Total Pageviews

Friday, 20 July 2018

आता वेध ‘फाईव्ह जी’ चे महा एमटीबी

-मनोज मनोहर-TARUN BHARAT
तंत्रज्ञान वेगानं बदलत असतं. तसंच लोकही बदलत असतात. मोबाईल, इंटरनेट या सेवा इतक्या कमी काळात लोकांनी स्वीकारल्या की आता लोकांकडूनच अधिक वेगवान सेवेची अपेक्षा होऊ लागली आहे. भारताच्या इंटरनेट सेवेचा वेग आणि दर जगात सर्वाधिक असल्यानं आपण कमी पडत होतो. आता मात्र भारतात फाईव्ह जी सुरू करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. त्यामुळे मोबाईल आणि इंटरनेटचं विश्वच बदलून जाईल.
कोणतंही तंत्रज्ञान बाजारात येतं तेव्हा स्वीकारलं जाण्याचं प्रमाण कमी असतं. एकदा हे तंत्रज्ञान अंगवळणी पडलं की पुढचे बदल लवकर स्वीकारले जातात. इंटरनेटचंही तसंच आहे. अवघ्या तीन दशकांमध्ये इंटरनेटचा फर्स्ट जनरेशन ते आता फिफ्थ जनरेशन हा प्रवास थक्क करणारा आहे. केंद्र सरकारनं पुढच्या वर्षी देशात फाईव्ह जी सेवा सुरू करण्यास मान्यता दिली आहे. त्यासाठी प्रारंभिक तरतूद पाचशे कोटी रुपयांची आहे. तज्ज्ञ समिती त्यावर विचार करत आहे. पहिल्यापेक्षा दुसरं तंत्रज्ञान अधिक वेगवान आणि सुसह्य असतं. त्यापेक्षा पुढच्या पिढीतलं तंत्रज्ञान आणखी गतिमान असतं. तंत्रज्ञानाची प्रत्येक पिढी अधिक गतिमान आणि सुसह्य होत जाते. माणूस आणि इंटरनेट यांचं नातं दिवसेंदिवस अधिकाधिक घट्ट होत चाललं आहे. संगणकांवर लॅनच्या माध्यमातून चालणार्‍या इंटरनेटनं केव्हाच कात टाकली आणि वायरलेस इंटरनेटची ओळख जगाला झाली. आता वाय-फायचा जमाना आहे. वायफायमुळे इंटरनेट वेगवेगळ्या संवादसाधनांवर वापरता येऊ लागलं आणि स्पर्धा सुरू झाली. इंटरनेटच्या वेगाच्या स्पर्धेत फर्स्ट जनरेशनते फोर्थ जनरेशनपर्यंत असं एकापाठोपाठ एक तंत्रज्ञान बाजारात आलं. इंटरनेटचं नवं तंत्रज्ञान वापरणारी पिढी तंत्रस्नेही आहे. या पिढीच्या मागण्या आणि गरजा लक्षात घेऊन सेवेत बदल केले जात आहेत. वेग वाढवण्यातही सेवा पुरवठादारांमध्ये मोठी स्पर्धा सुरू झाली आहे. आता तर दहा गीगाबाईट्‌स प्रति सेकंद इतका अचाट वेग मोबाईलवर देऊ शकणारं इंटरनेट भारतात दाखल व्हायला फार काळ राहिलेला नाही. आणखी वर्षा-दीड वर्षात भारतात 5-जी सेवा सुरू होऊ शकेल आणि त्यानंतरच्या तीन वर्षांमध्ये संपूर्ण देशानं हे तंत्रज्ञान अंगीकारलेलं असेल.


