आंब्याच्या झाडाचे महत्त्व आपल्या वेदांत, महाभारतात आणि रामायणात, एवढेच काय बौद्ध वाङ्मयात जबरदस्त रितीने व्यक्त केलेले आहे. वृक्षामध्ये देवता असते किंवा वृक्षावर देवतेचा निवास असतो, अशी आपली श्रद्धा असते. सुजाताने एका वृक्षदेवतेला म्हणजे वृक्षाला नवस केला होता की, “माझे लग्न चांगल्या घरी होऊ दे आणि मला पहिला पुत्र होऊ दे.” तिच्या दोन्ही इच्छा सफल होतात.
महाराष्ट्र शासनातर्फे १ जुलै हा ‘कृषीदिन’ म्हणून साजरा केला जातो. या दिवशी वृक्ष लावण्याचा मोठा कार्यक्रम केला जातो. वृक्ष अथवा झाडे लावण्याचा हा जो कार्यक्रम आहे, तो हळूहळू सरकारी कार्यक्रम न राहता लोकचळवळ बनू पाहत आहे. विवेक रूरल डेव्हलपमेंट सेंटर संचालित, राष्ट्र सेवा समिती-भालिवली, या ‘विवेक’तर्फे चालविल्या जाणाऱ्या केंद्रातर्फे दरवर्षी केंद्राच्या परिसरातील डोंगरात झाडे लावण्याचा कार्यक्रम होतो आणि अभिमानाची गोष्ट अशी की, ही झाडे वर्षभर जगविण्याचा प्रयत्न केला जातो आणि त्यात राष्ट्र सेवा समितीच्या कार्यकर्त्यांनी शंभर टक्के यश प्राप्त केले आहे. समारंभपूर्वक झाडे लावायची, नंतर त्या झाडाचे काय झाले, याकडे ढुंकूनही बघायचे नाही, असे करून चालत नाही. अपत्याला जन्म द्यायचा आणि त्याला सोडून द्यायचे, असे कुणी करत नाही. वृक्षांच्या बाबतीतही हीच भावना ठेवावी लागते.
अशी भावना ठेवा, असे आज सांगावे लागते, ही चांगली गोष्ट नाही. आपली संस्कृती अनेक मूल्यांवर आधारित आहे. त्यातील प्रमुख मूल्य वृक्षांच्या संवर्धनाचे आहे. Sacred Plants Of India - Nanditha Krishna & M. Amirth Alingam हे पुस्तक आपल्याला आपल्या संस्कृतीत वृक्षाचे महत्त्व काय आहे, हे अतिशय अप्रतिमरित्या पटवून देते. वेदकाळ, भगवान महावीर आणि भगवान बौद्धांचा काळ, त्यानंतरचे राजवंश, रामायण, महाभारत, पुराणे, अशा साहित्यातील अस्सल पुरावे आणि भित्तीचित्रापासून ते लेण्यातील चित्रांपर्यंत वेगवेगळे वृक्ष आपल्याला कसे भेटत जातात, याची थक्क करणारी माहिती या पुस्तकात आहे. लेखिका नंदिता कृष्णा आणि सहलेखक अमृत लिंगम् दोघेही तामिळनाडूचे आहेत. आपल्याला आपले पुरोगामी विद्वान कंठशोष करून आणि लेखणी घासून घासून सांगण्याचा प्रयत्न करतात की, तामिळी द्रविड आहेत, त्यांची संस्कृती वेगळी आहे, ते वैदिक नाहीत, वगैरे वगैरे.
नंदिता आपल्या पुस्तकात सहजपणे लिहून जातात की, “वेदात अनेक वृक्षांचे उल्लेख येतात. वड, पिंपळ, चिंच, आंबा, शाल, कदंब इत्यादी. यातील एकही झाड थंड प्रदेशात उगवत नाही. याचा अर्थ असा झाला की, थंड प्रदेशातून आर्य भारतात आले. या सिद्धांताला काही अर्थ नाही. आमची झाडेच सांगतात की, आम्ही इथलेच आहोत.” एवढेच नव्हे, तर नंदिताच्या पुस्तकात सिंधू संस्कृती आणि सरस्वती संस्कृती या दोन्ही संस्कृतीत समानतेने आढळणारे अनेक वृक्ष आपल्याला भेटत जातात. एका संस्कृतीची ही सर्व अंगे आहेत, हे यावरून लक्षात येते. आर्यपूर्वकालीन द्रविड संस्कृती तिला ‘सिंधू संस्कृती’ म्हणतात, हा सिद्धांत आपले पुरोगामी विद्वान आपल्याला सांगत असतात. तामिळनाडूतील विद्वान हे स्वीकारताना दिसत नाही. या विद्वानांचे वैशिष्ट्य असे की, त्यांनी वृक्षांशीच संवाद केलेला आहे.
