काही वर्षांपूर्वी मोबाइल फोन उत्पादन करणाऱ्या ठराविक कंपन्यांची भारतीय बाजारपेठेत मक्तेदारी होती होती. या कंपन्यांकडून ग्रामीण भागातला शेतकरी, मजूर, शहरी-निमशहरी भागातला कमी उत्पन्न असलेला ग्राहक दुर्लक्षित केला जात होता. अशा काळात रिलायन्सने स्वस्त मोबाइल बाजारपेठेत आणून बड्या मोबाइल कंपन्यांना दणका दिला होता. गेल्या वर्षी इंटरनेट सेवा देणाऱ्या अशाच काही बड्या कंपन्यांना रिलायन्स जिओने स्वस्त दरात इंटरनेट प्लॅन देऊन दुसरा दणका दिला होता. आता वेगवान ब्रॉडबँड इंटरनेट देण्याच्या इराद्याने मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स समुहाने १ जीबीपीएस इंटरनेट सेवा ग्राहकांना देण्याची घोषणा केली आहे. सध्या देशातील सर्वच मोबाइल फोन कंपन्यांची इंटरनेट सेवा संथ सुरू आहे. इंटरनेटचा वेग मंदावण्यापासून नेटवर्क जाण्यापर्यंत अनेक समस्या ग्राहकांना सतावत अाहे. (त्याला जिओही अपवाद नाही.) या सर्वच मोबाइल कंपन्यांनी आपण वेगवान अशी थ्री जी, फोर जी सेवा देत असल्याचा दावा करत आपला ग्राहकवर्ग वाढवला खरा; पण ग्राहकांची प्रचंड संख्या आणि इंटरनेट सेवा देणाऱ्या पायाभूत यंत्रणेत तेवढ्या प्रमाणात वाढ न झाल्याने पूर्वीचाच 'टूजी' वेग ग्राहकांना अनुभवायला मिळतोय. ग्राहकांच्या हातात जवळपास स्मार्टफोन आले आहेत, पण इंटरनेट सेवा जुन्या जमान्यातील असा विरोधाभासी खेळ सुरू आहे. अशा परिस्थितीत 'एमबीपीएस' कालबाह्य झाले असून जमाना 'जीबीपीएस'चा असल्याचा रिलायन्सने केलेला दावा बाजारपेठेत नवे युद्ध सुरू करतील यात शंका वाटत नाही. रिलायन्सच्या या आक्रमक घोषणेमुळे अन्य मोबाइल सेवा कंपन्यांना 'जीबीपीएस' यावे लागेल. त्यासाठी मोठी गुंतवणूक करण्याचे आव्हान या कंपन्यांपुढे असेल.
रिलायन्स जेव्हा मोबाइल सेवा देण्याच्या बाजारपेठेत उतरली तेव्हापासून ते स्वस्त सेवा पण अत्याधुनिक तंत्रज्ञान यांचा पाठपुरावा करत आली आहे. आणि त्या जोरावर त्यांनी संपूर्ण बाजारपेठेची दिशा बदलली आहे. अनेक कंपन्यांना बाजारपेठेला आपल्या बाजूने वळवण्यासाठी प्रयत्न करता आलेले नाहीत. रिलायन्सकडे आपला ग्राहक जाऊ नये इतपत त्यांचे प्रयत्न सुरू आहेत. रिलायन्सने गेल्या वर्षी 'जिओ' आणल्यानंतर इंटरनेट सेवा देणाऱ्या कंपन्यांमध्ये घबराट निर्माण झाल्याचे दिसून आले होते. याचा फायदा ग्राहकांनाही झाला. इंटरनेट स्वस्त झाले पण कॉलिंग रेट अधिक स्वस्त होत गेले व दूरसंपर्क क्षेत्र अधिक विस्तारित गेले. याचा जिओला ही फायदा झाला. त्यामुळे कंपनीने असा दावा केला की, त्यांनी या बळावर वर्षभरात सुमारे २१ कोटी ग्राहक मिळवले आहेत आणि जीबीपीएसमुळे ते त्यात १० कोटींची भर घालू शकतात. इंटरनेट सेवा देणाऱ्या बाजारपेठेत इतकी तीव्र स्पर्धा असेल तर त्याचा फायदा ग्राहकांसाठीच अधिक होणार आहे. पण प्रश्न कंपन्या सांगत असलेल्या इंटरनेट वेगाचा आहे. आकर्षक जाहिरातीतून आमच्या कंपनीचा इंटरनेट वेग इतरांपेक्षा अधिक आहे ही लोणकढी थाप आता चालणार नाही.
त्याचबरोबर रिलायन्सने ब्रॉडबँड केबल क्षेत्रात फायबरवर आधारित ब्रॉडबँड सेवा देण्याचीही घोषणा केली आहे. ही घोषणा अक्षरश: भारतीय केबल उद्योगाचे स्वरूप बदलू शकते. यामुळे घरात बसवण्यात येणारा सेट टॉप बॉक्समुळे टीव्ही संचावरून कॉल करता येणार आहे व सर्वोत्तम असे हायडेफिनेशन प्रसारण पाहायला मिळेल. या तंत्रज्ञानामुळे घरातील विविध इलेक्ट्रॉनिक उपकरणांवर नियंत्रण ठेवता येणार आहे. हे तंत्रज्ञान देशातल्या ११०० शहरांमध्ये सुरू केले जाणार असल्याने स्थानिक केबल कंपन्या व रिलायन्स यांच्यात दरयुद्ध सुरू होईल.
मुकेश अंबानी यांच्या नव्या घोषणांमुळे रिलायन्स आपल्या मूळ व्यवसायापासून दुसऱ्या व्यवसायाकडे जात आहे, हे दिसून येते. ते तेलशुद्धीकरणाच्या व्यवसायात अधिक गुंतवणूक करण्यापेक्षा हायब्रीड ऑनलाइन ते ऑफलाइन-ई-कॉमर्समध्ये म्हणजे तंत्रज्ञान सेवा देणाऱ्या कंपनीकडे प्रवास करत आहेत. सध्या रिलायन्स रिटेल उद्योगात अग्रेसर आहे या उद्योगाला इ-कॉमर्सशी जोडून घेतल्याने ते अॅमेझॉन, कॅरिफोर, वॉलमार्ट या परदेशी कंपन्यांसमोर तगडे आव्हान उभे करू शकतात. या विदेशी कंपन्या रिटेल व ई-कॉमर्स अशा एकाच प्लॅटफॉर्म खाली नाहीत. रिलायन्सने ते आव्हान स्वीकारले आहे. त्यांच्या या निर्णयाने रिटेलचा ३५ कोटींचा ग्राहक व जिओतून मिळवलेला २१ कोटींचा ग्राहक आता एकाच प्लॅटफॉर्मवर येणार आहे. यावरून भारतीय बाजारपेठेवर त्यांचे किती नियंत्रण येत आहे हे दिसून येते.
- सुजय शास्त्री, डेप्युटी न्यूज एडिटर, मुंबई
No comments:
Post a Comment