मेजर गोगाईचे काय चुकले …
. लष्कर प्रमुख जनरल बिपीन रावत यांनी तर मेजर गोगईंनी दाखवलेल्या शौर्याचे कौतुक करून त्याचा सन्मान केला म्हणून अनेकांचा अक्षरशः तिळपापड झाला. काश्मीर खोर्यात रोज दहशतवादी कारवाया करणार्यांविषयी ब्र न काढणारे भारतीय सैन्य दलावर मानवी हक्कांचे उल्लंघन केल्याचा आरोप करीत आहेत. मेजर गोगई यांनी नेमके काय केले, त्यांचे काय चुकले या प्रश्नावरून देशात mejorकाहूर निर्माण झाले आहे. मेजर गोगई यांनी काश्मिरी तरूणाला बांधून जीपवर बसवून फिरवले म्हणून आकांड तांडव करणार्यांनी भारतीय सैन्य दलावर दगडफेक किंवा पेट्रोल बाम्ब फेकणार्याच्या विरोधात कधी निषेध केलेला नाही. सैन्यदलाच्या कारवाईबाबत किंवा ते बजावत असलेल्या कर्तव्याबाबत निदान या देशातील जनतेत परस्पर विरोधी सूर असता कामा नये.
सुरक्षा दलाच्या कारवाईवर कोणी कसेही बोलावे किंवा त्यांच्यावर टीकेची झोड उठवावी हे मुळीच योग्य नाही. आपल्या शत्रू राष्ट्रांना जे पाहिजे आहे तेच या देशातून घडत असेल तर त्याचा फायदा ते उठवतील व या देशाच्या सुरक्षा दलाच्या मनोधैर्यावरही परिणाम होईल.दिनांक 9 एप्रिल, 2017 रोजी श्रीनगर लोकसभा मतदारसंघात पोटनिवडणुकीसाठी मतदान झाले. त्या दिवशी बडगाम येथील एका मतदान केंद्रावर तणावाचे वातावरण होते. दहशतवादी संघटनांनी मतदानावर बहिष्कार पुकारला होता. मतदान केंद्रावरून लष्कराकडे मदत मागवण्यात आली तेव्हा तातडीने मेजर लितुल गोगई हे घटनास्थळी पोचले. तेव्हा तेथे किमान बाराशेचा संतप्त जमाव होता. या जमावाला त्यांनी निघून जाण्याचे वारंवार आवाहन केले पण जमाव ऐकण्याच्या मनःस्थितीत नव्हता. आपल्या जीपचे एक चाक चिखलात रूतले असल्याचे गोगई यांच्या लक्षात आले. त्याच क्षणाला जमावाने त्यांच्या दिशेने जोरदार दगडफेक सुरू केली. एवढेच नव्हे तर त्यांच्यावर पेट्रोल बाम्ब फेकले. जमावाला पांगवण्यासाठी गोळीबार केला असता तर मोठी प्राणहानी झाली असती. मतदान केंद्रावर डय़ुटीवर असलेल्या सतरा कर्मचार्यांचेही जीव वाचवणे हे पुन्हा मोठे आव्हानच होते. गोगई यांना कल्पना सुचली, त्यांनी काश्मिरी तरूण सत्तावीस वर्षाच्या फारूख अहंमद दार याला पकडले, त्याला बांधले नि जीपवर बोनेटवर बसवले आणि जीपवरून त्याला डझनभर गावात फिरवले.
त्याचा परिणाम जमाव तर पांगलाच, सुरक्षा दलावर होणारी दगडफेक थांबली आणि मतदान केंद्रावरील सतरा जणांचे प्राणही वाचले. या सर्व प्रकारात कुठेही जीवित हानी झाली नाही. लष्कर प्रमुखांनी मेजर गोगईचा सन्मान केला तो काश्मिरी तरूणाला बांधून जीपवरून फिरवले म्हणून नव्हे तर मेजर गोगईंनी परिस्थितीचे भान राखून गोळीबार न करता मतदान केंद्रावरील सतरा कर्मचार्यांचे प्राण वाचवले म्हणून…फारूख अहमंद दार याला जीपवर बांधून, ओलिस ठेऊन, मानवी ढाल बनवून, गावा- गावातून फिरवले याचा व्हिडिओ सोशल मिडीयावर व्हायरल झाला आणि लष्कराच्या विरोधात संताप व्यक्त करणार्या प्रतिक्रीया व्यक्त होऊ लागल्या. जम्मू- काश्मीरमधे भाजपला बरोबर घेऊन सरकार स्थापन करणार्या पीपल्स डेमाक्रटीक पक्षाने ( पीडीपी ) ने मेजर गोगई यांचा लष्कर प्रमुखांनी सत्कार केल्याबद्दल नाराजी व्यक्त केली. लष्करी न्यायालयाचा चौकशी अहवाल येण्यापुर्वीच लष्करप्रमुखांनी गोगई यांचा शौर्य सन्मान करण्याची घाई का केली, असा सवाल पीडीपीने केला आहे.
