Total Pageviews

Friday, 6 July 2018

भय इथले संपत नाही... महा एमटीबी 06-Jul-मल्हार कृष्ण गोखले

सोव्हिएत रशिया समर्थ असला पाहिजे; पण त्यातही आमच्या कम्युनिस्ट बोल्शेविक पक्षाची सत्ता सर्वसमर्थ असली पाहिजे, ही भावना श्रेष्ठ असल्यामुळे लेनिन आणि स्टॅलिन यांनी आपल्याच कोट्यवधी देशबांधवांची कत्तल केली. तोच नमुना माओने गिरवला. माओच्या ‘हनुमान उडी’ व ‘सांस्कृतिक क्रांती’ इत्यादी महत्त्वाकांक्षी कार्यक्रमात किती चिनी नागरिक ठार झाले, हे अजूनही कळलेलं नाही.
 
भारताच्या थेट उत्तरेला सुमारे २२ हजार फूट उंचीवर पामीरचे पठार आहे. पामीरला ‘जगाचं छप्पर’ असं म्हटलं जातं. पामीरच्या पलीकडे चीनच्या सिकियांग किंवा आता नव्या उच्चारानुसार झिंजियांग प्रांतात लॉप नूर आहे. मुळात ते एक विस्तीर्ण सरोवर होतं. तारिम नदी त्या सरोवरात विलीन होत असे. प्राचीन चिनी भूगोलतज्ज्ञांनी नोंदवलेल्या माहितीनुसार, लॉप नूर सरोवराचं एकूण क्षेत्रफळ किमान १० हजार चौरस कि. मी. असावं. पण, तक्लामकान आणि कुरुक्ताग या दोन बाजूच्या दोन वाळवंटांनी त्या सरोवरावर आक्रमण केलं. १९२८ साली सरोवराचा शिल्लक भाग नीट मोजला गेला. तो फक्त ३१०० चौरस कि.मी. एवढाच होता आणि तीसुद्धा दलदल यांच्या स्वरूपातला. पुढच्या काळातं लॉप नूरच्या या विनाशात आणखीन भरच पडली. कारण, त्याच्या सभोवतीची पॉपलर आणि विलो वृक्षांची झाडी वेगाने नष्ट होऊ लागली. वास्तविक, चीनच्या या भागात एकंदर लोकवस्ती कमालीची विरळ आहे. चीनमधून पश्चिमेकडे जाणाच्या प्राचीन आणि प्रख्यात अशा सिल्क रूट- रेशीम मार्गावर हा सगळा भाग येतो. पण, तरीही आधुनिक यांत्रिक साधनांमुळे झाडी वेगाने तुटू लागली. आणि १९५० नंतर या विनाशात आणखी भर पडली, ती चीनच्या अणुस्फोटांची.
 
