Total Pageviews

1,056,122

Wednesday, 18 July 2018

सायबर व्यसनाधीनता धोकादायक वळणावर By shambhuraj.pachindre | Publish Date: Jul 18

महेश कोळी
तुम्ही सोशल मीडियावर दिवसातले किती तास खर्ची घालता? हा प्रश्‍न दुर्लक्षित करण्याजोगा नक्‍कीच नाही. जर सोशल मीडिया आणि इंटरनेटच्या सान्‍निध्यात तुम्ही अधिक काळ व्यतीत करीत असाल, तर ती धोक्याची घंटा आहे, हे वेळीच ओळखलेले बरे. इंटरनेटने जगाला ‘ग्लोबल व्हिलेज’ बनविण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली असली, तरी हेच इंटरनेट आता जगभरातील लहान मुले, किशोरवयीन मुले आणि युवकांना मोठ्या संख्येने इंटरनेट व्यसनी (सायबर अ‍ॅडिक्ट) बनवीत चालले आहे. अमली पदार्थांचा व्यापार जगभरात ज्या वेगाने पसरला, त्याहीपेक्षा किती तरी अधिक वेगाने इंटरनेट पसरले असून, त्याचे व्यसन जडणार्‍या व्यक्‍तींचे प्रमाणही तितक्याच झपाट्याने वाढत आहे. 
सद्यःस्थितीत विशेषतः युवावर्गामध्ये सायबर व्यसनाधीनतेचे आणि त्यातही सोशल मीडियाचे व्यसन जडण्याचे प्रमाण वेगाने वाढत आहे. या पार्श्‍वभूमीवर अमेरिका, चीन, दक्षिण कोरिया आणि अल्जेरियासह जगातील अनेक देशांमध्ये या व्यसनातून लोकांना बाहेर काढण्यासाठी खास क्लिनिक सुरू करण्यात आली आहेत. आपल्या देशातील दिल्‍ली आणि बंगळुरू शहरांमध्येही सायबर व्यसनमुक्‍ती केंद्रे उघडण्यात येत आहेत. वस्तुतः, देशभरातच नव्हे, तर संपूर्ण जगात सायबर व्यसन ही प्रचंड मोठी समस्या होऊन बसली आहे. लहान मुले आणि किशोरवयीन मुलांमध्ये वाढत असलेले हे इंटरनेटचे आणि सोशल मीडियाचे व्यसन कमी करण्यासाठी अशा प्रकारच्या व्यसनमुक्‍ती केंद्रांची गरज निर्माण होणे दुर्दैवी आहे. या केंद्रांमध्ये व्यसनाधीन व्यक्‍तीचे जीवन ‘ऑफलाईन’ करण्याचा कसोशीने प्रयत्न केला जातो. इंटरनेट आणि सोशल मीडियाच्या डिजिटल व्यसनामुळे लोक आपल्या जीवनातील मूळ समस्यांपासून दूर पळू पाहत आहेत, हा सर्वात मोठा तोटा आहे. त्याचप्रमाणे मूलभूत चिंतन आणि विवेकी विचार कमी होत चालला आहे. लोकांचा सामाजिक परीघही संकोचत चालला असून, गर्दीतही माणूस एकटा होत चालला आहे. सायबर व्यसन ही मनाची अशी स्थिती आहे, ज्यामुळे लोक ऑनलाइन गेम, नेट सर्फिंग आणि सोशल नेटवर्कवर दिवसातील सर्वाधिक वेळ व्यतीत करू लागले आहेत. या व्यसनाला वेळेची मर्यादा उरलेली नाही. त्यामुळे स्वतःवरील नियंत्रण कमी होत चालले आहे. इंटरनेट मिळाले नाही, तर लोक अधीर, बेचैन होऊ लागले आहेत. कधी कधी तर, ते नैराश्याच्या गर्तेतही सापडू लागले आहेत. या व्यसनाने ग्रस्त लोक खोटे बोलणे, समस्यांंपासून दूर पळणे अशा टप्प्यांमधून अखेर नकारात्मक मनःस्थितीपर्यंत पोहोचत आहेत. 
एका सर्वेक्षणानुसार भारतात 18 ते 30 वयोगटातील पाचपैकी तीन जण असे आहेत, ज्यांच्या हातात मोबाइल नसल्यास ते असे काही बेचैन होतात, जणू त्यांचा एखादा अवयवच कुणी तरी गायब केला आहे. यातील 96 टक्के लोक सकाळी उठल्याबरोबर सर्वात आधी सोशल मीडियावर हजेरी लावतात. सत्तर टक्के युवकांचे असे म्हणणे आहे की, ई-मेल आणि सोशल मीडिया चेक केल्याशिवाय ते जगूच शकत नाहीत. कॅस्पर्सकी लॅब या जागतिक पातळीवरील आयटी सुरक्षा फर्मने टप्प्याटप्प्याने केलेल्या सर्वेक्षणानुसार, एकूण 1007 भारतीय युवकांमधील 73 टक्के असे होते, ज्यांना डिजिटल व्यसन जडल्याचे दिसून आले. असंख्य युवक रात्री उशिरापर्यंत जागून आभासी 
