श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळ पुणे,
वेद वासुदेव फाउंडेशन, इतिहास प्रेमी मंडळ
पुणे, थोरले बाजीराव पेशवे प्रतिष्ठान पुणे, उत्तर प्रदेशातील अनेक संस्था आणि उत्तर प्रदेश सरकार यांनी, महान लष्करी नेते नाना साहेब द्वितीय यांची २०० वी जयंती संयुक्तपणे साजरी
केली. हा कार्यक्रम २८ मार्च ते ३० मार्च २०२५ दरम्यान उत्तर
प्रदेशातील कानपूरजवळील बिठूर येथील नाना साहेब पेशवे पार्क येथे पार पडला.
संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन
श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळाचे सचिव श्री सुधीर थोरात यांनी केले.
बिठूर येथील कार्यक्रमात १८५७-५८ च्या
भारताच्या पहिल्या स्वातंत्र्ययुद्धात नाना साहेबांनी दाखवलेल्या नेतृत्वावर
प्रकाश टाकण्यात आला.
नाना साहेब पेशवे यांचे शिक्षण
नाना साहेब (जन्म १८२४, मृत्यू १८५७) हे
१८५७ मध्ये झालेल्या भारताच्या पहिल्या स्वातंत्र्ययुद्धाचे शिल्पकार होते.
नाना साहेबांनी स्वातंत्र्यलढ्यात कानपूरमध्ये इंग्रजांविरुद्ध
क्रांतिकारकांचे नेतृत्व केले. नाना साहेब (धोंडू पंत) यांचा जन्म वेणुग्राम रहिवासी माधवनारायण
राव यांच्या घरी १८२४ साली झाला.
नानाराव हे पेशव्यांच्या दत्तकपुत्र
म्हणून स्वीकारले गेले आणि पेशव्यांनी त्यांच्या शिक्षणासाठी योग्य सोय केली.
त्यांना हत्ती, घोडा, तलवार
आणि रायफल कशी चालवायची, तसेच इतर अनेक भाषा शिकवल्या गेल्या.
तात्या टोपे आणि अझिमुल्ला खान हे त्यांचे जिवलग मित्र होते.
स्वातंत्र्याची घोषणा, पेशवेपद धारण
अव्यवस्थित कारभाराच्या निमित्ताने
गव्हर्नर डलहौसीने अयोध्येचे राज्य व निजामाचा वऱ्हाड प्रदेश ताब्यात घेतला.
त्यामुळे लहानमोठ्या सर्व संस्थानांत असंतोष निर्माण झाला.
संस्थाने खालसा झाल्यामुळे
त्यांच्यावर अवलंबून असलेले लोक व सैनिक बेकार झाले. १८३३
पासून १८५७ पर्यंत इंग्रजांनी साम्राज्य-विस्तारासाठी अनेक
युद्धे केली. या युद्धांचा खर्च हिंदी जनतेवर डोईजड कर बसवून
वसूल केला गेला. पाश्चात्य वस्तूंवरील आयात कर माफ
केल्यामुळे इंग्रजी मालाला उठाव मिळाला व देशी उद्योगधंदे बंद पडले. भारताचे दारिद्र्य वाढले. इंग्रजी अंमलात जमीनदार,
वतनदार, शेतकरी यांचे हाल झाले.
पेशवा बाजीराव दुसरा मरण पावल्यानंतर
लॉर्ड डलहौसीने नानासाहेबांना त्यांची ८ लाखांची पेन्शन नाकारली,
ज्यामुळे ते ब्रिटिश राज्याचे शत्रू बनले. या
अन्यायाबाबत नाना साहेब पेशव्यांनी अझीम उल्ला खान यांच्यामार्फत इंग्रज सरकारकडे
तक्रार केली होती, पण त्यांचे प्रयत्न निष्फळ ठरले.
नाना साहेब ब्रिटीश राज्याच्या
विरोधात वळले आणि इंग्रजांना भारतातून हाकलून देण्याचा कट रचू लागले. १ जुलै १८५७ रोजी इंग्रजांनी कानपूर सोडले तेव्हा नाना साहेबांनी पूर्ण
स्वातंत्र्याची घोषणा केली आणि पेशवेपद धारण केले.
