| Jun 11, 2017, 11:39 AM IST
+12 'दिव्य मराठी' पोहोचला सीमेवर.. 36 तास अक्षरश: श्वास रोखणारे; प्रत्येक क्षणी मृत्यूचा धोका
जम्मू-काश्मीर - कुपवाडा सेक्टरमधील उंचच उंच पहाड. ३० फूट जाड बर्फाच्या थरावर गस्त घालणारे जवान. प्रत्येक क्षणी मृत्यूचा धोका. किट्ट काळोखात टॉर्च तर सोडाच, आगपेटीही पेटवता येत नाही. आमच्या प्रतिनिधीने तेथे तब्बल ३६ तास व्यतीत केले. त्याचा हा थेट वृत्तांत...
कुपवाडा सेक्टरच्या १२ ते १५ हजार फूट उंच पर्वतांच्या शिखरांवर बर्फ वितळण्यास सुरुवात झाली आहे. हळूहळू पहाडी रस्ते खुले होत आहेत. त्यामुळे घुसखोरीचा धोका वाढला आहे. पाकिस्तान शस्त्रसंधीचे उल्लंघनही जास्त करत आहे. भारतीय चौक्यांवर हारा देत असलेले आपले जवान दुहेरी आव्हानांशी लढत आहेत.
पहिले :पाकिस्तानी लष्कर आणि घुसखोरांचा नि:पात करणे.
दुसरे :प्रतिकूल हवामानावर मात करणे. ही परिस्थिती ‘दिव्य मराठी’ने एलओसीवर जवानांसह पाहिली, त्यांच्यासोबत गस्तही घातली.
रात्री ७.४५ वाजता : एक सरसरता आवाज आला आणि सुरू झाला घुसखोरांचा शोध
बर्फाच्छादित पर्वतांची शिखरे सायंकाळच्या मिठीत विसावलेली. रात्रीचे आठ वाजताच एलओसीचे तारेचे कुंपण आणि चौक्या पूर्णपणे अंधारात बुडाल्या आहेत. अंधारात आव्हान एवढे वाढले आहे की, आपलीच चौकी दिसत नाही. असे असले तरी लाइट आणि माचिस उगाळण्यास सक्त मनाई आहे. ‘सतर्क, सक्षम, साहसी’ हे ध्येय वाक्य घेऊन सुभेदार देशराज राष्ट्रीय रायफलच्या गस्त आणि कुंपण पथकासह तारकुंपणापर्यंत पोहोचले आहेत. त्यांच्यासोबत हुंगणारी कुत्रीही आहेत. त्यांनी या पथकाला रायफल आणि इतर शस्त्रास्त्रे लोड करून ३०० फुटांच्या पहाडावर जाऊन गस्त घालण्याचे उद्दिष्ट दिले आहे. त्यांनी पथकाला शत्रूच्या हालचालींबाबत माहिती दिली आहे. सुभेदाराचा आदेश मिळताच दोन-दोन सैनिकांच्या जोडीने १०-१० फुटांचे अंतर राखून गस्त घालण्यास सुरुवात केली. नीरव शांततेत अनेकांचे डोळे शत्रूचा वेध घेत पुढे सरकत आहेत. येथे एकमेकांशी बोलण्यासही सक्त मनाई आहे. आवश्यकता असेल तर वॉकी-टॉकीने चर्चा करू शकतात, पण तीही इअरफोन लावून.
नाइट व्हिजन डिव्हाइस आणि कॅमेऱ्यांनी सज्ज असलेले सैनिक हळूहळू पुढे जात आहेत. पण सैनिक डोळ्यांपेक्षा कान जास्त सतर्क ठेवतात. हालचालीचा थोडासाही आवाज ऐकू आला की लगेच त्या ठिकाणी शोध सुरू होतो. त्याच वेळी कुंपणापलीकडून हळू आवाजात घंटी वाजली. मग वेेळ न दवडता पथकाने संपूर्ण भागाला घेराव घातला. नंतर शोधमोहीम सुरू झाली. जेथून आवाज आला तेथे हळूहळू पोहोचले. गुराख्यांनी सोडलेली जनावरे आणि खेचरे गवत खात असल्याचे समजले. पण तरीही सैनिक त्यावर थांबले नाहीत. संपूर्ण भागात शोध घेतला. आसपासच्या लहान गावांत परतलेल्या गुराख्यांची माहिती मिळाल्यावर त्यांची झडती घेण्यात आली. नंतर त्यांना सोडून देण्यात आले.
