Total Pageviews

Sunday 11 June 2017

कतार आणि पाकिस्तान-दहशतवादाला खतपाणी घालणाऱ्या कतारशी अनेक देशांनी राजनैतिक संबंध तोडले आहेत. दहशतवाद्यांना पोसणाऱ्या पाकिस्तानला अशीच शिक्षा देण्याचा निर्णय कधी होणार याची वाट आता पहावी लागणार आहे.-PRABHAT EDITORIAL

जगाच्या पाठीवर विविध ठिकाणी दहशतवादाची रक्तरंजीत पावले वेगाने पडत आहेत हे गेल्या काही महिन्यातील इंग्लंड आणि अन्यत्र झालेल्या कारवायांवरुन स्पष्ट होते. ही पावले रोखण्याचे काम वेळीच झाले नाही तर परिस्थिती हाताबाहेर जाण्याचा धोका आहेच. म्हणूनच केवळ दहशतवादी संघटनाच नाही तर या संघटनांना पाठिंबा देणाऱ्या देशांवरही कारवाई होण्याची गरज समोर आली आहे. पाकिस्तानपासून सावध राहण्याचा अमेरिका प्रशासनाला मिळालेला इशारा आणि कतारशी इतर देशांनी तोडलेले संबंध या दोन घटना या पार्श्‍वभूमीवर महत्वाच्या वाटतात. तालिबान आणि हक्कानी नेटवर्कला आसरा देणाऱ्या पाकिस्तानपासूनच अमेरिकेला सर्वाधिक धोका असल्याचे अमेरिकेच्या एका प्रमुख थिंक टॅंकने म्हटले आहे. जर पाकिस्तानने तालिबान आणि हक्कानी नेटवर्कला पाठिंबा देणे सुरूच ठेवले तर पाकिस्तानवर निर्बध घातले जातील असे ट्रम्प प्रशासनानं पाकला स्पष्टपणे सांगायला हवे, अशी आग्रही सूचनाही या थिंक टॅंकने केली आहे. सेंटर फॉर स्ट्रॅटेजिक अँड इंटरनॅशनल स्टडीज ही संस्था जगातील दहशतवादाचा अभ्यास करुन सतत अशा सूचना करीत असते. पाकिस्तानात अजूनही तालिबान आणि हक्कानी नेटवर्कसाठी हक्काची जागा आहे. आयएसआय या संघटनांना पोसत आहे. त्यामुळे या थिंक टॅंकच्या सूचनेवर अमेरिका काय भूमिका घेतो हे लवकरच समजणार असले तरी दुसरीकडे कतारसारख्या देशाला मात्र धडा मिळाला आहे. दहशतवादाला खतपाणी घालून आखाती देशांमध्ये अस्थिरता निर्माण करत असल्याचा आरोप करत सोमवारी बहारिन, सौदी अरेबिया, यूएई आणि इजिप्त या देशांनी कतारशी राजनैतिक संबंध तोडत असल्याचे जाहीर केले. सौदी अरेबियाच्या कतारमधील नागरिकांना मायदेशी परतण्यासाठी 14 दिवसांचा अवधी देण्यात आला आहे. दहशतवाद आणि अतिरेक्‍यांना रोखण्यासाठी ही कृती आवश्‍यक असल्याचे स्पष्टीकरण सौदी अरेबियाकडून सांगण्यात आले आहे. देशाच्या सुरक्षिततेला दहशतवाद आणि अतिरेकवादाचा धोका असल्यामुळे आंतरराष्ट्रीय कायद्याने दिलेल्या सार्वभौमत्त्वाच्या अधिकारातंर्गत सौदी अरेबियाने कतारशी राजनैतिक संबंध तोडण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे कतारशी जमीन, हवाई आणि समुद्रमार्गे होणारा संपर्क तोडण्यात आला आहे. कतारशी राजनैतिक संबंध तोडल्यानंतर सौदी अरेबियाने “अल जझीरा’ या वृत्तवाहिनीला दिलेला परवाना रद्द केला असून वृत्तवाहिनीचे सौदीतील कार्यालयदेखील बंद करण्यात आले आहे. कतारने सातत्याने इस्लामी गटांना पाठिंबा दिला असून, इराणशी जवळिकीचे संबंध ठेवले आहेत. त्यामुळे या देशांनी कतारशी संबंध तोडले