मोबाईल आणि इंटरनेट ही आता केवळ सुशिक्षितांची मक्तेदारी राहिलेली नाही. खेड्यापाड्यातील महिलाही आता मोबाईलवर इंटरनेटचा वापर करत असतात. व्हॉट्‌स अॅप, फेसबुकसारख्या सेवांना इंटरनेटची गरज लागते. अगदी दोन-तीन वर्षांची मुलंही इंटरनेटवर यु ट्युबवर व्हिडीओ पाहत असतात. ते चांगलं की वाईट, हा स्वतंत्र लेखाचा विषय होऊ शकेल. परंतु, इंटरनेट आणि मोबाईल हे जीवनाचे अविभाज्य भाग कसे झाले आहेत, हे समजण्यासाठी ही दोन उदाहरणं पुरेशी आहेत. बदलत राहणारं तंत्रज्ञानसुद्धा आता आपल्या जगण्याचाच एक भाग झालं आहे. वन जी-ची सेवा सुरू झाली तेव्हापासून, म्हणजे 1980 च्या दशकापासून त्याच्या वायरलेस सेवेची ओळख देशाला झाली. त्यानंतर या सेवेवर बरंच संशोधन झालं. 10 वर्षांनी ही सेवा सगळ्यांसाठी खुली करण्यात आली. या सेवेद्वारे केवळ व्हॉईस कॉल केला जाऊ शकत होता.
थ्रीजीच्या मोबाईलमधील इंटरनेटचा वेग होता 2 मेगाबाईट्‌स प्रती सेकंद. त्यानंतर आलं फोर जी तंत्रज्ञान. या जनरेशनच्या मोबाईलवर इंटरनेटचा वेग हवा 100 मेगाबाईट्‌स किंवा एक गीगाबाईट प्रती सेकंद. मात्र, तसं घडत नाहीये.


या पार्श्वभूमीवर देशात येत्या काही दिवसांमध्ये फाईव्ह जी सेवा सुरू होत आहे. सध्या भारतातला इंटरनेटचा वेग एक गीगाबाईट प्रतिसेकंद आहे. तो फाईव्ह जी तंत्रज्ञान आल्यानंतर 10 गीगाबाईट्‌स प्रती सेकंद होईल. केंद्र सरकारनं फाईव्ह जी साठी समिती नेमल्यानंतर लगेच मोबाईल कंपन्यांमध्येही फाईव्ह जीची सेवा देण्याबाबत स्पर्धा सुरू झाली आहे. आता भारतातील 40 कोटींहून अधिक लोक इंटरनेटचा वापर करतात. ते तर लगेच मोबाईल बदलतील. आधुनिक तंत्रज्ञानाचा स्वीकार करायला अन्य लोकही तयार होतात. त्यातून किमान दहा कोटी लोक नवे मोबाईल घेण्याची शक्यता आहे. त्यामुळे बाजारात हजारो कोटींची उलाढाल होण्याची शक्यता आहे. भारतातल्या जवळपास सर्व मोबाईल ऑपरेटर कंपन्या 5 जी सेवा सुरू करण्याच्या तयारीला लागल्या आहेत. गेल्या काही दिवसांमध्ये मोबाईलवर आवडता चित्रपट डाऊनलोड करण्याचं प्रमाण भारतातही वाढलं आहे. फोर जी तंत्रज्ञान असलेल्या मोबाईलमध्ये एक जीबी फाईल साईजचा सिनेमा डाऊलोड होण्यासाठी मुंबई-पुण्यासारख्या शहरी भागातही अर्धा तास लागतो.


फाईव्ह जी तंत्रज्ञान आलं तर हा सिनेमा फोटो क्लिक करण्याइतक्या कमी वेळेत डाउनलोड होऊ शकेल! भारतात ऑप्टिकल फायबर नेटवर्कचं जाळं विस्तारत आहे. त्यातही केंद्र सरकार आणि मोबाईल ऑपरेटर कंपन्यांनी जिथं जास्त महसूल तिथं जास्त लक्ष, असं धोरण ठेवलं आहे. त्याचा परिणाम अजूनही ग्रामीण भाग वेगवान मोबाईल सेवा तसंच ऑप्टिकल फायबर तंत्रज्ञानापासून वंचित आहे. त्या तुलनेत शहरांवर जास्त लक्ष केंद्रित करण्यात आलं आहे. बहुतांश शहरी आणि निमशहरी भागापर्यंत फोर जी सेवा पोचली आहे. कदाचित फाईव्ह जी सेवा देशाच्या सर्व भागात फोर जीच्या अगोदर पोहोचलेली असेल.
केंद्र सरकारनं अजून फाईव्ह जी स्पेक्ट्रमचा लिलाव केलेला नाही. थ्रीजी आणि फोर जीच्या लिलावावरून झालेला वाद आणि त्यानंतर त्याचा त्या सरकारला बसलेला फटका लक्षात घेऊन हे सरकार या लिलावातून किती पैसे मिळतील, याचा अभ्यास करत आहे. मोबाईल कंपन्यांमधील स्पर्धेमुळे आता कंपन्यांची आर्थिक स्थिती पूर्वीइतकी सुदृढ राहिलेली नाही. उलट, कंपन्यांचे ताळेबंद तोटा दाखवत आहेत. या पार्श्वभूमीवर फाईव्ह जी सेवेच्या स्पेक्ट्रम लिलावाला मोबाईल ऑपरेटर कितपत प्रतिसाद देतील, याबाबत साशंकता आहे. फोर जी सेवा अजून देशात सगळीकडे पोचलेली नसताना फाईव्ह जी सेवा आली तर जनता तिचं कसं स्वागत करेल, याची चाचपणी सरकार करत आहे. असं असलं, तरी मोबाईल ऑपरेटर्स आणि मोबाईल कंपन्या फाईव्ह जीचं तंत्रज्ञान स्वीकारण्याबाबत उत्साही आहेत. लोकसभा निवडणुकीच्या अगोदर सरकार फाईव्ह जी स्पेक्ट्रमचा लिलाव करण्याची शक्यता आहे.


