मी चित्रपट बघत नाही. त्यातल्या त्यात मराठी तर नाहीच नाही. मागे एकदा देऊळ चित्रपट बघितला होता. वैतागलो होतो. एका गावात एक भोळा तरुण दत्ताचे मंदिर बांधतो. शिरस्त्याप्रमाणे भक्तीचा बाजार मांडला जाऊ लागतो. हे बघून तो तरुण रात्री मंदिरातील दत्ताची मूर्ती चोरतो आणि नदीच्या पात्रात विसर्जित करतो. मूर्ती चोरीला गेली म्हणून गावात खळबळ माजते. मग राजकारणी पुढे येतात आणि दुसरी मूर्ती तिथे बसवितात. या मंदिरामुळे एरवी भकास असलेल्या या गावात समृद्धी आलेली असते. तसेच समृद्धीचे दुर्गुणही आले असतात. त्यांना दूर करायचे सोडून, गावातील एक कथित बुद्धिवंत (भूमिका : दिलीप प्रभावळकर) गाव सोडून निघून जातो. असा काहीसा हा चित्रपट आहे. नेहमीप्रमाणे हिंदू धर्माला शिव्या, बदनामी आहे. परंतु, यातून मार्ग काढणारा कुणी दाखविला नाही. भक्तीचा बाजार झाला ठीक आहे; परंतु ही जी धर्मशक्ती आहे तिला रचनात्मक वळण देण्याचे काम त्या बुद्धिवंताला करता आले असते. पण तो पळून जातो. असो. मराठी चित्रपटात आर्थिक दारिद्र्य असते; पण म्हणून कल्पनेचेही दारिद्र्य का असावे, कळत नाही. हिंदी चित्रपटांत आमिर खानचा ‘दंगल’ बघितला. कुस्तीसारख्या विषयावरही इतका सुंदर चित्रपट निघू शकतो, हे बघून आश्चर्य वाटले. हिंदी चित्रपट निव्वळ मनोरंजनासाठी चित्रपट बनवितात. कुठेही लपवाछपवी नसते. परंतु हे चित्रपट बघताना, नेहमी एक गोष्ट खटकते व ती म्हणजे, चित्रपटात हिंदू पुजारी नेहमी दरिद्री, कामुक, लोभी, बदमाश का दाखविला जातो? मंदिरदेखील कुठेतरी विराण जागी, चार ओबडधोबड खांबांवर एक स्लॅब घातलेले असते. या उलट, चित्रपटातील चर्च भव्य, दिव्य! तिथला धर्मगुरू नेहमीच पीडितांच्या समस्या सोडविणारा, दयाळू वगैरे असतो. दर्गा दाखवायचा असेल तर तिथे कर्णमधुर कव्वाली सुरू असते आणि तिथल्या पवित्र वातावरणाची अनुभूती प्रेक्षकांना येईल, असे चित्रीकरण असते.
मग हिंदूंच्या वाट्यालाच असे का? मी चित्रपटच बघत नसल्याने, हिंदूंचा हा असला अपमान प्रत्येक चित्रपटातच असतो की नसतो, याचा निष्कर्ष मला काढता येत नव्हता आणि तो काढण्यासाठी प्रत्येक चित्रपट बघण्याचे धैर्य माझ्यात नव्हते. परंतु, 8 जुलैच्या ‘हिंदुस्तान टाइम्स’ वृत्तपत्रात धीरज शर्मा यांचा एक लेख आला आहे. धीरज शर्मा हे आयआयएम अहमदाबादेत प्राध्यापक आहेत. त्यांनी मात्र याचा अभ्यास केला आणि त्यावर आधारित हा लेख लिहिला आहे. धीरज शर्मा म्हणतात- मी नियमित चित्रपट बघणारा नाही. परंतु, मित्रांच्या आग्रहाने सलमान खानचा ‘बजरंगी भाईजान’ चित्रपट बघितला. त्यात दिग्दर्शकाने विषयाला जी वागणूक दिली आहे ती पाहून आश्चर्य वाटले. या चित्रपटात बहुसंख्य भारतीय हे संकुचित मनोवृत्तीचे, रूढिवादी आणि भेदभाव करणारे दाखविले आहेत. या उलट, बहुसंख्य पाकिस्तानी खुल्या मनाचे, भेदभाव न करणारे दाखविले आहेत. यावरून मला वाटले की, असे हे चित्रण भारतीय चित्रपटांचा स्थायीभाव आहे की काय, याचा स्वत: अभ्यास केला पाहिजे.
