| Publish Date: Jun 05 2017 1:52AM
editorial
गेल्या काही महिन्यांपासून काश्मिरात आगडोंब उफाळलेला आहे. एका बाजूला नियंत्रणरेषेवर घुसखोरीचा प्रयत्न वाढलेला आहे; पण त्याला चोख उत्तर देत हे प्रयत्न हाणून पाडण्यात भारतीय सेना गर्क आहे. तर त्यात व्यत्यय आणण्यासाठी आधीच इथे येऊन बसलेल्या जिहादींचे घातपात चालू आहेत. म्हणजे सेनेला दुतर्फा लढावे लागत आहे. अशावेळी आझादी नावाच्या घोषणा देत गोंधळ घालणारे घोळके दगडफेकीसाठी पुढे करण्यात आलेले आहेत. या दगडफेक करणार्या गद्दारांचा बोलविता धनी पाकिस्तान आहे, हे वेगळे समजावून सांगण्याची गरज नाही; पण त्यांना इथून कोणीतरी नियंत्रित करत असतो, ही बाबही लपून राहिलेली नाही. दीर्घकाळ फुटीरवादी समजल्या जाणार्या नगण्य संघटनांवर तसे आरोपही झालेले आहेत; पण कायद्यातील पळवाटा शोधून त्यांनी आपली कातडी बचावलेली होती. आता ते कातडे व मुखवटेही फाटले आहेत. कारण दगडफेक करणारे घोळके व त्यांचे नियंत्रण करणार्या हुर्रियत नेत्यांच्या भानगडी उघड झाल्या आहेत. दगडफेक करणार्या काही तरुणांशी झालेल्या छुप्या कॅमेर्याच्या मुलाखती व अनेक आर्थिक व्यवहाराची कागदपत्रे यातून हुर्रियतच्या नेत्यांचा बुरखा फाटला आहे. त्याचा पहिला लाभ म्हणजे मोठ्या प्रमाणात अशा फुटीरवादी संघटनांची बाजू राष्ट्रीय माध्यमातून मांडली जात होती. आपल्यावर अन्याय होतो आहे आणि काश्मिरींची गळचेपी होत असल्याच्या तक्रारी मागल्या कित्येक वर्षांत चालू होत्या. त्यातून एकप्रकारची सहानुभूती जमा केली जात होती आणि पर्यायाने कठोर कारवाईचे मनोधैर्य खच्ची केले जात होते; पण काही पत्रकार व माध्यमांनी अशा हुर्रियत व आझादी ब्रिगेडची बारकाईने छाननी सुरू केली आणि त्यांचे पितळ साफ उघडे पडले आहे. त्यातून जी माहिती समोर आली तिने अनेक भारतीय राजकारण्यांचेही मुखवटे फाटले आहेत. साहजिकच, त्याचा परिणाम म्हणून पोलिस व लष्कराचे हात मजबूत झाले आहेत. ते किती मजबूत झाले त्याची प्रचितीच सध्या येत आहे. पहिली गोष्ट म्हणजे नियंत्रण रेषेच्या पलीकडे पाक ठाण्यांवर भडिमार सुरू झाला आहे. अधिकाधिक संख्येने जिहादी चकमकीत मारले जात आहेत आणि दुसरीकडे अशा गद्दारीला मिळणारी पैशाची रसद तोडण्याची ठाम सार्वत्रिक कारवाई सुरू झाली आहे. शनिवार आणि रविवारी लागोपाठ दोन दिवस काश्मीर खोर्यात व दिल्लीमध्ये दोन डझन धाडी एकाच वेळी घालण्यात आल्या. हुर्रियतच्या आर्थिक व्यवहार व उलाढालीची कुंडलीच कोथळ्यासारखी बाहेर आली आहे. नुसते हुर्रियतवालेच नाही, तर भारतीय राजकारणातल्या काही दिग्गजांचीही पापे त्यातून समोर येऊ लागली आहेत; पण या धाडीच्या निमित्ताने आणखी एक बाब नजरेत भरणारी घडली, हे विसरता कामा नये.