मंगल पांडे यास ८ एप्रिल १८५७ रोजी
फाशी- उठावास सुरुवात
अठराशे सत्तावनच्या जानेवारी—फेब्रुवारी महिन्यांत डमडम व बराकपूर येथे काडतूस-प्रकरणावरून
गडबड झाली. मीरत येथील शिपायांनी नवी काडतुसे वापरण्याचे
नाकारल्यामुळे ,त्यांना कैद केले गेले. शिपायांनी सरकारी इमारती जाळण्यास सुरुवात केली. २९
मार्च १८५७ रोजी मंगल पांडे व इंग्रज अधिकारी ह्यांच्यात चकमक झाली. मंगल पांडे यास पकडून ८ एप्रिल १८५७ रोजी फाशी देण्यात आले.
येथूनच उठावास सुरुवात झाली.
हा उठाव सप्टेंबर १८५८ पर्यंत चालू राहिला.
क्रांतिकारी सैन्याचे नेतृत्व:
क्रांतिकारक सैन्याचे ते सेनापती होते. फतेहपूर आणि आंग यांसारख्या भागात
नाना साहेबांचे क्रांतिकारक सैनिक आणि इंग्रज यांच्यात जोरदार चकमकी झाल्या.
कधी क्रांतिकारकांचा विजय झाला, तर कधी
इंग्रजांचा विजय झाला.
मात्र इंग्रजांची संख्या वाढत होती.
नाना साहेबांनी गंगा पार
केली, पुन्हा नाना साहेब पेशवे कानपूरला परतले, तिथे त्यांनी कानपूर आणि लखनौमधला रस्ता इंग्रजांच्या ताब्यातून घेतला.
त्यानंतर नानासाहेब अवध सोडून रोहिलखंडाकडे निघाले. रोहिलखंडात आल्यावर त्यानी खान बहादूर खानशी निष्ठा ठेवली. जोपर्यंत नाना साहेबांना पकडले जात नाही तोपर्यंत बंड माजवता येणार नाही
हे इंग्रजांच्या लक्षात आले होते.
बरेलीमध्ये क्रांतिकारकांना मारहाण
झाली,गावे उधवस्त करण्यात आली . परंतु नाना
साहेबांनी फिरंगी आणि त्यांच्या साथीदारांना शरण जाण्यास नकार दिला. इंग्रज प्रशासनाने नाना साहेब पेशव्यांना पकडण्यासाठी मोठ्या प्रमाणात
प्रोत्साहन दिले, परंतु ते व्यर्थ ठरले.
कानपूरचा वेढा:
या युध्दामध्ये एका बाजुला होते ,ईस्ट इंडिया कंपनीचे क्रांतिकारक शिपाई, ग्वाल्हेर
संस्थान, झांशी संस्थान, मराठा
साम्राज्य आणी अनेक घटक.सेनापती होते, नानासाहेब पेशवा 2,
राणी लक्ष्मीबाई, तात्या टोपे, बेगम हजरत महल, कुंवरसिंघ आणी ईतर.
दुसर्या बाजुला होते,ईस्ट इंडिया कंपनी,भारतातील युरोपीय नागरिक,२१ भारतीय संस्थाने,नेपाळचे राज्य.गुरखा,सिख सैनिक हे ईस्ट इंडिया कंपनीच्या बाजुने लढले.हा काल खंड होता-१० मे
१८५७ - २० जून १८५८.
१८५७ मध्ये कानपूरला वेढा घातला गेला
तेव्हा नाना साहेबांच्या नेतृत्वाखालील भारतीय सैन्यासमोर अडचणीत सापडलेल्या
इंग्रजांनी शरणागती पत्करली. ही बातमी नाना
साहेबांपर्यंत पोहोचताच त्यांनी आणि तात्या टोपे यांनी १८५७ मध्ये कानपूर येथे
ब्रिटिश राजवटीविरुद्ध उठाव केला.
नाना साहेब गादीवर बसले.
इंग्रजांनी कानपूर सोडून पळ काढला. इंग्रज
पुन्हा एकत्र आले आणि कानपूरला परतले.
मार्च १८५८ मध्ये इंग्रजांनी झाशीला
वेढा दिला. ह्यू रोझ व झाशीची राणी लक्ष्मीबाई
यांच्यात लढाई होऊन इंग्रजांनी झाशीचा कबजा घेतला. पुढे राणी
लक्ष्मीबाई व तात्या टोपे दोघे ग्वाल्हेर येथे इंग्रजांविरुद्ध लढले.लढाईत लक्ष्मीबाई मरण पावली.
दि. २१-१-१८५९ रोजी राजपुतान्यात सीकार येथे तात्या टोपे व
इंग्रज यांच्यात झालेल्या लढाईत तात्या टोपे पकडले गेले. दि.
१८-४-५९ ला त्यास
इंग्रजांनी फाशी दिले.
