पाकिस्तानने गेल्या तीन दशकांपासून काश्मीरमध्ये ‘डर्टी वॉर’ सुरू केले असून, या हिंसाचाराचा सामना करणार्याप जवानांना ‘वाट बघा आणि मरा’ असे सांगू शकत नाही, असे परखड मत भारतीय लष्कर प्रमुख बिपीन रावत यांनी नुकतेच व्यक्त केले. लष्करप्रमुखांच्या या वक्तव्यावर अपेक्षित प्रतिक्रिया उमटल्या. अनेकांनी बिपीन रावत यांच्या वक्तव्याचे स्वागत केले असले तरी काही मानवतावादी असल्याचा दावा करणारे बेचैन झालेत.
‘डर्टी वॉर’ म्हणजे नेमके काय, असे विचारले तर युद्धाचे नियम तोडून करण्यात येणारे युद्ध असे करता येईल. युद्धामध्येही अनेक नियमांचे पालन करायचे असते. विमानातून करण्यात येणारा बॉम्बहल्ला नागरी वस्तीवर करायचा नसतो. रणांगणावर शत्रूने पांढरे निशाण फडकविले तर त्यावर गोळी झाडायची नसते. रणांगणावर जखमी सैन्याला वैद्यकीय सेवा देणारे रेडक्रॉसचे डॉक्टर व त्यांचे सहायक यांचाही वेध घ्यायचा नसतो. शेवटी नियम पालन हे नीतिमत्तेशी निगडित आहे. नीतिमत्ताच नसेल तर कसले आले नियम? पाकिस्तानला नीतिमत्ता म्हणजे काय हे नेमके माहीत नसावे किंवा नीतिमत्ता तोडण्यातच पाकला धन्यता वाटत असावी. भारतीय जवानांचे शिर कलम करून त्यात आसुरी आनंद मानणारा पाकिस्तान त्यामुळेच मागील तीन दशकांपासून गलिच्छ पद्धतीने युद्ध खेळतो आहे.
सुडाने पेटलेली व्यक्ती नीती धाब्यावर बसविते व आपले इप्सित साध्य करते. महाभारतातील युद्धात जय मिळणार नाही हे स्पष्ट झाल्यावर सुडाने पेटलेल्या अश्व त्थामाने झोपेत असलेल्या पांडवकुलाची हत्या केली. एवढेच नाही तर अभिमन्यू पत्नी उत्तरेच्या पोटातील गर्भावर ब्रह्मास्त्र सोडले.
मोगल राजवटीदरम्यान अनेक ‘डर्टी वॉर’ बघायला मिळाले. पितृआज्ञा होताच राज्य सोडून वनवासात जाणारा राम मोगल शासकांना माहीत नव्हता. त्यांचा आदर्श म्हणजे सत्ता! सत्ता किंवा सम्राटपद मिळविण्याकरिता बापाला, भावांना कैदेत टाकणे व प्रसंगी त्यांची हत्या करणे असे प्रकार करून मोगल राजवट वाटचाल करीत गेली.
अफजलखानाने शिवाजी महाराजांविरुद्ध ‘डर्टी वॉर’चा वापर केला. भेटीच्या वेळी शस्त्र आणायचे नाही असे ठरले असताना अफजलखानाने शिवरायांच्या पाठीत खंजीर खुपसला. डर्टी वॉरच्या विरोधात नरसिंहावतार हे एकमेव उत्तर असल्याचे शिवाजी महाराजांनी सुमारे साडेतीनशे वर्षांपूर्वीच सिद्ध करून दाखविले आहे.
जागतिकीकरणानंतर डर्टी वॉर काहीसे सोपे झाले आहे. एका देशातून दुसर्याे देशात व्यापार करणे सहज, सुलभ झाले आहे. जागतिकीकरणामुळे अनेक विदेशी उद्योजक व दूरचित्रवाहिन्या यांनी भारतात बस्तान बसविले आहे. व्यापार करीत नफा कमावीत असताना हे विदेशी भारतीय जीवनपद्धतीच्या अनेक मौलिक परंपरा उद्ध्वस्त करण्याचे प्रयत्न करीत आहेत. ज्याच्याजवळ अधिक मालमत्ता किंवा रक्कम तो अधिक सुखी असे समीकरण मूळ धरू लागले आहे. कुटुंबाचा किंवा समाजाचा नाही तर स्वत:चाच विचार करा ही विचारधाराही हातपाय पसरते आहे. सुंदर दिसणे हाच पुरुषार्थ. याचा प्रभाव इतका वाढला आहे की, पुरुषांची सौंदर्यसाधना बाजारात करोडो रुपयांची उलाढाल घडवते आहे. पराक्रम हेच पुरुषांचे सौंदर्य हा विचार मागे पडला आहे. सिंहावलोकन केले तर असे दिसते की, दूरचित्रवाहिन्यांनी भारतीय जनमानसावर जबर पकड मिळविली आहे. यातील बहुतेक वाहिन्या या परकियांच्या मालकीच्या असून, त्यांना भारतात धंदा करायचा आहे. लष्करीतळावर अतिरेकी हल्ला सुरू असताना एका वाहिनीवर त्यामुळेच बातमीपत्र असे दिले जाते की, त्यामुळे अतिरेक्यांना मदत व्हावी! सरकारने काही कार्यवाही करायचे ठरविले की, ‘विचारस्वातंत्र्याची गळचेपी’ यासारखे मुद्दे अशा वाहिन्यांकडून पुढे केले जातात.
अमेरिकेने जपानच्या हिरोशिमा व नागासाकी या दोन नगरांवर १९४५ साली अणुबॉम्ब टाकला व त्यात लाखो जपानी नागरिक मरण पावले. परिणामी राष्ट्रीयत्व प्रमाण मानणारा जपानी नागरिक आजही अमेरिकी वस्तू खरेदी करीत नाही.
पाकिस्तानने काश्मीरचा एक तृतीयांश भाग बळकावला तर चीननेही बराच मोठा भारतीय भूभाग गिळंकृत केला आहे. याउपरही आम्ही भारतीय चीन देशात तयार झालेल्या वस्तू का खरेदी करतो? राष्ट्रीय अस्मितेचा विसर पडल्याने हे सारे घडत आहे.
भारतीयांना राष्ट्रीय अस्मितेचा विसर पडावा याकरिता बहुतेक (सर्व नाही) ई-वाहिन्या, सोशल मीडिया प्रयत्नशील आहेत. त्यामुळे स्वदेशी काय आहे हे न सांगता स्वस्त काय आहे हे सांगितले जाते. गरज नसताना विकत घेण्याकरिता प्रवृत्त केले जाते. अमुक टुथपेस्ट वापरली की दातदुखी थांबते इत्यादी सारखे फसवे दावे केले जातात. जीवनात शृंगार सर्वात महत्त्वाचा अशी भावना निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातो. थोडक्यात असे की, भारतीयांची मने नको त्या विषयांकडे आकृष्ट करण्याचे प्रयत्न सातत्याने व थंड डोक्याने पण विचारपूर्वक केले जात आहेत आणि या डर्टी वॉरबाबत समाजातील मोठा घटक अनभिज्ञ आहे.
सीमेवरील डर्टी वारला तोंड देण्यास भारतीय सेना सक्षम आहे. समाजासोबत जे डर्टी वॉर खेळले जात आहे त्याला कसे सामोरे जायचे, हा खरा प्रश्नस आहे. राष्ट्रीय अस्मिता विकसित करणे हाच त्यावर एकमेव उपाय आहे.
No comments:
Post a Comment