Total Pageviews

Friday, 23 June 2017

आता लाड पुरेत!सुनील गावसकर यांनी म्हटल्यानुसार आता खेळाडूंना सरावातून सुटी देऊन शॉपिंग करा, असे सांगणारा मार्गदर्शक हवा आहे. हे चित्र बदलणे आणि क्रिकेटपटूंचे लाड कमी करणे आवश्यक आहे.

चॅम्पियन्स ट्रॉफी क्रिकेट स्पर्धेतील अंतिम सामना भारताने गमाविल्यानंतर लगेचच कर्णधार विराट कोहली आणि मुख्य मार्गदर्शक अनिल कुंबळे यांच्यातील मतभेदांची विकोपाला गेल्याचे समोर आले. याबाबतची चर्चा स्पर्धेआधीपासून होती; परंतु वेस्ट इंडिज दौऱ्यापर्यंत कुंबळे प्रशिक्षक असतील, असे स्पष्ट करण्यात आल्याने तिला विराम मिळाला होता. मात्र, स्पर्धा संपल्यानंतर कुंबळे यांनी थेट पदाचा राजीनामा दिल्याने मार्गदर्शकाविनाच भारतीय संघ वेस्ट इंडिजला रवाना झाला. माजी कर्णधार सुनील गावसकर यांनी कुंबळेची पाठराखण करताना सध्याच्या खेळाडूंवर टीकेची झोड उठविली आहे. कुंबळे यांचा शिस्तीचा आग्रह अनेक खेळाडूंना जाचक ठरत असल्याने त्यांनी बंड केले, असा सुनील यांचा सूर आहे. अशा खेळाडूंना संघातून नारळ देण्याची शिफारसही त्यांनी केली आहे. अर्थात, भारतीय क्रिकेट संघाला हे काही नवीन नाही. बिशनसिंग बेदींपासून ग्रेग चॅपेलपर्यंतच्या अनेक मार्गदर्शकांना याच मार्गाने जावे लागले आहे. कुंबळे हा या मालिकेतील आणखी एक बळी ठरले आहेत. क्रिकेटपटूंना मिळणारी लोकप्रियता, त्यांच्या कमाईचे आकडे या सर्वांमुळे हा सगळा खटाटोप केवळ आपल्यामुळेच चालतो असा समज त्या संघातील प्रत्येकाचा होता. भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) आणि आता सर्वोच्च न्यायालयाने नियुक्त केलेली प्रशासकीय समितीदेखील आपल्या वागण्यातून या खेळाडूंचा समज दृढ करीत राहते. त्यातून दर दोन-चार वर्षांनी अशी परिस्थिती निर्माण होते. याच पार्श्वभूमीवर ऑलिंपिक सुवर्णपदक नेमबाज अभिनव बिंद्राचे वक्तव्यही महत्त्वाचे ठरते. न पटणाऱ्या मार्गदर्शकाबरोबर आपण एक दोन नव्हे तर तब्बल वीस वर्षे काढल्याचे बिंद्राने म्हटले आहे. क्रिकेटव्यतिरिक्त कोणत्यात खेळामध्ये खेळाडूंच्या म्हणण्याला महत्त्व देण्याची पद्धत आपल्या देशात नसल्याने बिंद्राला सहन करण्यावाचून पर्यायही नव्हता. क्रिकेटपटूंना मात्र हे भाग्य लाभते. क्रिकेटपटू कितीही व्यावसायिक खेळाडू असल्याचा आव आणत असले तरीही त्यांची व्यावसायिकता ही फक्त जाहिरातींची कंत्राटे मिळविण्यापुरती किंवा बोर्डाकडून मिळणारे वार्षिक करार मिळविण्याइतकीच आहे. प्रत्यक्ष खेळताना त्यांच्यात या व्यावसायिकतेचा अभाव दिसून येतो. शारीरिक तंदुरूस्ती, मनाची एकाग्रता, शंभर टक्के संघभावना या निकषांवर भारतीय क्रिकेटपटू अनेकदा नापास ठरतात. अशा गोष्टींचा आग्रह धरणारी कोणतीही यंत्रणा त्यांना लगेचच नकोशी होती. सुनील गावसकर यांनी म्हटल्यानुसार आता खेळाडूंना सरावातून सुटी देऊन शॉपिंग करा, असे सांगणारा मार्गदर्शक हवा आहे. हे चित्र बदलणे आणि क्रिकेटपटूंचे लाड कमी करणे आवश्यक आहे. एका वेळेस दोन संघ तयार करणे, कोणत्याही क्रिकेटपटूला आपले संघातील स्थान टिकविण्यासाठी कामगिरी हा एकच निकष ठेवणे आदी उपाय तातडीने करायला हवेत. त्याचप्रमाणे मार्गदर्शकाची कर्तव्ये, त्यांची भूमिका याची जाणीव खेळाडूंना करून देण्याची आवश्यकता आहे. मैदानावर खेळाडू खेळत असले तरीही त्यामागचा विचार मार्गदर्शक करतो. त्यानुसार तो धोरणे आखत असतो, हे या सगळ्यांचे कान धरून सांगण्याची वेळ आली आहे. ती जाणीव जितक्या लवकर दिली जाईल तितके भारतीय क्रिकेटला बरे दिवस येतील. अन्यथा चॅपेल-तेंडुलकर, चॅपेल-द्रविड, कुंबळे-कोहली ही कटूमालिका सुरूच राहील

No comments:

Post a Comment