Total Pageviews

Wednesday, 4 July 2018

व्हॉट्सअॅ्पसारख्या माध्यमाच्या गैरवापराबाबत-रोखणार कसे महा एमटीबी 04-Jul

व्हॉट्सअॅ्पसारख्या माध्यमाच्या गैरवापराबाबत सध्या जी काही चर्चा सुरू आहे, तंत्रज्ञान म्हणून यात फारसे काही करता येणार नाही मात्र विवेकाच्या जागृतीचे मोठे आव्हान आणि करण्यासारखे काम बरेच आहे.
 
व्हॉट्सअ‍ॅप या मुक्तमाध्यमाचा उपयोग करून अफवा पसरविणारे संदेश व हिंसा यामुळे चिंतीत झालेल्या सरकारने व्हॉट्सअ‍ॅपलाच यावर काय उपाययोजना करता येऊ शकते, अशी विचारणा केली आहे. व्हॉट्सअ‍ॅपनेही, “आम्हीदेखील यामुळे व्यथित आहोत व उपाय शोधण्याची गरज नाकारत नाही,” असे कळविले आहे. खरा प्रश्न हा आहे की, रोखणार कसे? याचे मुख्य कारण म्हणजे, व्हॉट्सअ‍ॅप आशय किंवा मजकूर निर्माण करीत नाही. ते केवळ संदेशवहनाचे काम करणारे तंत्रज्ञान आहे. ते लोकप्रिय ठरले, कारण ते मोफत आहे. वापरायला सुलभ आहे. भाषेचे, प्रदेशाचे, आर्थिक स्थितीचे असे कुठलेही बंधन त्याला रोखू शकत नाही. आशयनिर्मिती करण्यासाठी अवगत असावे लागणारे मूलभूत ज्ञानही व्हॉट्सअ‍ॅपसारखे माध्यम वापरताना अनिवार्य ठरत नाही. आपल्याला मजकूर लिहिता किंवा टाईप करता येत नसला तरी चालेल, पण एखादा फोटो पाठवून किंवा लहानशी ध्वनीचित्रफित पाठवूनही आपण आपला संदेश आणि त्यामागचा आशय पोहोचवू शकतो. आज जो काही प्रश्न निर्माण झाला आहे, तो मुळात व्हॉट्सअ‍ॅपमुळे झालेला नसून त्याचा वापर चुकीच्या पद्धतीने करण्यामुळे झाला आहे.
 
राजकीय, व्यापार, उत्पादने किंवा सेवा यांच्या जाहिराती किंवा प्रॉपगँडा करणारे कोणीही आजच्या घडीला व्हॉट्सअ‍ॅपचे महत्त्व नाकारू शकत नाही. उलट व्यावसायिक कारणासांठीदेखील व्हॉट्सअ‍ॅपचा वापर उत्तमरित्या करणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. पारंपरिक पद्धतीत ही जबाबदारी पारंपरिक माध्यमे घेत होती. यात प्रामुख्याने वृत्तपत्रे, टीव्ही माध्यमे, होर्डिंग्ज, बॅनर, रेडिओवरील जाहिराती यांचा समावेश होता. लिफलेटसारखे लहान पर्यायही वापरले जात होते, मात्र मुक्तमाध्यमे आली आणि जाहिरातीचे विश्वच बदलून गेले. या बदलामागे माध्यमांचे पूर्वग्रह व व्यावसायिक हितसंबंधदेखील कारणीभूत आहेत. सर्वसामान्य समाजापासून माध्यमे तुटली आहेत, असा जो काही आरोप केला जातो, त्याचे खरे कारण हेच आहे. स्वातंत्र्योत्तर काळात भारतातील माध्यमे पूर्णपणे संदर्भहीन झाली होती. त्याचे मुख्य कारण स्वातंत्र्यलढा संपला होता आणि प्रबोधनाचे काम करणारी माध्यमे आता काय अशा प्रश्नार्थक चिन्हयुक्त चेहऱ्याने समाजाकडे पाहात होती. आणीबाणीने या परिस्थितीत काही बदल घडविले, परंतु नंतरच्या काळात ही ग्लानीची स्थिती पुन्हा आली. याला अपवाद ठरला रामजन्मभूमी आंदोलनाचा आणि नंतर २०१४ साली आलेल्या मोदींच्या निवडणूक पर्वाचा. हे काही घटनाक्रम सोडले तर माध्यमांकडे जागा व्यापण्यासारखे काहीच नव्हते. यामुळे माध्यमे आपली प्रबोधनाची भूमिका बाजूला ठेऊन एक उत्पादन म्हणून आकाराला आली.
 
