May 12, 2017
0
15
रणनीती
दक्षिण काश्मीरच्या शोपिया जिल्ह्यात काही दहशतवाद्यांनी भारतीय सेनेचा लेफ्टनंट उमर फैयाज याचे अपहरण केले व त्याला ठार मारले. लेफ्टनंट उमर फैयाज हा मागच्या डिसेंबरमध्ये भारतीय सेनेत रुजू झाला होता. तो मामाच्या मुलीच्या लग्नसोहळ्यात सामील होण्याकरिता रजेवर आला होता. त्याला रात्री मंडपातूनच उचलण्यात आले. त्याचा मृतदेह सकाळी एका चौकात आढळला. त्याला अत्यंत क्रूरपणे मारण्यात आले. त्याचे दात काढण्यात आले होते. उमर अत्यंत होतकरू आणि हुशार अधिकारी होता. त्याचे प्रशिक्षण नॅशनल डीफेन्स ऍकॅडमी, खडकवासला, पुणे येथे झाले होते. तो अत्यंत उत्कृष्ट हॉकीपटू होता. दहशतवाद्यांचा त्याला मारण्यामागचा हेतू स्पष्ट होता. जनमानसात दहशत निर्माण करणे व भारतीय सेनेला एक संदेश देणे की, आम्ही असल्या प्रकारची कृत्ये करून तुम्हाला नामोहरम करू. या घटनेनंतर सबंध देशभरात संतापाची लाट आली व लोकांनी आग्रह धरला की, याचा बदला आपण केव्हा घेणार? बदला भारतीय सेना निश्चितच घेईल. मोदी सरकारचे धोरण मिळमिळीत नाही, याची खात्री आहे. भारतीय लोकांनी व मीडियाने थोडा धीर धरला पाहिजे.
बदला हा कशा प्रकारे घेतला जाईल, यावर जनमानसात चर्चा सुरू असते. यात प्राथमिक कारवाई ही पाकिस्तानी चौक्यांवर जबरदस्त फायरिंग करणे ही होय. ही जी फायरिंग आहे यात भारतीय सेनेच्या तोफांचा समावेश असावा. कारण तोफांच्या मार्यामुळे भलंमोठं नुकसान होतं. पाकिस्तान सतत युद्धबंदी उल्लंघन करीत आहे. याचा फायदा घेऊन दहा दिवसांपूर्वी जशा आपण पाकिस्तानच्या तीन चौक्या उद्ध्वस्त केल्या होत्या तसं एलओसीवर बर्याच ठिकाणी दणदणीत झोडपून काढावं. या तोफांचा मारा आपण जिथे दहशतवादी शिबिरं आहेत तिथेदेखील केला पाहिजे आणि ही शिबिरं तोफांच्या मार्यानं उद्ध्वस्त केली पाहिजे.
दुसरी कारवाई म्हणजे ‘सर्जिकल स्ट्राईक’ही असू शकते. यात मागील सर्जिकल स्ट्राईकप्रमाणे दहशतवाद्यांच्या प्रशिक्षण शिबिरांमध्ये घुसून प्रहार करणे, ही होय. या कारवाईसंबंधीची चर्चा मीडियाने टाळावी. असल्या प्रकारच्या सर्जिकल स्ट्राईकचा शत्रूच्या मनोबलावर फार मोठा विपरीत परिणाम होतो व आपले मनोबल उंचावते.
तिसरा पर्याय हा की, प्रत्यक्ष युद्ध न छेडता पाकिस्तानी ठाण्यांवर तेवढीच जबरदस्त कारवाई करणे. यात मॉर्टर्स तोफा, ऍण्टीटँक गाईडेड मिसाइल्स, रॉकेटस् व तोफांचा जबरदस्त मारा करणे, हा होय. जरी आपण एलओसी पार करण्याचा हेतू न ठेवला, तरी अटीतटीच्या वेळी एलओसी पार करून लिमिटेड ऑफेन्सिव्ह करणे हे होऊ शकते.
सध्या काश्मीरची परिस्थिती अत्यंत वाईट आहे व काश्मीर हातातून निसटतो की काय, ही भीती वाटते. खरंतर याच्यापेक्षाही वाईट परिस्थिती १९९० साली झाली होती. त्या वेळी राज्यपाल जगमोहन यांनी भारतीय सेनेला योग्य ती कारवाई करण्यास पूर्ण मुभा दिली होती. भारतीय सेनेने हे ऑपरेशन दोन पद्धतीने हाताळले. सर्वप्रथम दहशतवादी व दंगेखोर यांच्यावर सक्तीने कारवाई करण्याचे आदेश दिले. यात आवश्यक झाल्यास बिनधास्त गोळ्या झाडणे हे होतं, दुसरे असे की काश्मीरच्या लोकांना निर्णयात समाजोपयोगी योजनांद्वारे मदतीचा हात देऊन त्यांची मलमपट्टी करण्यात आली होती. सैन्याला पूर्ण मुभा दिल्यामुळे काश्मीरची बिघडलेली परिस्थिती दहा दिवसांत आटोक्यात आली. जे जे विघटनवादी व भारतविरोधी तत्त्वं आहेत त्यांची हयगय न करता, त्यांच्याविरुद्ध ठोस पावलं उचलली पाहिजे. परिस्थिती अजूनही नियंत्रणात येऊ शकते, जर भारतीय सैन्याला कारवाई करण्यास मोकळं सोडलं तर. भारतीय सेनेला काश्मीरमध्ये आपला काय रोल आहे, हे स्पष्टपणे माहीत आहे. भारतीय सेनेला कुठल्याही कारवाईमध्ये त्यांच्या मर्यादा माहीत आहेत. भारतीय सेनेलादेखील काश्मीरमध्ये शांतता हवी. विनाकारण बेछूट गोळीबार करण्याची भारतीय सेनेला हौस नाही.
