पाकिस्तानच्या नुकत्याच पार पडलेल्या सार्वत्रिक निवडणुकीत इम्रान खान यांच्या पाकिस्तान तहरिकी इन्साफ पक्षाने (पीटीआय) सर्वाधिक 120 जागा जिंकूनसत्तेचा दावा केला आहे. बहुमताला 137 सदस्यांची आवश्यकता आहे. त्यामुळे निवडून आलेल्या 20 अपक्षांच्या मदतीने पीटीआय सरकार स्थापन करणार, यात कुणाच्याही मनात शंका नाही. अजूनही काही निकाल यायचे आहेत, पण स्थिती जवळपास हीच राहील, असा अंदाज आहे. पीटीआय पक्षाचे संस्थापक इम्रान खान हे पाकिस्तानचे नवे पंतप्रधान असतील. 1997 साली इम्रान खान यांनी पीटीआय पक्ष स्थापन केला होता व 30 वर्षांनी हा पक्ष सत्तारूढ बनत आहे. क्रिकेटमधील अष्टपैलू खेळाडू म्हणून प्रसिद्ध असलेले इम्रान खान यांनी 1992 साली पाकिस्तानला एक दिवसीय सामन्यांचा विश्वचषक जिंकून दिला होता. त्यानंतर पाचच वर्षांनी त्यांनी राजकारणात उडी घेतली.
2013 च्या निवडणुकीत पीटीआय पक्षाचे 30 उमेदवार निवडून आले होते आणि पाच वर्षांत हा पक्ष 120 वर पोहोचला आहे. या निवडणुकीत माजी पंतप्रधान व सध्या भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली तुरुंगात असलेल्या नवाझ शरीफ यांच्या पाकिस्तान मुस्लिम लीग (नवाझ) पक्षाला दुसरे स्थान मिळाले आहे. बेनझीर भुत्तोंच्या पाकिस्तान पीपल्स पार्टीला तिसरे स्थान मिळाले आहे. पाकिस्तानात कोण पंतप्रधान होणार, याचा निर्णय पडद्यामागून लष्कर घेत असते, हे उघड गुपित आहे.त्यामुळे या विजयात इम्रान खान यांचे योगदान नेमके किती, यावर प्रश्नचिन्हच आहे. पाकिस्तानात आतापर्यंत झालेले पंतप्रधान लष्कराची मर्जी असेपर्यंत पदावर राहिले आहेत. देशाच्या महत्त्वाच्या धोरणांवर लष्कराचीच छाप असते. त्यामुळे इतर पंतप्रधानांप्रमाणे इम्रान खानदेखील देशासाठी खूप काही करू शकतील, असे वाटत नाही.
निवडणुकीचे निकाल पुरते लागलेही नसताना, इम्रान खान यांनी, आपण पंतप्रधान झालोच आहे या थाटात जे भाषण केले, ते त्यांच्या अपरिपक्वतेचा नमुना ठरावा. इम्रान खान यांच्या नव्या सरकारसमोर आव्हानांचे पहाड उभे असतील. पाकिस्तानची रसातळाला गेलेली अर्थव्यवस्था, अमेरिकेसोबत बिघडलेले संबंध,चीनची जीवघेणी जवळीक आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे, भारताशी असलेले संबंध इत्यादी आघाड्यांवर इम्रान खान यांना खूप मेहनत घ्यावी लागणार आहे.तशातच त्यांच्या पक्षाला स्पष्ट बहुमतही नाही. त्यामुळे इम्रान खान यांची पाच वर्षांची राजवट तारेवरची कसरत करण्यातच संपते की काय, अशी शंका आहे.
पाकिस्तानची आर्थिक स्थिती अतिशय गंभीर आहे. आतापर्यंत अमेरिका त्यांना वेळोवेळी आर्थिक मदत करीत होती. आता चीन करत आहे. परंतु, चीनची मदत‘मगरमिठी’च ठरण्याची शक्यता आहे. याचा अनुभव श्रीलंकेने घेतला आहे. त्यालाही लवकरच या मगरमिठीचा अनुभव येईल. नवाझ शरीफ सरकारने खूप गाजावाजा करीत, चीनच्या मदतीने ‘चीन-पाकिस्तान आर्थिक महामार्ग’ (सीपीइसी- सीपेक) या अतिमहत्त्वाकांक्षी प्रकल्पाची अंमलबजावणी सुरू केली. या प्रकल्पामुळे पाकिस्तानात आर्थिक समृद्धी येईल, अशी स्वप्ने दाखविण्यात आली. परंतु, हळूहळू या प्रकल्पाची दाहक वास्तवता बाहेर येत आहे. या प्रकल्पासाठी चीनने पाकिस्तानला जे प्रचंड रकमेचे कर्ज दिले आहे, त्याची परतफेड करता करता पाकिस्तानचे कंबरडे मोडण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
आता नुकतेच या प्रकल्पाच्या कामासाठी 500 कोटी रुपयांचे चेक देण्यात आले. त्यातील 350 कोटी रुपयांचे चेक बँकेतून निधीअभावी परत आले आहेत. त्यामुळे कंपन्यांनी प्रकल्पाचे काम थांबविले आहे. परकीय चलनाचे भंडार तर बुडाला लागले आहे. जागतिक स्तरावर पाकिस्तानची पतच राहिलेली नाही. आयएमएफकिंवा चीन या दोघांकडूनच पाकिस्तानला आर्थिक मदत होऊ शकते. आयएमएफकडून कर्ज घेतले तर पाकिस्तानला फार मोठ्या आर्थिक सुधारणा कराव्या लागतील आणि चीनकडून घेतले तर या देशाला नैसर्गिक संसाधने चीनच्या ताब्यात द्यावी लागतील. यातून इम्रान खान कसे मार्ग काढतात, हे बघावे लागेल.