त्यासाठी शर्मा आणि त्यांच्या संशोधक चमूने 1960 पासूनच्या चित्रपटांची यादी तयार करून त्यातील प्रत्येक दशकातील 50 चित्रपट निवडले. या चित्रपटांचा अभ्यास केल्यावर त्यांना असे लक्षात आले की, धर्म आणि जात यावरून या चित्रपटात एक विशिष्ट पॅटर्न आहे. 78 टक्के चित्रपटांतील स्वैराचारी महिलेचे नाव ख्रिश्चन आहे. चित्रपटातील 58 टक्के भ्रष्टाचारी राजकारण्यांचे आडनाव ब्राह्मण जातीतील आहे. तसेच 62 टक्के भ्रष्टाचारी व्यापार्यांचे नाव वैश्य जातीतील आहे. चित्रपटातील 84 टक्के मुसलमान कट्टर धार्मिक व प्रामाणिक (जरी ते या चित्रपटात अवैध धंद्यात सामील असले तरी) दाखविले आहेत. क्षत्रिय आडनाव असणार्यांपैकी 88 टक्के अतिशय धाडसी व शूर दाखविले आहेत. 74 टक्के चित्रपटांत शिखांना हास्यास्पद दाखविले आहे.
या शिवाय धीरज शर्मा व त्यांच्या चमूने पाकिस्तानी सेट असलेले 20 बॉलीवूड चित्रपट अभ्यासले. त्यातील 18 चित्रपटांमध्ये पाकिस्तानी आतिथ्यशील, खुल्या दिलाचे, धाडसी आणि नम्र दाखविले आहेत. या उलट पाकिस्तानी सरकार मात्र कट्टरपंथी, उद्धट आणि एककल्ली दाखविले आहे. याच चित्रपटात भारतीय संकुचित, अनादर करणारे आणि रूढिवादी आहेत. शेवटी या चमूने बॉलीवूड चित्रपटातील हा जातनिहाय आणि धर्मनिहाय पक्षपात 150 शाळकरी मुलांसमोर ठेवला. 94 टक्के मुलांनी हे पक्षपाती चित्रण खरे मानल्याचे आढळून आले. या चमूला असेही आढळून आले आहे की, हा जो धर्म आणि जातीबाबत पक्षपात आहे तो 1970 सालानंतर चढत्या क्रमाने आहे. गेल्या आणि आताच्या दशकात तर तो सर्वाधिक आहे. लेखक म्हणतो, हॉलीवूड चित्रपटांमध्ये अमेरिकी संस्कृती जगभरातील प्रेक्षकांच्या मनात ठसावी, असे चित्रण असते. परंतु, बॉलीवूड चित्रपटांमध्ये भारतीय संस्कृतीची थोरवी, महानता फारच कमी प्रमाणात प्रतिबिंबित होताना दिसते. लेखक म्हणतो, चित्रपटातून असे पक्षपाती चित्रण दाखविल्याने विशिष्ट धर्म वा जातीविरुद्ध समाजात एक दुर्भावना तयार होते. पाश्चात्त्य संशोधकांनी मान्य केले आहे की, चित्रपटामुळे तरुणांच्या वागण्या-बोलण्यावर, विचार करण्यावर सखोल परिणाम होत असतो आणि मग ही तरुण मंडळी तसेच वागण्याचा प्रयत्न करीत असतात. आज भारतीय समाजात जो हिंसाचार व्याप्त झालेला दिसत आहे, तशी मानसिकता तयार करण्यात बॉलीवूड चित्रपटांचा महत्त्वाचा हात आहे. त्या दृष्टीने या चित्रपट निर्मात्यांवर गुन्हे दाखल करण्याची गरज आहे.
