इमरान खान यांची निवडणूक बनावट आहे, खोट्या मतदानाने झालेली आहे, पाकिस्तानी जनतेने त्यांना निवडून दिलेले नाही, लष्कराने त्याला निवडून आणले आहे, त्याचे सरकार लोकांवर लादलेले सरकार असेल, लादलेले सरकार फार काळ टिकत नाही. सत्ता कोणत्याही प्रकारची का असेना तिला जनसमर्थन आवश्यक असते. जनसमर्थनाशिवाय कोणतीही सत्ता टिकू शकत नाही. इमरान खानच्या विरोधात पाकिस्तानातील इतर सर्व राजकीय पक्ष आंदोलन सुरू करतील. भुत्तोची पाकिस्तान पिपल्स पार्टी, नवाझ शरीफांची मुस्लीम लिग स्वस्थ बसणार नाहीत. हा त्यांच्या अस्तित्वाचा प्रश्न आहे. अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला की, अस्तित्व रक्षणासाठी सर्वस्वपणाला लावून लढावे लागते.
पाकिस्तानचे १९ वे पंतप्रधान होण्याचा बहुमान पाकिस्तानी क्रिकेटचे हिरो आणि माजी कप्तान इमरान खान यांना मिळणार आहे. पाकिस्तान संबंधी असे म्हटले जाते की, ‘तीन अ’ पाकिस्तान चालवितात. ‘अमेरिका, अल्ला आणि आर्मी.’ यावेळी आर्मीने म्हणजे लष्कराने इमरान खानला लोकशाही मार्गाने पंतप्रधान बनविण्याचे ठरविले. लष्कराचे आणि नवाझ शरीफांचे फारसे जमले नसावे, म्हणून शरीफ यांना बाहेरचा रस्ता दाखविणे लष्कराने अधिक पसंत केले. नवाझ शरीफ यांना घालविण्याचे काम पाकिस्तानी लष्कराने यावेळी लष्करीपद्धतीने केले नाही. म्हणजे गुडघ्यातील मेंदूचा वापर न करता, डोक्यातील मेंदूचा त्यांनी वापर केला. नवाझ शरीफ लोकनेते आहेत, लोकांचा त्यांना प्रचंड पाठिंबा आहे, त्याला तडा कसा देता येईल, याचा सांगोपांग विचार लष्कराने केला. ‘पनामा पेपर’ जेव्हा उघड झाले, तेव्हा त्यात नवाझ शरीफ आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या मालमत्तेचे आकडे बाहेर आले. नवाझ शरीफ, त्यांची मुलगी, जावई यांनी कोट्यवधी डॉलरचा भ्रष्टाचार केल्याचेही उघड झाले. लोकशाही मार्गाने नवाझ शरीफ यांना घालवायचे, असे लष्कराने ठरविले, म्हणून हे प्रकरण न्यायालयात गेली. न्यायालयाने (लष्कराच्या आदेशाप्रमाणे) नवाझ शरीफ यांना दोषी ठरवून टाकले आणि त्यांना तुरुंगवासाची शिक्षा सुनावली. आज नवाझ शरीफ आणि त्यांची मुलगी दोघेही तुरुंगात आहेत.
नवाझ शरीफ यांचा लोकशाही मार्गाने लष्कराने काटा काढल्यानंतर पाकिस्तानच्या पंतप्रधानपदावर कळसुत्री बाहुली बसविणे आवश्यक होते. बिलावल भुत्तो त्यासाठी लष्कराला योग्य वाटला नाही, कारण भुत्तो परिवाराला राज्य करण्याची एक परंपरा लाभली आहे. ते विचाराने स्वतंत्र आहेत. त्यांना जनसमर्थनही मोठ्या प्रमाणावर आहे. इमरान खान क्रिकेटपटू म्हणून लोकप्रिय जरी असले तरी राजनेत्यांत त्यांची गणना पाकिस्तानी विचारवंत करीत नसत. पहिल्या पन्नास जणांच्या यादीतही त्यांचे नाव कोणी घेतले नाही. असा ५१ व्या क्रमांकावर उभा असणारा माणूस पंतप्रधानपदासाठी चांगला, असे लष्कराला वाटले. इमरानला राज्यकारभाराचा अनुभव शून्य आहे. महानगरपालिकेची निवडणूकही तो कधी लढला नाही. तो राजघराण्यातला नाही, त्याची प्रतिमा छान शौकीने राहाणारा, अनेक स्त्रियांशी संबंध ठेवणारा, अत्यंत विलासी जीवन जगणारा, अशी आहे. अशा माणसाला आपल्याला पाहिजे तसे नाचविता येईल, असे लष्कराला वाटल्यास त्यात काही गैर नाही.
