June 17, 2017 05:30:28 AM प्रहार 0 Comment
महानगरी मुंबईत १२ मार्च १९९३ रोजी तेरा साखळी बॉम्बस्फोटांनी महासंहार घडवून साडेतीनशे निरपराध्यांचे बळी घेणा-या कटातील मुख्य आरोपी अबू सालेमला न्यायालयाने दोषी ठरवले आहे. सालेमसह मुस्तफा डोसा, फिरोज खान, ताहीर र्मचट, करीमुल्ला शेख हे सुद्धा दोषी ठरले आहेत, तर अब्दुल्ल कय्यूमला मात्र कोर्टाने निर्दोष ठरवले आहे. साखळी बॉम्बस्फोटांत एकूण १२९ आरोपी असून १०० आरोपींना टाडा न्यायालयाने दोषी ठरवून ६ महिने ते मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा त्यांच्यावरील आरोपांनुसार सुनावली आहे. तर दाऊद इब्राहिम, टायगर मेमन, अनीस इब्राहीम यांसह एकूण २७ आरोपी अद्याप फरार आहेत. १९९३ मध्ये झालेल्या साखळी बॉम्बस्फोटांत २५७ जण मृत्युमुखी पडले होते, तर ७१३ जण जखमी झाले होते. एकूण २७ कोटी रुपयांच्या मालमत्तेचे नुकसान झाले होते. मुंबईत त्यावेळी दुपारी दीड ते चापर्यंत १३ साखळी बॉम्बस्फोट झाले. अनेक वास्तू आणि वाहनेही उद्ध्वस्त झाली. हजारो लोक रक्तबंबाळ झाले. मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी असल्यामुळेच पाकिस्तानच्या चिथावणीने दहशतवाद्यांनी अत्यंत नियोजनपूर्वक हे स्फोट घडवताना जास्तीत जास्त मनुष्यहानी व्हावी अशीच ठिकाणे निवडलेली होती. दुपारी दीड वाजता मुंबई शेअर बाजारात पहिला स्फोट झाला. त्या पाठोपाठ दुपारी २.१५ वाजता नरसी नथ्था भागात, २.३० वाजता शिवसेना भवनजवळ तिसरा आणि त्यापाठोपाठ अवघ्या तीन मिनिटांनी एअर इंडियाच्या कार्यालयात स्फोट झाला होता. सेंच्युरी बाजार, माहीम, झवेरी बाजार, सी रॉक हॉटेल, प्लाझा चित्रपटगृह, जुहू सेंटर हॉटेल, सहारा विमानतळ या ठिकाणी हे स्फोट झाले होते. एवढे मोठे स्फोट झाल्यावरही जिद्दीच्या मुंबईकरांनी अवघ्या चार दिवसांत पुन्हा आपले उद्योग व्यवसाय सुरू केले होते. मुंबईच्या धैर्याला तेव्हा जगानेही सलामी दिली होती. हे बॉम्बस्फोट घडवण्यासाठी ३ हजार किलो आरडीएक्स पाकिस्तानातून आणले होते. त्यापैकी फक्त १० टक्के आरडीएक्सचा वापर केला होता. या बॉम्बस्फोटांचा मुख्य सूत्रधार म्हणून याकूब मेमनला २०१५ मध्येच फाशी देण्यात आली आहे. व्यवसायाने चार्टर्ड अकाऊंटंट असलेल्या याकूब मेमननेच पाकिस्तानातून मुंबईवर हल्ला करण्याचा कट कृतीत आणण्यासाठी दाऊद इब्राहिमला साथ दिली होती. भारतातले काही दहशतवादी आणि समाजकंटक त्याच्या जाळ्यात अडकले होते. मुंबईतल्या साखळी बॉम्बस्फोटांनी महानगरी मुंबईसह सारा देशही हादरला होता. न्यायालयाने शुक्रवारी दोषी ठरवलेले याकूबचे कृतिशील साथीदार मिळाले नसते तर दाऊद इब्राहिमला मुंबईत बॉम्बस्फोट घडवणे शक्य झाले नसते. न्यायालयाने दोषी ठरवलेल्या या आरोपींच्या शिक्षेसंदर्भात सोमवारपासून सुनावणी होणार आहे. या खटल्यात सालेमसह त्याचे अन्य साथीदार दोषी ठरणे म्हणजे सर्वसामान्य जनतेच्या भावनांचेच प्रकटीकरण मानायला हवे. मुंबईतील शेकडो निरपराध्यांचे हत्याकांड घडवणा-या या नराधमांना न्यायालयाने कोणतीही दया दाखविण्याची गरज नाही, हीच सामान्यांची अपेक्षा आहे. दहशतवाद्यांची गय केली जात नाही, असा संदेश सीमेपलीकडे लपून बसलेल्या दहशतवाद्यांना मिळेल असे मुंबईतील नागरिकांना अपेक्षित आहे. मुंबईत १९९३ मध्ये झालेल्या साखळी स्फोटांचा कट पाकिस्तानातच रचला गेला होता. त्यानंतर मुंबईसह देशाच्या विविध भागांत दहशतवाद्यांनी घडवलेल्या बॉम्बस्फोटांच्या मागे पाकिस्तानचाच हात होता. या सर्व आरोपींना पाकिस्तानची सक्रिय मदत होती आणि पाकिस्तानातूनच मोठय़ा प्रमाणात आरडीएक्स स्फोटकांचा साठा मुंबई परिसरातल्या समुद्र किना-यावर उतरवला गेल्याचे चौकशीत निष्पन्न झाले आहे. मुंबई पोलिसांनी प्रयत्नांची शर्थ करून मुंबईत स्फोट घडवणा-या गुन्हेगारांना पकडले आणि न्यायालयात त्यांच्याविरुद्ध सबळ पुरावेही दाखल केले होते. पोलिसांनी केलेल्या कसून चौकशीमुळेच हे गुन्हेगार दोषी ठरले आहेत
No comments:
Post a Comment