आहेत. खरेतर पाकिस्तानच्या तुलनेत कतारची दहशतवादाला पाठिंबा देण्याची भूमिका कमी तीव्र आहे. तरीही सौदी आणि इतर देशांनी ही भूमिका घेतली हे लक्षणीय आहे. म्हणूनच आता भारत आणि अमेरिका यांनीही दहशतवादाच्या मुद्यावर एकत्र येऊन पाकिस्तानला एकाकी पाडण्याची गरज आहे. आतापर्यंत अमेरिकेत आणि भारतातही वेगळ्या पक्षांची सरकारे होती. पण आता भारतात मोदी आणि अमेरिकेत ट्रम्प नेतेपदी आरुढ झाल्यानंतर दोघांच्या संयुक्त निश्‍चयातून काहीतरी भरीव हाती लागेल आणि दहशतवादाला खतपाणी घालणाऱ्या पाकिस्तानला धडा शिकवण्याचा मार्ग मोकळा होईल अशी आशा करण्यासारखी स्थिती आहे.पाकिस्तानची आर्थिक मदत रोखण्याचे आणि पूर्वीच्या मदतीचे कर्जात रुपांतर करण्याच्या धोरणाचे अमेरिकेने मध्यंतरी सुतोवाच केले होतेच.भारतानेही पाकिस्तानशी सर्व प्रकारच्या चर्चा थांबवल्या आहेत आणि पाकिस्तानच्या प्रत्येक कारवाईला ठोस प्रत्युत्तर दिले जात आहे. तरीही अमेरिका आणि भारतासह सर्वच देशांचे पाकिस्तानशी राजनैतिक संबंध कायम असल्याने पाकिस्तानवर काहीच परिणाम होत नाही. पाकिस्तानला आर्थिक आणि राजकीय झळ बसली तरच तो वठणीवर येईल. एक साधे उदाहरण क्रिकेटचे आहे. भारताने पाकिस्तानशी असलेले क्रिकेटचे संबंध तोडल्याने पाकिस्तानचे क्रिकेट मोडकळीस आले आहे. जगातील कोणताही देश पाकिस्तानात क्रिकेट खेंळत नाही. त्यामुळे पाकिस्तानलाही कोणत्याच देशात जाऊन द्विपक्षीय क्रिकेट खेळता येत नाही. आता तर अफगाणिस्ताननेही पाकिस्तानशी क्रिकेटचे संबंध तोडले आहेत. त्यामुळे शेजारी अफगाणचा संघही पाकिस्तानात जात नाही. साहजिकच पाकिस्तानचे क्रिकेट मंडळ डबघाईला आले आहे. राजकीय स्तरावरही अशीच कारवाई झाली तर पाकिस्तानला गुडघे टेकण्याशिवाय पर्याय राहणार नाही. म्हणूनच आता कतारचा धडा घेऊन भारताने अमेरिकेच्या मदतीने पुढाकार घेउन पाकिस्तानला घेरण्याचे काम सुरु करायला हवे. जरी इतर कोणाचीही मदत मिळाली नाही तरी भारताने पाकिस्तानला स्वबळावर एकटे पाडण्याची गरज आहे. चीनकडून भारताला कोणतीही अपेक्षा बाळगता येणार नाही. पण सार्क देशांच्या इतर सदस्य राष्ट्रांच्या मदतीने भारत पाकिस्तानवर दबाव वाढवू शकतो. आशियासॅट उपग्रहाच्या निमित्ताने भारताने पाकिस्तानला एकटे पाडून इतर देशांना उपकृत करुन ठेवले आहे. तेच धोरण आणखी तीव्र करुन पाकिस्तानला धडा शिकवावा लागणार आहे. मुख्य म्हणजे अमेरिकेच्या थिंक टॅंकने जर पाकिस्तानपासून सावध राहण्याचा इशारा दिला असेल, तर ही संधी गमावून भारताला चालणार नाही. त्यामानाने मवाळ असणाऱ्या ओबामा सरकारने लादेनचा खातमा केला होता. त्यामुळे बरेच जहाल असलेले ट्रम्प सरकार पाकिस्तानच्याबाबतीत कोणत्याही थराला जाण्याची शक्‍यता गृहित धरुनच भारताला भविष्यातील पावले टाकावी लागतील. कतारच्या निमित्ताने जी संधी उपलब्ध झाली आहे, ती गमावून चालणार नाही हे निश्‍चित

No comments:

Post a Comment