काश्मीर खोर्यातील चार-पाच जिल्ह्यांमध्ये सुरू असलेल्या दगडफेकीच्या घटनांमुळे देश अस्वस्थ आहे. अशा परिस्थितीत राज्यातील राजकारण्यांनी, सामाजिक कार्यकर्त्यांनी आणि पत्रकारांनीदेखील संयमित भूमिका घेण्याची गरज असते. जम्मू-काश्मीरातील काही संपादकांनी पुण्यात आयोजित एका परिसंवादात जी मुक्ताफळे उधळली, त्यावरून त्यांना खोर्यात खरेच शांतता हवी आहे, की देशाच्या अन्य भागातील वातावरणही कलुषित करण्याचा त्यांचा इरादा आहे, हे समजायला मार्ग नव्हता.
`पाकिस्तान-इंडिया पीपल्स फोरम फॉर पीस ऍण्ड डेमोक्रसी’ या संस्थेतर्फे आयोजित चर्चासत्रात काश्मिरी पत्रकारांनी लष्कर प्रमुखांवरदेखील टीका केली. लेफ्टनंट उमर फयाजचे जम्मू-काश्मीरमधील शोपिया जिल्ह्यात दहशतवाद्यांनी अपहरण केले होते व त्यानंतर त्याची हत्या केली होती. त्यावर ते काही बोलले नाही.
जम्मू-काश्मीरमध्ये भारतीय सेना कुठल्या परिस्थितीत काम करते आहे, देशाचे रक्षण करते आहे. घुसखोरी हाणून पाडताना, पाक प्रशिक्षित अतिरेक्यांना कंठस्नानदेखील घालत आहे. ही बाब या पत्रकारांना माहीत आहे. गतवर्षी काश्मीर खोरे पुराच्या पाण्यात अडकले असताना लष्करामुळे पुरग्रस्तांची सुटका होऊ शकली होती. राष्ट्रप्रेम आणि देशासाठीच्या कर्तव्यामुळे खोर्यात ठिकठिकाणी लष्कराने विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा भार उचलला आहे. खोर्यातील 26 शाळा जाळून टाकण्यात आल्यानंतर विद्यार्थी रस्त्यावरच आले होते. पण, त्यांच्यासाठी शिक्षणाची सुविधा उपलब्ध करून देत लष्कराने काश्मीर, काश्मिरी जनता आमचीच असल्याचे दाखवले. जम्मू-काश्मीरमधील 11 तरुण 10 जूनला लष्करी अधिकारी बनले आहेत. ही बाब काश्मिरी पत्रकारांनी सांगायला हवी होती.
ही पत्रकार मंडळी पुण्यात तथ्य मांडण्यासाठी आली, की येथील लोकांना चुकीची माहिती देऊन त्यांची माथी भडकवायला आली? दगडफेक करणार्या युवकांना पैसे किंवा वस्तूंच्या स्वरूपात मदत केली जाते. पुरग्रस्तांना केंद्र सरकारने प्रचंड मदत केली, पण मदतीचा पैसा सरकारच्या हाती न देता तो थेट लाभाथvच्या खात्यात जमा केला. काश्मिरी विद्यार्थी ज्याप्रमाणे भारताच्या इतर भागात शिक्षणासाठी जाऊ शकतात, विघटनवादाला काश्मीर खोर्यातील फक्त 10 टक्के भागातील नागरिकांचा पाठिंबा आहे, राज्यातील 90 टक्के जनता राष्ट्रप्रेमी आहे, हे का म्हणून सांगितले गेले नाही? काश्मिरी पत्रकारांनी फक्त भारताच्या संरक्षण दलाविरुद्ध तक्रार करून, त्यांचा विघटनवादी मार्गच अधोरेखित केला. तरीही अनेक मराठी वर्तमानपत्रांनी घातक प्रचाराला विनाकारण प्रसिध्दी दिली.
दहशतवाद्यांचे उदात्तीकरण
दहशतवाद ही आज जगापुढे असलेली सगळ्यात मोठी समस्या आहे. कुठेही दहशतवादी हल्ला झाला की तो हल्ला करणार्यांचे उदात्तीकरण करणे आणि तो हल्ला दहशतवाद्यांच्या नजरेतून पूर्णपणे न्याय्य कसा होता हे लोकांना पटवून देणे, हे काही विचारवंताचे काम नव्हे. तरीही दहशतवाद्यांचे उदात्तीकरण हे एकमेव काम असणारा एक गट मीडियामधून देशात सक्रिय आहे. काही तथाकथित प्रसिद्ध लेखकही या मोर्चात सामील आहेत.