वृक्षांशी संवाद करणे, ही आपली संस्कृती आहे. ‘विवेक’च्या ‘गोविज्ञान’ ग्रंथाच्या तयारीसाठी मी इंदोरला गेलो होतो. तेथे अहिल्या गोशाळेत गेलो. ती खूप मोठी आहे, आधुनिक आहे. तिच्यात आयुष्य काढणारे मेनन नावाचे (पुन्हा तामिळी) ऋषितुल्य व्यक्ती होते. त्यांनी मला गोशाळेची अशी काही माहिती दिली की, जी ऐकत असताना मी थक्क झालो. झाडांसंबंधी त्यांनी मला एक किस्सा सांगितला. गोशाळेत अनेक आंब्याची झाडे आहेत. डिसेंबर महिन्यात गोशाळेला भेट देण्यासाठी तेव्हाचे राष्ट्रपती शंकरदयाळ शर्मा येणार होते. त्यांना आंबे खूप आवडतात, हे मेनन यांना माहीत होते. ते दोन आंब्याच्या झाडाकडे गेले, प्रेमाने त्यांच्यावर हात फिरवला आणि त्यांना विनंती केली की, “डिसेंबरमध्ये राष्ट्रपती येणार आहेत, त्यांच्यासाठी आंबे द्या.” मेनन मला सांगत होते की, “मी रोज झाडांशी बोलतो. गोशाळा सोडून मी जेव्हा बाहेर जातो, तेव्हा मी झाडांना तसे सांगतो, त्यांची अनुमती घेतो आणि मग जातो.” आपल्या कुणाचा विश्वास बसणार नाही, पण डिसेंबर महिन्यात आंब्याच्या झाडांनी राष्ट्रपतींसाठी आंबे दिले. मेनन बाता मारणारे नसल्यामुळे त्यांच्या बोलण्यावर विश्वास ठेवण्यापलीकडे मी काही करू शकत नव्हतो.
संभाजीराव भिडे यांनी “माझ्या बागेतील आंबे खाल्ल्यानंतर मुले होतात,” असे म्हटले. त्यामुळे सगळे अंधश्रद्धा निर्मूलनवाले खवळले. तो त्यांचा जन्मसिद्ध मूलभूत अधिकार असल्यामुळे त्यावर आपण काही करू शकत नाही. आंब्याच्या झाडावरून पु. ल. देशपांडे यांचा ‘अंतू बर्वा’ आठवला. त्यातील जवळजवळ शेवटचा संवाद असा आहे- पु. ल. रत्नागिरी सोडून विदेशी जाणार आहेत. अंतू बर्वे विचारतात, “एकटे जाणार की सपत्नीक? पु. ल. म्हणतात, ‘‘सपत्नीक.” अंतू बर्वे म्हणतात, “हे चांगले केलेत, तुमचे भाग्य तिच्यामुळे आहे.तुम्हाला म्हणून सांगतो, चाळीस वर्षांपूर्वी माझी पत्नी गेली, त्यानंतर दारचा हापूस कधीही मोहरला नाही. शेकड्याने आंबे त्याचे मी घेतले, पण ती गेल्यानंतर त्याने एकही आंबा दिला नाही.” आता यावर एखादा अंधश्रद्धावाला म्हणेल, असे कधी होते काय? काहीतरीच अंधश्रद्धा आहे!
आंब्याच्या झाडाचे महत्त्व आपल्या वेदांत, महाभारतात आणि रामायणात, एवढेच काय बौद्ध वाङ्मयात जबरदस्त रितीने व्यक्त केलेले आहे. वृक्षामध्ये देवता असते किंवा वृक्षावर देवतेचा निवास असतो, अशी आपली श्रद्धा असते. सुजाताने एका वृक्षदेवतेला म्हणजे वृक्षाला नवस केला होता की, “माझे लग्न चांगल्या घरी होऊ दे आणि मला पहिला पुत्र होऊ दे.” तिच्या दोन्ही इच्छा सफल होतात. सोन्याच्या थाळीत खिरीचे भांडे घेऊन वृक्षदेवतेचा नवस फेडायला ती जाते आणि पाहते तर काय, वृक्षाखाली एक अत्यंत तेजस्वी तपस्वी बसलेला आहे. तो सिद्धार्थ गौतम असतो. संबोधि प्राप्त होण्याचा तो अगोदरचा दिवस असतो. सुजाता त्याला नमस्कार करते. तिला वाटते की, वृक्षदेवताच तपस्वीच्या रूपाने आपला नवस ग्रहण करण्यासाठी आली आहे. सुजाताची खीर सिद्धार्थ गौतम प्राशन करतात आणि त्याच रात्री त्यांना ज्ञान प्राप्त होते आणि ते गौतम बुद्ध होतात. संभाजीराव भिडेंच्या बागेतील आंबे खाल्ल्यामुळे मुले होतात की नाही माहीत नाही, परंतु अडीच हजार वर्षांपूर्वी सुजाताला वृक्षाला नवस केल्यामुळे मुलगा झाला आणि तिने दिलेली खीर प्राशन केल्यानंतर सिद्धार्थाला संबोधि प्राप्त झाली. याचा बुद्धिवादी संबंध कसा जोडायचा, हे अंधश्रद्धा निर्मूलनवाल्यांना ठरवू द्या.
