Total Pageviews

Monday, 5 June 2017

नुकताच झालेला ‘सर्जिकल स्ट्राईक-२’ होता?June 6, - अभय बाळकृष्ण पटवर्धन


दहशतवादी, जिहाद्यांशी लढा देणार्या- सुरक्षा दलांवर हातात दगड, गोटे घेऊन हल्ला करणार्या तरुणाईच्या देशद्रोही कारवायांमुळे काश्मीरचे खोरे संपूर्ण एप्रिल व मे १७ मध्ये खदखदत होते. श्रीनगरमधील एप्रिलमध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या दिवशी गोटमार करणार्याल अंदाजे ९०० नागरिक व तरुणांच्या हिंसक, उद्रेकी तावडीतून आपल्या अखत्यारितील सात पोलिंग बुथ कर्मचारी व आठ पोलिसांना वाचवण्यासाठी राष्ट्रीय रायफल्सच्या एका तरण्या अधिकार्याीने एका दगडफेक्या निदर्शकला आर्मी जीप समोरील बॉनेटला बांधून जवळपास तीन किलोमीटरचे अंतर सुरक्षित रीत्या पार केले. सर्वोच्च न्यायालयाने जुलै १६ मध्ये दिलेल्या निर्देशांच्या अनुषंगाने आणि फुटीरतावादी व राज्य शासनाच्या दबावाखाली त्या मेजरविरुद्ध आयपीसी ३०४, ०६ व ०८ अंतर्गत एफआयआर दाखल करण्यात आला. तर, लष्करप्रमुखांनी चीफ ऑफ आर्मी स्टाफ कमेन्डेशन कार्ड देऊन त्याचे मनोबल वाढविले. या दोन्ही कारवायांमुळे देशात याबद्दलच्या साधकबाधक चर्चेला उधाण आले. या अकारण, अवाजवी उद्रेकामुळे सेनाध्यक्ष जनरल बिपीन रावत यांनी ‘दगडफेक करणार्यां नी हाती शस्त्रे घेतली असती, तर बरे झाले असते, अशी जाहीर तंबी दिली. सेनाध्यक्षांच्या या विधानांमुळे एकच गदारोळ माजला. एका खासदाराने आर्मी व सेनाध्यक्षांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नंचिन्ह उभं केलं. दुसर्यां नी खोर्यागत जाऊन फुटीरतावादी नेत्यांच्या मनधरण्या करून याबद्दल माफी मागितली. काही असंतुष्ट नेत्यांनी हे प्रकरण आंतरराष्ट्रीय न्यायालय व अमनेस्टी इंटरनॅशनलकडे नेण्याचा प्रण केला. देशातील वाहिन्यांवर, बुद्धिवादी चर्चांमध्ये आणि प्रसारमाध्यमांमध्ये घमासान सुरू झालं. भारतीय सेना मात्र शांतपणे सीमेवर कार्यरत होती. सेनेने बडगाम व केरण सेक्टरमध्ये घुसखोरी करणार्यां आठ जिहाद्यांना एप्रिल आणि चौदा जिहाद्यांना मे महिन्यात अल्लाला प्यारे केलं. एप्रिलच्या मध्यापासून भारत-पाक सीमा ‘क्रॉस बॉर्डर फायर’नी धगधगू लागली आणि त्याचा शेवट पुँछ सेक्टरच्या कृष्णाघाटी क्षेत्रात १ मे १७ ला पाकिस्तानी ‘बॉर्डर ऍक्शन टीम’ने भारतीय बॉर्डर चेकिंग टीमवर घात लावून केलेल्या नृशंस हल्ल्यात झाला. बॉर्डर ऍक्शन टीममध्ये पाकिस्तानी स्पेशल सर्व्हिस ग्रुपचे सैनिक, पाक रेन्जर्स आणि मुजाहिदीन एकत्र काम करतात. २०१६ मध्ये नौशेरामधील हल्ल्याच्या ठिकाणाजवळ, त्याच पद्धतीने पाक बॉर्डर ऍक्शन टीमने परत एकदा तीच कारवाई केली. आपण