Total Pageviews

Saturday, 3 June 2017

अरुंधतीचे भारतविरोधी फूत्कार!-TARUN BHARAT -CHARUDUTT KAHU-‘भारताने खोर्‍यातील सैन्यसंख्या सात लाखाहून ७० लाख केली, तरी त्यांना काश्मिरात जे साध्य करायचे आहे, ते शक्य होणार नाही!’’ अरुंधतीच्या या विधानावर सोशल मीडियामध्ये टीकात्मक प्रतिक्रिया उठणे स्वाभाविकच होते. त्यावर संतप्त होऊन परेश रावल या अभिनेत्याने आणि खासदाराने अतिशय तिखट प्रतिक्रिया दिली- ‘‘लष्कराच्या लोकांनी दगडफेक करणार्‍या युवकांना जीपपुढे बांधण्याऐवजी अरुंधती रॉय यांना बांधून फिरवावे!’’ या शब्दांत रावल यांनी अरुंधतीला फटकारले.

तिसरा डोळा ‘ पण, यामुळे खूपच गोंधळ झाला. टीका वर्मी बसल्याने अरुंधतीचे माध्यमांमधील पाठीराखे संतप्त झाले आणि त्यांनी परेश रावल यांनाचा लक्ष्य करणे सुरू केले… भारतीय राज्यघटनेने या देशातील प्रत्येकच नागरिकाला अभिव्यक्तिस्वातंत्र्य दिले आहे. ते भारतातच आहे, असे नाही. अनेक देशांतील नागरिकांनी या स्वातंत्र्याला आपल्या दैनंदिन जीवनाचा भाग बनवताना, आपल्या देशाच्या नीतिमूल्यांचा र्‍हास होणार नाही, आपल्या देशाची परंपरा धुळीस मिळणार नाही, आपले राष्ट्रपुरुष, सन्मानचिन्हे यांचा अवमान होणार नाही, राष्ट्रध्वजाची विटंबना होणार नाही याचे भान जपले आहे. पण, भारतातील काही मंडळी सातत्याने येथे अभिव्यक्तिस्वातंत्र्याचा गळा घोटला जात असल्याचा कांगावा करतात आणि आपल्या देशाची जगात बदनामी कशी होईल, अशीच त्यांची कृतीसुद्धा असते. कोणत्याच देशात सातत्याने देशविरोधी विधाने, कृत्ये करणार्‍या व्यक्तींची भाषा खपवून घेतली जात नसावी. पण, भारतात अशा लोकांचे भरपूर पीक असून, येथील माध्यमांना विशेषतः इंग्रजी माध्यमांना त्यांच्याचबद्दल कळवळा आहे. त्यांची विधाने भडकपणे दाखवण्यातही त्यांना स्वारस्य आहे. भारतीयत्व, भारत आणि भारतातील चांगुलपणाबद्दल जे काही चांगले बोलले जात असेल, त्याविरुद्ध आवाज बुलंद करणार्‍यांमध्ये बुकर पुरस्कार विजेत्या लेखिका अरुंधती रॉय यांचे नाव अग्रक्रमाने घ्यावे लागेल! काही दिवसांपूर्वी एका पोर्टलने अरुंधती रॉय यांच्या एका देशविरोधी विधानाचा व्हिडीओ व्हायरल करून खळबळ उडवून दिली. त्यात अरुंधती म्हणतेय्, ‘‘काश्मीर, गोवा, पंजाब, हैदराबाद, मिजोरम, मणिपूर, नागालॅण्ड ही राज्ये भारताची अभिन्न अंग नसून, भारताने त्यावर बेकायदेशीर कब्जा केलेला आहे.’’ पुढचे तिचे विधान अधिकच आक्षेपार्ह आहे. ती म्हणते, ‘‘भारतीय लष्कर काश्मिरी लोकांविरुद्ध बलात्काराचे अस्त्र वापरत आहे. भारतीयांनी काश्मीर आणि ईशान्येकडील राज्यांमध्ये आपल्याच लोकांविरुद्ध युद्ध पुकारलेले आहे. या समस्येवर तोडगा काढायचा असेल, तर काश्मीरला भारतापासून आझादी देणे, हाच एकमेव उपाय आहे.’’ आता बोला! ही विधाने देशद्रोही नाहीत का? पण, अरुंधती रॉय अशी वादग्रस्त विधाने करूनही अभिव्यक्तिस्वातंत्र्याच्या नावाने बोटं मोडायला मागे-पुढे पाहत नाही. अरुंधती म्हणाली, ‘‘भारताने काश्मीरमध्ये जे लक्ष्य साध्य करायचे ठरविले आहे, ते तो साध्य करू शकत नाही.’’ काश्मीर खोर्‍यातील परिस्थिती सध्या तणावपूर्ण आहे, हे आपण सारे जाणतोच. तेथील स्थिती काबूत आणण्यासाठी भारत सरकार, जम्मू-काश्मीर सरकार आणि भारताच्या लष्कराचे जवान दिवसरात्र प्रयत्न करीत आहेत. या परिस्थितीत समजूतदारपणा दाखवून शांत बसणे किंवा भारताचे मनोबल वाढविण्याचे सोडून अरुंधती रॉय काश्मीरच्या आझादीचा राग आळवत बसल्या आहेत. श्रीनगर येथील त्यांच्या दौर्‍यात त्या म्हणाल्या, ‘‘काश्मीरमधील भारताचे आक्रमण लाजिरवाणे आहे. नवी दिल्लीच्या दडपशाहीने काश्मिरींचा संघर्ष कमकुवत होणार नाही. भारताने खोर्‍यातील सैन्यसंख्या सात लाखाहून ७० लाख केली तरी त्यांना काश्मिरात जे साध्या करायचे आहे, ते शक्य होणार नाही!’’ त्यांच्या या अशा विधानावर सोशल मीडियामध्ये टीकात्मक प्रतिक्रिया उठणे स्वाभाविकच होते. त्यावर संतप्त होऊन परेश रावल या अभिनेत्याने आणि खासदाराने अतिशय तिखट प्रतिक्रिया दिली- ‘‘लष्कराच्या लोकांनी दगडफेक करणार्‍या युवकांना जीपपुढे बांधण्याऐवजी अरुंधती रॉय यांना बांधून फिरवावे!’’ या शब्दांत रावल यांनी अरुंधतीला फटकारले. पण, यामुळे खूपच गोंधळ झाला. टीका वर्मी बसल्याने अरुंधतीचे माध्यमांमधील पाठीराखे संतप्त झाले आणि त्यांनी परेश रावल यांनाच लक्ष्य करणे सुरू केले. अखेर वाद वाढू नये म्हणून परेश रावल यांनी या विधानापासून फारकत घेतली. पण, त्यांच्या या कृतीमुळे अरुंधती रॉय यांनी केलेल्या चुकांवर पांघरूण घातले जाऊ शकत नाही. मध्यंतरी देशात असहिष्णुतेचे वातावरण असल्याची कुरकुर करून, पुरस्कार परत करणार्‍यांच्या टोळीत अरुंधती आघाडीवर होती. पुण्यात एफटीटीआयमध्ये झालेल्या आंदोलनालाही तिने पाठिंबा देऊ केला होता. १९९७ मध्ये अरुंधतीला, तिने लिहिलेल्या ‘गॉड ऑफ स्मॉल थिंग्ज’ या कादांबरीसाठी बुकर पुरस्कार मिळाला. पण, यामुळे तिचा भारतविरोधी सूर अधिकच टीपेला पोचला. तिने आपले कार्यक्षेत्र बदलले आणि आता ती पूर्णवेळ मानवाधिकार कार्यकर्ती म्हणून भारतात धुडगूस घालत आहे. भारतासह अनेक विकसनशील देशांमधील विकासात्मक कामे थांबविण्यात अभिरुची असलेल्या अनेक आंतरराष्ट्रीय गैरसरकारी संस्थांची प्रवक्ता म्हणून ती जबाबदारी पार पाडत आहे. भारताच्या अण्वस्त्र धोरणाला तिचा विरोध आहे. त्याचप्रमाणे भारताच्या औद्योगिकीकरणाविरोधात आणि आर्थिक विकासाच्या विरोधात ती सातत्याने भूमिका घेत आली आहे. औद्योगिकीकरणामुळे भारतात रोजगाराच्या शेकडो संधी उपलब्ध होतील आणि तेच तिला