व्हॉटस्ऍपची सुरक्षितता या विषयावर सध्या सतत उलटसुलट बातम्या येत आहेत… काय आहे त्यामागची सत्यासत्यता…
काही दिवसापासून अनेक समाजमाध्यमावर तसेच वृत्तपत्रात व्हॉटस्ऍपमध्ये येवू घातलेल्या काही नवीन सुरक्षाविषयक वैशिष्टय़ांबद्दल खूप मोठय़ा प्रमाणात चर्चा सुरु आहेत. व्हॉटस्ऍपमधील काही नवीन गोष्टी कदाचित आपल्या सगळ्यांच्या उपयोगी पडू शकतात, पण बऱयाच गोष्टी खरंच शक्य आहेत काय आणि जर त्या खऱया असतील तर त्याचा आपल्यावर काय फरक पडू शकतो यावर खूप मोठय़ा प्रमाणात साशंकता आहे. त्यातच अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या माहितीमुळे नक्की काय खरे आणि काय खोटे हेदेखील कळण्याचा मार्ग बंद झाला आहे.
पंधरा दिवसांपूर्वी व्हॉटस्ऍपमध्ये सगळ्यात मोठे वैशिष्टय़ देण्यात आले ते म्हणजे आपल्याला आलेला कोणताही मेसेज हा मूळ मेसेज आहे की कोणीतरी पाठवलेला फॉरवर्डेड मेसेज आहे, ते कळू शकेल. व्हॉटस्ऍपमध्ये जर तो फॉरवर्डेड मेसेज असेल तर त्यावर ‘फॉरवर्डेड’ असे लिहिलेले असते. त्यामुळे आपल्याला सहज कळू शकते की हा मेसेज मूळ मेसेज नाही. याचा फायदा म्हणजे अनेकदा अफवा पसरवताना मेसेज फॉरवर्ड केले जातात. त्यावेळेस आपल्याला हा मेसेज मूळ नाही हे लगेच कळते.
दुसरे म्हणजे व्हॉटस्ऍपमध्ये असणारे वेगवेगळे ग्रुप हे सध्या अतिशय जलद गतीने माहिती प्रसारित व्हायचे सगळ्यात मोठे स्त्रोत आहेत, कोणत्याही एका व्यक्तीला मेसेज पाठवण्यापेक्षा एका ग्रुपमध्ये मेसेज टाकला की तो एकाच वेळेस अनेक लोक वाचू शकतात आणि पुढे तेच लोक मग तोच मेसेज दुसऱया ग्रुपमध्ये पोस्ट करून त्या मेसेजला काही क्षणात हजारो किंवा लाखो लोकांपर्यंत पोहोचवतात. त्यामुळेच अनेकदा कोणतीही अफवा किंवा चुकीची माहिती व्हॉटस्ऍप ग्रुपमधून सुरु होते. आपण बऱयाच वेळेस ऐकले आणि वाचले असेल की व्हॉटस्ऍपच्या ग्रुप ऍडमीनला अशा प्रकारच्या अफवा पसरवण्यासाठी जबाबदार धरले जाते. त्यासाठी व्हॉटस्ऍपमध्ये आता काही नवीन गोष्टी देण्यात आल्या आहेत. उदा. तुमच्या ग्रुपमध्ये कोणता व्यक्ती मेसेज पाठवू शकतो हे आता ग्रुप ऍडमीन ठरवू शकतात. जर तुमच्या ग्रुपमध्ये कोणी सर्रास अफवा किंवा चुकीची माहिती पाठवत असेल तर अशा व्यक्तींना तुम्ही अशी माहिती प्रसारित करण्यापासून रोखू शकता. ग्रुपबद्दल अजून एक गोष्ट खूप मोठय़ा प्रमाणात चर्चिली जात आहे, ती म्हणजे सर्व व्हॉटस्ऍप ग्रुप पोलीस स्टेशनमध्ये नोंदणी करण्याचा; सध्या व्हॉटस्ऍप वापरणारा प्रत्येक व्यक्ती कमीतकमी २० ते २५ ग्रुपचा सदस्य असतो. अशा प्रकारे ग्रुपची नोंदणी करायची माहिती अजूनही ना व्हॉटस्ऍपने दिली आहे ना पोलिसांनी, त्यामुळे सध्या ही फक्त एक चर्चाच आहे असे समजून चालूया.