काही आठवड्यापूर्वी मेजर गोगोई नावाच्या एका सेनाधिकार्याने एका दगडफेक्याला आपल्या जीपवर बांधून दगडफेकीला लगाम लावून दाखवला होता. त्याचा गाजावाजा होऊनही सरकार त्याच्या पाठीशी उभे राहिले व सेनाप्रमुखांनी त्याला सन्मानपत्रच दिले. कारण गेल्या काही महिन्यांत चकमक वा घटनास्थळी जमा होऊन जवानांवरच दगड मारण्याचे प्रकार वाढले होते. जिथे जिहादी दडी मारून बसलेत, तिथे शोध चालू असताना जवानांच्या कामात व्यत्यय आणण्यासाठी जमावाच्या दगडफेकीचे हत्यार वापरले जात होते; पण त्यापेक्षाही मोठी कठोर कारवाई शनिवार व रविवारी चालू होती आणि तिथे फिरकण्याची हिंमत एकाही दगडफेक्याला झालेली नाही. भल्या पहाटे राष्ट्रीय तपास संस्थेचे अधिकारी पथके बनवून हुर्रियतचे नेते व त्यांच्या कार्यालयावर धाडी टाकायला पोहोचले. त्यांच्यासोबत स्थानिक पोलिस व केंद्रीय राखीव दलाचे जवान तैनात होते. इतकी मोठी सैनिकी फौज तैनात असताना, आपल्याच हुर्रियतच्या आझादीफेम नेत्यांना वाचवण्यासाठी कोणी काश्मिरी तरुणांचा घोळका तिथे फिरकला नाही. कोणी तिथे जमा होऊन दगडफेक केली नाही. या कामात व्यत्यय आणायला कुठल्या संस्था, संघटनेचे कार्यकर्ते जमा झाले नाहीत. इतक्या शांततापूर्ण वातावरणात काश्मिरात कित्येक वर्षांत कुठलेही सरकारी कार्य होऊ शकलेले नाही. धाडी ही खरी बातमी नसून, त्या धाडींमध्ये कुठलाही व्यत्यय येऊ शकला नाही, हीच खरी सनसनाटी बातमी आहे. नेहमी आझादीच्या घोषणा देत दगड फेकायला जमणार्यांचा उत्साह अकस्मात कसा मावळला? कधीही बहिष्कार वा हरताळाचे आदेश जारी करणार्या हुर्रियतच्या नेत्यांना आपल्याच घरावर धाडी पडत असताना असा काही आक्रमक पवित्रा घेण्याची हिंमत का झालेली नाही? त्याचे कारण सोपे आहे. सर्वकाही पैशांचा खेळ होता. ‘असतील शिते तर नाचतील भुते’, अशी एकूण काश्मीरच्या आझादीची रंगभूमी आहे. त्या रंगभूमीवर घातपात वा दंगल माजवण्यासाठी पैसे फेकून भुते गोळा केली जातात. मात्र त्या दंगलीत गोळीबार होणार नाही वा कोणाला जीव गमवावा लागणार नाही, अशी हमी आहे. ती हमी काढून घेतली गेली आणि पैशांचे पाठबळ जिथून मिळते, त्याच सोन्याच्या खाणीवर आघात होताच दगडफेक व आझादीच्या डरकाळ्या थंडावल्या आहेत. पाक सीमेपासून घातपाती बिळांसह हुर्रियत नेत्यांच्या अड्ड्यापर्यंत, एकाच वेळी हल्ला झाल्यावर काश्मीर थंडावू लागला आहे. हुर्रियतप्रमाणेच राजकीय पक्षांचे दिल्लीत बसलेले काही छुपे पाकप्रेमी सापळ्यात येतील, त्यानंतर काश्मिरात खरी शांतता प्रस्थापित होईल. पाकसेना वा तिथून येणार्या जिहादी फिदायिन हल्लेखोरांपेक्षा भारतातच दबा धरून बसलेल्या गद्दार लोकांचा धोका मोठा आहे आणि त्यांच्या मुळावर सध्याच्या धाडीने मोठा घाव घातला गेला आहे
No comments:
Post a Comment