दुनियेत आपला बहुमूल्य वेळ खर्ची घालतात. काही किशोरवयीन आणि युवावस्थेतील व्यक्‍ती तर सातत्याने आभासी दुनियेतच राहतात आणि गेम खेळणे, व्हिडीओ पाहणे, बातम्या आणि वृत्तान्त वाचणे, ई-कॉमर्स साइट्स पाहणे, चॅट करणे, ट्वीट-रीट्वीट करणे आणि सोशल मीडियावर आपले अनुयायी तयार करणे, एवढेच काम सदासर्वकाळ करतात. सर्वेक्षणाच्या निष्कर्षांनुसार, फोन हरवणे हा त्यांच्यासाठी प्रचंड मोठ्ठा धक्‍का असतो. गेल्या वर्षी दहा देशांमधील दहा हजार लोकांच्या मुलाखती घेऊन केलेल्या एका सर्वेक्षणात असे आढळून आले की, 53 टक्के भारतीय दर तासाला इंटरनेटवर जातात. हा आकडा जागतिक सरासरीच्या 51 टक्क्यांपेक्षा जास्त आहे. यातील 77 टक्के लोक सोशल नेटवर्किंग साइट्सवर दररोज लॉगइन करतात. गेल्या दोन वर्षांपासून 
स्मार्टफोनवरून केले जाणारे व्हॉइस कॉल आणि एसएमएसमध्ये वीस टक्क्यांची घट झाली आहे आणि मेसेजिंग तसेच नेटआधारित व्हॉइस कॉलची संख्या अनुक्रमे दहा आणि बावीस टक्क्यांनी वाढली आहे. 
आपल्या कामाचा वेळ आणि रिकामा वेळ यातील फरक कळेनासा होऊन व्यक्‍ती जेव्हा सोशल मीडियाला अधिक महत्त्व देऊ लागते आणि स्मार्टफोनला चिकटून राहू लागते, तेव्हा या व्यसनाची सुरुवात झाली आहे, असे ओळखावे. 
डिजिटल व्यसनामुळे देशातील युवकांना बेरोजगारीच्या चटक्यांचीही जाणीव होईनाशी झाली आहे. भारतासाठी चिंतेचा विषय असा की, 2017 ते 2019 या कालावधीत बेरोजगारीचा दर 3.4 वरून 3.5 टक्के वाढणार असला, तरी 15 ते 24 वर्षे वयोगटातील बेरोजगारांचा दर 2019 मध्ये 10.7 टक्के एवढा असेल. 2014 मध्ये हा दर 10 टक्के होता. अहवालानुसार, देशभरातील 11 टक्के लोकसंख्या सध्या बेरोजगार आहे. ही अशी मंडळी आहेत, जी काम करण्यास सक्षम असूनही बेकार आहेत. या अहवालाव्यतिरिक्‍त श्रम मंत्रालयातील श्रम ब्यूरोच्या सर्वेक्षण आकडेवारीनुसार, बेरोजगारीचा दर सध्या गेल्या पाच वर्षांतील सर्वोच्च पातळीवर पोहोचला आहे. 
भारतात डाटा अत्यंत स्वस्त दरात उपलब्ध होत आहे. त्यामुळे कमी उत्पन्‍न गटातील लोकही स्मार्टफोन घेऊन त्याचा वापर करीत आहेत; परंतु त्याचा चांगल्या कारणांसाठी वापर होण्यापेक्षा दुरुपयोग होण्याचे प्रमाण सर्वाधिक असून, ते वाढत चालले आहे. एका सर्वेक्षणानुसार, गरीबवर्गातील सुमारे 92 टक्के युवक इंटरनेटचा वापर करीत असून, 65 टक्के लोकांकडे स्मार्टफोन आहे. दुसरीकडे, चांगली कमाई असलेल्या घरांतील, तब्बल 97 टक्के मुले इंटरनेटचा वापर करीत असून, 69 टक्के मुलांकडे स्मार्टफोन आहेत. आपल्या दैनंदिन जीवनावर हे आभासी जीवन प्रभाव पाडत आहे आणि आपण व्यसनाधीन आहोत, हेच बहुतांश लोकांना समजत नाही. अजूनही वेळ गेलेली नाही. आपण आपल्या युवा पिढीचा इंटरनेट व्यसनाधीनतेच्या दुष्परिणामांपासून बचाव करू शकतो. घराघरांत आई-वडील त्यांना या व्यसनाची भयावहता लक्षात आणून देऊ शकतात.

No comments:

Post a Comment