरठ्यावर उभी होती. परंतु, रौप्यपदक मिळवून उदयोन्मुख बॅडमिंटनपटूंना प्रेरित केले. सायना नेहवालपासून प्रेरणा घेत पी. व्ही. सिंधू, अजय जयराम, एच. एस. प्रणोय, आर. एम. व्ही. साईप्रणीत, पारूपल्ली कश्यप आणि आता किदंबी श्रीकांत या खेळाडूंनी जागतिकस्तरावर भारताचा ठसा उमटवला आहे. श्रीकांतने भारताला सांघिक स्पर्धांत बहारदार कामगिरी करत यश मिळवून देण्यात महत्त्वाचा वाट उचलला आहे.
आंध्र प्रदेशातील गुंटूर जिल्ह्यात श्रीकांतचा जन्म झाला. पुढे भावाच्या प्रेरणेने हैदराबाद येथे गोपीचंद अकादमीत प्रवेश घेतला आणि श्रीकांतच्या खेळाला आकार आला. मोठा भाऊ फारसा यशस्वी ठरला नसला, तरी त्याची कसर श्रीकांतने भरून काढली. तासन्तास सराव करत जागतिक खेळाडूंचे बारकावे श्रीकांतने शिकले आणि समजून घेतले. प्रतिस्पर्धी खेळाडूंचे विकपॉईंट त्याने शोधले आणि त्यावरच हल्ला केला. आक्रमकतेबरोबरच बचावही तेवढ्याच ताकदीचा असावा, असे श्रीकांत म्हणतो. जागतिक स्पर्धेत भारतीय खेळाडू चमकदार कामगिरी करत असताना, ऑलिम्पिकमध्ये कच खात असल्याचा अनुभव आपल्याला येतो. यास श्रीकांतही अपवाद राहिला नाही. अकारण मानसिक दडपणाखाली खेळून ऐनवेळी हाराकिरी करत असल्याचे चित्र आपल्याला दिसते. याबाबत त्यानेच कबुली दिली आहे. रिओ येथील स्पर्धेत त्याला अपयश आले. ऑलिम्पिकचे आणि अन्य स्पर्धांचे वातावरण वेगळे असते. चीन, मलेशिया, इंडोनेशिया यासारख्या देशांचे खेळाडू ऑलिम्पिकच्या स्पर्धा खूपच गांभीर्याने खेळतात. हा अपवाद वगळता श्रीकांतने भारताला देदीप्यमान यश मिळवून दिले आहे. इंडोनेशियन ओपनचा अंतिम सामना जिंकल्यानंतर श्रीकांतने आपल्या कामगिरीवर समाधान व्यक्त करत म्हटले होते की, अंतिम सामन्यातील दुसरा गेम अवघड होता. परंतु, मी आखलेल्या रणनीतीनुसार खेळ केल्याने त्यावर मात करणे सहजशक्य झाले आणि इंडोनेशियन ओपनचा किताब माझ्या नावावर करता आला. भारतीय बॅडमिंटन संघटनेनेे श्रीकांतला पाच लाख रुपयांचा पुरस्कार जाहीर केला असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. यशाची पताका अशीच उंचावत राहो, अशी आशा त्यांनी व्यक्त केली आहे. इंडोनेशियन ओपन जिंकणारा श्रीकांत हा पहिला भारतीय खेळाडू असून, यापूर्वी सायना नेहवालने महिला ऐकरीत दोनदा हा किताब जिंकला आहे. तत्पूर्वी, उपांत्यपूर्व सामना जिंकल्यानंतर श्रीकांतने आपले लक्ष्य आताच चषकावर नसून, आखलेल्या रणनीतीवर आहे, असे म्हटले होते. याच रणनीतीने श्रीकांतने ऐतिहासिक कामगिरी नोंदवली. संयमी वृत्ती ही श्रीकांतची उजवी बाजू मानली जाते. त्यामुळे प्रतिस्पर्धी खेळाडूला पाठिंबा देणारा मोठा वर्ग असला, तरी श्रीकांत आपला समतोल थोडाही ढळू न देता कोर्टवर अधिक लक्ष केंद्रित करतो. वेगवान फटके आणि चपळता ही श्रीकांतची जमेची बाजू आहे. या जोरावरच त्याने स्पर्धा जिंकल्या आहेत. यंदाच्या हंगामात त्याला सिंगापूर ओपन स्पर्धेत उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले होते. या पराभवाचा त्याने बारकाईने अभ्यास केला आणि उणिवा दूर करण्यावर भर दिला. यात आत्मपरीक्षण करून त्याने खेळात आणखी सुधारणा केली. याचा फायदा त्याला इंडोनेशियन ओपनमध्ये झाला. आगामी जागतिक स्पर्धेपूवीर्र् श्रीकांतला मिळालेले यश मोलाचे मानले जाते. इंडोनेशिया ओपन जिंकल्यानंतर आता किदंबी श्रीकांतची नजर ऑस्ट्रेलियन ओपन सुपर सीरिज स्पर्धेवर राहणार आहे. ही स्पर्धा 25 जूनपर्यंत चालणार आहे. श्रीकांतबरोबर अन्य खेळाडूंकडूनही चांगल्या कामगिरीची अपेक्षा बाळगली जात आहे. भारतात आता क्रिकेटपेक्षाही अन्य खेळांनाही पुरेसे महत्त्व दिले जात असल्याने विविध खेळांत भारतीय खेळाडू नाव कमावताना दिसून येत आहेत. बॅडमिंटनमध्ये दर्जेदार खेळाडूंची फळी उभी राहिलेली असून, ती याही पुढच्या काळात अशाच प्रकारची ऐतिहासिक कामगिरी करेल अशी आशा करू.
No comments:
Post a Comment