काहीही केले तरी भारत उलटवार करीत नाही, अशी पाक लष्कराची धारणा होती. पण, सप्टेंबर २०१६ चा सर्जिकल स्ट्राईक भावल्यामुळेच जनतेला सेनेकडून आतादेखील तशाच कारवाईची अपेक्षा होती. पण सेनेने भावनेच्या भरात तत्काळ कारवाई केली नाही. सेना आपल्याला सोयीस्कर वेळ, काळ व जागेच्या शोधात होती. भारतीय सैन्याने १ मे च्या पाकिस्तानी कारवाईचे वेळ येताच संयत पण करडं उत्तर दिलं. ९/१० मे १७ ला त्याच सेक्टरमध्ये त्याच जागी सीमापार पाकिस्तानी चौक्यांवर (पोस्टस्) भारताने प्रचंड मोठा अग्निवर्षाव करून त्यांचे किमान सात बंकर्स ध्वस्त केलेत. ही भारतीय कारवाई इतकी अनपेक्षित होती की, एका अनुमानाप्रमाणे बंकर्सबरोबर त्यातील अंदाजे २५-३० पाकिस्तानी सैनिक अल्लाला प्यारे झाले. मेजर जनरल अशोक नरुला यांनी या हल्ल्याची सविस्तर माहिती दिली. एक व्हिडीओफीतही जारी केली. नंतर ती सगळ्या वाहिन्यांवरून संपूर्ण जगाने पाहिली. या हल्ल्यात रॉकेट लॉंचर्स, अँटी टँक गायडेड मिसाईल्स, ऑटोमेटेड ग्रेनेड लॉंचर्स, रिकॉइललेस गन्स आणि बोफोर्स गन्सचा वापर भारतीय सेनेने केला, असाही खुलासा त्यांनी केला. पाकिस्तान घाबरट कोल्ह्यासारखा मागून वार करतो, पण आम्ही मात्र चित्यासारखा समोरून नरडीचा घोट घेतो या शब्दांमध्ये एका लष्करी अधिकार्या ने या कारवाईचं वर्णन केलं. पाकिस्तानी सेनेचे प्रवक्ते, मेजर जनरल आसिफ गफूरनी १३ मे १७ ला हा व्हिडीयो खोटा आहे, आमच्यावर कोणताच हल्ला झाला नाही, अशी नेहमीप्रमाणे भूमिका घेतली. पण, २५ मे १७ ला भारताने दाखवलेल्या उर्ध्वरित व्हिडियोला आपलाच म्हणून दाखवून पाकिस्तानने स्वत:ची फजिती करून घेतली. त्याच वेळी आंतरराष्ट्रीय सीमेची पाहणी करण्यासाठी गेलेल्या (युनिमॉग) वर, भारताने जाणूनबुजून गोळीबार (इन्टेन्शनल फायर) केल्याचा कांगावाही पाक सेनेने केला. पण असं काही झालंच नाही, अस म्हणत युनिमॉगने जागतिक पटलावर पाकिस्तानी इभ्रतीचा फालुदा केला. पाकिस्तानने चालवलेले प्रछन्न युद्ध एक क्रूर जीवघेणे वास्तव आहे. त्यासाठी सामरिक शक्तीबरोबरच खंबीर व सुदृढ मनोबलाची आवश्यकता आहे. युद्धाचं प्रशिक्षण अति कठोर व अमानवी असते. सैनिकाचं काम रक्तरंजित, क्रूर आणि दु:खदायक असतं. सैनिकांमुळेच देशातील लोक सुखाने राहू शकतात. त्यासाठी करण्यात आलेले सर्जिकल स्ट्राईक्स अल्पकालीन शांततेसाठी (लिमिटेड पीस) योग्य असलेत तरी निर्णायक नाहीत. पाकनिर्मित दहशतवादी आरोहातून बाहेर पडणं हाच त्यासाठी एकमेव पर्याय आहे. आणि यासाठी सर्वंकष युद्ध छेडणं आवश्यक असल्यामुळे यासाठी भारतीय सेनेला सरकारचा संपूर्ण पाठिंबा मिळालाच पाहिजे. केवळ वार्तालापांनी पाकिस्तानशी