उप पोलिस अधीक्षक मोहम्मद अयुब पंडित यांना मुसलमान जमावाने ठेचून ठार केल्याची घटना अंगावर शहारे आणणारी आहे. सर्व देश हादरला. काश्मीर खोरेही हादरले. लोकांनी, पत्रकारांनी, राजकीय नेत्यांनी जम्मू-काश्मीरच्या सरकारवर आग पाखडणे सुरू केले. राज्यातील कायदा व सुव्यवस्थेची जबाबदारी निश्चि-तच राज्य सरकारवर असते. पण, इथे जम्मू-काश्मिरात परिस्थिती वेगळी आहे हे सर्व जण जाणतात. तरीही पीडीपी-भाजपा युती सरकारवर नाही नाही त्या भाषेत टीका करण्यात आली. संपुआ सरकारच्या काळात बव्हंश: हा प्रदेश शांत राहिला आणि रालोआ आल्यावर, विशेषत: नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यावर काश्मिरात हिंसाचाराचा नंगा नाच सुरू झाला, असे एक चित्र सातत्याने रंगविणे सुरू झाले आहे. स्पष्टच सांगायचे, तर काश्मीरचा प्रश्नस न सुटणे, तो सतत चिघळत राहणे, हे सेक्युलर राजकीय पक्ष व मीडिया यांना हवेच आहे. कारण त्यांचे अस्तित्व त्यावर आहे. हे काम सोपे नाही, पण तरीही तो सोडवायचा आहे, हा त्यांचा निश्चाय आहे. आणि म्हणूनच, विरोधकांच्या तसेच मीडियाच्या दबाबतंत्राला भीक न घालता, ते आपल्या परीने पुढे जात आहेत. मागे लष्करी अधिकारी फयाज याला ठार करण्यात आले आणि आता मोहम्मद अयुबला. या दोन घटना, काश्मिरातील वातावरण बदलत असल्याच्या संसूचक आहेत. जोपर्यंत कुठल्याही चळवळीला किंवा आंदोलनाला जनतेचा पाठिंबा असतो, तोपर्यंत ती चळवळ किंवा आंदोलन निरस्त करता येत नाही. काश्मिरी जनतेच्या मनात दहशतवाद्यांविरुद्ध जोपर्यंत चीड निर्माण होत नाही, तोपर्यंत काश्मीर समस्येचे निराकरण होणे नाही. काश्मिरी लोकांच्या मानसिकतेत बदल होत असल्याचे, या दोन घटनांनी समोर आले आहे. दहशतवाद्यांनी काश्मिरी जनतेला इतकी वर्षे मूर्ख बनविले. आता लोकांचा भ्रमनिरास झाला आहे. त्यांना या आंदोलनातील फोलपणा कळून चुकला आहे. तिकडे दहशतवाद्यांमध्येही नैराश्य आहे. ते नैराश्य मग अशा दगडांनी ठेचून मारण्याच्या प्रसंगात प्रकट होत असते. एकतर लोकांना आता भारताच्या इतर राज्यांप्रमाणे शांततेत जगायचे आहे. या आंदोलनामुळे आपण जगाच्या फार मागे पडलो आहोत, याची जाणीव त्यांना होऊ लागली आहे. तसे नसते तर, काश्मिरी जनतेने पीडीपी व भाजपा यांना सरकार बनविण्यास बाध्य केले नसते. आता काश्मिरी जनता, जनताच जेव्हा दहशतवाद्यांचा ठावठिकाणा सांगणे सुरू करेल, त्या दिवसापासून काश्मीरचा प्रश्नज सुटण्याचा प्रारंभ होणार आहे, हे निश्चिात
काश्मिरियतला काळिमा