चीन या अफाट भूप्रदेश आणि अपार लोकसंख्या असणाऱ्या देशात पूर्वापार राजेशाही होती. इंग्रजांनी भारताप्रमाणे चीनवर प्रत्यक्ष राज्य केलं नसलं, तरी चीनचं भरपूर शोषण केलं. चीन हा राजेशाहीच्या जोखडातून सुटून सार्वभौम प्रजासत्ताक देश बनला. यानंतर १९१७ साली रशियात साम्यवादी क्रांती झाली आणि तो देश जगातला पहिला साम्यवादी राज्यव्यवस्था असणारा देश बनला. पुढच्या काही वर्षांतच सोव्हियत रशिया हा देश किती झपाट्याने प्रगती करतो आहे आणि ही प्रगती करणं त्याला साम्यवादी व्यवस्थेमुळेच कसं शक्य होत आहे, याचे ढोल जगभर पिटण्यात येऊ लागले. जगभरात साम्यवादी तत्त्वज्ञानाबद्दल प्रचंड आकर्षण निर्माण झालं. विशेषत: तरुण पिढीवर तर त्याचा फारच प्रभाव पडला. त्यापैकीच एक तरुण होता, चीनमधला माओ त्से-तुंग किंवा नव्या उच्चारानुसार माओ झेडिंग. माओने १९२१ सालापासून चिनी साम्यवादी राजकारणाला सुरुवात केली आणि अखेर १९४९ साली लोकशाही प्रजासत्ताक राज्यव्यवस्था हद्दपार करून त्याने चीनला साम्यवादी राज्य बनवलं. लोकशाही पक्षाने, चीनच्या मुख्य भूमीच्या पूर्वेला पॅसिफिक महासागरात फोर्मोसा नावाच्या बारक्याशा बेटात त्याने आश्रय घेतला. वास्तविक, माओला त्यांना तिथूनही घालवून द्यायचं होतं. पण, अमेरिका आड आली. तिने लोकशाही पक्षाच्या चँग कै-शेकच्या सरकारला खरं चिनी राष्ट्र म्हणून मान्यता दिली. माओचा नाईलाज झाला. कारण, अमेरिकेकडे अणुबॉम्ब होता. त्याचा भीषण प्रताप १९४५ साली सगळ्यांनीच अनुभवला होता. आता तर अमेरिकेचे दोस्त असलेल्या ब्रिटन आणि फ्रान्सकडेही त्यांचे व्यक्तिगत अणुबॉम्ब होते. तसा माओचा दोस्त आणि साहायक असलेल्या सोव्हिएत रशियाकडेही अणुबॉम्ब होताच. पण, माओ महावस्ताद होता. त्याला सोव्हिएत रशियाकडून सर्व प्रकारची मदत तर हवी होती. मात्र, त्याबदल्यात त्याला स्टॅलिनची ताबेदारी नको होती. पूर्व युरोपीय देशांप्रमाणे त्याला स्टॅलिनचे मांडलिकत्व नको होतं. त्याने फोर्मोसा प्रश्नांवर तात्पुरती माघार घेतली. फोर्मोसाचं तैवान असं नवं नाव ठेवण्यात आलं. तैवानला राष्ट्रसंघाच्या सुरक्षा समितीचं कायम सभासदत्व देण्यात आलं. यावर माओचा उपाय होता-चीनचं बळ वाढवणं हा आणि बळ वाढवणं याचा अर्थ अण्वस्त्रसज्ज होणं.
 

 
 
१९४९ साली, सत्ताधारी झालेल्या नी १९५४-५५ साली तैवानच्या प्रश्नावरून अमेरिकेशी गरमागरमी करणाऱ्या माओने १९५६ सालापासून चीनचा अण्वस्त्रविकास कार्यक्रम धडाक्याने पुढे रेटला. या वेळेपर्यंत सोव्हिएत रशियात स्टॅलिनचा संशयास्पद मृत्यू होऊन, निकीता क्रुश्चेव्ह हा सत्ताधीश बनला होता. पहिल्यापासूनच सोव्हिएत रशियाने चीनला साम्यवादी बंधू म्हणून भरपूर साहाय्य केलेलं होतं. आताही क्रुश्चेव्ह अण्वस्त्रविकास कार्यक्रमासाठी चीनला भरपूर मदत केली. अनेक सोव्हिएत लष्करी अणुशास्त्रज्ञ चीनमध्ये आले. एक प्रायोगिक अवस्थेतली अणुभट्टी उभारण्यात आली. युरेनियमवर प्रक्रिया करण्याची यंत्रणा उभी करण्यात आली. एवढेच नव्हे, तर अण्वस्त्रवाहून नेणारं एक क्षेपणास्त्र सोव्हिएत संघाने चीनला द्यावं आणि ते खोलून त्याचं यांत्रिक, तांत्रिक पृथक्करण करण्याची परवानगीही चिनी शास्त्रज्ञांना मिळावी, इथपर्यंत माओने क्रुश्चेव्हला पटवलं. हे चालू असताना पाश्चिमात्य देशांमधल्या हेर जाळ्यांकडूनही माओ अण्वस्त्रविकासांबद्दल मौल्यवान माहिती मिळवतच होता. अचानक क्रुश्चेव्हच्या लक्षात आलं असावं की, माओ आपल्यावरही कुरघोडी करण्याच्या उद्योगात आहे. जून १९५९ मध्ये क्रुश्चेव्हने निर्णय घेतला की, चीनला अण्वस्त्रविकासासाठी देण्यात येणारी मदत थांबवायची. पण, तोपर्यंत माओचं काम झालेलं होतं.
 
