Maharashtra Times | Updated: May 26, 2017, 12:51AM IST
0
0
ताबारेषेच्या पलीकडून दहशतवाद्यांना रसद पुरविणाऱ्या पाकिस्तानी चौक्या भारतीय लष्कराने उद्ध्वस्त केल्यानंतर पाकिस्तान काहीतरी कांगावा करणार हे अपेक्षित होते. आपल्या चौक्या भारताने उद़्ध्वस्त केल्याची कबुली पाकिस्तानने दिली असती, तर तो देश दहशतवाद्यांना थारा देत असल्याचेही स्पष्ट झाले असते. त्यामुळे भारताने अशी काही कारवाई केली नसल्याचा दावा पाक लष्कर करीत राहिले. गेल्या नोव्हेंबरमध्ये पाकिस्तानी हद्दीत घुसून केलेल्या सर्जिकल स्ट्राइकनंतरही पाकने अशीच नकारघंटा लावली होती. आताही तेच. मात्र, भारत आक्रमक होत असल्याने, आपल्या नागरिकांची दिशाभूल करण्यासाठी त्याला काहीतरी सांगणे गरजेचे होते. त्यामुळेच भारतीय चौक्या उद्ध्वस्त केल्याचा व्हिडिओ पाक लष्कराने जारी केला. त्याचबरोबर, संयुक्त राष्ट्रांच्या निरीक्षकांच्या गाडीवर भारताने ताबारेषेवरून गोळीबार केल्याचा दावाही पाकिस्तानने केला. मात्र, आपल्या वाहनावर भारताकडून गोळीबार झाला नसल्याचा खुलासा खुद्द संयुक्त राष्ट्रांच्या प्रवक्त्यानेच जाहीर केल्याने पाकच्या दाव्यातील हवा गेली. पाकिस्तानी लष्कराबरोबर निरीक्षक (पाकव्याप्त काश्मीरमधील) भीमबेर जिल्ह्यात गेले होते. त्यावेळी जवळपासच कोठेतरी गोळीबार झाल्याचा आवाज ऐकू आला. मात्र, तो निरीक्षकांवर गोळीबार झाल्याचा कोणताही पुरावा नाही. त्यात कोणीही जखमी झालेला नाही, असे संयुक्त राष्ट्रांच्या निरीक्षकाने स्पष्ट केल्याने पाकचा कांगावा उघड झाला आहे. भारतीय चौक्या तोडल्याचा पाकचा दावाही भारतीय लष्कराने खोडून काढला आहे. पाकचा हा बनाव असून, याबाबतचा व्हिडिओही खोटा असल्याचे लष्करी सूत्रांनी स्पष्ट केले आहे. भारतीय चौक्यांची स्थिती आणि व्हिडिओमधील दृश्य यांमध्ये मेळ नसल्याकडेही त्यांनी लक्ष वेधले आहे. हे दोन दावे खोटे ठरत असतानाच लढाऊ विमानाबाबतही पाकने कांगावा केला. आपल्या हवाई दलाच्या विमानांनी सियाचीन हिमनदीच्या भागात उड्डाण केल्याचा दावा पाकने केला; परंतु भारतीय हवाई दलाने आपल्या हवाई हद्दीचा भंग झाला नसल्याचे स्पष्ट केले असून, पाकने त्याच्याच हद्दीत सराव केला असावा, असे म्हटले आहे. दहशतवादाच्या मुद्द्यावर पाकिस्तानला आंतरराष्ट्रीय पातळीवर एकाकी पाडण्याच्या भारताच्या डावपेचाला यश येत असल्याने अगतिक झालेला पाकिस्तान काश्मीरमधील ताज्या स्थितीचा लाभ उठवू पाहत आहे. फुटीरतावाद्यांना आणि दहशतवाद्यांना बळ देऊन काश्मीर अशांततेत भार घालून हा प्रश्न आंतरराष्ट्रीय पातळीवर चर्चेत ठेवण्याचे त्याचे डावपेच आहेत. मात्र, पाकची ही खेळीही अपयशी ठरत आहे. नुकताच सौदी अरेबियात भरलेल्या इस्लामी देशांच्या दहशतवादाच्या विरोधी परिषदेत पाकची पुरती नाचक्की झाली. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प या परिषदेस उपस्थित होते. भारत हा दहशतवादाचा बळी असल्याचे ट्रम्प यांनी या परिषदेत जाहीर सांगितले. त्यानंतरच दोन दिवसांनी पाकिस्तानला अमेरिकेकडून दिल्या जाणाऱ्या अनुदानात मोठी घट करण्याचे संकेत ट्रम्प प्रशासनाने दिले. या पार्श्वभूमीवर पाकच्या कांगाव्याकडे पाहिल्यास त्याची अगतिकता स्पष्ट होते. काश्मीरच्या मुद्द्यावरून भारताशी हजार वर्षे युद्ध करण्याच्या झुल्फिफार अली भुट्टो यांच्या दर्पोक्तीची आठवण होईल अशी भाषा पाकिस्तानी हवाई दलाचे प्रमुख सोहेल अमन यांनीही नुकतेच केले आहे. अशा स्थितीत भारताला सतर्क आणि संरक्षणसज्ज राहावेच लागेल.
No comments:
Post a Comment