Total Pageviews

Wednesday 18 July 2018

ई-कॉमर्स बदलतंय! By shankar.pawar | Publish Date: Jul 19 2018-PUDHARI


संतोष घारे
देशातील मोठ्या शहरांमध्ये आजकाल मॉल संस्कृती मोठ्या झपाट्याने वाढते आहे. त्यामुळे गल्‍लीबोळांतील दुकानदार चिंतेने ग्रासले आहेत. त्यांना असे वाटते की, अशा महाकाय मॉलमुळे छोट्या दुकानदारांचे अस्तित्वच हळूहळू समाप्त होईल. त्यामुळे कोट्यवधी लोकांच्या उपजीविकेचे साधन हिसकावले जाईल, अशीही भीती पसरली आहे. आता तर केवळ मोठ्या शहरांतच नव्हे, तर मध्यम आणि छोट्या शहरांमध्येही मॉल सुरू झाले आहेत. मात्र, मॉलच्या विस्तारामुळे किराणा दुकाने बंद होत असल्याचे अद्याप दिसून आलेले नाही. अर्थात, जिथे मॉल उभे राहिले आहेत, त्या परिसरातील किराणा दुकानदारांच्या व्यवसायावर परिणाम झाल्याचे मात्र दिसले आहे; परंतु उत्पन्‍न कमी होऊनसुद्धा असे छोटे दुकानदार बाजारात टिकून आहेत. याउलट ई-कॉमर्स कंपन्यांचा विस्तार आणि ऑनलाइन खरेदीकडे वाढता ओढा यामुळे मॉलमधील खुल्या शोरूमच्या व्यवसायावर मात्र नक्‍कीच विपरित परिणाम झाला आहे.
ई-कॉमर्स कंपन्यांशी मॉलमधील खुले शोरूम स्पर्धा करू शकत नाहीत. मोठ्या प्रमाणावर शोरूम ओस पडल्यामुळे शेकडोंच्या संख्येने मॉल बंदही झाले आहेत. सातत्याने नवनवीन ऑफर्स आणि मोठ्या सवलती देऊ केल्यामुळे ई-कॉमर्स कंपन्यांचा व्यवसाय सातत्याने वाढत आहे. सुरुवातीच्या काळात महानगरांमध्ये लक्ष केंद्रित केल्यानंतर आता या कंपन्यांनी छोट्या शहरांमध्येही आपली उत्पादने उपलब्ध केली आहेत; परंतु ग्राहकांची वाढती संख्या लक्षात घेता त्यांना त्यांची उत्पादने ग्राहकांकडे वेळेवर पोहोचविणे हे कंपन्यांसाठी मोठे आव्हान बनले आहे. मात्र, इतिहासाची पुनरावृत्ती होते, हे विधान या बाबतीत खरे ठरताना दिसत आहे. किराणा दुकानदारांना पूर्वीचे दिवस येणार याची चाहूल त्यामुळेच लागली आहे. ज्या ई-कॉमर्स कंपन्यांमुळे किराणा दुकाने बंद पडतील, अशी भीती व्यक्‍त केली जात होती, त्याच कंपन्या आता आपली उत्पादने पोहोचविण्यासाठी याच किराणा दुकानांची मदत घेऊ लागल्या आहेत. या नव्या मॉडेलमुळे संबंधित किराणा दुकानदारांचा लाभ वाढू लागला आहे. 
ई-कॉमर्स कंपन्यांनी तयार केलेले व्यवसायाचे हे नवे मॉडेल कसे आहे, हे जाणून घेणे गरजेचे आहे. या कंपन्या एखाद्या सणाच्या निमित्ताने किंवा खास दिवसाच्या निमित्ताने विशेष सेल लावतात तेव्हा त्यांचा व्यवसाय कित्येक पटींनी वाढतो. एकाच दिवसात लाखो ऑर्डर्स ग्राहकांपर्यंत पोहोचविणे केवळ अशक्य होऊन बसते. या संकटातून मार्ग काढण्यासाठी ई-कॉमर्स कंपन्या आता किराणा दुकानदारांना आपला प्रतिनिधी बनवीत आहेत. उदाहरणच घ्यायचे झाल्यास, एका ई-कॉमर्स कंपनीने गुरुग्राममधील दहा सेक्टरमधील प्रत्येकी एका किराणा दुकानदाराला आपला प्रतिनिधी म्हणून नियुक्‍त केले आहे. यानंतर दिवसाकाठी एखाद्या सेक्टरमधून कंपनीला जेवढ्या ऑर्डर्स मिळतील, त्या वस्तू घेऊन जवळच्या वेअर हाऊसमधून कंपनीची गाडी सेक्टरप्रमाणे त्या-त्या दुकानदाराकडे वस्तू पोहोच करते. किराणा दुकानदार या वस्तू आपल्या कर्मचार्‍यांमार्फत आपापल्या सेक्टरमधील ग्राहकांना पोहोच करतात. एका अंदाजानुसार हे दुकानदार या मॉडेलद्वारे सरासरी पंधरा हजार रुपयांची कमाई करीत आहेत.  आता याच दुकानदारांच्या मदतीने कंपन्या अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचू पाहत आहेत. व्यापार्‍यांच्या अखिल भारतीय संघटनेने (कॅट) म्हटले आहे की,  ई-कंपन्यांचा व्यवसाय किरकोळ दुकानदारांच्या दृष्टीने नक्‍कीच हितावह नाही. 
ई-कॉमर्स कंपन्यांसाठी नियामक यंत्रणा निर्माण करून दुकानदारांना संरक्षण देण्याची संघटनेची मागणी आहे. अर्थात, ई-कॉमर्स कंपन्यांना टक्‍कर देण्यासाठी व्यापारीही वेगवेगळी धोरणे आखत आहेत. 23 ते 25 जुलैदरम्यान या संघटनेचे अधिवेशन होत असून, व्यवसायातील बदलांच्या दृष्टीने व्यापारी त्यात चर्चा करतील. व्यापार्‍यांनी आपापल्या विभागासाठी एक पोर्टल बनवावे, अशी संघटनेची कल्पना आहे. पोर्टलच्या माध्यमातून परिसरातील एखादी व्यक्‍ती खरेदी करू इच्छित असेल, तर दुकानदाराने ती ऑफर स्वीकारावी.  किराणा दुकानदारांची गुंतवणूक कमी असल्यामुळे ते ई-कॉमर्स कंपन्यांशी स्पर्धा करू शकतील, असे संघटनेला वाटते.

No comments:

Post a Comment