Total Pageviews

Saturday 17 June 2017

बिटकॉइन नक्की काय आहे?Maharashtra Times |


आतापर्यंत प्रत्येक चलन त्या-त्या काळानुसार राजे-महाराजे, सरकार, रिझर्व्ह बँक यांच्यामार्फत नियंत्रित केले जात होते किंवा आहे. पण, एका आभासी चलनाने आंतरराष्ट्रीय बाजारात धुमाकूळ घातलाय, ज्यावर ना कुठल्या देशाचे नियंत्रण आहे, ना कुणा एका विशिष्ट व्यक्तिचे. बरं ते चलन प्रत्यक्ष हातात येत नाही, ना त्याला दृश्य रुप आहे. तरीही त्याची किंमत वाढतीच आहे आणि जगात असंख्य लोक विनिमयासाठी त्याचा वापर करत आहेत, ते म्हणजे बिटकॉइन. नवासी अवस्थेतून नागरीकरणाकडे येताना मनुष्याने ‘व्यवहार’ विकसित केला. एखादी वस्तू हवी असेल तर त्या बदल्यात तुम्हाला दुसरं काहीतरी त्याच्या तुल्यबळ द्यावं लागेल. यातून सुरुवातीला वस्तूविनिमयाची पद्धत अस्तित्वात आली. मात्र, प्रत्येकालाच ‌आपल्याकडे असलेल्या वस्तूची गरज असेलच असे नाही. शिवाय, वस्तूंचे आकार व प्रकार पाहता त्या साठवून ठेवणे अवघड होते. म्हणून मग चलन ही संकल्पना अस्तित्वात आली. राजमान्यता किंवा लोकमान्यता असलेल्या विशिष्ट मूल्यवान वस्तूंना (जसे की विशिष्ट आकाराचे दगड, कवड्या, मोरपिसे) ठराविक ‘मूल्य’ बहाल केले गेले, ज्याद्वारे दै‌नंदिन लागणाऱ्या वस्तू ‘विकत’ घेता येऊ लागल्या. काळानुसार हे चलन तांबे, पितळ, सोने, चांदीच्या नाण्यात परि‌वर्तित झाले. राजे-महाराजांच्या काळात सोन्याचांदीच्या नाण्यांचे चलन होते. आधुनिक काळात प्रत्येक देशाने आपले विशिष्ट चलन विकसित केले. नाणी, नोटांच्या रुपात असलेले हे चलन सर्व व्यवहारांसाठी सोयीचे होते. पण, या प्रत्यक्ष चलनातून काळा पैसा मोठ्या प्रमाणावर निर्माण झाला. बँकांची स्थापना झाल्यानंतर हुंडी, चेक, डीडी असा पतपैसा निर्माण झाला. गेल्या काही वर्षांत पतपैशाऐवजी प्लास्टिक मनीला महत्त्व आले. डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड. आणि आता विनिमयासाठी प्रत्यक्ष चलनाची गरजच पडू नये म्हणून कॅशलेस व्यवहारांना चालना देण्यात आली. आतापर्यंत प्रत्येक चलन त्या-त्या काळानुसार राजे-महाराजे, सरकार, रिझर्व्ह बँक यांच्यामार्फत नियंत्रित केले जात होते किंवा आहे. पण, आता अशा एका आभासी चलनाने आंतरराष्ट्रीय बाजारात धुमाकूळ घातलाय, ज्यावर ना कुठल्या देशाचे नियंत्रण आहे, ना कुणा एका विशिष्ट व्यक्तिचे. बरं ते चलन प्रत्यक्ष हातात येत नाही, ना त्याला कुठले दृश्य रुप आहे. तरीही त्याची किंमत वाढतीच आहे आणि जगात असंख्य लोक विनिमयासाठी त्याचा वापर करत आहेत, ते म्हणजे बिटकॉइन. बिटकॉइन हा शब्द गेल्या चार-पाच वर्षांत अनेकांनी ऐकला असेल. पण बिटकॉइन नक्की काय आहे, याबाबत अनेकांमध्ये संभ्रम आहे. बिटकॉइन ही ब्लॉक चेनवर आधारीत एक ‘क्रिप्टोकरन्सी’ आहे. बिटकॉइनची सुरुवात सातोशी नाकोमोतो नावाच्या व्यक्तीने २००९ मध्ये केल्याचे