व्हॉटस्ऍपवर अजून एक गोष्ट खूप मोठय़ा प्रमाणात फिरत आहे ती म्हणजे तुमचा मेसेज आता सरकारदेखील वाचणार आहे इ. त्यासाठी एक स्क्रीनशॉटही दाखवला जात आहे तो म्हणजे हा मेसेज सरकारने वाचला आहे आणि तो ठीक आहे, त्याची पुढची पायरी म्हणजे हा मेसेज सरकारने वाचला आहे आणि तो अनुचित आहे आणि तुम्हाला पोलीस अटक करू शकतात, हा स्क्रीनशॉट आणि मेसेज म्हणजे शुद्ध अफवा आहे.
एकंदरीत व्हॉटस्ऍप वापरणारे सध्या त्यावर येवू घालणाऱया नवीन सुरक्षाविषयक गोष्टींमुळे अनेक तर्कवितर्क लावत असतील, पण व्हॉटस्ऍप वापरताना आपण अगदी स्वतः थोडीशी काळजी घेतली तर स्वताच अफवा किंवा खोटय़ा बातम्यांपासून वाचू शकतो. त्याची सुरुवात मात्र आपल्याला स्वतःपासून करावी लागेल. आपल्याला कोणतीही माहिती जर अनुचित वाटत असेल तर दुसऱया कोणालाही पाठवू नका आणि ती माहिती आपल्या ज्या मित्रमंडळी किंवा नातेवाईकाने पाठवली असेल तर त्यांना सूचित करा.
हिंदुस्थान ही देशी-विदेशी मोबाईल कंपन्यांसाठी एक महाप्रचंड बाजारपेठ ठरली आहे. या ग्राहकांना ‘जाळ्या’त ओढण्यासाठी वेगवेगळ्या योजनांचा भडीमार सुरू आहे. बरे, आपले जनमानस किंवा मानसिकतादेखील या डिजिटल म्हणा अथवा ‘आभासी’ म्हणा, भूलभुलैयाला सहज बळी पडणारी असल्याने मोबाईलचा वापर अतिरेकाच्या सीमारेषा पार करून बराच पुढे गेला आहे. मोबाईलच्या ‘चक्रव्यूहा’त हिंदुस्थान पुरता अडकल्याचा हा पुरावा आहे. त्यामुळेच आज आपल्या देशातील ६६ टक्के लोकांना मोबाईलशिवाय एक दिवसही राहता येणार नाही असे वाटू लागले आहे. पुढील काही वर्षांत हे प्रमाण १०० टक्के झाले आणि अन्न, वस्त्र, निवारा या माणसाच्या जीवनावश्यक गरजांमध्ये मोबाईल या चौथ्या गरजेची भर पडली तर आश्चर्य वाटायला नको!
