निर्णायक वेळ
Maharashtra Times | Updated: May 11, 2017, 11:49PM IST
0
लेफ्टनंट उमर फयाज या काश्मीरमधील अवघ्या २२ वर्षांच्या तरुण लष्कराधिकाऱ्याचे दहशतवाद्यांकडून झालेले अपहरण आणि हत्या आणि काश्मीरी जनतेने त्याच्या अंत्यसंस्काराला दिलेला प्रतिसाद व स्थानिक वृत्तपत्रांनी घेतलेली भूमिका पाहता काश्मीरमधील दुभंग आता निर्णायक बनल्याचे सिद्ध झाले आहे. जन्माला आल्यापासून दहशतवादी वातावरण पाहिलेला हा शूर शिपाई काश्मिरी जनतेला शांतता हवी आहे असे नेहमीच सांगायचा. म्हणून तो केवळ एक लष्कराधिकारी नव्हता तर केवळ दहशतवाद्यांच्या बंदुकीच्या गोळीतून आपले मार्ग शोधणाऱ्या त्याच्या पिढीसाठी पर्यायही होता. त्याची दहशतवाद्यांनी केलेली हत्या त्याने चोखाळलेल्या या वेगळ्या वाटेमुळेच होती, यात शंका नाही. देशातील खलिस्तानी चळवळ संपुष्टात येत असताना नव्वदीच्या दशकाच्या प्रारंभापासून काश्मीरमध्ये सुरू झालेला हा रक्तरंजीत प्रवास आता दोन्ही बाजूंनी अगतिक पातळीवर येऊन पोचला आहे. अलीकडच्या काळात बुरहान वाणी या दहशतवाद्याच्या हत्येनंतर सुरू झालेला अराजकतेचा कालखंड उमर फयाजपर्यंत येऊन पोचला आहे. काश्मीरमध्ये नेहमी रक्त वाहात राहिल्याने भारताच्या हातून परिस्थिती निसटल्याची भावना काश्मिरी जनतेमध्ये निर्माण व्हावी यासाठी दहशतवाद्यांच्या मार्फत पाकिस्तान हे छुपे युद्ध चालवत असले तरी आता निर्णायक वेळ आली आहे ती काश्मिरी जनतेसाठी. पाकिस्तान कुलभूषण जाधव यांना फाशीची शिक्षा जाहीर करण्यापासून भारतीय सैनिकांचे मुंडके छाटण्यापर्यंतची आगळीक करून आपली अगतिकताच दाखवत असले तरी त्यातून काश्मीरी जनतेपुढे तो भारताचा पराभव म्हणूनच दाखवला जात आहे. उमर फयाज काश्मीरींना योग्य मार्ग दाखवणारा नायक होता. बुरहाण वाणीच्या पोस्टरची जागा घेण्याचे सामर्थ्य त्याच्यात होते. त्यामुळे हा दुभंग नव्या पुलावाटे मिटवून भविष्याला वळण देण्यासाठीचा निर्णायक क्षण काश्मिरी जनतेसाठी येऊन ठेपला आहे. बुरहाण वाणी मेला तर काश्मिरी सुपुत्र गेला आणि उमर फयाज शहीद झाला तर भारतीय लष्कराधिकारी गेला या दुभंगलेल्या मानसिकतेला मागे टाकण्याची वेळ त्यांच्यासाठी आली आहे. एकाच प्रदेशात दोन मृत्यूंचा शोक कसा व्यक्त होतो, हे पाहून तरी डोळे उघडायला हवेत. केंद्र सरकारसाठीही ही निर्णायक वेळ आहे. उमर फयाजच्या हौतात्म्याचा अर्थ भारतीय सार्वभौमित्वावरचा हल्ला आहे.
No comments:
Post a Comment