Total Pageviews

Tuesday, 20 June 2017

पाकसाठी अमेरिकन सापळा? By pudhari

या आठवड्याच्या अखेरीस राष्ट्रपतिपदाचे भाजप उमेदवार रामनाथ कोविंद यांचा अर्ज दाखल केला जायचा आहे. स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यात सहभागी व्हायचे आहेत. ते काम उरकले, मग विनाविलंब पंतप्रधान अमेरिका भेटीसाठी जाणार आहेत. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याच खास आमंत्रणावरून मोदी तिकडे जाणार असून, या भेटीला शिखर बैठक असेही मानले जात आहे. गतवर्षी आपल्या निवडणूक प्रचारात ट्रम्प यांनी वारंवार मोदींचा उल्लेख केलेला होता आणि त्यांच्या विजयानंतर मोदींनीही त्यांना शुभेच्छा पाठवल्या होत्या; पण ट्रम्प यांनी सत्तासूत्रे हाती घेऊन सहा महिने होत आले असतानाही, अजून या दोन नेत्यांची प्रत्यक्षात भेट होऊ शकलेली नाही. दरम्यान, अनेक जागतिक विषयात त्यांचे मतभेद समोर आले आहेत आणि अनेक बाबतीत सामंजस्यही दिसलेले आहे. अमेरिकनांनाच रोजगार मिळावा म्हणून आग्रही असलेल्या ट्रम्प यांनी सत्ता हाती घेताच परदेशी तंत्रज्ञ व कुशल कर्मचार्‍यांना व्हिसा नाकारण्याची वा त्यांची संख्या कमी करण्याची भूमिका घेतली. त्याचा मोठा फटका तिथे कामधंद्यासाठी जाणार्‍या भारतीयांना बसलेला आहे. त्याखेरीज पर्यावरणविषयक पॅरिस करारातून बाहेर पडताना ट्रम्प यांनी चीन व भारताला अधिक सूट मिळण्याविषयी प्रतिकूल मत व्यक्त केलेले होते. त्यालाही मोदींनी आक्षेप घेतलेला होता. अशा पार्श्‍वभूमीवर ट्रम्प यांनीच पुढाकार घेऊन मोदींना तिकडे येण्याचे आमंत्रण दिल्याने कुतूहल निर्माण होणे स्वाभाविक आहे; पण मोदी तिकडे जाण्यापूर्वीच ट्रम्प सरकारने सूचित केलेल्या काही गोष्टी व भूमिका पाकच्या पोटात धडकी भरवणार्‍या आहेत. त्यापैकी पहिली गोष्ट म्हणजे अफगाण प्रदेशात तालिबान्यांच्या बंदोबस्तासाठी वापरल्या जाणार्‍या ड्रोन हल्ल्याची व्याप्ती पाकिस्तानी प्रदेशातही होऊ शकते, हा इशारा! तो इशारा अमेरिका किती अंमलात आणेल याची शंका आहे; पण त्यातून भारताला खूश करण्याचा प्रयत्न ट्रम्प सरकार करते आहे, यात शंका नाही. मोदींच्या कारकिर्दीत अमेरिका व भारत यांचे संबंध खूप गुण्यागोविंदाचे झाले, यात शंका नाही; पण आता अकस्मात ट्रम्प यांनाही भारताची गरज वाटू लागण्याची प्राथमिक कारणे वेगळी असू शकतात. प्रामुख्याने मध्य आशियातील बिघडणारी राजकीय स्थिती आणि सौदीला आव्हान देणारे शिया व कतारी राजकारण यातून अमेरिकेचा गोंधळ उडालेला असू शकतो. त्यापासून कटाक्षाने अलिप्त राहिलेले चीन व भारत हे दोनच देश आहेत आणि त्यात भारत अमेरिकेला जवळचा वाटत असावा, असा याचा अर्थ आहे. जागतिक व आंतरराष्ट्रीय राजकारणात भारताने महत्त्वाच्या भूमिका घेण्यासाठी ट्रम्प प्रयत्नशील