Total Pageviews

Sunday, 15 July 2018

देशात क्रूझ पर्यटनाला ‘अच्छे दिन’ !



देशाच्या अर्थव्यवस्थेत पर्यटन क्षेत्राचा वाटा अधिक असून यादृष्टीने केंद्राकडून सहकार्य मिळणे अपेक्षित असते. केंद्राकडून मोठय़ा प्रमाणात निधी प्राप्त झाल्यास पर्यटन क्षेत्राच्या विकासावर लक्ष केंद्रीत करता येऊ शकते. सध्या ‘क्रूझ’ पर्यटनाला देशात चालना देण्यावर केंद्र सरकार प्रयत्नशील आहे. याद्वारे रोजगार निर्मितीचेही लक्ष्य आपण गाठू शकतो.

आज जागतिक स्तरावर पर्यटन क्षेत्र विकसित होत असताना पूर्वापारच्या पर्यटन क्षेत्रातील संकल्पना आता कालबाहय़ होत आहेत. आपल्या देशाच्या आर्थिक विकासात पर्यटन क्षेत्राचा मोठा वाटा आहे. अगदी जम्मू काश्मीरपासून ते केरळपर्यंत विविध पर्यटनस्थळे आज विदेशी पर्यटकांसोबत देशी पर्यटकांना भुरळ घालतात. पर्यटन क्षेत्रात जसजसे बदल होत गेले तसतसे त्यामध्ये पर्यटनातील वेगवेगळय़ा शाखा समाविष्ट होत गेल्या. यामध्ये प्रामुख्याने वन पर्यटन, आरोग्य पर्यटन, साहसी पर्यटन, कृषी पर्यटन यांचा समावेश होता. त्याबरोबरच आता ‘क्रूझ पर्यटन’ (क्रूझ टुरिझम) यावर भर देण्यात येत आहे.
नुकत्याच मुंबईत ‘पोर्ट ट्रस्ट ऑफ मुंबई’च्या वार्षिक कार्यक्रमाच्या निमित्ताने आयोजित ‘प्रमोशन अँड डेव्हलपमेंट ऑफ क्रूझ टुरिझम इन इंडिया’ चर्चासत्रात केंद्रीय रस्ते व जल वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी आंतरराष्ट्रीय जलपर्यटन घडवणारी क्रूझ जहाजे अधिकाधिक संख्येने भारतात यावीत, समुद्रकिनारा असलेल्या देशाच्या विविध शहरातून ही जहाजे सफरीवर निघावीत व त्यातूनच  क्रूझ पर्यटनाला चालना मिळावी यासाठी केंद्राकडून 500 कोटीचा निधी देणार असल्याचे जाहीर केले. रस्ते तसेच रेल्वेमार्ग होणाऱया वाहतुकीसाठी जो खर्च येतो, त्याहीपेक्षा कितीतरी कमी वेळात व कमी पैशात जलवाहतूक होते. त्यामुळे समुद्र आणि देशातील नद्यांतून प्रवासी व मालवाहतूक करण्यावर केंद्र सरकारने लक्ष केंद्रीत केले आहे, असे गडकरी यांनी स्पष्ट केले. महाराष्ट्राच्या सागरी किनारपट्टीय भागात जास्तीत जास्त जेटी बांधण्याबाबतचा निर्णय घेण्यात येईल. तसेच ‘सागरमाला’ योजनेअंतर्गत क्रूझ पर्यटनासाठी ‘शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया’ला 500 कोटी देणार असल्याची घोषणा यावेळी गडकरी यांनी केली.
केंद्र सरकार क्रूझ पर्यटनाला चालना देण्यावर भर देत असल्यामुळे एकीकडे देशात क्रूझवर येणाऱया पर्यटकांच्या संख्येत तसेच सरकारच्या उत्पन्नातही वाढ होईल. पुढील 5 वर्षात तब्बल 40 लाख पर्यटकांना क्रूझ टुरिझमकडे आकर्षित करण्याचा सरकारचा मानस आहे. मात्र, या क्षेत्रासाठी पुढील 5 वर्षे जीएसटीमधून सूट मिळावी म्हणून केंद्राला विनंती करण्यात आली आहे. भारतात पर्यटकांना घेऊन येणाऱया जहाजांची संख्या सध्याच्या 158 वरून वाढून वार्षिक 955 पर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. यामुळे क्रूझ पर्यटनाद्वारे उत्पन्न 2022 पर्यंत 35,500 कोटींपर्यंत पोहोचू शकते. देशातील प्रमुख शहरांमधील ‘नाईट लाईफ’ आता इतिहासजमा झाल्याचे दिसून येते. अशावेळी मनोरंजनाच्या सर्व सोयी सुविधांसहित ‘पूझ’वर रात्रीची मजा लुटणे हे नवीन आकर्षण बनले आहे. प्रसिद्ध गायक सुरेश वाडकर यांच्या मते, क्रूझवर जाऊन स्वत:ला तणावरहित बनवू शकतो. यामुळेच महाराष्ट्राच्या पावलावर पाऊल ठेवून केरळमध्ये कोची, पश्चिम बंगाल कोलकाता, अंदमान निकोबार-पोर्ट ब्लेअर आणि तामिळनाडूमध्ये तुतिकोरीनमध्ये क्रूझ पर्यटनासाठी विशेष टर्मिनलचा प्रस्तावही देण्यात आला आहे.