दहशतवाद्यांचे उदात्तीकरण करणारे कट्टरतावादाबद्दल कधीच बोलत नाहीत. त्यांचा भर असतो दहशतवाद्यांची `मानवी बाजू’ दाखवण्याकडे. मग 1993 मधल्या मुंबई बॉम्ब हल्ल्याबद्दल फाशी गेलेला याकूब मेमन `मृदूभाषी’ आणि `खूप पुस्तके वाचणारा’ कसा होता. 26 नोव्हेंबरच्या मुंबईवरच्या दहशतवादी हल्ल्यामध्ये जिवंत हाती लागलेला दहशतवादी अजमल कसाब, तो लहानपणी कसा गोंडस होता, त्याला हिंदी सिनेमे बघायला कसे आवडायचे. त्याच्या बालपणीच्या आत्यंतिक गरिबीमुळे त्याला `बडा आदमी’ कसे बनायचे होते आणि त्यामुळे तो सहजपणे दहशतवाद्यांच्या गळाला कसा लागला, अशा काळीज पिळवटणार्या कहाण्या भारतीय वृत्तपत्रातून प्रसिद्ध होतात.
काश्मीरमध्ये गरिबी आणि बेकारी
सध्या काश्मीरच्या खोर्यात इस्लामी कट्टरतावाद पसरतोय. हिजबुल मुजाहिदीन आणि लष्करे तोयबाचे दहशतवादी इस्लामी खिलाफतसाठी लढत आहेत. काश्मिरीयतशी त्यांचे काहीच देणेघेणे नाही. तरीही त्या दहशतवाद्यांचे उदात्तीकरण करण्यासाठी भारतीय मीडियामधले काही पत्रकार पुढे होत आहेत. मग भारतीय लष्कराने मारलेला लष्करचा कमांडर, खतरनाक दहशतवादी बुर्हान वणी हा `गरीब हेडमास्तरचा मुलगा’ होतो, तर त्याचा उत्तराधिकारी, सबझार बट हा प्रेमात अयशस्वी झाल्यामुळे निराश होऊन दहशतवादाकडे कसा वळला, याचे गोडवे गायले जातात. काश्मीरमध्ये गरिबी आणि बेकारी आहे म्हणून तिथले तरुण दहशतवादाकडे वळलेत हा युक्तिवाद तर कित्येक वर्षे केला जातोय.
देशात इतरही प्रांतात गरिबी आहे, बेकारी आहे, इतर प्रश्न आहेत, तरीही तिथले तरुण कसे हिंसेकडे वळत नाहीत, हा प्रश्न मात्र कुणालाही विचारावासा वाटत नाही. एप्रिलमध्ये मेजर लिथुल गोगोई यांनी जीपला बांधून ज्या दगडफेक्याला फिरवले तो फारुख दार शालीवर सुंदर भरतकाम कसे करतो याचेच कौतुक. पण एकही गोळी न झाडता कामगिरी फत्ते करणार्या मेजर गोगोईचे रास्त कौतुक केले जात नाही. दहशतवाद्यांच्या उदात्तीकरणातून दहशतवादाचे जे मूळ इस्लामी कट्टरतावाद त्याच्यावर पांघरूण घातले जाते.
भारतीय लष्कर आणि `डर्टी वॉर’
काश्मीरमध्ये जे काही चालू आहे ते एक `डर्टी वॉर’ म्हणजे युद्धाचे कसलेही नियम न पाळता केलेले एक अधर्मयुद्ध आहे. समोरचा शत्रू हा दिसत नाही, सैनिकासारखा समोरासमोर लढत नाही. तो नागरी वेशात असतो, स्त्रिया व मुले यांची मानवी ढाल वापरत हा शत्रू आपल्या सैनिकांवर हल्ले करत असतो. अश्या वेळी सैनिकांनी स्वतःचा जीव आणि समोरच्या लोकांचे प्राण वाचवण्यासाठी वेगळा विचार केला. कमीत कमी प्राणहानी होईल आणि आपल्यावर सोपवलेली कामगिरीही फत्ते होईल असे काही तरी केले तर त्याबद्दल त्या सैनिकाचे कौतुकच व्हायल हवे. अत्यंत प्रतिकूल अशा युद्धजन्य परिस्थितीत, जिथे प्रत्येक सेकंद महत्त्वाचा असतो तिथे काम करावे लागते.