आता एव्हढ्यात माझ्याही असे लक्षात आले की, बॉलीवूड चित्रपटात नायक मुसलमान असतो, नायिका हिंदू. हा एवढ्यातला बदल आहे. मुसलमान नायिका रूपवान असल्या, अभिनयसंपन्न असल्या आणि ‘चित्रपटातील कथेची मागणी’ म्हणून कितीही बोल्ड दृश्य देण्यास तयार असल्या, तरी त्यांना फार वाव मिळत नाही. यावरही सध्या चर्चा सुरू झाली आहे. कदाचित बॉलीवूडच्या बहुतेक चित्रपटांना ‘डॉन’चे अर्थसाह्य (अर्थातच अप्रत्यक्ष) मिळत असावे आणि त्याची ही अट असावी की, नायकाला मुसलमान नायिकेशी प्रणय करताना दाखविले जाऊ नये. खरे-खोटे भगवान जाणे! या सर्व सांस्कृतिक गोंधळाला, चिखलाला आम्हीच जबाबदार आहोत. संजय दत्तवरचा चित्रपट आम्हीच डोक्यावर घेतो. भारतीय बॉलीवूड दरोडेखोर, बलात्कारी, अंडरवर्ल्ड डॉन, बदनाम लोकांवर चित्रपट काढताना दिसते. पण, श्रीनिवास रामानुजम्वर ‘द मॅन हू न्यू इन्फिनिटी’ नावाचा चित्रपट काढण्याची बुद्धी हॉलीवूडलाच का व्हावी? नाना फडणविसांवर ‘घाशीराम कोतवाल’ काढता; पण त्याच्या असामान्य बुद्धिमत्तेवर एकही चित्रपट/नाटक नाही! थोरल्या बाजीरावची मस्तानी दिसते; पण अटकेपर्यंत त्याने मराठी राज्य स्थापन केले तो पराक्रम, आमच्या चित्रपटाचा विषय नाही होत! नेपोलियनवर, त्याच्या एकेका पैलूवर कितीतरी चित्रपट तयार झाले आहेत. त्या नेपोलियनपेक्षा कणभरही कमी नसलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांवर निघालेल्या चित्रपटांची संख्या नगण्य आहे, नगण्य! ही सर्व नावे ‘भगवी’ म्हणून बाजूला ठेवू. शाहू महाराजांवर, डॉ. आंबेडकरांवर तरी किती चित्रपट निघाले? की ते सरकारनेच सरकारी खाक्यात काढायचे? अशी अगणित उदाहरणे आहेत. दक्षिणेकडेच का म्हणून भारतीय संस्कृतीची महत्ता दाखविणारे चित्रपट तयार होतात? ‘सागर संगमम्’, ‘शंकराभरणम्’सारखे चित्रपट तेलगूतच का निघतात? बरे, हे चित्रपट बॉक्स ऑफिसवरही प्रचंड यशस्वी होत असतात. खोट आमच्यातच आहे, असे वाटते.
महाराष्ट्रात प्रबोधनकारी चळवळीमुळे आमच्या कलाकारांची (आणि आम्हा प्रेक्षकांचीही) बुद्धी इतकी नासली गेली आहे की, भारताच्या गौरवाने त्यांची प्रतिभा प्रसवतच नाही. भारतीय संस्कृतीची जितकी काही भोके असतील, जखमा असतील, त्या पाहूनच त्यांची प्रतिभा उत्तेजित होते आणि मग कलाकाराला अभिव्यक्तिस्वातंत्र्य असले पाहिजे, अशा भंपक मागण्या घेऊन ही मंडळी चार-पाचच्या संख्येत रस्त्यावर उतरतात. भारताच्या नशिबी हे भोग कुणी दुसर्या-तिसर्याने आणले नसून, अशा या भंपक व उथळ कलाकारांना डोक्यावर घेऊन आम्ही हिंदूंनीच आणले आहे, हे खरे दुर्दैव आहे.
No comments:
Post a Comment