एकंदरीत अभ्यास केल्यास सुटय़ांच्या काळात पर्यटक ‘क्रूझ’ हा नवा पर्याय स्वीकारत आहेत. विशेष करून भारताला लाभलेला विशाल समुद्रकिनारा हे त्यामागील मुख्य कारण. युरोपियन देशांमध्ये यापूर्वी विशेष ठरलेले क्रूझ लायनर भारतातील मागील काही वर्षात आलिशान आणि सुयोग्य समुद्र प्रवासाच्या शोधात आहेत. पॅसिफिक महासागरातील आलिशान क्रूझ ‘लिब्रा’ने मुंबईमध्ये आपली मागील वर्षी सेवा सुरू केली. त्यावेळी त्याच पहिल्या वर्षात या क्रूझवरून जवळपास 75,000 प्रवाशांनी गोवा आणि लक्षद्वीप यासारख्या प्रसिद्ध पर्यटनस्थळांचा मनमुराद आनंद लुटला. मुख्य म्हणजे भारतात क्रूझ पर्यटनाला आणखी वाव मिळण्यासाठी विशेष सेवा देण्यावर भर आवश्यक आहे. यामध्ये प्रामुख्याने सामान्य पर्यटकांनाही परवडेल अशा लग्नसोहळय़ांच्या पार्टी, सांस्कृतिक कार्यक्रम, नवविवाहित जोडप्यांसाठी हनिमून किंवा शालेय विद्यार्थ्यांसाठी विशेष सूट देण्यासाठी प्रयत्नशील असावे.
मुंबई पोर्ट ट्रस्टच्या परवानगीने खाजगी कंपनी या क्षेत्रात पाऊल टाकणार असून 150 ते 200 प्रवाशांची क्षमता असणाऱया या क्रूझचे भाडे एक ते दीड हजार रु.च्या घरात असण्याची शक्यता आहे. मुंबई-गोवा क्रूझ सेवेत सिंधुदुर्ग-रत्नागिरीतील महत्त्वाच्या बंदरांवर थांबे देण्यात येण्याची शक्यता आहे. यामध्ये रत्नागिरी, विजयदुर्ग, रेडी या मुख्य बंदरांचा समावेश असू शकतो.
  ‘क्रूझ पर्यटन’ आणि महाराष्ट्र याबाबतचा एकंदरीत विचार केल्यास एकूण 720 कि.मी. लांबीचा भव्य समुद्रकिनारा राज्याला लाभला असून यामध्ये अगदी मुंबईपासून रेडीपर्यंतच्या बंदरांचा समावेश होतो. अलिबाग, रेवदंडा, श्रीवर्धन, गुहागर, रत्नागिरी, गणपतीपुळे, विजयदुर्ग, देवगड, मालवण, आचरा, देवबाग-तारकर्ली, निवती, वेंगुर्ले, रेडी-शिरोडा, तेरेखोल ते गोव्यातील मिरामार, दोनापावला, वास्को, कर्नाटकातील मंगळूर हे कोकणपट्टय़ातील महत्त्वाचे समुद्रकिनारे. पर्यटन हंगामाचा अभ्यास केल्यास परदेशी आणि देशी पर्यटकांची ओढ ही वरील ठिकाणी अधिक असल्याचे दिसून येते. मुख्य म्हणजे कोकण किनारपट्टीत असे अजूनही काही समुद्रकिनारे आहेत; जे दुर्लक्षित आहेत. परंतु, हे भाग क्रूझ पर्यटनाच्या दृष्टीने अजूनही मागासलेलेच, असे म्हणावे लागेल. यासाठी सरकारने आणि मुंबई पोर्ट ट्रस्टने कोकणातील समुद्रकिनाऱयांवर ‘क्रूझ टुरिझम’बाबत  स्थानिकांना माहिती उपलब्ध करून देणे योग्य ठरेल. कारण, आजही विदेशी किंवा देशी पर्यटक या कोकणातील पर्यटनाचा आस्वाद घेण्यासाठी रेल्वे, खाजगी बसेस किंवा स्वत:च्या वाहनांचा पर्याय ठेवतात. परंतु, मुंबई-गोवा क्रूझ पर्यटन सेवेबाबत पर्यटकांना माहिती मिळण्यासाठी जाहिरातबाजीवरही लक्ष देण्यावर फायद्याचे ठरेल.   
क्रूझ पर्यटनातून आर्थिक बाजू मजबूत करण्यासाठी कोकणात जास्तीत जास्त चित्रपटांचे चित्रीकरण करण्यासाठी प्रोत्साहन देण्यावर भर आवश्यक असून पर्यटनस्थळांवर उपाहारगृहे आणि शॉपिंग प्लाझा यांची उभारणी करणे योग्य ठरेल.  क्रूझवरील पर्यटकांसाठी प्रामुख्याने स्थानिक कोस्टल फूडसहित अन्य पद्धतीच्या जेवणाची उपलब्धता करून देणे आवश्यक ठरेल. कोकणातील मालवण, देवबाग-तारकर्ली येथील वॉटर स्पोर्ट्सप्रमाणे अन्य ठिकाणीही या स्पोर्ट्सला चालना मिळणे आवश्यक ठरेल. या समुद्रकिनाऱयांवर दरवर्षी ख्रिसमसच्या सुटय़ांमध्ये विदेशी पर्यटक क्रूझद्वारे जवळपास एक महिना तळ ठोकून असतात. यातून कोकणच्या विकासालाही गती प्राप्त होते. याच पद्धतीद्वारे क्रूझ पर्यटनातून कोकणात रोजगार निर्मिती होऊन येथील जनतेसाठी ‘अच्छे दिन’ येतील यात शंका नाही.
रोहन नाईक

No comments:

Post a Comment