Total Pageviews

Friday, 27 July 2018

अजून एक बुजगावणे! महा एमटी-PAK ELECTIONS MUST READ

पाकिस्तानी निवडणुकांचा फार्स पूर्ण झाला आहे. माजी क्रिकेटपटू आणि आपल्या गुलछबू वागणुकीसाठी प्रसिद्ध असलेल्या इमरान खान यांच्या ‘तहरिक-ए- इन्साफ’ पक्षाला पाकिस्तानी जनतेने निवडून दिले आहे. पाकिस्तानी नागरिकांनी शहबाज शरीफ, बिलावल भुत्तो या बड्या राजकीय नेत्यांना अव्हेरून या माजी क्रिकेटपटूला निवडून दिले, यातच बरेच काही आले. खरेतर पाकिस्तानी राजकारणी, त्यांची घराणी या साऱ्यांचे लष्कर अमेरिका व नव्याने जोडल्या गेलेल्या चीनशी असलेले संबंध हा वेगळ्या लेखाचा विषय होऊ शकतो. हाफिज सईदच्या पक्षाला न मिळालेला पाठिंबा हा आपल्याला कदाचित सुखावणारा कौल वाटू शकतो, मात्र हा एकमेव असा कल आहे जो सुखावणारा ठरावा. कारण बाकी आघाड्यांवर असलेली पाकिस्तानी बोंब कायम आहे. इमरान खानने निवडणुकीचे निकाल पूर्णपणे हाती आल्यावर जे विधान केले, त्यावरून भारताच्या पुढ्यात काय वाढून ठेवले आहे याची कल्पना यावी. “मला मिळालेल्या प्रचंड विजयामुळे नरेंद्र मोदी घाबरले आहेत,” असे विधान इमरान खानने केले आहे. आता हे वाचून कुणालाही हसू येईल, मात्र पाकिस्तानात अशी विधाने राजकीयदृष्ट्या गरजेची असतात. पूर्वी पाकिस्तानी अवाम अशा वाक्यांनी खुश व्हायची. त्यात आता पाकिस्तानी लष्कराची भर पडली आहे.
परवेझ मुशर्रफ यांच्या हकालपट्टीनंतर पाकिस्तानी लष्कराने पाकिस्तानी राजकारणाचा पूर्णपणे ताबा घेतला. पाकिस्तानात तो यापूर्वीही होता, पण राजकीय नेते आणि लष्करी अधिकारी यांच्यात ही संगीतखुर्ची चालायची. नवाझ शरीफ तुरुंगात गेल्यानंतर आता लष्कराने यापुढे सत्ता पूर्णपणे आपल्या इशाऱ्यावर चालेल याची काळजी घेतली आहे. इमरान खानचे मोदींविषयीचे विधान हे याच आयामातून पाहिले पाहिजे. लष्कराला खुश ठेवले नाही तर आपला नवाझ शरीफ होईल, याची इमरान खानना पूर्ण कल्पना आहे. इमरान खानच्या पक्षाला बहुमताकडे सरकविण्यासाठी लष्कराने केलेले प्रयत्न मोलाचे आहेत. वस्तुत: इमरान खानला कधीही राष्ट्रीय स्तरावरचे स्थान नव्हते. क्रिकेटर म्हणूनही तो फारसा लोकप्रिय नव्हता. नवाझ शरीफ यांच्या विरोधात त्याला उभा करण्यापूर्वी लष्कराने अतिशय धूर्तपणे शरीफ यांचे आर्थिक गैरव्यवहार उघडकीला आणले. बलुचिस्तान, क्वेटा, पख्तून या भागात बॉम्बस्फोट घडवून आणले गेले, ज्यात अनेक पाकिस्तानी नागरिक दगावले. यातून पाकिस्तानी जनतेत असा संदेश गेला की, हे सरकार आपल्या रक्षणार्थ नाही. पंजाबी मुसलमानांत नवाझ शरीफ यांचा चांगला प्रभाव होता. पारंपरिकरित्या पश्तून पठाण व पंजाबी मुसलमान यांचे पटत नाही. इमरान खानला उभे करून इथे हे ध्रुवीकरण उत्तमरित्या केले गेले. पाकिस्तानी लष्कर हे सगळे उद्योग करण्यात तरबेज झाले आहे. अनागोंदी तयार करायची, हा त्यांचा शिरस्ता. या सगळ्याच अनागोंदीत उठ म्हटले की उठेल आणि बस म्हटले की बसेल, असे बुजगावणे लष्कराला हवे होते. इमरान खानच्या रूपाने ते लष्कराला मिळाले.