यावेळी पाकिस्तानच्या लष्करात मुशर्रफसारखा बिनडोक माणूस कोणी प्रमुख नसावा. कारण, मुशर्रफसारखी माणसे गुडघ्यातल्या मेंदूने विचार करतात. लष्कराने यावेळेला लोकशाही पद्धतीत आपल्याला पाहिजे तो उमेदवार पंतप्रधान म्हणून बसविण्यात यश मिळविले आहे. नवाझ शरीफला घरी बसविल्यानंतर विविध पक्षातील दुय्यम नेत्यांना पाकिस्तानी लष्कराने संदेश पाठविले की, इमरान यांच्या ‘पाकिस्तान तेहरिक-ए-इन्साफ’ पार्टीत सामील व्हा. असंख्य राजकीय नेते सभेच्या व्यासपीठावर कधी ‘वाघ’ असतात, तर कधी ‘राजसिंह’ असतात. अशी नेते मंडळी भयाचे भूत समोर उभे केले असता, शेपूट खाली घालून बसतात. पाकिस्तानातील अनेक नेटे मुकाट पाकिस्तान तेहरिक-ए-इन्साफ पार्टीत दाखल झाले. निवडणुकीचा प्रचार सुरू झाला आणि पाकिस्तानभर इमरानचे पोस्टर्स लागले. गल्लीबोळात, दिव्याच्या खांबावर, चौकाचौकात इमरानमय वातावरण निर्माण करण्यात आले. लष्कराने वृत्तपत्रांना दम भरला की, नवाझ शरीफ यांचा उल्लेख ‘माजी पंतप्रधान’ असा करू नये. नुसता ‘मिस्टर नवाझ’ असा करावा. त्यांची प्रतिमा खलनायकाची रंगवावी आणि इमरानची प्रतिमा देवदूताची रंगवावी.
सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे, पाकिस्तान अमेरिका, अल्ला आणि आर्मी चालवित असल्याने आर्मीचे ऐकण्याशिवाय पाकिस्तानी मीडियाला दुसरे काही गत्यंतर नव्हते. तशी पाकिस्तानात वृत्तपत्रांवर बंदी नाही. पत्रकारांना पकडून तुरुंगात टाकले जात नाही, दिसायला सर्व प्रकारचे स्वातंत्र्य आहे. व्यवहारात काय असते? निवडणुकांची बातमी घेण्यासाठी पत्रकार जेव्हा फिरू लागले तेव्हा त्यांना काय आढळले? हे पाकिस्तानी पत्रकार शहा मिर बरुज याच्या शब्दात आपण पाहुया. “पाकिस्तानातील सार्वत्रिक निवडणुका आश्चर्य आणि धक्क्याने भरलेली होती. आमच्यापैकी काही जणांनी ती प्रत्यक्ष पाहिली, काही जणांना त्यासाठी प्रतिक्षा करावी लागेल. गुरुवारच्या सकाळी आम्ही इस्लामाबाद येथील एका मतदान केंद्रात प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. सुरक्षा रक्षकाने आम्हाला सांगितले की, तुम्हाला आत जाता येणार नाही. बरोबर तुमचे कॅमेरा, सेलफोन, नोटपॅड काहीही घेऊन जाता येणार नाही. आम्हाला धक्का बसला.”