नानासाहेब व इंग्रज यांच्यात कानपूर
येथे लढाई झाली. नानासाहेब रोहिलखंडाच्या बाजूस गेले
असता इंग्रजांनी त्याचा पाठलाग केला. कँबेल याने
रोहिलखंडातील उठाव मोडला. नानासाहेबास पकडण्यासाठी
इंग्रजांनी ५० हजारांचे बक्षीस जाहीर केले. नानासाहेब व हजरत
बेगम हे नेपाळात निघून गेले असावेत.
बहादुरशाहास इंग्रजांनी कैद करून
रंगूनला पाठविले.या उठावात निजाम, भोपाळच्या बेगमा, नेपाळचा राणा जंग बहादूर यांनी
इंग्रजांना मदत केली. पंजाबमधील शीख, काश्मीरचा
राजा व कित्येक जमीनदार इंग्रजांशी एकनिष्ठ राहिले.
हा उठाव यशस्वी होऊ शकला नाही;
कारण उठावातील लोकांच्यात एकजूट नव्हती. बरेचसे
भारतीय इंग्रजांना फितूर झाले होते. सर्व संस्थानिक उठावात
सामील झाले नव्हते.
मात्र या उठावाने भारतीय इतिहासाला
कलाटणी मिळाली. हिंदुस्थानचा राज्यकारभार ईस्ट
इंडिया कंपनीकडून इंग्लंडच्या संसदेकडे सोपविण्यात आला. इंग्लंडचा
राजा हिंदुस्थानचा बादशहा झाला. वि.दा.
सावरकरांनी ‘१८५७ चे स्वातंत्र्यसमर’ हा अद्वितीय मराठी ग्रंथ लिहिला. दुर्दैवाने
ग्रंथाची हस्तलिखित प्रत इंग्रजांनी जप्त केली.
१८५७ च्या युद्धाचा वारसा -
भारताच्या स्वातंत्र्यलढ्यावर परिणाम
१८५७ चा उठाव अखेर दडपण्यात आला असला
तरी, नानासाहेब पेशवे यांच्या योगदानाचा भारताच्या
स्वातंत्र्यलढ्यावर कायमचा प्रभाव पडला. स्वातंत्र्ययुद्धाने
ब्रिटिश राजवटीच्या कमकुवतपणा उघडकीस आणल्या आणि क्रांतिकारकांच्या भावी पिढ्यांना
प्रेरणा दिली. नानासाहेब पेशवे आणि त्यांच्या देशबांधवांच्या
धाडसाने आणि बलिदानाने राष्ट्रवादी चळवळीला चालना दिली.
नानासाहेब पेशव्यांच्या प्रेरणेने
वासुदेव बळवंत फडके, चाफेकर बंधू, स्वातंत्र्यवीर
सावरकर, भाई कोतवाल, हिराजी पाटील
आदींनी शौर्य दाखवले.
स्वतंत्र भारतात नानासाहेबांचा वारसा
१९४७ मध्ये भारताच्या
स्वातंत्र्यानंतर, नाना साहेबांना स्वातंत्र्यसैनिक
म्हणून मान्यता देण्यात आली. त्यांच्या सन्मानार्थ, कानपूरमध्ये नाना साहेब पार्क बांधण्यात आले, जे
त्यांच्या आणि त्यांचे भाऊ बाळा राव यांनी ब्रिटिश राजवटीविरुद्धच्या लढ्यात
दिलेल्या योगदानाचे स्मरण करते.
१८५७ च्या स्वातंत्र्ययुद्धाने एक
राष्ट्रीय भावना प्रज्वलित केली, ज्याने ब्रिटिश अजिंक्य नव्हते हे सिद्ध केले.
या चळवळीने भविष्यातील संघर्षांचा पाया घातला, ज्यामुळे अखेर १५ ऑगस्ट १९४७ रोजी भारताच्या स्वातंत्र्याचा पाया रचला
गेला - नाना साहेब पेशव्यांचे स्वतंत्र भारताचे स्वप्न पूर्ण
झाले.
नानासाहेब पेशवे यांच्या जयंती
द्विशताब्दीनिमित्त, आम्ही भारतमातेच्या या महान
सुपुत्राला आदरांजली वाहतो. लेखाच्या दुसऱ्या भागामध्ये नानासाहेब पेशव्यांनी
अठराशे सत्तावनच्या युद्धामध्ये दाखवलेल्या युद्ध नेतृत्वाची आपण विश्लेषण करू.
No comments:
Post a Comment