Total Pageviews

Friday 5 May 2017

काहीही कारण नसताना शस्त्रसंधीचे उल्लंघन करायचे, भारतीय जवानांचे बळी घ्यायचे, नंतर त्यांच्या मृतदेहांचीही निर्लज्जपणे विटंबना करायची अन् आम्ही हल्ला केल्याचे पुरावे द्या, अशी मागणी भारताकडे करायची, हा पाकिस्तानचा कोडगेपणाच आहे. पाकच्या हल्ल्यात भारतीय जवानांच्या मानवाधिकाराचे उल्लंघन होत नाही अन् भारताने प्रत्युत्तर दिले तर उल्लंघन होते, हा कसला आला मानवाधिकार? असल्या फालतू मानवाधिकाराची चिंता न करता पाकिस्तानात घुसून अतिरेक्यांना अन् हल्ला करणार्‍या पाकी सैनिकांना ठार मारले पाहिजे…


हा कसला मानवाधिकार? May 3, 2017064 अग्रलेख •• ••पाकिस्तानची कुख्यात गुप्तचर संस्था आयएसआयच्या कुरापती वाढतच चालल्या आहेत. वेळकाळ काहीही न बघता, आयएसआयकडून बदमाशी सुरू आहे. भारतीय नौदलातील निवृत्त अधिकारी कुलभूषण जाधव यांचे इराणमधून अपहरण केले आणि त्यांना पाकिस्तानात नेले. नुसतेच नेले नाही तर भारतीय हेर ठरवून तिथल्या लष्करी न्यायालयाने, कुलभूषण जाधव यांना फाशीची शिक्षाही सुनावून टाकली. ही सगळी बदमाशी आहे. स्वत:ची दुष्कृत्ये झाकण्यासाठी भारताला आंतरराष्ट्रीय पातळीवर बदनाम करण्याचे पाकचे ते एक मोठे षडयंत्र आहे. हे षडयंत्र हाणून पाडण्याची आणि पाकिस्तानच्या मुसक्या आवळण्याची आता वेळ आली आहे. परवाच पाकिस्तानने शस्त्रसंधीचे उल्लंघन करत रॉकेट हल्ला केला अन् त्यात भारताचे दोन जवान शहीद झाले. या शहीद झालेल्या जवानांच्या मृतदेहांचीही पाकिस्तानच्या जवानांनी विटंबना केली. पाकिस्तानची वागणूक या प्रकरणात अतिशय अमानवीय राहिली. एकतर कारण नसताना हल्ला करून जवानांना मारण्याचा गुन्हा पाकने केला होता, त्यात मृतदेहांची विटंबना करण्याचे पापही पाकने केले आहे. पाकच्या गुन्ह्याची अन् पापाची कठोर शिक्षा आता त्या देशाला दिलीच पाहिजे. पाकिस्तानी सैनिकांचे क्रौर्य हे अतिशय निंदनीय आहे. कोणत्याही प्रकारे ते माफ करता येऊ शकत नाही. आम्ही क्रूरतेचा बदला घेऊ, असा इशारा देऊन आता भागणार नाही. पाकिस्तानला आजवर अनेक वेळा इशारे देऊन झाले आहेत आणि इशार्‍यांची भाषा कळत नाही, हे त्यांनी कृतीने पुन:पुन्हा सिद्ध केले आहे. पाकने गोळीबार केला आणि त्याला भारताने जबरदस्त प्रत्युत्तर दिले म्हणजे बदला घेतला असे होत नाही. बदला असा घेतला पाहिजे की, पुन्हा वाकड्या नजरेने भारताकडे पाहण्याची पाकिस्तानची हिंमतच व्हायला नको! भारतीय हद्दीत शिरून पाकिस्तानी सैनिकांनी भारताच्या दोन शहीद जवानांचा शिरच्छेद केला, त्यांच्या शरीराची निर्लज्जपणे विटंबना केली, हे कृत्य सहन करण्यापलीकडचे आहे. म्हणूनच भारताने पुन्हा एकदा ‘सर्जिकल स्ट्राईक’ करत पाकिस्तानात घुसून त्यांच्या सैनिकांना, अतिरेक्यांना मारण्याची गरज निर्माण झाली आहे. आंतरराष्ट्रीय समुदाय काय म्हणेल, मानवाधिकारवाले काय म्हणतील, आपल्या कृतीचे काय परिणाम होतील, याचा विचार करत बसण्याची ही वेळ नाही. भारताचे जवान पाकिस्तानी आक्रमणात शहीद होतात, तेव्हा मानवाधिकारवाले कुठे वाळूत चोच खुपसून बसतात, हे त्यांचे त्यांनाच माहिती! मात्र, प्रत्युत्तरात भारतीय जवानांनी काही कारवाई केली की, हे मानवाधिकारवाले बेंबीच्या देठापासून अगदी कर्कशपणे बोंबलत सुटतात. आता त्यांनाही त्यांची जागा दाखवून देण्याची वेळ आली आहे. काश्मीर हातचे जाईल की काय, अशी भीती अनेक जण व्यक्त