भगवान गौतम बुद्धांच्या चरित्रातून वृक्ष काढले तर काय उरेल? तर वाळवंट उरेल. त्यांचा जन्म एका शाल वृक्षाखाली झाला. त्यांच्या जन्मापूर्वी त्यांच्या आईला म्हणजे महामायेला स्वप्न पडलं, एक पांढरा हत्ती कमळ घेऊन उजव्या बाजूने तिच्या उदरात प्रवेशकर्ता झालेला आहे. भगवान गौतम बुद्धांना पिंपळाच्या वृक्षाखाली संबोधि प्राप्त झाली. शाल वृक्षाखाली त्यांचे महापरिनिर्वाण झाले. जातककथांमधील अनेक कथा झाडासंबंधीच्या आहेत. मग कधी आपल्याला टेंभुर्णीचे झाड भेटेल, कधी आंब्याचे, कधी बोराचे तर कधी शाल, अशी आपलीच झाडे भेटत जातात. या झाडांवरील वृक्षदेवतांच्या कथा आहेत. टेंभुर्णीच्या वृक्षावरील वृक्षदेवता पांचाळ नरेशाला तीनदा स्वप्नात येऊन जागृत करते की, “प्रजा तुझ्या कारभाराला विटली आहे. तुझ्या मरणाची ती वाट बघते आहे, ती बंड करील, तेव्हा सावध हो आणि राज्यकारभारात सुधारणा कर.” राजा जेव्हा प्रजेचे हालहवाल बघायला जातो, तेव्हा खेड्यातील शेतकरी, घरातील म्हातारी बाई, गावातील तरुण आणि तळ्याकाठी जखमी झालेला बेडूकसुद्धा राजा असंख्य जखमांनी मरावा, असे म्हणतो. तेव्हा राजाचे डोळे उघडतात. तो विलास बंद करतो आणि विकासाच्या कामाला लागतो. वृक्षाच्या साहाय्याने मौलिक उपदेश करण्याची गौतम बुद्धांची शैली अप्रतिम आहे. त्याचा अभ्यास केला पाहिजे आणि त्यासाठी थोडे वाचन केले पाहिजे.
छंद्योग्य उपनिषदात अरुणी आणि श्वेतकेतू यांच्या संवादाची कथा येते. तेथे वटवृक्षाचा उल्लेख येतो. अरुणी श्वेतकेतूला सांगतात की, “वटवृक्षाचे फळ घेऊन ये, त्या फळाची बी काढ, ती बी फोड, आत काय दिसतंय ते सांग. श्वेतकेतू सांगतो, “आत काही दिसत नाही.” अरुणी म्हणतात, जे दिसत नाही, ते तू आहेस. जे दिसत नाही त्यातून या ब्रह्मांडाची निर्मिती झाली आहे. हा प्रचंड वटवृक्ष जे दिसत नाही, त्यातून उभा राहिलेला आहे. वटवृक्ष हा आपला राष्ट्रीय वृक्ष आहे. भारत हे सेक्युलर राष्ट्र आहे की, हिंदू राष्ट्र आहे, यावर आपले विद्वान डोक्याचे टक्कल होईपर्यंत डोके खाजवत बसलेले असतात, परंतु आपण जी राष्ट्रीय चिन्हे निवडलेली आहेत, ती हिंदूराष्ट्राची चिन्हे आहेत. वटवृक्ष त्यातील एक. एखादे विदेशी झाड का नाही निवडले? सुबाभूळ का नाही निवडले? सुबाभूळ हे सेक्युलॅरिझमसारखे आहे. ना खायला उपयोग ना जळणाला उपयोग, ना त्यावर कुठले पक्षी घरटे करतात, ना त्या वृक्षाच्या छायेखाली गाय, वासरू, बैल, मेंढ्या जातात.
