उमरचे हौतात्म्य वाया न जावो…
काश्मिरातील स्थितीने किती भीषण वळण घेतले आहे हे उमर फैयाज या लष्करी अधिकाऱयाच्या हत्येमुळे पुन्हा एकदा स्पष्ट झाले. उमर हा अवघा बावीस वर्षांचा तरुण अधिकारी पुटुंबातील लग्नसमारंभासाठी सुट्टी घेऊन गावी आला होता. त्यावेळी काही तरुणांनी त्याला बाहेर बोलावून नेले व दुसऱया दिवशी त्याचा मृतदेह आढळला. त्याला चेहऱयावर व पोटात गोळी मारून त्याची हत्या केली गेली असल्याचे आता निष्पन्न झाले आहे. उमर हा तळहातावर शिर घेऊन लढण्याइतका निडर होताच. म्हणून तर तो लष्करात दाखल झाला होता. राजपुताना रायफल्समध्ये लेफ्टनंटपदावर असलेल्या या अधिकाऱयाचे लष्करी शिक्षण पुण्याच्या एनडीएमध्ये झाले होते. उत्तम हॉकीपटू असलेल्या उमरची देशासाठी लढण्याची इच्छा पूर्ण झाली. पण त्याचा मृत्यू हा सीमेवर लढताना नव्हे तर दगाबाजीने त्याच्याच गावातल्या लोकांनी घडवला. काश्मिरी मुस्लिम असूनही तो भारतीय लष्करात गेला हा फुटिरतावाद्यांच्या लेखी मोठा धर्मद्रोह असला पाहिजे. त्याचीच शिक्षा त्याला देण्यात आली असून, इतरही अशा हजारो मुस्लिम जवान तसेच पोलिसांना हा इशारा असल्याचे मानायला हवे. हिजबुल मुजाहिदीन या दहशतवादी संघटनेचा हात असल्याचे धागेदोरे मिळाले असून अब्बास बट नावाच्या अतिरेक्याने हे कृत्य घडवल्याचे स्पष्ट झाले आहे. हा अब्बास एका स्थानिक मुस्लिम डॉक्टरच्या हत्येप्रकरणी देखील आरोपी आहे. उमरचे वडील हे शेतकरी असून निरक्षर आहेत. एकेकाळी त्यांचे काका दहशतवादी गटात होते. उमरने सैन्यात जाण्याचा निर्णय घेतला. कुटुंबीयांनी त्याला अडवले नाही. एरवी फुटिरतावादी व दहशतवादी यांच्या कारवायांमुळे सतत चर्चेत असलेल्या शोपियान व कुलगाम जिह्यांचा हा परिसर आहे. तेथे भारतविरोधी वातावरण अत्यंत तीव्र आहे. असे असूनही उमरला आपल्याच गावात कधी धोका होईल असे आम्हाला कधीही वाटले नाही अशी त्याच्या वडिलांची भावना होती. गेल्या वर्षीपर्यंत ती ठीक होती. आता ती चुकीची आहे हे उमरच्या हत्येने दाखवून दिले.
हा हिंसाचार व फुटिरतावादी भावना यांचा कहर झाला तरीही जम्मू-काश्मीर सरकार, पोलीस इत्यादी यंत्रणा आपापले कार्य करीत होत्याच. यामध्ये काम करणारे बहुसंख्य लोक हे स्थानिक मुस्लिमच आहेत. ते कायद्यानुसार करायची कारवाई करीत होते व त्यांना फारसा अटकाव नव्हता.
याच काळात काश्मिरात घेतल्या गेलेल्या लष्करभरती मोहिमांना नेहमीच मोठा प्रतिसाद मिळाल्याचे दिसले. म्हणजेच एकीकडे फुटिरतावादी वातावरणाचा प्रभाव असतानाही लोकांना लष्कराच्या नोकरीची गरज व आकर्षण वाटत होते हेही स्पष्ट दिसत होते. मात्र फुटिरतावादी व दहशतवाद्यांनी आता यावरही हल्ला करण्याचे ठरवलेले दिसते. किंबहुना, आता काश्मिरी विरुद्ध भारत असे जणू सर्वंकष युद्धच करायची ही लक्षणे आहेत. दक्षिण काश्मिरातील शोपियान, कुलगाम, पुलवामा आणि अनंतनाग या जिह्यांमध्ये गेल्या काही महिन्यांपासून भारतीय यंत्रणांना थाराच मिळू नये अशा मोहिमा राबवल्या जात आहेत.
जम्मू-काश्मीर बँकेच्या पैसे वाहून नेणाऱया वाहनांवर हल्ले, त्यांच्या सुरक्षा रक्षकांच्या हत्या, राजकीय पक्षाच्या नेत्यांच्या हत्या इत्यादी प्रकार सर्रास चालू आहेत. याखेरीज, जम्मूöकाश्मीर पोलिस दलात काम करणाऱया काश्मिरी मुस्लिमांच्या घरी जाऊन त्यांच्या कुटुंबीयांना धमकावण्याचे नवे प्रकार सुरू झाले आहेत. याचा परिणाम म्हणून अशा पोलिस अधिकारी व कर्मचाऱयांनी आपल्या घरी जाताना सावधगिरी बाळगावी किंवा तूर्तास घरी जाऊ नये अशा सूचना करण्याची वेळ त्यांच्या वरिष्ठांवर आली. पोलिस व जवानांवर दगडफेकीचे तसेच त्यांच्यावर नागरिकांच्या जमावाने हल्ला करण्याचे प्रकारही मुद्दाम घडवण्यात येत आहेत.
दुर्दैवाने याबाबतची भारत सरकारची प्रतिक्रिया मात्र काहीशी बेफिकीर म्हणावी अशी आहे. काश्मीरच्या मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती या स्थिती हाताळण्यात पूर्णपणे अपयशी आणि हतबल आहेत. तेथील समाजात त्यांच्या शब्दाला कोणतीही किंमत राहिलेली नाही. लेफ्टनंट उमर हा एका दृष्टीने हुतात्माच झाला आहे.
No comments:
Post a Comment