करीत आहेत. सरकार मात्र अशी भीती बाळगण्याचे कारण नसल्याची भूमिका घेते आहे. सरकार सरकारच्या जागी योग्यही असेल. पण, आज काश्मीरमध्ये पाकिस्तानने जी परिस्थिती निर्माण केली आहे, ती लक्षात घेता, भीती वाटणे स्वाभाविक आहे. भाडोत्री तरुण, भारताच्या सुरक्षा दलातील जवानांवर दगड फेकून त्यांना जखमी करीत आहेत, त्यांच्यावर हात उचलत आहेत, त्यांना मारहाण करीत आहेत. असे असतानाही आमचे जवान मात्र कमालीच्या संयमाचा परिचय देत आहेत अन् आम्हाला त्याचेच भूषण वाटत आहे. ही परिस्थिती आता बदलली पाहिजे. जे काश्मिरी तरुण दगड फेकत आहेत, ते पाचशे, हजार, दोन हजार आणि प्रसंगी पाच हजार रुपये घेऊन दगड फेकत आहेत. या दगडफेक्यांना पाकिस्तानची फूस आहे, हे कधीचेच स्पष्ट झाले आहे. त्यामुळे जी भीती व्यक्त केली जात आहे, ती दुर्लक्ष करण्यासारखी नक्कीच नाही. भारत सरकार दगडफेक्यांना आणि पाकिस्तानला आवर घालण्यासाठी नक्कीच ठोस उपाय योजत असणार. पण, ते अधिक ठोस अन् कडक असणे गरजेचे आहे. मध्यंतरी भारत सरकारने नोटाबंदी केल्यानंतर अतिरेक्यांचेही आर्थिक कंबरडे मोडले होते. त्यामुळे काही काळ दगडफेक थांबली होती. पण, आता पुन्हा त्यांच्या हाती पैसा आलेला दिसतो आहे. पाकिस्तानी हल्ल्यासोबतच परवा पुन्हा एक मोठी घटना काश्मिरात घडली अन् तिची दखल घेतलीच पाहिजे, अशी ती घटना आहे. अतिरेक्यांनी बँकेच्या कॅश व्हॅनवर हल्ला करून ५० लाख रुपये लुटून नेले. शिवाय, पाच पोलिसांनाही त्यांनी ठार मारले, घटनेत बँकेचे दोन कर्मचारीही मारले गेले. ही साधी घटना नाही. भारतीय बँकांतील पैसा लुटायचा अन् तोच पैसा भारतीय जनमानस अशांत करण्यासाठी वापरायचा, हा पाकिस्तानचा मोठा डाव आहे. २०१४ साली पाकिस्तानातील पेशावर येथे एका शाळेवर झालेल्या हल्ल्यानंतर पाकने आपली रणनीतीच बदलून टाकली आहे. कोणताही खटला ते लष्करी न्यायालयात चालवितात अन् आरोप असलेल्या व्यक्तीला बचावाची कुठलीही संधी न देता त्याला शिक्षा सुनावतात. पाकिस्तानात संविधान नावापुरतेच आहे, हेही कुलभूषण जाधव प्रकरणात सिद्ध झाले आहे. लष्करी न्यायालयात जो खटला चालतो, तो पूर्णपणे गुप्त राखला जातो आणि त्याची माहिती कुणालाच दिली जात नाही. फक्त सुनावण्यात आलेली शिक्षा तेवढी जाहीर केली जाते. एक प्रकारे पाकिस्तानात संविधानाच्या चिंधड्या उडविल्या जातात अन् मानवाधिकार तर औषधालाही तिथे शिल्लक नाही! जो देश मानवाधिकाराची अजीबात पर्वा करीत नाही, त्या देशाला धडा शिकविताना भारतानेही मानवाधिकार वगैरेची चिंता करण्याची गरज नाही. राहिली गोष्ट अमेरिकेची, तर अमेरिकेला मानवाधिकाराबाबत बोलण्याचा नैतिक अधिकारच राहिलेला नाही! अमेरिकेने आपल्या सोईनुसार अफगाणिस्तान, इराक, पाकिस्तानवर हल्ले केले आहेत आणि अतिरेक्यांना मारताना सामान्य नागरिकांचेही बळी घेतले आहेत. आपण जे ड्रोन हल्ले करतो आहोत, त्यात निष्पाप नागरिकांचेही बळी जाऊ शकतात, याचा विचार अमेरिकेने कधीच केला नाही. त्यामुळे भारताने अमेरिकेची पर्वा करण्याचीही आवश्यकता नाही. पाकिस्तानने, वारंवार इशारे देऊनही कुरापती थांबविलेल्या नाहीत, त्यामुळे आता पाकविरुद्ध धडक मोहीम उघडण्याची अन् पाकचा कायमचा बंदोबस्त करण्याची वेळ आली आहे. वेळ वाया न घालवता जर कारवाई केली गेली तर आणि तरच पाक वठणीवर येईल. अन्यथा, आपल्याला वारंवार त्रास सहन करावा लागेल

No comments:

Post a Comment