रात्री १०.०० वाजता : मी खुणेने विचारले-काय झाले?
उत्तर मिळाले-दहशतवादी असू शकतात थंडी वाढली आहे. सर्व गरम कपडेही कमी पडत आहेत. पथक शिखराकडे निघाले आणि आपल्या चौकीकडे आले. त्याच वेळी पाकव्याप्त काश्मीरमधील काही पाकिस्तानी चौक्यांत प्रकाशाची तिरीप दिसली. आमचे पथक सतर्क झाले. नाइट व्हिजन कॅमेऱ्यांद्वारे जवानांनी तिकडे पाहिले तर थोडीशी हालचाल दिसली. लगेचच संपूर्ण गस्त पथक कुंपणाजवळ पोझिशन घेऊन बसले. वाऱ्यालाही गप्प बसवले असावे एवढी नीरव शांतता. पण काहीच घडले नाही आणि नंतर गस्त सुरू झाली. सहकाऱ्यांच्या पोझिशनबद्दल सातत्याने विचारणा होत आहे. त्याच वेळी संशय आल्याने पथकाने कुंपणही ओलांडले आणि शत्रूचा शोध सुरू केला. काही मिळाले नाही.
मी खुणेने विचारले- तिकडे का? खुणेनेच उत्तर मिळाले-दहशतवादी किंवा पाकिस्तानी सैनिक दबा धरून बसलेले असू शकतात, त्यांनाही ठार मारायचे आहे. आम्ही पहाडाच्या शिखरावर पोहोचलो तेव्हा मागील बाजूने हजारो फूट खाली असलेल्या भारतातील शेवटच्या गावात मंदसा प्रकाश दिसला. दुसरीकडे त्या बाजूला कुठलीही हालचाल नाही. सीमेवर शांतता आहे, असे एका सैनिकाने वॉकी-टॉकीद्वारे गावातील दुसऱ्या लष्करी पथकाला सांगितले. सांगण्यात आले की, संपूर्ण गाव निद्राधीन आहे.
रात्री १.०० वाजता : अतिरेकी दिसावेत म्हणून ड्रॅगन लाइटचा झोत हजारो मीटरपर्यंत
भारतीय लष्कराच्या चौकीतून दुसरे पथक गस्तीसाठी तेथे आले आहे. सुभेदार देशराज आणि हवालदार सुमन कुमार आतापर्यंतच्या घडामोडींची माहिती या पथकाला देत आहेत. हवालदार इश्हाकच्या नेतृत्वात गस्तीसाठी आलेल्या दुसऱ्या पथकाने आपल्या क्षेत्राधिकारातील कानाकोपऱ्यात पुन्हा शोधमोहीम हाती घेतली आहे. सुरुवात होते कुंपणापासून. कुंपण तुटलेले नाही ना किंवा कुठून घुसखोरीचा प्रयत्न तर झाला नाही हेही तपासले जाते. खात्री पटल्यानंतर गस्ती पथक पुढे सरकते.
या पथकाकडील शस्त्रास्त्रांत एलएमजी आणि रात्रीच्या अंधारात दूरवर निशाणा साधू शकणाऱ्या स्निफर रायफलचाही समावेश आहे. हे पथक आपल्या दिशेने पुढे रवाना झाले. त्याच वेळी पहाडाच्या सर्वात उंच शिखरावरील चौकीतून ड्रॅगन लाइटचा प्रकाशझोत पडतो. हा लाइट संपूर्ण रात्रभर हजारो मीटरपर्यंत जातो, घुसखोरी रोखली जावी, हा हेतू. त्यात संशयित दिसताच चौकीच्या आसपासच्या आपल्या बंकरमध्ये तैनात जवान त्याला तिथेच गोळ्या घालतात. मी बंकरमध्ये जाऊन पाहिले तेव्हा एमएमजी म्हणजे मीडियम मशीनगनसह आपला सैनिक पोझिशन घेऊन उभा आहे. प्रत्येक बंकरमध्ये दोन-दोन सैनिक आहेत. या प्रकाशात किंवा दुर्बिणीद्वारे कोणी दिसले की, एक घंटी वाजवून तो दुसऱ्याला सतर्क करतो.
