Total Pageviews

Thursday, 5 July 2018

कायदेपालनही महत्त्वाचेच, नाही का? महा एमटीबी 05-Jul-2018

आज जमावाने मारहाण केल्यामुळे लोकांचा जीव जाताना आपण पाहतो. पण, केवळ संशयावरुन एखाद्याला मारण्यापर्यंत-कायदा हातात घेण्यापर्यंत लोकांची मजल जातेच कशी? तर त्याचे मूळ आपल्या सांस्कृतिक संचितात जसे आहे, तसेच ते आपल्याकडे नसलेल्या घटनात्मक जाणीवेतही आहे.   
 
मुले पळवणारी टोळी असल्याच्या संशयातून धुळे जिल्ह्यात जमावाने पाचजणांची दगडाने ठेचून निर्घृण हत्या केली. आजच केंद्राने देशातील सर्वच राज्यांना अशाप्रकारच्या कायदा हातात घेणाऱ्या घटनांना रोखण्याचे निर्देश दिले. जमावाने केलेल्या मारहाणीच्या या अमानुष घटनांनी देशभरात खळबळ माजवलेली असतानाच आपल्याला एक नागरिक म्हणून काही गोष्टींचा नक्कीच विचार करावा लागेल. आपल्या देशाला पाच हजार वर्षांचा समृद्ध संस्कृतीचा अभिमानास्पद-गौरवास्पद इतिहास-वारसा असल्याचे आपण नेहमीच म्हणतो. आपल्या या समृद्ध सांस्कृतिक वारशात महाभारतकाळापासून ते हडप्पा, सिंधु, बौद्ध-जैन आणि त्यानंतरच्या हिंदू धर्म उत्थानाच्या काळाचा फार मोठा वाटा आहे. आजही देशाच्या या प्राचीन, अर्वाचीन इतिहासाचा, संस्कृतीचा, वारशाचा दाखला आपण वेळोवेळी देतच असतो. शिवाय आपले हे सांस्कृतिक संचित जगाला आणि प्रत्येक मानवाला नेहमीच दिशा दाखवणारे ठरल्याचेही आपण म्हणतो. ‘वसुधैव कुटुम्बकम।’ म्हणजेच संपूर्ण जगाला एक कुटुंब मानण्याचा घोष आपल्या संस्कृतीनेच केला. पण नंतरचा मध्ययुगीन अर्थात मुघल राजवटीचा कालखंड हिंसाचाराचा कळस गाठणारा असाच होता, तर मुघल सत्तेच्या ऱ्हासानंतर देशात ब्रिटिशांचा अंमल सुरु झाला. ब्रिटिश राजवट म्हणजे एतद्देशीयांवर जुलूम-जबरदस्ती-अन्याय-अत्याचार करणारी म्हणूनच ओळखली जाते. ब्रिटीशांच्या जुलूमाच्या कहाण्या आजही इतिहासाच्या पुस्तकांत पसरलेल्या दिसतात. ब्रिटीशांच्या याच जुलूमशाहीविरुद्ध लाखो क्रांतिकारक, स्वातंत्र्यसैनिक पेटून उठले व त्यांच्या प्रचंड त्याग व संघर्षाच्या बळावर देशाला स्वातंत्र्य मिळाले. स्वातंत्र्योत्तर कालखंड तर एखाद्या स्वप्नील युगासारखाच. स्वतःचे भविष्य स्वतः घडवण्याचा. मात्र, देशाच्या या एकूणच ऐतिहासिक प्रवासाचा विचार करता आपल्याला कायदा-सुव्यवस्था आणि नियमांची व त्याला अनुसरुन जगण्याची जाणीव कधी झाली, याचा विचार करता आपल्यासमोर ब्रिटीशांशिवाय अन्य कोणाचेही नाव येऊच शकत नाही.
 
ब्रिटीशांनी भारतात कायद्याची, नियमांची संकल्पना मांडली व रुजवली. लिखित आणि रचनात्मक स्वरुप देत, त्याची एक निश्चित अशी प्रणाली-व्यवस्थाही ब्रिटीशांनीच विकसित केली. एखादी नियमबाह्य घटना घडल्यास त्याची संबंधित व्यवस्थेसमोर तक्रार करणे, न्यायाची मागणी करणे, मिळालेला न्याय मान्य करणे हेही ब्रिटीशांनीच शिकवले. शिवाय, आज आपला देश ज्या संविधानाला अनुसरुन चालतो, त्या घटनात्मक लोकशाही प्रणालीचे पालकत्वही ब्रिटीशांकडेच जाते. अशा परिस्थितीत एकीकडे आपल्याला भारताच्या समृद्ध सांस्कृतिक वारशाचा, वसुधैव कुटुम्बकम मानत असल्याचा अभिमान वाटत असतानाच कायदा-सुव्यवस्था व नियमांना पायदळी तुडवून केवळ संशयाच्या आधारे जिवंत माणसाचा बळी घेणारेही आपल्यातलेच आहेत, हे नाकारुनही चालणार नाही. कायदे व नियमांची जाणीव आजही समाजातल्या सर्वच थरांत पोहोचली नसल्याचेच हे लक्षण आणि ते तसे का? असे विचारल्यास स्वातंत्र्योत्तर काळातील सत्ताधिशांकडेच अंगुलीनिर्देश करावा लागेल.
 
