सध्या मायदेशात पनामा पेपर्समुळे चव्हाट्यावर आलेल्या भ्रष्टाचाराने संकटात सापडलेले पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ हे आंतरराष्ट्रीय पातळीवरही मोठ्या मानहानीला तोंड देत आहेत. संयुक्त राष्ट्रसंघातील अपयश, कुलभुषण जाधव प्रकरणी आंतरराष्ट्रीय न्यायालयातील अपयश, जागतिक पातळीवर दहशतवादाच्या मुद्याने आलेला बहिष्कृतपणा अशा अनेक कारणांमुळे सध्या पाकिस्तानला ‘बुरे दिन’ आले आहेत. सौदी अरेबियातील इस्लामी राष्ट्रांच्या परिषदेतही हेच दृश्य पाहायला मिळणे हे पाकिस्तानसाठी अत्यंत अनपेक्षित आणि धक्कादायकच होते. या परिषदेत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनाही निमंत्रित करण्यात आले होते. त्यावेळी ट्रम्प यांनी आपल्या भाषणात शरीफ किंवा पाकिस्तानचा नामोल्लेखही केला नाही, उलट भारत दहशतवादाने पिडित झालेला देश आहे असे सांगून भारताविषयीची सहानुभुती व्यक्त केली. ट्रम्प यांच्यासमोर भाषण करण्याची संधी मिळेल म्हणून शरीफ यांनी दीड तासांचे भाषण तयार केले होते, पण त्यांना ही संधी मिळालीच नाही. अनेक छोट्या राष्ट्रांना ही संधी मिळाली आणि पाकिस्तानला डावलण्यात आले. अर्थातच याची प्रतिक्रिया पाकिस्तानात उमटणे साहजिकच आहे. विरोधकांनी पाकिस्तानच्या या अपमानाबद्दल नवाज शरीफ यांनाच जबाबदार धरून त्यांच्यावर टीकेची झोड उठवली आहे. ‘तेहरीक-ए-इन्साफ’ या पक्षाचा सर्वेसर्वा आणि माजी क्रिकेटपटू इम्रान खान याने ही संधी घेऊन शरीफ यांच्यावर पुन्हा हल्लाबोल केला. शरीफ यांनी ट्रम्पबरोबर गोल्फ खेळण्याची संधी मिळेल म्हणून आपल्या सुरक्षाकर्मचार्यांनबरोबर भरपूर सराव केला, पण त्यांना खेळणे दूरच, मैदानातही येऊ दिले नाही, अशी बोचरी टीका इम्रानने केली. पाकिस्तानातील प्रसार माध्यमांनीही याबाबत सरकारवर खरमरीत टीका केली आहे. दहशतवादाच्या मुद्यावर पाकिस्तानला एकटे पाडण्यात भारताला मिळालेले यश इस्लामी राष्ट्रांच्या परिषदेतही असे दिसून आले, हे विशेष!
No comments:
Post a Comment