रात्री ३.३० वाजता : तारकुंपण बर्फाखाली, सैनिक दोराने पकडून घालतात गस्त
युनिटचे कमांडिंग ऑफिसर कर्नल एम. बी. सिंह हेडलाइट सुरू न करताच जिप्सीने जलद कारवाई दलासह स्वतंत्ररीत्या गस्तीवर निघाले आहेत. मीही त्यांच्यासोबत निघतो. हजारो फूट उंच पहाडी नागमोडी कच्च्या अरुंद रस्त्यावर जीप वेगाने पुढे जात आहे. कर्नल एम. बी. सिंह म्हणाले, एलओसीवर दिवसाऐवजी रात्री गस्त घालणे मोठे आणि कठीण आव्हान आहे. आम्हाला शत्रूवर नजर ठेवायची आहे आणि स्वत:ला त्यांच्या नजरेपासून वाचवायचेही आहे. प्रकाशाची जास्त गरज असेल तेव्हा छद्म दिवे लावतात. म्हणजे ते असतात एकीकडे आणि प्रकाश दुसऱ्या जागी पडतो. घातपातही अंधारातच होतो. थोडासाही आवाज झाला की त्या दिशेकडे न पाहताच शत्रूला गारद करण्याची क्षमता गस्ती पथकात आहे. पाच महिन्यांपर्यंत संपूर्ण चौकी आणि रस्ते ३० ते ४० फूट एवढे बर्फाच्छादित असतात. संपूर्ण भागाचा संपर्क खालून तुटतो, तेव्हा फक्त हेलिकॉप्टरचाच सहारा असतो. संपूर्ण तारकुंपण बर्फाखाली दबलेले असते. त्यावर ३० फुटांपर्यंत बर्फ असतो. सैनिक दोर धरून त्याआधारे गस्त घालतात. त्याच वेळी कर्नलही आले.
सकाळी ५.३० वाजता : रात्री शांतता होती तेथे आता गोळ्या-स्फोटांचे आवाज
सूर्यप्रकाशाची तिरीप पडण्यास सुरुवात झाली. गस्ती पथक आता बराकीकडे परत जात आहे. त्याच वेळी शिट्टीचा जोरदार आवाज ऐकू आला आणि झोपेत असलेले सैनिक अचानक बराकीतून बाहेर येत आहेत. सात वाजताच पीटी आणि योगासने सुरू झाली. काही तरुण सैनिक जिममध्ये जाऊन व्यायाम करत आहेत. हे पथक दररोज गस्त घालते, शस्त्रास्त्रे चालवण्यात पारंगत आहे. तरीही दररोज शस्त्रास्त्रे चालवण्याचा सराव होतो. सहा-सहांच्या गटाने सैनिक चौकीच्या आतच तयार केलेल्या एका निर्मनुष्य पहाडाजवळ जातात आणि तेथे टार्गेट बनवून आपली रायफल आणि मोठ्या शस्त्रास्त्रांनी वेध घेतात. रात्री जेथे सन्नाटा होता, तेथे आता गोळ्या-स्फोटांचे आवाज सुरू झाले आहेत. प्रत्येक गोळी शत्रूच्या वर्मी लागावी यासाठी जवळच उभे इन्स्ट्रक्टर आणि वरिष्ठ अधिकारी सातत्याने दुरुस्त्या करतात.
सकाळी ९.०० वाजता : कोपऱ्या-कोपऱ्याचा तपास, आता शत्रूवर स्पष्ट नजर
पुन्हा एकदा दिवसाच्या गस्तीसाठी पथक ब्रीफिंगनंतर रवाना होत आहे. रात्रीच्या गस्तीनंतर हे पथक पुन्हा कुंपणाच्या आत आणि बाहेर टप्प्या-टप्प्यावर तपासणीच्या तयारीत आहे. संपूर्ण खात्री पटल्यानंतरच ते पुढे सरकते. पण आता रात्रीसारखी स्थिती नाही. ना तो सन्नाटा आणि ना अंधार. दूरवरचे दिसते. शत्रूने काही कुरापत काढली तर त्याला सहजपणे चोख उत्तर दिले जाऊ शकते.
No comments:
Post a Comment