हिंदुस्थानचे सार्वभौमत्व अंदमान–निकोबार बेटांमध्ये चांगले जपले जात आहे. हिंदुस्थानातील सर्व राज्यांतून, विशेषतः दक्षिणेतील राज्यातून लोक येथे राहण्यासाठी आले आहेत. बेटांना सातत्याने भूकंप आणि त्सुनामीचा धोका व त्यासाठीची तयारी ठेवणे क्रमप्राप्त आहे. जंगल, लाकूडकाम, शेतीव्यतिरिक्त अंदमान निकोबार बेटसमूहांचा विकास आणि त्यांचे लक्ष्य तयार करताना केंद्र सरकारने पर्यावरणाची सांगड पर्यटनाशी घालून विकासाचा विचार करावा.
पोर्ट ब्लेअर येथे स्वातंत्र्यवीर सावरकर आंतरराष्ट्रीय
विमानतळावर उतरतानाच जाणवले की, बंगालच्या उपसागरात निसर्गाने अत्यंत रमणीय, पर्यावरणस्नेही ठिकाण मानवाला बहाल केले आहे. बऱयापैकी नागरीकरण होऊनही निळाशार समुद्र, सोनेरी किनारे, सुखावह जंगले आणि मानवी करणीतून ढवळाढवळ न झालेली बेटे, त्यातील प्रदूषणमुक्त हवा… साधारण ५७२ बेटांचा हा समूह. ७८० कि.मी. लांब आणि जास्तीत जास्त ३२ कि.मी. रंद असलेली ही जमीन म्हणजे निसर्गाचा अद्भुत नजराणा! हिंदुस्थानचा हा भूभाग आपल्या देशापासून साधारण १३०० कि.मी. दूर, पण दक्षिणपूर्व आशियातील जावा, सुमात्रा, इंडोनेशिया या देशांच्या जवळ आहे. पूर्व हिमालयन साखळीतील हा भूभाग होता, पण निसर्ग उलाढालीत बेटांच्या रूपाने आज उपलब्ध आहे.
अंदमान बेटाची ऐतिहासिक पार्श्वभूमी रंजक पण मानवी वृत्तीची खेदजनकताही त्यात दिसते. या बेटांवरील आदिवासी जंगलातील काही जणांना पळवून आणून गुलामगिरी करायला लावले जायचे. मलाया लोकांनी यात पुढाकार घेतला. या प्रदेशाला ते Handuman म्हणत. रामायणातील हनुमानाच्या धर्तीवर; पण पुढे त्याचे अंदमान झाले. आर्कीबोल्ड ब्लेअर याची नियुक्ती या प्रदेशाचा आणि समुद्राचा अभ्यास करण्यासाठी ब्रिटिशांकडून केली गेली. बेटांवर वास्तव्य करण्यात पुष्कळ अडथळे येत. या सर्व मंथनातून हिंदुस्थानी स्वातंत्र्यचळवळीतील स्वातंत्र्यसैनिकांना येथे पाठवून देण्याचा निर्णय ब्रिटिश राज्यसत्तेने घेतला. इ.स. १८५८च्या दरम्यान या निर्णयाची अंमलबजावणी पोर्ट ब्लेअर याने सुरू केली. स्वातंत्र्यसैनिकांची पिळवणूक चालूच होती. विशेषतः महाराष्ट्र, बंगाल, पंजाब वगैरे राज्यांतून आलेले स्वातंत्र्यसैनिक होते. दुसऱया महायुद्धात जपानने या प्रदेशाचा ताबा घेतला. स्वातंत्र्यसैनिकांची जंत्री बनविण्याचे काम त्यांनी केले. ब्रिटिशांना चांगलाच हादरा दिला. त्याआधी ब्रिटिशांनी सेल्युलर जेलची निर्मिती केली होती आणि स्वातंत्र्यसैनिकांसाठी ६९९ खोल्या विशिष्ट रचनेतून निर्माण केल्या गेल्या होत्या. जंगल तोडणे, वस्ती वाढविणे या गोष्टी ब्रिटिशांनी केल्या, पण प्रदेशाचे तुरंगात रूपांतर करताना आदिवासींसाठी, त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी काही केले नाही.
खरे म्हणजे या बेटांवरील वनस्पती विविधता म्हणजे निसर्गभूषण आहे. पर्किन्सन या अभ्यासकाने नोंद केली आहे की, समुद्रकाठापासून टेकडय़ांपर्यंत येथील लाकडांमधील विविधता अवर्णनीय आहे. त्याचप्रमाणे त्याची मुबलकताही भरपूर आहे. बांबूंची विविधता, वर चढणाऱया वेली आणि लाकूड कापण्यासाठी उपयोगी अशी झाडे येथे मुबलक आहेत. त्यांची वर्गवारी तीन प्रकारे करता येईल. पहिल्या वर्गात पडोक, कोको, युगलम, मार्बल आणि सॅटीत वूड येतात. दुसऱयात त्रिन्मा, वायले, चाई, लकुच, लिचिनी, पॉनगीत आणि चिर्टायन येतात. तिसऱया वर्गात डिडू, व्येत्री, टंगस्पीग्री, गुर्जन ही येतात. एकंदर ६५० जाती आढळून येतात. त्यातील बहुतांश या बेटांवर निर्माण झाली आणि काही बाहेरून आणली गेली. कोकणाएवढाच पाऊस असला तरी निराळय़ा प्रकारची जमीन असल्यामुळे झाडांमध्ये हा फरक दिसतो.