नकोय्. हीच भूमिका अमेरिका आणि विदेशी देणग्यांमुळे पोसल्या जाणार्‍या स्वयंसेवी संस्थांची आहे. भारतातील विकास प्रकल्प भांडवलदारधार्जिणे असून, ते गरिबांची गळचेपी करणारे आहेत, असे ती मानते. भारताचा अणुप्रकल्प आणि अण्वस्त्रनिर्मिती ही मिजोरम आणि नागालॅण्डमधील आदिवासींविरोधी असल्याचाही ती कांगावा करते. अटलबिहारी वाजपेयी यांच्या सरकारच्या कार्यकाळात तिने केलेल्या चुकीच्या प्रचाराचा आधार घेत, विदेशी संस्थांनी राजस्थानच्या पोखरण येथे झालेल्या अणुचाचणीचा विरोध केला होता. नर्मदा नदीवरील सरदार सरोवरामुळे ५० हजार गावकरी विस्थापित होतील, असा दावा करून अरुंधतीने, मेधा पाटकर यांच्यासोबत नर्मदा बचाव आंदोलनात उडी घेतली होती. खरे तर या प्रकल्पामुळे गुजरातचा कायपालट झाला, परिसरातील भूमी सुजलाम्-सुफलाम् झाली. चौकशीअंती अरुंधती रॉय यांना, या प्रकल्पाचे काम ठप्प करण्यासाठी कोट्यवधी रुपयांच्या विदेशी देणग्या मिळाल्याचे उघड झाले. हा पैसा पुनर्वसनासाठी वापरण्यात आल्याचा दावा तिने केला असला, तरी खर्चाचा तसा कुठलाच तपशील कुणाला उपलब्ध करून दिलेला नाही. कोण आहे ही अरुंधती रॉय आणि का ती सातत्याने भारतविरोधी भूमिका घेते? याची माहिती जाणून घेणे औचित्यपूर्ण ठरावे. ‘सुझाना अरुंधती रॉय’ हे नाव पुस्तक वाचकांसाठी आणि चित्रपट कलाकारांसाठी नवे नाही. तिने अनेक पुस्तके लिहिली असून, त्यातील काही प्रचंड लोकप्रिय झाली. तिचा जन्म शिलॉंग, मेघालयचा. राजीव आणि मेरी रॉय यांची ही मुलगी. मेरी रॉय या मल्याळी सीरियन ख्रिश्‍चन आणि महिलांच्या हक्कांसाठी लढणार्‍या कार्यकर्त्या. पण, अतिशय बंडखोर प्रवृत्तीमुळे तिच्या आईचा घटस्फोट झाला आणि ती आई व एका भावासह केरळमध्ये आली. कोट्‌टायमच्या ख्रिस्ती शाळेत तिचे शिक्षण झाले आणि नंतर तिने दिल्लीत स्थापत्यशास्त्राची पदवी मिळविली. त्यानंतर तिने गेरार्ड दा कुन्हा याच्याशी विवाह केला. तोदेखील स्थापत्यशास्त्राचाच विद्यार्थी. पण, उभयतांचे फार काळ पटले नाही आणि ही दोघं विभक्त झाली. एनडीटीव्हीचे मालक प्रणव रॉय यांची चुलत बहीण, ही अरुंधतीची आणखी एक ओळख आहे. तिचा दुसरा विवाह प्रदीप क्रिशन या चित्रपट निर्मात्याशी झाला. तिने त्यांच्या एका चित्रपटात भूमिकादेखील केली. काही वर्षांनी तिचा प्रदीप क्रिशेन यांच्यासोबत घटस्फोट झाला. भारताबद्दल खोटी आणि चुकीची माहिती पसरविण्याच्या आरोपाखाली तिच्याविरुद्ध सर्वोच्च न्यायालयाने अवमानना नोटीस जारी केली होती. प्रारंभी तिने माफी मागण्यास आणि दंड भरण्यास नकार दिला. पण, ज्या वेळी किमान तीन महिन्यांसाठी तुरुंगाची हवा खावी लागेल, याची खात्री पटली तेव्हा तिने २५०० रुपये भरले, न्यायालयाची माफी मागितली आणि या प्रकरणातून आपली सुटका करवून