नव्वदीच्या दशकात जागतिकीकरणाचे वारे वाहायला लागल्यापासून या प्रक्रियेला अधिक गतीने सुरुवात झाली. परदेशी वृत्तसंस्था, त्यांच्या कामाच्या पद्धती, त्यांचा थरार व गतीदेखील माध्यमांनी अनुभवली. खरेतर यातून प्रगल्भता यायला हवी होती, मात्र आपल्याकडे यातून मक्तेदारीचेच वातावरण निर्माण झाले. उत्पादन म्हणून आकाराला आल्याने साहजिकच त्यात मागणी, मूल्य, सहभागाची किंमत अदा करण्याची जबाबदारी अशा सर्वच गोष्टी अंतर्भूत झाल्या. आता यातून जे काही सिद्ध होणार होते, ते पुढच्या काळात समोर आले. किंमत मोजण्याची तयारी व ती मोजू शकणाऱ्यांचा सहभाग अशी एक स्थिती भारतीयच नव्हे, तर जगभरातील माध्यमांमध्ये निर्माण झाली होती. यात अन्यही काही घटक होते. सनसनाटी निर्माण करण्याच्या नादात केले गेलेले उपमर्द आणि माध्यमात काम करणाऱ्याची विचारसरणी व त्यानुसार ठरणारा माध्यमांचा कल, या चिंताजनक परिस्थितीमुळे सर्वसामान्य व माध्यमांच्या चौकटीबाहेरचे असामान्य यांना माध्यमांची दारे जवळजवळ बंदच झाली होती. भारतीय सिनेसृष्टीचा महानायक मानला जाणारा अमिताभ बच्चन याने आपल्यापुरती ही कोंडी फोडली आणि मार्ग काढला होता. पारंपरिक माध्यमांकडे पाठ फिरवून स्वत:च्या चाहत्यांपर्यंत पोहोचण्यासाठी स्वत:चा ब्लॉग लिहिणारा अमिताभ हा पहिला नायक असावा. आज माध्यमांशी असलेला अबोला अमिताभने सोडला असला तरीही त्याला अभिव्यक्त व्हायचे असेल तर तो त्याच्या ट्विटर हँडलचाच वापर करीत असतो.
 
दुसरा मुद्दा विचारसरणीचा. २०१४ साली राजकीय पटलावर झालेला नरेंद्र मोदींचा उदय माध्यमातील काही मंडळींना खूप आधी कळून चुकला होता. काँग्रेसशी असलेले त्यांचे सख्य आणि यांचे भविष्यवेत्तेपण यामुळे नरेंद्र मोदींनी राजकीय परिवर्तनासाठी जे काही भोगले ते अन्य कुणीही भोगले नाही. डाव्या पत्रकारांनी मोदींच्या बदनामीचे जे जे काही डाव खेळले त्या कारस्थानाची तुलना इंदिरा गांधींनी केलेल्या आणीबाणीतील कारस्थानाशीच होऊ शकते. निखिल वागळे वगैरेंसारख्या आज अस्ताला गेलेल्या पत्रकारांनी त्यावेळी मोदींना ‘नरराक्षस’ वगैरे विशेषणे लावली होती. मोदींनीही या सगळ्या स्थितीला कंटाळून सोशल मीडियाचा आधार घेतला. ते पंतप्रधान होत आहेत, असा उल्लेख सर्वप्रथम एका सर्व्हेच्या माध्यमातूनच ट्विटरवरच जाहीर करण्यात आला होता. यानंतर मोदींनी मुक्तमाध्यमांच्या वापरातून जो काही प्रचाराचा धुरळा उडवला, त्याला तोड नाही. भारतीय परिप्रेक्ष्यामध्ये मुक्तमाध्यमांचा प्रभाव हा या सगळ्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेला आहे.
 
आज केला जात असलेला व्हॉट्सअ‍ॅपसारख्या माध्यमाचा वापर गंभीरच आहे. संभाजी ब्रिगेड, स्वत:ला ‘आंबेडकरी विचारांचे’ म्हणवून इतरांचा द्वेष करणारे, छत्रपतींच्या नावाने विष पसरविणारे असे अनेक लोक व संघटना आज व्हॉट्सअ‍ॅप माध्यमाचा सर्रास गैरवापर करीत आहेत. समाजाचे परस्परांशी तुटलेपण इतके असते की, या गटाला त्या गटात कोणत्या प्रकारचे विष कालविण्याचे उद्योग केले जात आहेत, हे कळत नाही. तंत्रज्ञान म्हणून यात फारसे काही करता येणार नाही. मात्र, विवेकाच्या जागृतीचे मोठे आव्हान आणि करण्यासारखे काम बरेच आहे

No comments:

Post a Comment