Total Pageviews

Monday, 2 July 2018

होय.... गुगल पैसे पण देते!महा एमटीबी


गुगलची सुरवात, त्याचा इतिहास, त्याच्या बद्दलची माहिती आपण या पूर्वीच्या लेखामध्ये वाचली होती. आता या लेखामध्ये आपण एकूण गुगलचे उत्पन्न, त्यासाठी सर्वसामान्य माणसाचा हातभार कसा लागतो, त्याचबरोबर सर्वसामान्य माणूससुद्धा गुगलच्या माध्यमातून कशाप्रकारे उत्पन्न मिळवू शकतो, हे पाहणार आहोत.
 
गुगलच्या एकूण उत्पन्नापैकी मुख्य उत्पन्न हे जाहिरातींद्वारे मिळणारे आहे आणि या जाहिराती गुगलची सहायक कंपनी ‘ऍडसेन्स’ हिच्यामार्फत इंटरनेटवरती प्रसिद्ध केल्या जातात. यामध्ये दोन प्रकारच्या जाहिरातींचा समावेश असतो. एक असते कंटेटसाठी आणि दुसरी असते ती सर्चसाठी. तर या दोन्ही प्रकारातून गुगलवरती जाहिराती प्रसिद्ध केल्या जातात. एखाद्या वेबसाईटवर ऑनलाईन लेखाबरोबर ज्या गुगल जाहिराती असतात, त्या कंटेटच्या ‘ऍडसेन्स’चे साधन असेत. ज्याला इंटरनेट युझर्स ’ads by google‘ या नावाने ओळखतात. वेगवेगळ्या वेबसाईट्सवर गुगल सर्चचा ऑप्शन दिला जातो आणि त्याला सर्च एड्सन्सच्या साहय्याने नियंत्रित केले जाते. यासंबंधी संपूर्ण पारदर्शकता गुगलकडून ठेवली जाते. जे काही जाहिरातीतून मिळणारे उत्पन्न आहे, त्याची इत्यंभूत माहिती ही गुगलकडून दिली जाते आणि त्याच्यातून ६८ टक्के भाग हा ज्याच्या मार्फत जाहिरात मिळाली आहे, त्याला दिला जातो. सर्चच्या माध्यमातून ज्या जाहिराती मिळतात, त्यातही त्या वेबसाईटना ५१ टक्के इतका उत्पन्नातील वाटा दिला जातो. यामध्ये अगदी लहान कंपन्यांपासून घेऊन ते अगदी मोठ्या कंपन्यापर्यंत सर्व कंपन्या गुगल बरोबर काम करतात. या ‘ऍडसेन्स’ची सुरुवात २००३ मध्ये झाली होती. त्यामध्ये काहीच मोठे बदल केले गेलेले नाहीत. २००५ मध्ये सर्चच्या ऍडसेन्समध्ये बदल केला गेला होता. त्यामध्ये एकूण वेबसाईटची भागीदारी वाढवण्यात आली होती. कदाचित भागीदारीत बदल होऊ शकतो, मात्र मुख्य उत्पन्नाचे साधन तेच आहे. गुगल मोबाईल, गुगल गेम्स किंवा बातम्यांसाठीसुद्धा जाहिराती दिल्या जातात. परंतु, त्यातून मिळणारे उत्पन्न हे तुलनेने कमी असते. आता हे ‘ऍडसेन्स’ कसे काम करते किंवा सर्वसामान्य माणूस कशाप्रकारे काम करू शकतो हे पाहू.
 
ब्लॉगिंगद्वारे उत्पन्न
 
बरेच जण ब्लॉगिंगचे काम करत असतात किंवा काहीजण ऑनलाईन काम करतात. हे ऑनलाईन किंवा ब्लॉगिंगचे काम करतानाच जर त्यांना उत्पन्न मिळाले तर ते किती फायदेशीर असेल, असा विचार केला जातो. त्यामुळे जे कोणी ऑनलाईन असतात, ते ऑनलाईन राहूनच कसे पैसे कमाविता येतील, याचे मार्ग शोधतात. अर्थात, त्यासाठी त्याला मेहनत करणे आवश्यक आहेच. म्हणजे फक्त इंटरनेट घेतले आणि फक्त ब्लॉग किंवा एखादी वेबसाईट सुरु केली म्हणजे आपले उत्पन्न गुगलच्या जाहिरातींमधून सुरु होणार असे नाही, तर थोडसे गंभीरतेने ही गोष्ट करणे आवश्यक आहे. याच्या माध्यमातून आपल्याला नक्कीच उत्पन्न मिळू शकते.
 