वटवृक्ष हा अमर वृक्ष आहे. भारतीय संस्कृती तशी आहे. वटवृक्षाला मरण नाही. फांद्यातून त्याची मुळे खाली येतात, ती जमिनीत जातात आणि खोडाचे रूप धारण करतात. भारतीय संस्कृती अशीच आहे. येथे विविध मतप्रवाह येतात, त्यांना फांद्या फुटतात, त्या फांद्यातून मुळे निघतात, ती जमिनीत जातात आणि मूळ झाडाचे भरणपोषण करतात. आपण वटवृक्षासारखे आहोत. आम्हाला जन्म नाही, मरण नाही. आमच्या फळामध्ये न दिसणारे जे तत्त्व आहे, त्यातून ब्रह्मांड निर्माण होते. एका तत्त्वातून विश्वाचा पसारा उभा राहतो- वटवृक्षासारखा.वटवृक्ष हे अक्षयतेचे जसे प्रतीक मानले जाते, तसे केळीचे झाड हे भौतिकतेचे प्रतीक मानले जाते. त्याचा जन्म एकदाच होतो. त्याला केळी आली की त्याचा संसार संपतो. त्याचे आयुष्य संपते. ते या जगाचा निरोप घेते, परंतु त्याच्या मुळातून दुसरे केळीचे कोंब फुटायला लागतात. त्याचा पुनर्जन्म होतो. जन्म आणि मृत्यू याचे रहाटगाडे म्हणजे केळीचे झाड. भारतीय संस्कृतीची ही दोन रूपे आहेत. एक वटवृक्षाचे आणि दुसरे केळीच्या झाडाचे. दोन्हीही सत्य आणि शाश्वत आहेत. एक खरं आणि दुसर खोटं असं नाही. एका बाजूने आम्ही अक्षय आहोत आणि दुसऱ्या बाजूने आम्ही नाशिवंत आहोत. आम्हाला पुनर्जन्म आहे.
या वटवृक्षाची पूजा वटपौर्णिमेला केली जाते. विवाहित महिला ती करतात. तिच्यामागे महाभारतातील सावित्रीचे असंख्य आहे, ते आपल्या सर्वांना माहीत आहे. वटवृक्षाखाली सावित्रीचा पती सत्यवान आपला प्राण गमावतो. सावित्री यमराजाच्या मागे जाते आणि आपल्या बुद्धीचातुर्याने आपल्या पतीचे प्राण घेऊन येते, अशी ही कथा आहे. ही वटपौर्णिमा आली की आपल्याकडील काही वटवट बहाद्दुरांना एकदम सावित्रीबाई फुले यांची आठवण होते. या सावित्रीपेक्षा ही सावित्री मोठी, अशी मांडणी केली जाते. वंदनीय सावित्रीबाई फुलेंचे नाव ‘सावित्री’ हे त्यांच्या मातापित्यांनी महाभारतातील सावित्रीवरूनच ठेवलेले आहे. आपली कन्या त्या सावित्रीसारखी व्हावी, ही त्यामागची अपेक्षा आणि हे नाव या सावित्रीने सार्थ करून दाखविले. महाभारतातील सावित्री पतीपरायण होती. आधुनिक काळातील ही सावित्रीदेखील तशीच पतीपरायण होती. पतीच्या पावलावर पाऊल टाकून चालणारी. पतीचा वसा पुढे चालविणारी. सावित्रीसारखीच निर्भय आणि अंतर्बाह्य पवित्र, असे असल्यामुळे या आधुनिक काळातील सावित्रीचे स्मरण केलेच पाहिजे. पण, त्यासाठी महाभारतातील सावित्रीला कमी लेखण्याचा भयानक पुरोगामीपणा कशासाठी?
वृक्षलागवड करीत असताना आपल्या संस्कृतीचा भाव लक्षात ठेवला पाहिजे. तो आपल्याला सांगतो की, वृक्ष हे देवतांचे निवासस्थान आहे. वृक्ष आपली सर्व इच्छा पूर्ण करणारे आहेत, म्हणून कल्पवृक्षाची कल्पना आपल्याकडे केली आहे. आपल्या परिसरातील असंख्य झाडे कल्पवृक्षासारखीच असतात. नारळाचे झाड काय किंवा बाबूंचे वन काय, हे सर्व कल्पवृक्षच आहेत. ज्याची इच्छा करावी, ते देणारे, ही वृक्षदेवता आहे. तिची आराधना १ जुलै किंवा जुलैचा आठवडा एवढा काळच न करता इष्टदेवतेची आराधना नित्यकर्माचा भाग व्हावी लागते. एकेकाळी तसा आपला स्वभाव होता, त्यामुळे भारत ‘सुजलाम् सुफलाम्’ होता. आता हा स्वभाव आपल्याला पुन्हा बनवावा लागेल. त्यासाठी आपले वृक्षवाङ्मय आपण शोधून शोधून वाचले पाहिजे
No comments:
Post a Comment