परिस्थिती अशी आटोक्याबाहेर का गेली, याचीदेखील बरीच कारणे आहेत. मोठ्या प्रमाणात जम्मू-काश्मीर सरकार याला कारणीभूत आहे. या सरकारने विघटनवादी नेते व फुटीरवादी लोकांविषयी जी पावलं उचलायला हवी होती ती योग्य वेळी उचलली गेली नाहीत व जम्मू-काश्मीर सरकार याविषयी अतिशय नरम होते. याचा फायदा शत्रूंनी उचलला व पत्थरबाज टोळ्या तयार केल्या. पत्थरबाजांना कसे हाताळावे, यासंंबंधी भारतीय सेनेला स्पष्ट निर्देश नव्हते, त्यामुळे भारतीय सेनेचेही बरेच नुकसान झाले व काश्मीरमधील परिस्थिती चिघळत गेली. काश्मीर सरकारचे मंत्री व नेते घरात बसून, ज्या कारवाया होत आहेत त्या टीव्हीवर बघताहेत. हेच नेते जर त्या वेळी बाहेर पडले असते व ज्या लोकांमुळे ते निवडून आले त्यांच्याशी जनसंपर्क साधला असता, तर परिस्थिती बदलली असती. आपण ज्याला म्हणतो ‘रिचिंग आऊट टु पीपल’ हे काश्मीर सरकारच्या नेतेमंडळींनी अजीबात केले नाही. माझं स्पष्ट मत आहे की, भारत सरकारने कुठलाही विलंब न करता काश्मीरमध्ये राष्ट्रपती राजवट लागू केली पाहिजे व सैन्यास स्पष्टपणे योग्य ती कारवाई नि:संकोचपणे करण्याचे निर्देश दिले पाहिजे. मी खरे सांगतो, परिस्थिती दहा दिवसांत आटोक्यात येईल. यासोबत भारत सरकारने सोशल मीडियाचा अत्यंत प्रभावीपणे वापर केला पाहिजे. पाकिस्तानी व सौदी अरबच्या वाहिन्यांवर व काश्मीरमधील व्हॉट्स ऍप ग्रुपवर ताबडतोब बंदी घातली पाहिजे. भारत सरकारची जी काही सकारात्मक धोरणे आहेत त्यांचा अत्यंत प्रभावीपणे प्रचार केला पाहिजे. थोडक्यात, आपण अक्षरश: काश्मिरी जनमानसाचं सकारात्मक बाबींनी ब्रेनवॉशिंग केलं पाहिजे.
भारतीय सेनेच्या एका काश्मिरी अधिकार्याची दहशतवाद्यांद्वारे हत्या, हा काश्मीरच्या इतिहासात एक टर्निंग पॉईंट होऊ शकतो. काश्मीरच्या लोकांना नेतेमंडळींनी सोशल मीडियाद्वारे हे पटवून दिले पाहिजे की, पाकिस्तानी दहशतवादी हे काश्मिरी जनतेचे विरोधी आहेत. कारण त्यांनी एका होतकरू काश्मिरी युवकास क्रूरपणे ठार केले. लेफ्टनंट उमर फैयाज याच्या अंत्ययात्रेत या पत्थरबाज लोकांनी प्रेतावर दगडफेक केली. माझ्या मते, ही काश्मीरच्या लोकांकरिता अत्यंत लाजिरवाणी गोष्ट आहे. याचा काश्मीरच्या लोकांमध्ये व विशेषत: युवकांमध्ये असा प्रचार झाला पाहिजे की, काश्मीरच्या जनमानसात क्षोभ जागृत झाला पाहिजे. मी एक सैनिक आहे आणि उमरची त्या ही माझ्याकरिता अत्यंत वेदनादायी आहे. काश्मीरच्या मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांनी म्हटले आहे की, काश्मीरची समस्या सोडवण्याचे कौशल्य व सामर्थ्य फक्त नरेंद्र मोदींमध्ये आहे. त्यामुळे आता मोदींनी काश्मीरच्या लोकांशी संवाद साधायला हवा. काही वेळ ‘मन की बात’ ही त्यांच्यासाठीच करावी. लोकांचे मन जिंकण्याचे कौशल्य त्यांच्यामध्ये आहे. काश्मीरची समस्या ‘ब्लो हॉट व ब्लो कोल्ड’ या धोरणांनीच संपुष्टात येईल. म्हणजे भारतीय सेनेला सक्त व योग्य कारवाईचे आदेश व मोदींनी काश्मीरच्या लोकांची मनं जिंकून आपलंसं करणे. ही पावलं उचलताना विघटनवादी व फुटीरवादी नेत्यांना तुरुंगात डांबले पाहिजे, त्यानंतरच त्या कारवाया प्रभावी ठरतील. भारतीय सेेनेने लेफ्टनंट उमर फैयाजच्या रक्ताच्या प्रत्येक थेंबाचे प्रत्युत्तर दिलेच पाहिजे आणि भारतीय सेना ते लवकरच देईल, याची मला पूर्ण खात्री आहे. सारा देश त्याची वाट पाहतो आहे.
No comments:
Post a Comment