संदर्भ इंटरनेटवर सापडतात. मात्र, एका वर्षातच ती व्यक्ती यापासून दूर गेली. एका ओपन डाटाबेसवर अनेक लोक मिळून कॉम्प्युटर प्रोग्रामच्या माध्यमातून हे चलन तयार करतात. त्यावर व्यवहार करण्याचे अधिकार दुसऱ्यांना देतात. अशा व्यवहारांना ‘मायनिंग’ म्हणतात आणि व्यवहार करणारांना ‘मायनर्स’ म्हणतात. बिटकॉइन हे विशिष्ट प्रकारचे कॉम्प्युटर कोड असतात, ज्यावरील प्रत्येक व्यवहारानंतर एक डिजिटल सिग्नेचर जोडली जाते. तरीही आपली ओळख लपवूनही यात व्यवहार करता येतात. बँकांप्रमाणे अनेक कंपन्यांनी बिटकॉइन वॉलेटची निर्मिती केली आहे, ज्या माध्यमातून बिटकॉइन खरेदी-विक्री करता येतात. भारतात यूनोकॉइन, झेबपे, कॉइनकसिक्युअर, बीटीएक्स इंडिया यांसारख्या सुमारे वीस कंपन्या बिटकॉइन खरेदी-विक्री व्यवहारांत आहेत. बिटकॉइनच्या मूल्यातही सतत चढ-उतार होत असतात. त्यामुळे टेक्नोसॅव्ही युवावर्गासह सट्टेबाज, अंडरवर्ल्डमध्ये हे चलन जास्त लोकप्रिय आहे. विशेष म्हणजे, गेल्या महिन्यात जगभरात गाजलेल्या रॅनसमवेअर सायबर हल्लेखोरांनीही बिटकॉइनच्या स्वरुपात खंडणी मागितली होती. यातून, या चलनाचे वेगाने वाढते महत्त्व लक्षात यावे. एक समांतर चलन म्हणून बिटकॉइनला भारतातही पसंती मिळू लागल्याने रिझर्व्ह बँकेची चिंता वाढली आहे. चार वर्षांपूर्वी रिझर्व्ह बँकेने यातील व्यवहारांच्या धोक्यांबाबत इशारा दिला होता. मात्र, त्याची लोकप्रियता पाहता, गेल्या महिन्यातच रिझर्व्ह बँकेने या चलनाला मान्यता द्यावी किंवा नाही, याबाबत जनतेकडून अभिप्राय मागविले आहेत. यावरून या चलनाची घोडदौड लक्षात यावी. सरकार बिटकॉइनला कायद्याच्या कचाट्यात आणण्याची तयारी करीत असून, त्यावर कर लावण्याच्या विचारात आहे. रिझर्व्ह बँक व्हर्च्युअल करन्सीमध्ये गुंतवणूक आणि त्याची देवघेव करण्यासंदर्भात सविस्तर मार्गदर्शक तत्वे तयार करणार असून, आरबीआय अॅक्ट १९३४च्या कक्षेत ती असू शकतील. बिटकॉइन हे सुरक्षित चलन आहे, असे म्हटले जात असले तरी त्यातही अनेक धोके आहेत. सगळ्यात पहिला धोका म्हणजे हे चलन अद्याप भारतात तरी अधिकृत नाही. दुसरे म्हणजे हे चलन प्रत्यक्षात अस्तित्वातच नाही. ते तुमच्याकडे असल्याची फक्त तुमची कल्पना असते. जोपर्यंत लोकांचा बिटकॉइन चलनप्रणालीवर विश्वास आहे, तोपर्यंत त्याला मूल्य आहे. त्यावरचा विश्वास संपला की बिटकॉइनचे अस्तित्व संपेल. जसे की, हजाराची नोट गेल्या वर्षी मौल्यवान होती, पण आता ती रद्दी आहे. बिटकॉइनची ऑनलाइन चोरी झाली तर ते चोरणारा सापडणे जवळपास अशक्यच. कारण, येथे सगळेच निनावी व्यवहार असतात. एकंदरीत बिटकॉइन या आभासी चलनप्रणालीने जगात आपले भक्कम जाळे निर्माण केले असून, अनेक देशांनी त्यातील व्यवहारांना मान्यता दिली आहे. पण, या चलनप्रणालीचे भवितव्य काय, याबाबत मात्र छातीठोकपणे कोणीच सांगू शकणार नाही

No comments:

Post a Comment