आजही एखाद्या शाळेला, बागेला, ग्रंथालयाला, रस्त्याला साने गुरुजींचे नाव दिलेले आपण वाचतो.
साने गुरुजींचे हजेरीपटावरचे नाव पांडुरंग सदाशिव साने. या पांडुरंगाने पंढरपूरचे पांडुरंगाचे मंदिर सर्व जाती-धर्मांसाठी खुले केले ही, त्यांच्या आयुष्यातील मोठी कमाई! गुरुजींची आर्थिक परिस्थिती अत्यंत नाजूक होती. तरीही त्यांनी एम. ए. पर्यंतचे शिक्षण घेतले. हे शिक्षण घेताना कधी त्यांना माधुकरी मागावी लागली, कधी वार लावून जेवावे लागले, तर कधी डाळ मुरमुरे खाऊन अर्धपोटी-उपाशी झोपावे लागले. पण त्यांनी शिक्षणाचा ध्यास कधी सोडला नाही. गुरुजी अमळनेरच्या शाळेत शिक्षक झाले. त्यांनी मुलांना ज्ञान तर दिलेच; पण प्रेम, भक्ती, सेवा, कृतज्ञता यांचेही संस्कार दिले. खऱ्या अर्थाने गुरुजी हे नामाभिधान त्यांनी सार्थ केले.
1924 ते 1930 अशी सहा वर्षे गुरुजींनी वर्गात प्रत्यक्ष अध्यापन केले. शाळेत मुलांचे “विद्यार्थी’ नावाचे मासिक चालवले. गुरुजी शिक्षक, लेखक, कवी, पत्रकार, समाजसेवक, कथानिवेदक अशा अनेक भूमिका पार पाडत होते. त्यांचा “पत्री’ नावाचा काव्यसंग्रह फार गाजला. त्यातली “खरा तो एकचि धर्म, जगाला प्रेम अर्पावे।’ ही कविता फारच गाजली. आजही शाळाशाळांमधून ही कविता गायली जाते. तिला प्रार्थनेचे रूप आले आहे. ज्ञानेश्वरांच्या पसायदानातिकीच लोकमान्यता तिला मिळाली आहे.
पुढे भारतीय स्वातंत्र्याचे आंदोलन तीव्र बनत गेले आणि गुरुजींनी त्यात उडी घेतली. त्यांच्या दृष्टीने गांधीजी हे स्वातंत्र्यसूर्य होते. मग गुरुजींनी खादीचा प्रचार आणि प्रसार केला. गांधीजींची विचारधारा लोकांना सांगितली. कॉंग्रेससाठी अर्थसहाय्य मागितले. त्यासाठी भाषणे केली. तुरुंगवास पत्करला. या धामधुमीत लग्न करायचे राहूनच गेले. त्यांनी देशाचाच संसार केला. गुरुजींनी “कॉंग्रेस’ नावाचे साप्ताहिक चालवले. नंतर “साधना’ नावाचे साप्ताहिकही सुरू केले. अजूनही ते पुण्यातून ते प्रसिद्ध होते. गेली 69 वर्षे ते समाजवादी विचारांची पेरणी करते आहे. समाजमने घडवीत आहे.
1932 साली गुरुजी धुळ्याच्या तुरुंगात होते. तेथे आचार्य विनोबाही होते. राजकैदी म्हणून त्यांना तेथे ठेवले होते. तेथे त्यांना कष्टाची कामे करावी लागत. विनोबा तेथील कैद्यांना दर रविवारी गीतेवर प्रवचन देत. त्यांनी अठरा अध्यायांवर अठरा प्रवचने दिली. कैद्यांनी ती मनोभावे ऐकली. या ऐकणारांमध्ये साने गुरुजीही होते. त्यांनी विनोबांचा शब्दन्शब्द टिपून घेतला. पुढे त्याला ग्रंथरूप प्राप्त झाले. “गीता प्रवचने’ या नावाने तो ग्रंथ सर्वत्र पोहोचला. विनोबांसारखा रसाळ वाणीचा निरुपणकार आणि गुरुजींसारखा सिद्धहस्त लेखक यांच्या संयोगातून तो अक्षरग्रंथ सिद्ध झाला. धुळ्याच्या तुरुंगात त्याची निर्मिती झाली. तुरुंग काही वाईट नसतात. तेथे बऱ्याच वेळा अक्षरवाङ्मयाची निर्मिती झालेली दिसते. लोकमान्य टिळकांचा “गीतारहस्य’ ग्रंथ मंडालेच्या तुरुंगात सिद्ध झाला. सावरकरांचे “कमला’ नावाचे महाकाव्य अंदमानच्या कोठडीत प्रसवले. पंडित नेहरूंनी “भारताचा शोध’ नावाचा ग्रंथ नगरच्या तुरुंगात लिहिला
“आंतरभारती’ हे गुरुजींचे स्वप्न होते. प्रांताप्रांतामध्ये भांडण असू नये. उलट एकमेकांच्या भाषा, संस्कृती, परंपरा एकमेकांनी समजून घ्याव्यात. त्यामुळे राष्ट्रीय एकात्मता वाढीला लागण्यास मदत होईल अशी गुरुजींची विचारधारा होती. एका साहित्यसंमेलनात त्यांनी आपले विचार मांडलेही होते. त्यासाठी पैशाची जमवाजमव सुरू केली होती. पण भारतीयांच्या नशिबात तो योग नव्हता.
गुरुजींनी कथा, कविता, कादंबरी, नाटक, चरित्रे, निबंध, पत्रलेखन असे वाङ्मयाचे विविध प्रकार लीलया हाताळले. मुलांसाठी त्यांनी गोड गोष्टी लिहिल्या. कुमारांसाठी सुंदर पत्रे लिहिली. भारतीय संस्कृतीचे अंतरंग उलगडून दाखवले. “श्यामची आई’ सारखे मातृप्रेमाचे महन्मंगल स्तोत्र गायले. “पत्री’ काव्यसंग्रहातून देशभक्तीपर गीते लिहिली. “बलसागर भारत होवो, विश्वात शोभुनी राहो’ हे अजरामर गीत गुरुजींचेच. गुरुजी असे आज शब्दांतून उरले आहेत. त्यांची वाणी, लेखणी आणि कृती देशासाठीच होती. त्यांनी हयातभर भव्यदिव्य, समर्थ, संपन्न आणि सामर्थ्यशाली भारताचेच स्वप्न पाहिले. मात्र, गांधीजींच्या हत्येमुळे त्यांना अतीव दुःख झाले. त्यासाठी त्यांनी एकवीस दिवसांचे उपोषण केले. स्वतः प्रायश्चित्त घेतले. तरीही मनावरचे मळभ दूर झाले नाही. ते अतिसंवेदनशिल असल्यामुळे त्यांना नैराश्य आले. त्यातच त्यांनी आपली जीवनज्योत मालवून टाकली. ज्ञानेश्वरांनी जसे आपले कार्य झाल्यावर समाधीरूपाने स्वतःला मालवून टाकले तसे. तरीही गुरुजी भारतीयांच्या मनात अमर आहेत. लेखणी आणि कृतीच्या रूपाने तर ते अमर आहेतच आहेत.
No comments:
Post a Comment