घेतली. भारतविरोधाची तिची कहाणी येेथेच संपत नाही. भारतातील अनेक विकासकामांमध्ये खोडा घालणार्‍यांमध्ये ती अग्रणी आहे! कधी नर्मदा बचाओ आंदोलनात भाग घे, तर कधी येथील अणुऊर्जा प्रकल्पांना विरोध कर, अशा तिच्या कुरापती सतत सुरू राहिल्या. २००१ मध्ये संसदेवर झालेल्या हल्ल्यामधील प्रमुख आरोपी अफजल गुरू याला न्यायालयाने ठोठावलेल्या शिक्षेला तिने विरोध केला. न्यायालयाने केवळ परिस्थितिजन्य पुराव्यांवर विसंबून अफझलला शिक्षा ठोठावू नये, असे विधान तिने केले होते. मुंबईत झालेल्या बॉम्बस्फोेट मालिकांनी किती जणांचे बळी गेले हे आपण जाणतोच. त्या २६/११च्या मुंबई हल्ल्यासाठी पाकिस्तानला दोष देता येणार नाही, असे वक्तव्य करून तिने स्वतःची वैचारिक पातळी किती खालची आहे, हे जगाला दाखवून दिले. हा विषय आपण व्यापक दृष्टिकोनातून समजून घेतला पाहिजे, याला क्षेत्रीय इतिहासाची पार्श्‍वभूमी आहे. प्रचंड प्रमाणातील दारिद्र्य, भारताची फाळणी, मुस्लिमांविरुद्धचे अत्याचार आणि काश्मीर प्रश्‍न ही या हल्ल्यामागची कारणे असल्याचे नमूद करून तिने, स्फोट घडविणार्‍या मनोवृतींची पाठराखण केली होती. मुंबई हा भारताचा भाग नसून तो पाकिस्तानचा असायला हवा होता, असाही दावा तिने त्या वेळी केला होता. २००८ मध्ये तर अरुंधती रॉयने भारतविरोधाची अत्युच्च पातळी गाठली. पाकच्या सहकार्याने फोफावणार्‍या अतिरेक्यांशीच हातमिळवणी करून तिने काश्मीरला भारतापासून आझाद करण्याच्या मागणीसाठी मोर्चा काढला. १८ ऑगस्ट २००८ रोजी श्रीनगरमध्ये तब्बल पाच लाख विघटनवाद्यांच्या मोर्चाचे नेतृत्व करून अरुंधतीने काश्मीरच्या आझादीची मागणी बुलंद केली. नोव्हेंबर २०१० मध्ये अरुंधती, सैद अली शाह गिलानी आणि इतर पाच जणांना राष्ट्रद्रोहाच्या आरोपावरून दिल्लीत आणण्यात आले. तिने २१ ऑक्टोबर २०१० रोजी ‘आझादी ः द ओन्ली वे’ यावर परिसंवाद आयोजित केला होता. यावरून हिंसाचाराला प्रोत्साहन देणे आणि भारताविरुद्ध युद्ध छेडण्याच्या आरोपाखाली तिच्यासह इतर विघटनवाद्यांविरुद्ध प्राथमिक सूचना अहवाल दाखल झाला होता. त्या वेळी तिने काश्मीर हे कधीच भारताचे अभिन्न अंग नव्हते, असा दावा केला होता. अरुंधती एक कलाकार आहे, लेखिका आहे आणि मानवाधिकार कार्यकर्तीदेखील आहे. तिच्या बहुआयामी व्यक्तिमत्त्वाकडे बघता, तिच्याकडून परिपक्व वागणुकीची देशवासीयांची अपेक्षा आहे. तिने पाकिस्तान अथवा कुठल्या बाह्य देशाच्या नव्हे, तर या देशाच्या, भारताच्या नागरिकांच्या आशा-आकांक्षांच्या पूर्तीसाठी काम करावे, असे अपेक्षिले जात आहे. पण, तिच्या सातत्यपूर्ण भारतविरोधी विधानांमुळे भारतीय समाजमन क्रुद्ध झाले आहे. वरवर शांत दिसणार्‍या या मनाचा भडका उडाल्यास अरुंधतीची काही खैर नाही…

No comments:

Post a Comment