लष्करी हुकूमशाहांना जागतिक राजकारणात मान्यता नाही. त्यामुळे अशी बुजगावणी लष्कराला सतत लागतात. गेल्या काही वर्षांत लष्कराने स्वत:ची अशी अर्थव्यवस्था उभी केली आहे. पाकिस्तानी कॉर्पोरेट आणि लष्कराचे अधिकारी यांची युती पाकिस्तानातले बरेच निर्णय आकारास आणत असते. यामागे आर्थिक उलाढाली हेच प्रमुख कारण आहे. भारताच्या विरोधात लढण्यासाठी पाकिस्तानला बरीच शस्त्रास्त्रे विकत घ्यावी लागतात. अशा प्रकारच्या खरेदीत अनेकांचे हात ओले होऊन जातात. ट्रम्प यांच्या कारकिर्दीत अमेरिका पाकिस्तानला किती प्रमाणात मदत करीत राहू शकते, हा मोठा प्रश्न आहे. पाकिस्तानला सापडलेला नवा मित्र चीन. साम्यवादाच्या विरोधात महत्त्वाची भूमिका निभावू शकेल, अशा भाबड्या आशेने अमेरिकेने पाकिस्तानला मदत करायला सुरुवात केली होती. साम्यवाद राहिला बाजूला, पाकिस्तानने या मदतीचा वापर दहशतवादी कारवायांना खतपाणी घालण्यासाठीच केला. ओसामा बिन लादेनच्या मृत्यूनंतर अमेरिकन राजकारण्यांसमोरही अनेक प्रश्न निर्माण झालेच होते. सतत कुणाच्यातरी भिकेवर जगणाऱ्या पाकिस्तानला आता मात्र नवा मित्र सापडला.
इमरान खान निवडून आल्याबरोबर, “अमेरिकेने आमचा वापर केला,” हे विधान आणि लगेचच “इमरान खानला आमचे संपूर्ण सहकार्य राहणार आहे,” हे चीनने केलेले विधान परस्परांना पूरकच आहे. चीनची पुढची पावले विशद करणारे हे वाक्य आहे. जी मदत पाकिस्तान अमेरिकेकडून मिळवत होता, ती आता चीनकडून मिळेल. नवाझ शरीफ यांची भ्रष्टाचाराची प्रकरणे किती खरी, किती खोटी हा वेगळ्या लेखाचा विषय. मात्र, भारतविरोधी कारवाया करण्याचे लष्कराचे मनसुबे आता अधिक बळावतील, कारण नवाझ शरीफ हे भारत-पाकिस्तान संबंध सुधारण्याच्या पक्षाचे होते. लष्कराने वाढविलेले स्वत:चे अवास्तव महत्त्व आणि नियंत्रण कमी करण्याचा प्रयत्न त्यांनी सुरू केला होता. त्याचे जे काही परिणाम त्यांना भोगावे लागणार होते, तेच आता ते भोगत आहेत. पाकिस्तानी लष्करी अधिकारी आपल्या छातीवर अनेक पदके लावून फिरतात. आता केवळ भारतासोबतच लढाई केलेले हे लष्कर आणि त्यातही प्रत्येक वेळी पराजयच हाती पडलेला. असे असताना ही पदके कसली, हा मोठाच प्रश्न असतो. मात्र, यावरून इथल्या लष्कराची लष्कर म्हणून उपयुक्तता कशी आहे, हे ध्यानात येते. वस्तुत: लष्कराला इथे लष्कर म्हणून काम करण्यापेक्षा सत्ताकेंद्र म्हणून काम करण्यातच अधिक रस आहे. पाकिस्तानी राष्ट्रीय अस्मितेपेक्षा इथले आर्थिक विषय आणि सत्ता लष्कराला अधिक आकर्षक वाटते.
भारत-पाक संबंध सुधारण्यासाठी भारताने एक पाऊल पुढे टाकण्याची भाषा आता इमरान खान करीत आहेत. भारत-पाक संबंध सुधारण्यासाठी एक पाऊल काय, पण संपूर्ण बसप्रवास करून लाहोरला पोहोचलेल्या आणि नंतर विश्वासघाताचे दु:ख पचविलेल्या अटलबिहारी वाजपेयींनी पाकिस्तानचे वर्णन करणारी कविता लिहिली होती. 1947 साली लिहिलेली ही कविता. तिचे संदर्भ बदलले असले तरीही आशय तोच आहे.
इन्सान जहाँ बेचा जाता,
इमान खरीदा जाता है।
इस्लाम सिसकियाँ भरता है, डालर मन मे मुस्काता है

No comments:

Post a Comment