महंमद अयुब पंडित या पोलिस उपअधीक्षकाची काश्मीरमध्ये जमावाने ठेचून केलेली हत्या माणुसकीला काळिमा फासणारी तर आहेत; परंतु तेथील नागरिक ज्याचा गौरवाने उल्लेख करतात त्या काश्मिरियतलाही काळिमा फासणारी आहे. श्रीनगरमधील जामा मशिदीच्या परिसरात कर्तव्य निभावत असलेल्या पंडित यांनी जमावाला डिवचण्याचा कसलाही प्रयत्न केलेला नसताना त्यांची जमावाने अतिशय निर्घृण हत्या केली. एरव्ही भ्याड असलेलाही जमावात शूर होतो, हे खरे असले, तरी जबरदस्त फूस असल्याखेरीज जमावाकडून असे कृत्य होणे शक्य नाही. त्यामुळे जमावामागील बोलविता धनी शोधून कठोर कारवाई करण्याचे आव्हान पोलिस आणि सरकारसमोर आहे. गेल्या दीड वर्षांपासून धुमसत असलेल्या काश्मीरमधील कायदा सुव्यवस्था राखण्याच्या प्रयत्नात असलेले पोलिसच फुटीरतावाद्यांचे लक्ष्य होणे चिंताजनक आहे. पोलिसांची सहनशीलता संपल्यास सारे काही संपेल, हा मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांनी दिलेला इशारा योग्यच आहे. मात्र, त्यासाठी खुद्द मेहबूबा यांनाच कठोर होण्याची आणि राजकीय हितसंबंधांच्या पलीकडे जाण्याची गरज आहे. नॅशनल कॉन्फरन्सचे नेते ओमर अब्दुल्ला यांनीही निषेध व्यक्त केला असला, तरी त्यांनाही केवळ विरोधासाठी विरोध ही भूमिका सोडावी लागणार आहे. काश्मीरमधील फुटीरतावाद्याचे रक्तरंजित आंदोलन नवीन नसले, तरी गेल्या दीड वर्षापासून तिथे सुरू असलेला हिंसाचार थांबायलाच तयार नाही. फुटीरतावाद्यांना मिळत असलेला प्रतिसाद, तेथील जमावाकडून पोलिस आणि लष्करावर होणारे हल्ले वाढत असून, त्यांवर नियंत्रण मिळण्यात पोलिसांना आणि लष्कराला अपयश येत आहे. त्यामुळे परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे चित्र आहे. काश्मीरचा प्रश्न राजकीय असून, तेथील सर्व संबंधित घटकांशी चर्चा करून मार्ग काढणे योग्य असले, तरी त्यासाठीची पोषक स्थिती सध्या तिथे नाही, हे मान्य करायलाच हवे. तिथे जे वातावरण तयार केले गेले आहे, फुटीरतावाद्यांना जी रसद पुरविली जात आहे ते पाहता त्यामागील शक्तींचा अंदाज येऊ शकतो. या शक्तींना पाकिस्तानची फुस तर आहेच; परंतु त्यांना धार्मिक कट्टरपंथीयांचीही चिथावणी मिळत आहे. हुरियतच्या नेत्यांचे अलीकडचे त्यांचे वर्तनही चिंताजनक आहे. पंडित यांच्या हत्येनंतर हुरियतचे नेते मिरवैझ फारुक यांनी त्याचा निषेध केला असला, तरी त्यांच्यासारख्यांच्या चिथावणीमुळेच ही वेळ आली, हे उघडच आहे. पंडित यांची हत्या झाल्यानंतर काही मिनिटांतच मिरवैझ जामा मशिद परिसरात पोहोचले. त्यांना या प्रकाराची आधी कल्पना होती का, असाही प्रश्न उपस्थित होतो. काश्मीरमधील हिंसाचाराला लष्कर आणि पोलिसांना जबाबदार धरून फारुक मोकळे होऊ शकत नाहीत. तेही या हिंसाचाराला कारणीभूत आहेत. काश्मीरमध्ये आझादीच्या घोषणा घुमत असल्या, तरी तेथील बहुसंख्य नागरिक, तरुण भारताच्याच बाजूने आहेत. पोलिस भरतीला मिळणारा प्रतिसाद याची साक्ष देणारा आहे. पंडित हे पोलिस आहेत आणि त्यामुळे ते भारताच्या बाजूचे आहेत, अशा घोषणा देऊन जमावातील काहींनी मारहाण करण्यास सुरुवात केली, याचे कारणही हेच आहे. याच नागरिकांच्या मदतीने काश्मीरमधील परिस्थिती निवळण्यासाठी पावले टाकावी लागणार आहेत. त्यासाठीची धोरणे केंद्र आणि राज्य सरकारने वेगाने आखायला आणि राबवायला हवीत.