लष्कर प्रमुखांनी गोगई यांचा गौरव केला असला तरी त्यांच्या विरोधात नोंदवलेला गुन्हा ( एफआयआर ) मागे घेतला जाणार नाही, असे काश्मीरचे पोलीस प्रमुख मुनीर अहंमद खान यांनी म्हटले आहे. विशेष म्हणजे मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांनी दिलेल्या सुचनेनंतरच काश्मीर पोलिसांनी गोगई यांच्या विरोधात गुन्हा नोंदवला आहे. फारूख अहंमद दार हा बडगामचा मतदार असून तो स्वतः मतदान करून आला होता. तो नॅशनल कॉन्फरन्सचा समर्थक आहे . दहशतवाद्यांनी बहिष्काराचे केलेले आवाहन झुगारून त्याने मतदान केले, पण नेमके त्यालाच मेजर गोगईने जीपवर बांधून दगडफेक करणार्यांना रोखण्यासाठी डझनभर गावांतून फिरवले.
हुर्रियतचे चेअरमन सय्यद अली गिलानी यांनी लष्कराच्या कारवाईचे लांछनास्पद असे वर्णन केले आले. पाकिस्तानात फाशीची शिक्षा झालेल्या कुलभूषण जाधव याला न्याय मिळवून देण्यासाठी भारत सरकारने आंतरराष्ट्रजएाrय कोर्टात धाव घेतली तसेच फारूख दार प्रकरणात आंतरराष्ट्रजएाrय कोर्टाने हस्तक्षेप करावा अशी मागणी गिलानी यांनी केली आहे. जम्मू काश्मीर लिबरेशन फ्रंटचे यासिन मलिक, हुर्रियत नेते मीरवाइज उमर फारूख, काँग्रेस नेते मणिशंकर अय्यर यांनी मेजर गोगई यांचा लष्करप्रमुखांनी गौरव केल्याबद्दल सुरात सूर मिसळून निषेध व्यक्त केला आहे. गोगईंचा सन्मान म्हणजे काश्मीरी जनतेचा अवमान करून पुन्हा श्रीमुखात भडकावण्याचा प्रकार आहे, असे नॅशनल कॉन्फरन्सने म्हटले आहे.
मेजर गोगईला जे आरोपीच्या पिंजर्यात उभे करीत आहेत ते हिजबुल कमांडर बुरहान वाणीच्या एन्कौन्टरनंतर गळे काढत होते. नातेवाईंच्या लग्नासाठी गावी आलेल्या लेफ्टनंट उमर फैयाज याची दहशतवाद्यांनी हत्या केली तेव्हा मेजर गोगईवर टीका करणारे कुठे होते… वाणीच्या नंतर कमांडर झालेल्या सबजारच्या हत्येविषयी हेच लोक सहानभुती बाळगून होते. जसे नागरीकांना मानवी हक्क आहेत तसे सैनिकांना नाहीत का… त्यांच्यावर दगडफेक, पेट्रोल बाम्ब सर्रास फेकले जातात त्याविषयी कोणी का बोलत नाहीत…लष्करप्रमुख हे काही राजकारणी नाहीत, त्यांनी आपल्या जवानांचे कौतुक केले तर दहशतवाद्यांना काश्मिरी तरूण म्हणून सहानभुती दाखविणार्यांच्या पोटात का दुखावे… तोंडावर फडकी गुंडाळून आजही रोज लष्करी वाहनांवर व सुरक्षा दलावर बाम्ब फेकले जात आहेत. शाळेतील मुले व महिला रस्त्यावर उतरत आहेत, त्याविषयी कोणी का शब्द बोलत नाही….काश्मीर खोर्यातला आक्रोश उत्स्फुर्त नसून पाकिस्तान व आयएसआय प्रेरीत आहे, मग त्यांना सहानभुती कशासाठी… मानवी हक्कांचा संबंध येतोच कुठे… म्हणून दहशतवाद्यांना काही काळ तरी वठणीवर आणण्यासाठी व सतरा लोकांचे प्राण वाचविण्यासाठी मेजर गोगई यांनी जे धाडस दाखवले त्याचे कौतुकच करायला हवे.
No comments:
Post a Comment