हाच पत्रकार पुढे लिहितो की, “शहरी भागांत बनावट मतदान त्या मानाने कमी झाले आहे, परंतु ग्रामीण भागात ते सहज शक्य झालेले आहे. त्याच्याकडे पाकिस्तानमधील एका दलाच्या नेत्याने तक्रार केली की, आमच्या समर्थकांकडे असलेली ओळखपत्रे सैनिक काढून घेत आहेत. पाकिस्तानातील ६० टक्के जनता खेड्यात राहाते.” बलुचिस्तानमधला एक सिनेटर म्हणतो की, “निवडणुकीच्या एक दिवस अगोदर मतपेट्या लष्कराने आपल्या बराखीत नेल्या आणि तिथे ज्याला निवडून आणायचे आहे, त्याच्या नावावर स्टॅम्प मारून त्या पत्रिका मतपेट्यांत टाकल्या. असे खेडोपाड्यातील मतदान केंद्रावर झालेले आहे. तीन लाखांहून लष्कराचे जवान विविध मतदान केंद्रांवर तैनात करण्यात आले होते. याला म्हणतात, (लष्कराच्या) मुक्त वातावरणात झालेल्या नि:पक्षपाती निवडणुका.” आपल्या विरोधी मतदारांच्या मनात भीती निर्माण करण्यासाठी या वेळी लष्कराच्या आशीर्वादाने दहशतवादी संघटनांनी काही ठिकाणी बॉम्बस्फोट घडवून आणले. मस्तंग येथे झालेल्या बॉम्बस्फोटात १५१ नागरिक ठार झाले आणि १७१ जखमी झाले. अन्य ठिकाणीही असे बॉम्बस्फोट घडवून आणण्यात आले. या बॉम्बस्फोटांचा हेतू ‘मतदानास बाहेर पडू नका आणि आम्हाला ज्याला निवडून आणायचे, त्याला निवडून आणू द्या,’ हा संदेश देण्यासाठी होता.
इमरान खान देशाचे पंतप्रधान होतील. ते किती काळ पंतप्रधान पदावर राहतील? याचे उत्तर अल्ला, अमेरिका आणि आर्मी देईल. यात आणखी एक चौथा घटक आहे, तोही याचे उत्तर देईल आणि यावेळी हा चौथा घटक पहिल्या तिघांपेक्षाही अधिक ताकदवान बनेल, असे वाटते. १९७० साली पाकिस्तानात निवडणुका झाल्या. बहुमताने आवामी लिग निवडून आली. आवामी लिग पूर्व बंगालची होती. पूर्व बंगाली लोकांच्या हातात सत्ता द्यायची नाही, असे लष्कर आणि भुत्तोने ठरविले. त्यामुळे गृहयुद्ध सुरू झाले. भारताला त्यात उतरावे लागले. पाकिस्तान तोडला गेला आणि बांगलादेश निर्माण झाला. इमरान खान यांची निवडणूक बनावट आहे, खोट्या मतदानाने झालेली आहे, पाकिस्तानी जनतेने त्यांना निवडून दिलेले नाही, लष्कराने त्याला निवडून आणले आहे, त्याचे सरकार लोकांवर लादलेले सरकार असेल, लादलेले सरकार फार काळ टिकत नाही. सत्ता कोणत्याही प्रकारची का असेना तिला जनसमर्थन आवश्यक असते. जनसमर्थनाशिवाय कोणतीही सत्ता टिकू शकत नाही. इमरान खानच्या विरोधात पाकिस्तानातील इतर सर्व राजकीय पक्ष आंदोलन सुरू करतील. भुत्तोची पाकिस्तान पिपल्स पार्टी, नवाझ शरीफांची मुस्लीम लिग स्वस्थ बसणार नाहीत. हा त्यांच्या अस्तित्वाचा प्रश्न आहे. अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला की, अस्तित्व रक्षणासाठी सर्वस्वपणाला लावून लढावे लागते.
इमरान खान म्हणाले की, ‘पाकिस्तानचा राज्य कारभार यापूर्वी कोणी केला नसेल, इतका आदर्शवाद आम्ही करू. पाकिस्तानला आम्ही इस्लामिक लोककल्याणकारी राज्य बनवू आणि प्रेषित मोहम्मदाने ज्या पद्धतीने मदिनेवर राज्य केले, त्या प्रकारचे राज्य करून मानवता आणि न्यायाची प्रस्थापना करू.” लंडनच्या ‘गार्डियन’ वृत्तपत्राचे यावर भाष्य असे आहे- “पाकिस्तान-तेहरिक-ए-इन्साफ या उपटसुंभ पक्षाचे राष्ट्रीय सभेतील जास्तीत जास्त जागा जिंकण्याचे यश आणि खान याच्या विजयाचा डंका पिटला जात असतानाच त्यावर विरोधी पक्षाच्या आरोपांचे कृष्णमेघ गोळा व्हायला सुरुवात झाली आहे. सैन्याने फार मोठ्या प्रमाणात मतदानात थांदली केलेली असून विरोधी पक्षाने एकमताने हा निर्णय अमान्य केलेला आहे. भविष्यकाळातील कटकटींची ही नांदी आहे.” ही कटकट कोणते स्वरूप घेईल? १९७०ची पुनरावृत्ती होईल का? उत्तरासाठी आपल्याला वाट बघावी लागेल.
No comments:
Post a Comment