भारताच्या संदर्भात बोलायचे झाले, तर इम्रान खान यांच्या राजवटीत भारत-पाकिस्तान यांचे संबंध कसे राहतील, हा कळीचा मुद्दा आहे. बहुतेक विश्लेषकांचे मत आहे की, यात फार काही फरक पडणार नाही. कारण जोपर्यंत पाकिस्तानी लष्कर ठरवणार नाही, तोपर्यंत पाकिस्तानची भारताच्या संदर्भातील धोरणे बदलणार नाहीत. इम्रान खान यांना या संदर्भात काही करता येईल, असे वाटत नाही. तसेही इम्रान खान यांची आतापर्यंतची भूमिका बघता, ते पाकिस्तानातील दहशतवादी गटांना हात लावतील असे वाटत नाही. अफगाणिस्तानातील तालिबान्यांचे त्यांनी नेहमीच समर्थन केले आहे. त्यावरून त्यांना ‘तालिबान खान’ असे बिरूदही चिकटले आहे. अफगाणिस्तानात अमेरिकेची उपस्थिती इम्रान खान यांना पसंत नाही. अमेरिकेची नाही म्हणून तिथे भारताची उपस्थितीही त्यांना रुचणार नाही.
इम्रान खान यांनी आपल्या पहिल्या भाषणात भारताकडे मैत्रीचा हात पुढे केला आहे. मैत्रीसाठी भारत एक पाऊल पुढे येत असेल तर पाकिस्तान दोन पावले पुढे येईल, असे ते म्हणाले. पाकिस्तानशी मैत्रीसाठी मागे अटलबिहारी वाजपेयी यांनी एक पाऊल पुढे टाकले होते. त्या बदल्यात पाकिस्तानने दोन पावले कारगिल भागात पुढे टाकली होती आणि परिणामी भारताला पाचशेच्या वर जवानांचे बलिदान देऊन हा भूप्रदेश पाकमुक्त करावा लागला होता. ही आठवण विसरता येणार नाही. त्यामुळे भाषणातून गर्जना करणे सोपे असते. परंतु, तदनुसार आचरण करणे सोपे नसते, याची प्रचीती इम्रान खान यांना लवकरच येईल.
भारताशी संबंध म्हटले म्हणजे काश्मीर प्रश्न आलाच. तो कसा सोडविणार, याचा काही आराखडा इम्रान खान यांच्याकडे असेल, असे वाटत नाही. तो तसा असूनही काही फायदा नाही. कारण पुन्हा लष्करच! ते म्हणेल तसेच होणार. काश्मीरबाबत सौम्य भूमिका घेणे पाकिस्तानातल्या कुठल्याही राजकारण्याला सोयीचे नाही.त्यातून सत्ता जाण्याची भीती असते. थोडक्यात काय की, पाकिस्तानात इम्रान खान यांची नवी कोरी राजवट आली तरीही त्यातून भारताला काही दिलासा मिळेल याची सुतराम शक्यता नाही. या सर्व पृष्ठभूमीचा विचार केला, तर पाकिस्तानात होणारे सत्तापरिवर्तन भारतासाठी ‘नागनाथ जाऊन सापनाथ आला’ असेच असते! आज जगात पाकिस्तानला एकटे पाडण्यात नरेंद्र मोदी यशस्वी झाले आहेत. हळूहळू त्याची कोंडी करत व त्यासोबतच भारताने आपली आर्थिक व सामरिक शक्ती वाढवत ठेवली, तरच कालांतराने पाकिस्तान दाती तृण धरून भारताशी चांगल्या शेजार्यासारखा वागण्यास तयार होईल. दुसरा मार्ग नाही. आणि त्यासाठी भारतीय जनतेला आपला विवेक शाबूत ठेवावा लागणार आहे. कारण 2019 ची निवडणूक जवळ येत आहे. एवढाच पाकिस्तानातील सत्तापरिवर्तनाचा भारतासाठी तरी संदेश आहे
No comments:
Post a Comment