May 25, 2017
Facebook Twitter
जवान लढत असताना त्यांच्या शौर्याची चेष्टा करणाऱ्या लोकांना हिंदुस्थानी नागरिक म्हणून जगण्याचा अधिकारच नाही. जवानांनी हिजबूलचा कमांडर अश्रफ वाणीला मारले, म्हणून आमच्या स्वातंत्र्य व स्वाभिमानाचे श्राद्ध घालणारी ही जमात त्या अश्रफ वाणीपेक्षा भयंकर ठरत आहे. पंतप्रधान मोदी यांनी अशा बेताल व चवचाल जिभेच्या लोकांविरुद्ध कठोर कायद्याचे प्रयोजन करायलाच हवे. आम्ही स्वतः मेजर गोगोईंच्या धाडसाने व सन्मानाने प्रभावित झालो आहोत. मेजरसाहेबांना शिवसेनेचा मानाचा मुजरा!
कश्मीर खोऱ्यात हजारो कश्मिरी पंडितांच्या हत्या झाल्या. आपल्याच देशात त्यांना निर्वासितासारखे जगावे लागते या अमानुष परिस्थितीबद्दल ज्यांच्या पापण्यांच्या कडा ओलावत नाहीत असे बरेच लोक अतिरेकी व देशद्रोहय़ांना मारल्याबद्दल नक्राश्रू ढाळतात तेव्हा त्यांची कीव येते. एका कश्मिरी तरुणास लष्कराच्या जीपला बांधून ठेवल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला व कश्मीरात मानवी हक्कांचे काय व कसे उल्लंघन होत आहे यावर आमच्या सैन्यालाच गुन्हेगार ठरविण्यात आले. या मानवी हक्कांच्या ठेकेदारांची मजल इथपर्यंत गेली की, ज्याने त्या अतिरेकी तरुणास जीपला बांधले त्या लष्करी अधिकाऱ्यास बडतर्फ करा, त्याचे कोर्टमार्शल करा, अशा पद्धतीने त्यांच्या जिभा वळवळू लागल्या, पण त्या राष्ट्रद्रोही जिभांची पर्वा न करता जीपच्या तोंडी कश्मिरी तरुणास बांधून ठेवणारे मेजर नितीन गोगोई यांना चीफ ऑफ आर्मी स्टाफ कॉमन्डेशनने सन्मानित केले. त्यामुळे आमच्या सैन्यदलाचे मनोबल अधिकच वाढणार आहे. अर्थात मेजर गोगोईंच्या या सन्मानाविरोधात काही विचारवंत दहशतवाद्यांच्या जिभा व मेंदू वळवळू लागल्याच आहेत व त्या अरुंधती जिभांचे योग्य ते कोर्टमार्शल अभिनेता व खासदार परेश रावल यांनी केले आहे. परेश रावल यांनी जे कोर्टमार्शल केले ती जनभावना व संतापाचा उद्रेक आहे. कश्मीरमधील निवडणुका शांततेने पार पाडण्याची जबाबदारी आपल्या लष्करावर होती व प्राणांची बाजी लावून लष्कर त्यांचे काम करीत होते, पण एका मतदान केंद्रावर हिंसक हल्ला होत आहे हे समजल्यावर मेजर गोगोई तेथे पोहोचले. या
हिंसक हल्ल्यातून