भारत हा झुंडींचा देश बनत चालला आहे की काय अशी भयशंका आज अनेकांच्या मनात उभी आहे. सातत्याने कुठून ना कुठून झुंडीने केलेल्या हिंसाचाराच्या बातम्या कानावर येत आहेत. दोन दिवसांपूर्वी श्रीनगरमध्ये एका पोलीस अधिकाऱ्याची जमावाने हत्या केली. नग्न करून दगडांनी ठेचून मारले त्यांना. त्याच दिवशी हरयाणात रेल्वेमध्ये १५-२० जणांच्या जमावाने एका तरुणाला जीव जाईपर्यंत मारले. त्याआधी.. कधी झारखंड, कधी हरयाणा, कधी राजस्थान, कधी महाराष्ट्र, तर कधी आसाम.. कधी अखलाक, तर कधी पहलू खान.. गणती तरी किती घटनांची करायची? आणि हे गेल्या काही वर्षांतच घडत आहे असेही नाही. महाराष्ट्रातील नागपूरने तर अशा किती तरी घटना पाहिल्या आहेत. १८ वर्षांपूर्वीची अक्कू यादव हत्या आजही अनेकांच्या स्मरणात आहे. त्यानंतर इक्बाल शेख, गफार डॉन, मोहनीश रेड्डी.. तेथील भरतवाडा परिसरात स्त्रीवेशातील तिघा जणांना जमावाने दगडांनी ठेचून ठेचून मारले होते. चोर समजून त्यांचा हा न्याय करण्यात आला. नंतर समजले ते चोर नव्हते, बहुरूपी होते. कधी चोर समजून, तर कधी मुले पळविणाऱ्या टोळीतील समजून, कधी एखाद्याच्या गुंडगिरीला वैतागून, तर कधी जात, धर्माच्या कारणावरून.. आता तर गोमाता हे एक नवीनच कारण तयार झाले आहे. गोवंशाची वाहतूक करणे हा माणसाला ठेचून ठार मारण्याचा गुन्हा झाला आहे. कारणे वेगवेगळी असली, तरी ती फारशी महत्त्वाची नाहीत. महत्त्वाचे आहे ते जमावाचे पाशवीपण. ते अधिक घाबरविणारे आहे. कारण त्यातून आपण एक समाज म्हणून कोणत्या गर्तेत चाललो आहोत हेच दिसते आहे. ही गर्ता क्रौर्याची आहे, जंगली कायद्याची आहे, संस्कृतिहीन समाजाची आहे. प्रश्न आहे तो हे सारे आले कोठून? अजूनही या देशात कायद्याचे राज्य आहे. व्यवस्था आहे. अजूनही येथे माणसेच राहतात. पण ही माणसे एकत्र आली की त्यांच्या मनात ही श्वापदे कोठून जन्माला येतात? माणसांची साधी गर्दी, जमाव आणि झुंड यांत एक फरक असतो. झुंडीत माणसाचे बोध व्यक्तित्व लोपलेले असते. त्याचे अबोध सामूहिक व्यक्तित्वात रूपांतर झालेले असते. माणसाचे स्वतंत्र व्यक्तिमत्त्वच गळून पडते त्यात. तर्कशुद्ध विचारांना फारकत घेतो. भावनावश, विकारवश असे त्याचे व्यक्तिमत्त्व बनते. जे माणसाचे, तेच झुंडीचे. समोरील परिस्थिती हीच त्याची प्रेरकशक्ती बनते. तिला तो प्रतिसाद देतो. सुसंस्कृत समाजाला भय वाटावे ते या प्रतिसादाचे. प्रत्येकाच्या मनात आदिम भावना असतातच. त्या दडपणे यात माणूसपण असते. ते गमावले जाणे हे कोणा एकेकटय़ा व्यक्तीकरिताच नव्हे, तर संपूर्ण व्यवस्थेकरिता घातक असते. म्हणून व्यवस्थेने स्वत:ला सातत्याने भक्कम ठेवायचे असते. आज त्या व्यवस्थाच शक्तिहीन झाल्या आहेत. हे एका दिवसात घडलेले नाही. पण आता जणू ती प्रक्रिया पूर्णत्वास गेली आहे. माणसे एकत्र येताच त्यांच्या झुंडी बनत आहेत. एरवी नेवाळीत महिला पोलिसांचा विनयभंग होता ना, काश्मिरात पोलिसाला मारले जाते ना. एरवी माणसापेक्षा गाय नावाचा पशू अधिक किमती ठरता ना. ही सारी हिंसा करणारे लोकच तेवढे दोषी आहेत असेही मानता कामा नये. कारण त्यांच्या या कृत्याला समर्थन देणाऱ्या मेंदूंच्या झुंडी आज घराघरांत आहेत. त्या कधी सभा-संमेलनांतून, कधी समाजमाध्यमांतून या झुंडींना बळ पुरवीत आहेत.. देशात म्हणून ही श्वापदे मोकाट सुटली आहेत.
No comments:
Post a Comment