‘गुगल ऍडसेन्स’ही गुगलचीच एक कंपनी आहे, जी गुगलच्या जाहिरातीचा पूर्ण व्यवहार सांभाळते. एका दृष्टिकोनातून ही जाहिरात कंपनी आहे असे आपण म्हणू शकतो. गुगलचेच हे एक उत्पादन आहे. ‘ऍडसेन्स’द्वारे काय केले जाते, तर जे कोणी प्रकाशक आहेत, त्यांच्या वेबसाईटवरती किंवा ब्लॉगवरती टेक्स्ट, इमेज किंवा व्हिडिओ स्वरुपात जाहिराती दाखवल्या जातात. बरेचसे ब्लॉगर्स यावरतीच उत्पन्नासाठीही अवलंबून असतात. तुमचा ब्लॉग समजा, ऍडसेन्सने मान्यताप्राप्त असेल, तर तुम्ही तुमच्या ब्लॉगवरती अशा वेगवेगळ्या जाहिराती टाकू शकता. त्याच्यातून दोन वेगवेगळ्या पद्धतीतून उत्पन्न मिळू शकते. त्या दोन पद्धती म्हणजे ‘इम्प्रेशन्स’ आणि ‘क्लिक.’ ‘इम्प्रेशन’मध्ये किती वेळा लोकांनी तुमच्या जाहिराती बघितल्या, त्यानुसार तुम्हाला पैसे दिले जातात. उदाहरणादाखल, एक हजार व्ह्यूज असतील तर त्याला साधारण एक अमेरिकन डॉलर दिले जातात. दुसरा प्रकार म्हणजे क्लिक. क्लिक म्हणजे तुमच्या जाहिरातींवरती किती वेळा क्लिक केले गेले, यावर उत्पन्नाचे प्रमाण अवलंबून असते. ज्याला ‘click per ad' असे म्हटले जाते. एकदा जर ऍडसेन्समध्ये account मान्य झाले की, मग तुम्ही त्याप्रमाणे आपल्या ज्या काही जाहिराती आहेत, त्या तिथे प्रदर्शित करू शकतात आणि लोकांकडून त्या जाहिराती मिळूसुद्धा शकतात. तुमच्या ब्लॉला जे भेट देणारे आहेत, ते त्या जाहिराती बघून क्लिक करतील, तेव्हा आपोआप तुम्हाला त्याचे उत्पन्न मिळत जाते.
 
तुमचा ब्लॉग लोकप्रिय असल्यास गुगलकडून तुम्हाला जाहिरातींसंदर्भात विचारणा केली जाते, नाही तर तुम्ही स्वतःसुद्धा जाहिराती विकू शकता. एकदा का १०० डॉलर जमा झाले की, ते धनादेश किंवा बँक खात्यामार्फत तुम्ही मिळवू शकता आणि याचाच एक पुढचा भाग म्हणजे युट्यूब. युट्यूबवर लोक व्हिडिओला प्राधान्य देतात. त्यामुळे युट्युबद्वारे देखील जाहिराती मिळवून ब्लॉगर्सना फायदा होऊ शकतो. समजा, तुमचा ब्लॉग कोणी वाचत नसेल, तर त्यावर जाहिराती टाकून काही उपयोग नाही आणि गुगलसुद्धा अशावेळी जाहिराती लावण्याची परवानगी देत नाही. कारण, हे जाहिरातीचं नेटवर्क असल्याने त्यादृष्टीनेच त्याचे कार्य चालते.
 
हे काम नेमके कसे चालते?
 