मतदान केंद्रावरील डझनभर निवडणूक कर्मचारी व सुरक्षा दलाच्या सात-आठ जवानांची सुटका मेजरसाहेबांनी केली. सुटकेची कारवाई सुरू असतानाही दगडफेक सुरूच होती. मेजर गोगोई व त्यांच्या सहकाऱ्यांवर पेट्रोल बॉम्बचा मारा केला गेला व त्या हल्लेखोर जमावाचे नेतृत्व करणारा हा तरुण हिंसाचारास प्रोत्साहन देत होता. परिस्थिती चिघळू लागताच मेजर गोगोई व त्यांच्या सहकाऱ्यांनी त्या तरुणावर झडप घातली व त्यास जीपच्या बोनेटला बांधून ठेवले. अशी ही स्वच्छ सरळ रोमांचक कहाणी आहे. पण त्या तरुणास जीपला का बांधले हो? असा आक्रोश करणाऱ्यांनी तो तरुण तेथे कोणता ‘शांतीपाठ’ वाचत होता याची चौकशी केली नाही. मुळात सैन्य हे सैन्य असते. मग ते कोणत्याही देशाचे असो. सैन्याला नेमून दिलेले कार्य, उद्दिष्ट त्यांनी कर्तव्यकठोरपणे पार पाडायचे असते. ते करत असताना अतिरेकी मानवतेचे अवडंबर माजवून चालत नाही. एका मर्यादेपलीकडे माणुसकीची धर्मशाळा करून चालणार नाही. अर्थात ढोंगी मानवतावादाचे मुखवटे घालणाऱयांना हे कसे समजणार? त्यातही वाद जम्मू-कश्मीरमधील लष्करी कारवाईबाबत असेल तर अशा मंडळींना मानवतावादाचे उमाळे जरा जास्तच फुटतात. खरे म्हणजे मानवतेच्या नावाखाली कश्मीर खोऱ्यातील माथेफिरू तरुणांना जे सहानुभूती दाखवतात त्यांच्या मानेवर डोकी नसून
पाकिस्तानात बनवलेली
रिकामी मडकीच आहेत. कश्मीरात रोजच जवानांवर हल्ले सुरू आहेत. जवान मारले जात आहेत. हे सर्व मानवी हक्कांचे उल्लंघन करणारे आहे असे या अरुंधतीछाप विचारवंत अतिरेक्यांना वाटत नाही. मात्र अतिरेक्यांशी लढणाऱ्या मेजर गोगोईस सन्मानित केले म्हणून त्यांच्या पोटात दुखायला लागले. मग त्या अतिरेकी व हिंदुस्थानविरोधी घोषणा देणाऱ्या तरुणास ‘पद्म’ पुरस्कार किंवा वीरचक्राने सन्मानित करायला हवे होते काय? अरुंधती रॉय या मोठ्य़ा, पुरस्कार विजेत्या लेखिका आहेत. त्याबद्दल सर्वांना आदरच आहे, पण त्यांनी राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने संवेदनशील विषयात डोके न घातलेले चांगले. विशेषतः कश्मीरसारख्या प्रश्नाबाबत देशाची एक तीव्र भावना आहे. त्या भावनेचा अनादर होणार नाही याची काळजी त्यांनी घ्यायला हवी. कश्मीरातील हिंसेचे व समस्येचे मूळ आपल्याच भूमीवरील अशा लोकांच्या मानसिकतेत आहे. जवान लढत असताना त्यांच्या शौर्याची चेष्टा करणाऱया लोकांना हिंदुस्थानी नागरिक म्हणून जगण्याचा अधिकारच नाही. जवानांनी हिजबूलचा कमांडर अश्रफ वाणीला मारले, म्हणून आमच्या स्वातंत्र्य व स्वाभिमानाचे श्राद्ध घालणारी ही जमात त्या अश्रफ वाणीपेक्षा भयंकर ठरत आहे. पंतप्रधान मोदी यांनी अशा बेताल व चवचाल जिभेच्या लोकांविरुद्ध कठोर कायद्याचे प्रयोजन करायलाच हवे. आम्ही स्वतः मेजर गोगोईंच्या धाडसाने व सन्मानाने प्रभावित झालो आहोत. परेश रावल यांनी घेतलेल्या भूमिकेबद्दल त्यांना ‘वीर सांसद’ पुरस्काराने सन्मानित करायलाही हरकत नाही! मेजरसाहेबांना शिवसेनेचा मानाचा मुजरा
No comments:
Post a Comment