आपल्या देशातील मोबाईलच्या वेडाबद्दल नव्याने सांगायची गरज नाही. देशातील मोबाईलधारकांची संख्या, मोबाईलचा (त्यातही स्मार्टफोनचा) वापर ‘वाढता वाढता वाढे भेदिले शून्य मंडळा’ या पद्धतीने लाखांचे, करोडोंचे आकडे भेदत चालला आहे. आता एका सर्वेक्षणानुसार असे समोर आले आहे की, आपल्या देशातील ६६ टक्के लोक मोबाईलशिवाय एक दिवसही राहू शकत नाहीत. ‘स्टेट ऑफ डिजिटल लाइफ स्टाईल’ने केलेल्या सर्वेक्षणात हा निष्कर्ष काढण्यात आला आहे. हा निष्कर्ष धक्कादायक असला तरी अस्वाभाविक म्हणता येणार नाही. कारण बाकी काही नसले तरी मोबाईल जवळ असलाच पाहिजे हे आपल्या देशात अनेकांचे ‘ब्रीद’च झाले आहे. म्हणजे लोकसंख्यावाढ हा जसा आपल्याकडे ‘बंधनमुक्त’ विषय आहे तसाच मोबाईलचा वापर हादेखील ‘अनिर्बंध’ होऊ लागला आहे. सकाळी उठल्यापासून रात्री डोळा लागेपर्यंत ‘जेथे जातो तेथे तू माझा सांगाती’ याप्रमाणे मोबाईल हाच अनेकांचा ‘जीवनसाथी’ झाला आहे. कुटुंबातील इतरांकडे लक्ष दिले नाही, त्यांच्याशी बोलणे झाले नाही तरी हरकत नाही, पण मोबाईलवर बोलणे, वाचणे तसेच
लिहिणे आणि पाहणे
व्हायलाच हवे. घरात कोणी असले काय आणि नसले काय, स्मार्टफोन आहे ना, मग बस्स झाले! देशात घराघरात हेच चित्र दिसते. त्यावरून मागची पिढी आणि आताची पिढी यांच्यात वादही होताना दिसतात; पण हा ‘पिढीभेद’ही आता कमी होत आहे. त्यामुळे मोबाईलशिवाय एक दिवसही राहता येणार नाही असे सांगणार्यांची संख्या ६६ टक्क्यांवर पोहोचली असल्यास नवल काय? गेल्या वर्षी हिंदुस्थानातील मोबाईलधारकांची संख्या ६५ कोटी एवढी होती. त्यात ३० कोटी स्मार्टफोनधारक होते. म्हणजे आजही उर्वरित सुमारे ३०-३५ कोटी मोबाईलधारक हे स्मार्टफोन कंपन्यांचे ‘संभाव्य ग्राहक’ आहेत. शिवाय आपल्या देशातील काही कोटी लोक अद्याप कुठलाच फोन वापरत नाहीत. तसेच काही कोटी जनता अद्याप ‘इंटरनेट’च्या जाळ्यात अडकलेली नाही. हिंदुस्थान ही देशी-विदेशी मोबाईल कंपन्यांसाठी एक महाप्रचंड बाजारपेठ ठरली आहे ती याचमुळे. साहजिकच या ‘संभाव्य’ ग्राहकांना ‘जाळ्या’त ओढण्यासाठी सर्वच कंपन्या जोरदार प्रयत्न करीत आहेत. वेगवेगळ्या
योजनांचा भडीमार
सुरू आहे. बरे, आपले जनमानस किंवा मानसिकतादेखील या डिजिटल म्हणा अथवा ‘आभासी’ म्हणा, भूलभुलैयाला सहज बळी पडणारी असल्याने मोबाईलचा वापर अतिरेकाच्या सीमारेषा पार करून बराच पुढे गेला आहे. सेल्फीचा अतिरेक, त्यातून होणार्या दुर्घटना आणि मृत्यू, मोबाईल गेम्सपायी होणार्या आत्महत्या, मोबाईलवरील गाणी ऐकत प्रवास करण्याची जीवघेणी सवय, मानवी आरोग्याला बसणारे फटके हे आपला देश ‘मोबाईल व्यसना’च्या विळख्यात अडकल्याचेच परिणाम म्हणता येतील. तरीही समजून न उमजल्यासारखे मोबाईलचे वेड वाढतच आहे. मोबाईलच्या ‘चक्रव्यूहा’त हिंदुस्थान पुरता अडकल्याचा हा पुरावा आहे. महाभारतातील अभिमन्यूप्रमाणे हिंदुस्थानी माणूस या चक्रव्यूहातून बाहेर पडू शकणार नाही. त्यामुळेच आज आपल्या देशातील ६६ टक्के लोकांना मोबाईलशिवाय एक दिवसही राहता येणार नाही असे वाटू लागले आहे. पुढील काही वर्षांत हे प्रमाण १०० टक्के झाले आणि अन्न, वस्त्र, निवारा या माणसाच्या जीवनावश्यक गरजांमध्ये मोबाईल या चौथ्या गरजेची भर पडली तर आश्चर्य वाटायला नको!
No comments:
Post a Comment