चिनी अणुशास्त्रज्ञ स्वतंत्रपणे अणुबॉम्ब बनवण्याइतके कुशल बनले होते. चीनच्या अण्वस्त्रविकास कार्यक्रमाचे प्रवर्तक म्हणून ओळखले जाणारे हे दहा शास्त्रज्ञ अत्यंत बुद्धिमान आणि उच्च विद्याविभूषित होते. त्यांच्यापैकी सहाजण अमेरिकेत, एकजण फ्रान्समध्ये आणि एकजण जर्मनीत शिकून आले होते, तर अस्त्रविद्या प्रयोगशाळेचा संचालक चेंग कैजिआ व थर्मोन्युक्लिअर अण्वस्त्राचं पहिलं डिझाईन बनवणारा पेंग हुआन-हू हे दोघे ब्रिटनच्या एडिंबरो विद्यापीठाचे स्नातक होते. या सर्वांनी मिळून चिनी अणुबॉम्ब सिद्ध केला आणि त्याचा पहिला चाचणी स्फोट १६ ऑक्टोबर १९६४ या दिवशी लॉप नूरच्या दलदली वाळवंटात करण्यात आला. चीनमध्ये सर्वत्र प्रचंड जल्लोश झाला. क्रुश्चेव्हने १९५९ च्या जून महिन्यात चीनला मदत देण्याचं थांबवलं होतं. म्हणून त्याला जणू खिजवून दाखवण्यासाठी माओने या विकास प्रकल्पाचे नाव ‘५९६’ म्हणजे ५९ सालचा ६ वा महिना असं ठेवलं.
 
१९६४ पासून १९९६ पर्यंत चीनने लॉप नूर भागात एकंदर ४५ चाचणी अणुस्फोट केले. यात थर्मोन्युक्लिअर बॉम्ब, हायड्रोजन बॉम्ब, न्यूट्रॉन बॉम्ब असे सगळे प्रकार होते. १९९६ साली चीनने ‘सी.टी.बी.टी’ या नावाने प्रसिद्ध असलेल्या अण्वस्त्रबंदी करारावर सही केली. त्यामुळे त्यानंतर त्याने अजून तरी अणुस्फोट केलेला नाही. अशा प्रकारे, चीन अण्वस्त्रसज्ज झाला. अमेरिकेशी पंगा घेऊन आणि सोव्हिएत रशियाला बनवून चीन अण्वस्त्रसज्ज झाला, हे खरं म्हणजे कौतुक करण्यासारखं आहे. अमेरिका, रशिया आणि अन्य विकसित युरोपीय अण्वस्त्रसंपन्न देशांना आपल्या पुढारलेपणाची भयंकर घमेंड आहे. त्यांच्या दृष्टीने चीन हा एक मागास, शेतीप्रधान, आशियाई देश होता. आशियाई, पौर्वात्य देश म्हणजे मागास नव्हे. आम्हीही तुमच्याइतकेच बुद्धिमान आहोत, आम्हीही अणुबॉम्ब विकासासारखा अत्याधुनिक वैज्ञानिक कार्यक्रम यशस्वी करू शकतो, हे सिद्ध करून चीनने या घमेंडखोर पाश्चिमात्यांना, एक सणसणीत चपराक ठेवून दिली इथपर्यंत ठीक आहे. ‘माझं राष्ट्र अत्यंत सबल, समर्थ, अत्याधुनिक असलंच पाहिजे,’ अशी महत्त्वाकांक्षा प्रत्येक राज्यकर्त्याने बाळगलीच पाहिजे. पण, वांधा इथून पुढे सुरू होतो. सोव्हिएत रशिया समर्थ असला पाहिजे; पण त्यातही आमच्या कम्युनिस्ट बोल्शेविक पक्षाची सत्ता सर्वसमर्थ असली पाहिजे, ही भावना श्रेष्ठ असल्यामुळे लेनिन आणि स्टॅलिन यांनी आपल्याच कोट्यवधी देशबांधवांची कत्तल केली. तोच नमुना माओने गिरवला. माओच्या ‘हनुमान उडी’ व ‘सांस्कृतिक क्रांती’ इत्यादी महत्त्वाकांक्षी कार्यक्रमात किती चिनी नागरिक ठार झाले, हे अजूनही कळलेलं नाही.
 