देशातल्या इंटरनेट-यूजर्सची संख्या 2021 मध्ये दुपटीनं वाढून 82.9 कोटींवर जाण्याची शक्यता आहे. याचा अर्थ देशातली जवळपास 59 टक्के जनता इंटरनेटचा वापर करत आहे. याव्यतिरिक्त डिजिटल क्रांतीचा भाग बनलेल्या उपकरणांची संख्या 2021 मध्ये दोन अब्जांवर जाण्याची शक्यता आहे. सध्या वापरात असलेल्या उपकरणांची संख्या 1.4 अब्ज आहे. शिवाय आयपी ट्रॅफिकचा वेगही येत्या पाच वर्षांमध्ये सरासरी 30 टक्क्यांनी वाढणार आहे. त्यामुळे फाईव्ह जी सेवा असलेल्या मोबाईल हॅण्डसेटची संख्या वाढवणं हे सगळ्यात मोठं आव्हान असणार आहे. लोकांच्या वाढत्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी वेगवान ग्राहककेंद्रित सेवा पुरवणं हे एक मोठं आव्हान असेल. ज्यांच्याद्वारे सिग्नल प्रसारित केले जातात, अशा ध्वनिलहरींच्या उपलब्धतेवर फाईव्ह जी सेवा अवलंबून आहे. त्यासाठी मोठ्या पायाभूत सुविधांची आवश्यकता आहे.


फाईव्ह जी तंत्रज्ञानानुसार सरकारनं शहरी क्षेत्रांमध्ये 10,000 मेगाबाइट प्रति सेकंद (एमबीपीएस) आणि ग्रामीण क्षेत्रांमध्ये 1000 एमबीपीएसच्या गतीने इंटरनेट स्पीड उपलब्ध करण्याची योजना बनवली आहे. बीएसएनएल आणि नोकियानंही सध्याच्या नेटवर्कला फाईव्ह जी मध्ये अपग्रेड करण्याबाबत करार केल्याचं वृत्त आहे. सध्या याबाबतची तयारी सुरू असून ही सेवा व्यावसायिकदृष्ट्या लॉंच करण्यासाठी किमान तीन वर्षांचा कालावधी अपेक्षित आहे. ज्या दिवशी फाईव्ह जी सेवा जागतिक स्तरावर सुरू होईल, त्याच दिवशी ती बीएसएनएलकडून भारतात सुरू केली जाईल, असं बीएसएनएलचे महाव्यवस्थापक अनिल जैन यांनी सांगितलं. बीएसएनएलनं फाईव्ह जी सेवांच्या चाचणीसाठी जपानच्या एनटीटी अॅडव्हान्स टेक्नॉलॉजी कॉर्पोरेशनची भारतीय भागीदार व्हर्गो कॉर्पोरेशनबरोबर सामंजस्याचा करार केला आहे. नोकिया भारतात 5 जी नेटवर्क सेवा सुरू करणार आहे. सुरुवातीला प्रायोगिक तत्त्वावर सुरू करण्यात येणार्‍या 5 जी सेवेसाठी बंगळुरूत विकास केंद्र उभारणार आहे. 2020 पर्यंत नोकियाचं 5-जी नेटवर्क कार्यान्वित होण्याची शक्यता आहे. सध्या भारती एअरटेल आणि बीएसएनएलच्या मदतीनं भारतात प्रायोगिक तत्त्वावर 5-जी सेवा सुरू करण्याचा कंपनीचा मानस आहे

No comments:

Post a Comment