शांतीपूर्ण संबंध स्थापन केल्या जाऊ शकत नाहीत. त्यासाठी त्याच्यासोबतच ‘स्ट्रॉंग डेटरन्स बाय पनिशमेंट’ या मध्यम दूरगामी कार्यप्रणालीचा अंगीकार करावा लागेल हे सूर्यप्रकाशागत स्पष्ट आहे. २७ मे १७ ला फुटीरतावादी नेत्यांना स्थानबद्ध करून सरकारने या कार्यप्रणालीचा ओनामा केलेला दिसून पडतो. जागतिक महाशक्ती, सर्वात मोठी लोकशाही, जगातली चौथी मोठी सेना, सहावी अर्थव्यवस्था इत्यादी वायफळ बिरुदांऐवजी अकारण बळी गेलेल्या नागरिक/सैनिकांचा सूड घेणारा देश, असं बिरूद मिरवण्यातच भारताचं भलं आहे. आज अतिरेकी लष्करात गेलेल्या जवानांची हत्या करीत असले तरी, लष्कराच्या भरतीसाठी हजारो युवक-युवतींनी गर्दी करणे, हा अतिरेक्यांना दिला गेलेला ठोस संदेश आहे. जगात भारत हा एकच देश आहे जेथे फुटीरतावाद व दहशतवादाला खुला पाठिंबा देणारे बिना रोकटोक संचार करू शकतात, ज्यांना जन्मभर दोष दिला त्याच सरकारने दिलेल्या सुरक्षेचा अंगीकार करतात. ज्या सेनेने आपत्तीकाळात त्यांचे जीव वाचवले, त्यांना मदत केली त्याच सेनेवर आणि सरकारवर प्रसारमाध्यमांमध्ये गरळही ओकतात. भविष्यात जरी सर्जिकल स्ट्राईक्स केल्या गेलेत तरी त्याचा प्रभाव अल्प काळासाठीच (शॉर्ट टर्म मेझर्स) असेल. आपले जवान हकनाक बळी पडल्यानंतर जिहादी व अतिरेक्यांना मारण्यात फारशी मर्दुमकी नसते. ते बळी पडणारच नाही अशी परिस्थिती निर्माण करण्यातच खरी सामरिक सिद्धता असते. अशा अवचित हल्ल्यांचं नियंत्रण आणि त्यावरील बेधडक कारवाईसाठी इंटेलिजन्स व सरकारची जबरदस्त दहशत निर्माण व्हावी लागते. पाकिस्तान भारताशी सर्वसंमिलीत संकरित युद्ध (हायब्रीड वॉर) करतो आहे. त्याला प्रेरणादायक गतिमान पद्धतीने (कायनॅटिक स्ट्राईक) उत्तर देण्याची प्रणाली भारताने अंगीकारली आहे हे नौशेरामधील हल्ल्यातून प्रत्ययाला येतं. या प्रणालीत शत्रूवर सर्व शक्तिनिशी एकाच ठिकाणी त्याचं कंबरडं मोडणारा हल्ला केल्या जातो. ही सर्जिकल स्ट्राईकची पुढची पायरी आहे, असंही म्हणता येईल. सरकारने डायरेक्ट ऍक्शन घ्यायला हवी. जिहादी खातम्यासाठी सेनेला खुली सूट व मोकळीक देण्याची गरज आहे. सरकारने असं केल्यास काश्मीरमध्ये काही महिन्यातच शांतता व सुव्यवस्था नांदू लागेल. ९० च्या दशकत लेफ्टनन्ट जनरल आर. एस. दयाल व पोलिस अधीक्षक के. एस. गिलच्या नेतृत्वात पंजाबमध्ये हीच मात्रा लागू पडली होती. कारण ‘ए सोल्जर नेव्हर फाईट्‌स बिकॉज ही हेटस् एनिमी इन फ्रंट; ही फाईट्‌स बिकॉज ही लव्हज द कंट्री मेन बिहाईंड हिम! आस्क युवरसेल्फ माय कंट्रीमेन, आर यू बिहाईंड अस ऑर आफ्टर अस?’ (लेखक निवृत्त कर्नल आहेत) ९४२२१४९८७

No comments:

Post a Comment