असावेत काय, अशी म्हणूनच शंका येते. म्हणजे भारत-पाक वितुष्टाचा संबंध आपोआप येतो. अफगाणिस्तानात अमेरिकन सेना दीर्घकाळ आहे आणि तिथे अफगाण लोकशाही प्रस्थापित करण्यासाठी अमेरिकेने खूप झळ सोसली आहे; पण त्यात मोठा व्यत्यय पाकमध्ये आश्रय घेतलेले तालिबान व पाकप्रणीत जिहादी आणत असतात. त्यांचा शस्त्रांनी पुरेसा बंदोबस्त होऊ शकलेला नाही. पाकला त्यासाठी शस्त्रांची व पैशांची मदत देऊनही परिणाम शून्यच मिळाला आहे. साहजिकच, अफगाणिस्तानात भारताला हस्तक्षेप करण्याची मोकळीक देऊन, तिथून पाकचे नाक दाबण्याच्या डावपेचांची कल्पना पुढे आणली जात असेल काय? अफगाण प्रदेशाच्या नव्या उभारणीत भारताने खूप सहाय्य केलेले आहे. भारतीय सेनेचा एक घटक असलेली सीमारस्ते संघटना तिथले मोठे हमरस्ते व महामार्ग उभारण्याच्या कामात अनेक वर्षे गुंतलेली आहे. त्याच संघटनेचा व पर्यायाने भारतीय सेनेचा अफगाण शांततेसाठी संयुक्तपणे उपयोग करण्याची कल्पना यातून आकाराला येऊ शकते. पाक सेना व त्यांनी पोसलेले जिहादी ही अवघ्या जगाची डोकेदुखी झालेली आहे. भारताला तर शेजारी म्हणूनच त्यांचा त्रास सोसावा लागतो आहे. त्याचा थेट उल्लेख ट्रम्प यांनी आपल्या सौदी भेटीत व मुस्लिम देशांच्या परिषदेत बोलताना केलेला होता. त्या दहशतीचा बळी भारत असल्याचे बोलून दाखवताना नवाज शरीफ यांना भेटही नाकारण्याचा ताठरपणा ट्रम्प यांनी दाखवला होता. आता त्याच्या पुढले पाऊल उचलले जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. म्हणजे एका बाजूला पाकची आर्थिक व लष्करी मदत कमी करणे, तर दुसरीकडे अफगाण सीमेवरूनही पाकसेनेची कोंडी करणे, असा खेळ होऊ शकतो. त्याचे अनेक पदर व छटा असतात. त्याचे तपशील सहसा समोर आणले जात नाहीत; पण इस्लामी दहशतवादाचे केंद्र व त्यामुळे अराजक माजलेला पाकिस्तान, ही अमेरिका व जगासाठी समस्या बनलेली आहे. त्याचा सर्वात मोठा बळी म्हणून भारतानेच पाकला ठेचावे, अशी काही कल्पना अमेरिकेने योजलेली असू शकते काय? आजवर चीनने पाकला खूप आश्रय दिला असला, तरी अमेरिका वा सौदी यांच्याच पैशांवर पाकने मस्ती केली आहे. त्या दोघांनी हात आखडता घेतल्यास पाकसेनेची नाकेबंदी होऊ शकते. अफगाण प्रदेशातली अशांती संपवण्यासाठी तशी काही संयुक्त योजना असल्याची चाहूल अमेरिकेतून मिळू लागली आहे. पाकविषयक कठोर पवित्रा आणि अमेरिकन लढाऊ विमानांच्या उत्पादनासाठी भारतीय कंपनीशी करण्यात आलेला करार; त्याची लक्षणे दाखवत आहे. ट्रम्प यांनी भारतीय पंतप्रधानांना अगत्याने आमंत्रण दिल्यानंतरच्या काही बातम्या व घटना त्याचीच चाहूल देत आहेत. त्यात जगाला डोकेदुखी झालेल्या पाकिस्तानची जिहादी नांगी ठेचण्याचा काही आराखडा अमेरिकेत शिजल्याचेच संकेत मिळतात

No comments:

Post a Comment