जनरल डायर यांच्या निर्णयाने `जालियनवाला बाग’ रक्ताने लाल झाली, मेजर गोगोई ह्यांच्या निर्णयाने रक्ताचा एकही थेंब न सांडता त्यांच्यावर सोपवली कामगिरी फत्ते झाली. `भारतीय लष्कराची जनरल डायर मोमेंट’ म्हणणार्या तथाकथित पुरोगामी लेखकाचे आणि तो लेख छापणार्या वायर संकेत स्थळाचे सत्कार व्हायला हवेत.
सैन्यावर विनाकारण आरोप
सध्या सैन्यावर विनाकारण आरोप करणार्यांची चलती आहे. देशप्रेम, देशाभिमान या सामान्य लोकांना महत्त्वाच्या वाटणार्या गोष्टींची खिल्ली उडवणे यालाच काही विचारवंत/ पत्रकारिता `मानवी हक्क’ हे नाव देतात. मानवी हक्क हे या लोकांच्या हातातले आवडते शस्त्र. हे कधीही, कसेही, कुणावरही उगारता येते.
प्रेमभंगही जगात अनेकांचे होतात, नैराश्यही खूप लोकांना येते पण म्हणून काही ते दहशतवादाकडे वळत नाहीत. दहशतवाद हा धार्मिक कट्टरतेतून आलेला आहे आणि त्या मूळ कारणाकडे दुर्लक्ष करून जर मीडिया दहशतवाद्यांचे उदात्तीकरण आणि मानवीकरण करत राहिला तर काही दिवसांनी मला खूप डास चावले, म्हणून मी दहशतवादाकडे वळलो, असाही एखाद्या दहशतवाद्याचा भावनेने पिळवटलेला कबुली जबाब आपल्याला मीडियामध्ये वाचायला मिळू शकेल.
एका संपादकाची मजल लष्करप्रमुखांची संभावना `वर्दीतले वावदूक’ असे संबोधण्यापर्यंत गेली. पार्थ चॅटर्जी नामक लेखकाने भारताचे लष्करप्रमुख जनरल बिपीन रावत यांची तुलना अमृतसरमधल्या जालियनवाला बागेतल्या हत्याकांडासाठी जबाबदार असलेल्या ब्रिटिश क्रूरकर्मा ब्रिगेडियर जनरल डायरशी केली आहे. कालच काँग्रेस नेते संदीप दीक्षित यांनी लष्करप्रमुखांचा उल्लेख रस्त्यावरील गुंड असा केला.
भारतीय लष्कर ही एक नियमांच्या चौकटीत काम करणारी, अत्यंत शिस्तबद्ध अशी संघटना आहे.त्यांच्यावर सारखे टीकेचे आघात करून त्यांना दहशवादी मोहिम थांबवण्याकरता दबाव टाकला जातोय. केवळ लिहिता येते म्हणून वाटेल ते आरोप करणार्या लोकांनी हे लक्षात घेतले तर खूपच बरे होईल.
मनोधैर्य कायम राखण्याची जबाबदारी
भारतीय लष्कर हे काश्मीरमध्ये तसेच ईशान्य भारतात सरकारच्या आदेशाप्रमाणे भारतीयांच्या हिताच्या संरक्षणासाठी काम करत आहे. राष्ट्राच्या हिताच्या संरक्षणासाठी काम करताना राजकीय पक्ष, वेगवेगळ्या संस्था, सामान्य नागरिक म्हणूनही आपली जबाबदारी असते. त्यात मुख्यत्वे सैन्याचे मनोधैर्य कायम राखण्याच्या महत्त्वाच्या जबाबदारीचा समावेश होतो. अहोरात्र डोळ्यात तेल घालून आपले कर्तव्य बजावणार्या सैन्यदलाचे मनोधैर्य खचणार नाही, याची काळजी घेतली जायला हवी. तसे झाले नाही तर सैन्य आपले काम व्यवस्थित पार पाडू शकत नाही.
ब्रिगे. हेमंत महाजन (निवृत्त)
No comments:
Post a Comment