अंदमान बेटांवर प्राणी विविधता फारशी दिसत नाही. रानमांजर, डुक्कर, इगुना, साप, ग्रीन लिझार्ड वगैरे प्राणी धोकादायक नाहीत. कोरल रीडस्, सी कुकम्बर, पीजन्स, विविध रंगांचे पक्षी येथे आढळतात. पण वनस्पतींसारखी विविधता प्राणी आणि पक्षी यांत आढळत नाही. समुद्रातील मासे आणि कोरलस् यांची विविधता मुबलक आहे. बऱयाच शास्त्र्ाज्ञांनी या विविधतेचा अभ्यास केला आहे. अंदमानमधील सर्व संग्रहालये या धनसंपदेचे चांगले दर्शन घडवितात. अत्यंत अभ्यासपूर्ण अशी संग्रहालयांची निर्मिती, देखभाल आणि जतन करून अभ्यासकांना चांगले दालन उपलब्ध करून दिले आहे.
या सर्व बेटांचे आणखी वैशिष्टय़ म्हणजे तेथील प्रथम नागरिक. सगळी बेटे मिळून हे ‘अबोरिजिनल’ जास्तीत जास्त १००० असतील. जारवाज, ओन्जीस, सेंटीनेलीस, शोम्पीन्स, निकोबासिज, नेग्रीस, मंगोलाईड समूहातील आहेत. काही जमाती धनुष्यबाणातून मासेमारी करतात, पण समूहात राहतात. काही जमाती ‘होस्टाईल’ असतात. त्यांना बाहेरील जगाच्या बदलत्या स्वरूपाशी देणेघेणे नसते. सन १९९१ मध्ये अशा जमातींशी काही अधिकाऱयांनी संपर्क साधला. जवळीक केली. पण ते निराळेपण सोडायला तयार नाहीत. काही जमाती मित्रत्वाच्या भावनेसाठी उत्सुक दिसतात. नेग्रीटो जमात आधी मोठय़ा प्रमाणावर होती, पण ब्रिटिशांच्या युद्धस्वरूपी प्रसंगात पुष्कळजण मारले गेले. कारेन जमात मात्र शांत स्वभावाचे, शिक्षणप्रेमी असल्यामुळे मुख्य प्रवाहात सामील झालेले दिसतात. वस्ती करण्यासाठी जंगलतोड आणि इतर कामांसाठी ब्रिटिशांनी या सर्व जमातींचा उपयोग करून घेतला.
येथे आणले गेलेल्या स्वातंत्र्य कैद्यांनी ब्रिटिश अधिकाऱयांवर हल्ले केल्याचे दिसून येते. ब्रिटिशांविरुद्ध लढण्यात स्वातंत्र्यवीर सावरकरांचे योगदान मोठे आहे. या बेटांबद्दल बोलताना त्यांनी सांगितले आहे की, ‘नेव्हल बेस करण्यासाठी याचा उपयोग करावा. त्याची सत्यता खूप उशिरा स्वतंत्र हिंदुस्थानच्या राज्यकर्त्यांना पटली’. सेल्युलर जेलमध्ये सावरकरांनी ग्रंथालय सुरू केले. अशिक्षित कैद्यांना पुस्तके वाचून दाखवून त्यांच्यात ते जागृती निर्माण करीत. १९१० मध्ये वीर सावरकरांना अंदमानमधील सेल्युलर जेलमध्ये पाठविले गेले. वामन जोशी, शंभुनाथ आझाद. जयदेव कपूर, बाहुकेश्वर दत्त, सच्चीनाथ, संम्याल, पंडीत परमानंद, लोकनाथ, बाळ गणेशचंद्र घोष, त्रिलोकनाथ चक्रवर्ती त्रैलोक्य महाराज अशी पुष्कळ नावे सावरकरांबरोबरीने घेतली जातात.
अशा या बेट समूहाचे स्वामित्व १९४७ साली ब्रिटिशांनी स्वतःकडे ठेवून रॉयल एअर फोर्स निर्माण करायचा घाट घातला होता. पण लॉर्ड माउंैट बॅटनच्या आग्रहाखातर ही बेटे स्वतंत्र हिंदुस्थानात सामील केली होती. हिंदुस्थानी घटनेप्रमाणे केंद्र सरकारच्या अखत्यारीतील सर्व तऱहेच्या घटना तरतुदी आणि प्रशासकीय कचेऱया येथे निर्माण केल्या आहेत. हिंदुस्थानचे सार्वभौमत्व आणि राष्ट्रीयत्व या प्रदेशात चांगले जपले जात आहे. हिंदुस्थानातील सर्व राज्यांतून, विशेषतः दक्षिणेकडील राज्यातून लोक येथे सर्वधर्मसमभावाने राहण्यासाठी आले आहेत. हिंदी भाषा चांगली जोपासली आहे. बेटांना सातत्याने भूकंप आणि त्सुनामीचा धोका व त्यासाठीची तयारी ठेवणे क्रमप्राप्त आहे. जंगल, लाकूडकाम, काही पिके याव्यतिरिक्त अंदमान निकोबार बेटसमूहांचा विकास आणि त्यांचे लक्ष्य (vision) तयार करताना केंद्र सरकारने पर्यावरणाची सांगड पर्यटनाशी घालून तेथील विकासाचा विचार करावा.
No comments:
Post a Comment