लॉप नूरचंही हेच झालं आहे. अतिशय विरळ लोकवस्तीचा भाग म्हणून लॉप नूरमध्ये १९६४ ते १९९६ या ३२ वर्षांत ४५ अणुस्फोट करण्यात आले. त्यामुळे निर्माण झालेल्या रेडिओअॅक्टिव्ह क्षेत्राचे दुष्परिणाम होऊ नयेत, यासाठी मात्र कोणतीही खबरदारी घेण्यात आलेली नाही. १९५७ साली चीनमध्ये दुष्काळ पडला. कित्येक लाख लोक भुकेने मेले. पण, त्याही स्थितीत देशाच्या अर्थसंकल्पातील फार मोठा भाग अण्वस्त्रविकासावरच खर्च होत होता. विशेष म्हणजे जे प्रमुख दहा शास्त्रज्ञ आणि त्यांचे शेकडो मदतनीस अण्वस्त्रविकासासाठी रात्रंदिवस राबत होते, त्यांचं वैयक्तिक जीवन तरी सुखाचं होतं का? छे! त्यांचे पगार बेताचेच होते. एवढेच नव्हे, तर देशात दुष्काळ पडलाय म्हणून त्यांनाही रेशनवर तुटपुंज अन्नधान्य मिळत होतं. याला साम्यवादी तत्त्वज्ञान म्हणायचे की, समानतेच्या नावाखाली चाललेलं शोषण म्हणायचं?
 
अणुस्फोटानंतर प्रकल्पाच्या परिसरातल्या किमान दीड कोटी लोकांना रेडिओअॅक्टिव्ह विषबाधेचा त्रास झाला. त्यापैकी किमान १ लाख ९० हजार लोक विविध प्रकारच्या कर्करोगाला बळी पडले. किमान ३५ हजार स्त्रियांचा गर्भपात झाला आणि जी बालकं जन्मली, त्यांना जन्मत:च अनेक दुर्धर रोग होते. त्यांच्या पाठीचे कणे जन्मत:च वाकडे होते. या रेडिओअॅक्टिव्ह विषबाधेबद्दल चीन सरकार इतकं बेपर्वा आहे की, त्यांनी प्रतिबंध करण्यासाठी काहीही उपाय केलेले नाहीत. त्यामुळे ही विषबाधा वाढत्या वयाबरोबर झिजियांग प्रांतात पश्चिमेला दूरवर म्हणजे अगदी कझाकस्तान आणि किर्गिजस्तानच्या सीमेपर्यंत पसरली आहे. लॉप नूर भागातले रहिवासी अनेक रोगांना तोंड देत जेमतेम ५०-६० वर्षे जगतात. त्यापेक्षा मोठ्या वयाची व्यक्ती तिथे आढळतच नाही. त्याबद्दल सरकारला काहीही पर्वा नाही. साम्यवादी तत्त्वज्ञान श्रमिकांच्या म्हणजेच सामान्य माणसांच्या राज्याचा विचार मांडते, पण राज्यावर आलेले साम्यवादी, सामान्य माणसांना ‘माणूस’ समजतचं नाहीत

No comments:

Post a Comment