कायदा-सुव्यवस्था आणि नियमांची अंमलबजावणी, त्यांचे पालन आणि त्याला हवे तसे वाकवणे, पायदळी तुडवणे अशा सर्वच मुद्द्यांचा विचार करता देशातली संसाधने सर्व समाजापर्यंत पोहोचली नसल्याचेही मान्य करावे लागेल. त्यामुळे ही संसाधने आपल्यापर्यंत न पोहोचल्याने त्यांच्या प्राप्तीसाठी पुन्हा कायदा-सुव्यवस्था आणि नियमांना नख लावणे आलेच. त्यामुळे ही सवय ज्यांनी लावली, तेच इथल्या प्रत्येक अवैध गोष्टींना कारणीभूत असल्याचे स्पष्ट होते. शिवाय ही परिस्थिती का उद्भवली, कायद्याची पायमल्ली करत एखाद्या व्यक्तीला ठार मारण्यापर्यंत लोकांची मानसिकता खालच्या स्तरापर्यंत कशी जाते, हे पाहता आणखी एका गोष्टीचाही उल्लेख करावा लागेल. ती म्हणजे स्वातंत्र्य, समता आणि बंधुता ही मानवी मूल्ये-फ्रेंच राज्यक्रांतीने जगाला दिलेली मौल्यवान देणगी! नंतर ही मूल्ये जवळपास सर्वच पाश्चिमात्य देशांनी आपलीशी केली आणि अमेरिकेने तर या मूल्यांच्या आधारे आपला देश जगभरातल्या सर्वच मानवासाठी खुला केला. आजच्या बहुतांश अमेरिका वगळता इतर देशांतील लोकांचे अमेरिकेत जाण्याचे, तिथेच स्थायिक होण्याचे स्वप्न असते. कित्येक भारतीयांचेही तसेच स्वप्न आहे. पण हे स्वप्न का पाहतात लोक? तर समाजातल्या शेवटच्या माणसाचे स्वातंत्र्य, समता आणि बंधुता या मूल्यांच्या पायावर कसे कल्याण होईल, हा विचार करणारी तिथली राज्यघटना व लोकशाही प्रणाली आणि कायदा-सुव्यवस्था व नियम यामुळे. आपण आपल्या घटनेने कायदे पाळल्यास माझ्यासह सर्वांचेच हित निश्चितच साधले जाईल, ही तिथल्या नागरिकांची भावनादेखील याला कारणीभूत आहेच.
भारताचा विचार करता घटनेने केलेले कायदे पाळण्याची कितीलोकांची मानसिकता असल्याचे दिसते? वाहतुकीचे नियमांचे जिथे दिवसाढवळ्या उल्लंघन होते, ‘जिथे कचरा टाकू नये’ असे लिहिलेले असते, तिथेच कचरा टाकला जातो, त्या देशात खरेच नियमांना किती गांभिर्याने घेतले जात असेल? आज जमावाने मारहाण केल्यामुळे लोकांचा जीव जाताना आपण पाहतो. पण केवळ संशयावरुन एखाद्याला मारण्यापर्यंत-कायदा हातात घेण्यापर्यंत लोकांची मजल जातेच कशी? तर त्याचे मूळ आपल्या सांस्कृतिक संचितात जसे आहे, तसेच ते आपल्याकडे नसलेल्या घटनात्मक जाणीवेतही आहे. घटनेने केलेले कायदे-नियम मान्य केलेच पाहिजेत, याची जाणीव जोपर्यंत आपल्यात येत नाही, कोणताही गुन्हा घडत असताना वा घडल्यानंतर त्याची तक्रार घटनेने आखून दिलेल्या नियमांनुसार, संबंधित व्यवस्थेपर्यंत पोहोचत नाही, तोयर्पंत हे असे होतच राहणार. लोकशाहीने केलेली ही फार मोठी तजवीज आहे आणि आपण लोकशाही राष्ट्रात राहतो, त्यामुळे तिचे पालन केलेच पाहिजे. लोकशाही प्रणाली वा घटना परिपूर्ण आहे, असे नाहीच. पण जोपर्यंत या दोन्ही व्यवस्थांना समर्थ पर्याय उपलब्ध होत नाही, दुसरा मार्ग सापडत नाही, तोपर्यंत त्यातील त्रुटींसह त्यांचा स्वीकार करणे, हाच एकमेव पर्याय उरतो. त्यामुळे कायदा हातात घेऊन कोणाचा जीव घेण्याएवजी घटनात्मक मार्गाने एखाद्या विषयाची सोडवणूक कशी करता येईल, हाच विचार देशातल्या प्रत्येक नागरिकाने केला पाहिजे. तसे झाले तर, अशा हिंसक घटना नक्कीच टळतील

No comments:

Post a Comment