जे लोक आपल्या वेबसाईटवर जाहिराती टाकतात, त्यांना ‘पब्लिशर’ (प्रकाशक) म्हटले जाते. ज्यांच्या जाहिराती आपण दाखवतो, ते जाहिरातदार. समजा, तुम्ही एखाद्या कंपनीची जाहिरात दाखवलीत, तर ती कंपनी जाहिरातदार आहे आणि तुम्ही त्या कंपनीची जाहिरात आपल्या ब्लॉगवर दाखविण्यासाठी त्यांच्याशी बोलून ती जाहिरात दाखवू शकता. यासाठी गुगलदेखील मदत करते. गुगल ने AdWords नावाचे नवीन उत्पादन सुरु केले आहे. या आधारे मोठ्या मोठ्या कंपन्यासुद्धा आपल्याला जाहिराती देऊ शकतात. त्याआधारे आपल्याला काही उत्पादनाच्या जाहिरातीसाठी नोंदणी करून नंतर जाहिराती मिळू शकतात. याखेरीज कीवर्ड हा देखील महत्त्वाचा घटक आहे. मोठमोठ्या कंपनीत कीवर्ड वापरले जाते. वेबसाईटवर एखाद्या उत्पादनाविषयी कीवर्ड असतो. तो सर्च केल्यावर त्यासंबंधी जाहिराती आपल्याला दिसतात. जो कोणी जाहिरात पाहणारा असेल, तो ती जाहिरात पाहायची की नाही, हे ठरवू शकतो. उदा. जर आपण एखाद्या स्मार्टफोन संबंधित ब्लॉग असेल तर त्यासंबंधी कीवर्ड टाकून जाहिरात बघू शकता किंवा फोन कनेक्ट असल्याने आपोआप त्या कीवर्ड संबंधित जाहिराती दिसतात. आजकाल ई-कॉमर्समुळे वेगवेगळ्या वेबसाईटवर जाऊन या गोष्टींचा इतिहास आणि माहिती ब्राऊझरमध्ये सुरक्षित राहते आणि त्याविषयी बर्याचदा शिफारस देखील केली जाते. ऍडसेन्स लोकांना रुची असणाऱ्या सर्व जाहिराती दाखवितात. जर आपल्याला ऑनलाईन खरेदी करायची असेल, तर त्यासंबंधी सर्व जाहिराती ते दाखविणार आणि मग आपोआप त्या खरेदी संबंधी उत्पन्न मिळणार.
 
गुगलद्वारे उत्पन्न मिळवण्याचे इतर मार्ग
 
गुगलच्या आधारे घरी बसलेल्या व्यक्ती पैसे कमवू शकतात, याचे आणखीन काही मार्ग आहेत. गुगलने 'गुगल ओपिनियन रिवार्ड' असे एक उत्पादन सुरु केले आहे. यात काही सर्वेक्षणासाठी आपल्याला काय वाटते, हे आपल्याला सांगावे लागते. या मोबदल्यात प्रत्येक सर्वेक्षणामागे दहा रुपये मिळतात. काहीवेळा गुगलकडून स्क्रीननुसार 'मीडिया पॅनल अॅप' आपल्या फोनमध्ये ठेवले जाते. त्याला साईन अप केल्यावर १०-१० रुपये मिळतात. गुगल आपला पाठलाग करून आपण काय काय बघतो, हे देखील बघत असतो. 'गुगल मॅप' यात आपण फोटो टाकू शकतो. त्यात गाईड पण असते. त्यातल्या काही प्रश्नांची उत्तरे आपल्याला द्यावी लागतात. त्यासाठी इतर लोकांना काही सांगण्यासाठी मार्केटचे फोटो किंवा रिव्ह्यू अपलोड करू शकतात किंवा काही नवीन जागा मॅपवर फोटो टाकून सार्वजनिक करू शकता आणि त्याचे देखील उत्पन्न मिळू शकते आणि घरी बसल्या गुगलद्वारे उत्पन्न मिळते. अशाप्रकारे घरी बसून ऑनलाईन राहून गुगलच्या आधारे विविध मार्गांनी उत्पन्न मिळवता येते.
 
- गजेंद्र देवडा

No comments:

Post a Comment