र
By pudhari | Publish Date: May 30 2017 1:20AM
अग्रलेख
शत्रू समोर येऊन उभा ठाकतो आणि दोन हात करू बघतो, त्याला युद्ध म्हणतात. त्याच्याशी आमनेसामने लढता येते. पण, जे पाठीत वार करतात आणि समोर येण्याची हिंमत दाखवत नाहीत, ते युद्ध नव्हे तर हस्तकांची खेळी असते. गनिमी युद्ध असते. घाणेरडी फसवी लढाई असते. त्यात गुंतलेल्या माझ्या सैनिक जवानांना मी काय सांगू? गुपचूप उभे रहा. अंगावर फेकलेले दगड खा आणि बिनातक्रार मरून जा, असे सांगू काय? जवानांनी विचारले तर त्यांना काय सांगू? अशा त्यांच्या निमूट मरण्यानंतर त्यांच्यासाठी उत्तम दर्जेदार शवपेटी घेऊन येईन, असे उत्तर देऊ काय? आपल्या जीवावर उदार होऊन देशाची सुरक्षा करण्यासाठी लढणार्या जवानांची हिंमत वाढवण्याचे काम मला करायचे असते. तेच माझे कर्तव्य असते. असे खडेबोल भारताचे लष्करप्रमुख बिपिन रावत यांनी ऐकवले आहेत. काश्मिरात चाललेल्या दगडफेक व हिंसाचाराचे समर्थन करणार्यांना आणि मानवाधिकारांचे थोतांड माजवणार्यांना रावत यांनी आपली भूमिकाच साफ करून ऐकवली आहे. गेले काही दिवस काश्मिरात चाललेला हिंसाचार, सेनेवर होणारी दगडफेक आणि त्यावरून होत असलेले राजकारण, याविषयी एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत रावत यांनी स्पष्टपणे आपली भूमिका मांडली आहे. आजवर सहसा भारतीय लष्करप्रमुखाने देशाच्या कुठल्या भागात चाललेल्या हिंसा वा त्यावरील लष्करी कारवाईबद्दल अशी उघड भूमिका मांडली नव्हती. राजकीय क्षेत्रात होणार्या टिपण्या वा आरोप-प्रत्यारोप यापासून सेनेचे अधिकारी कायम अलिप्त राहिले आहेत. मात्र, अलीकडे अशी टिपणी अधिकच अतिरेकी होऊ लागल्याने प्रथमच हा अपवाद समोर आला आहे. पहिली गोष्ट म्हणजे आजवरचे तमाम निकष बाजूला ठेवून मेजर लिथुल गोगोई नावाच्या अधिकार्याने दगडफेक करणार्या एका दंगेखोर काश्मिरीला आपल्या जीपच्या समोर बांधून दंगेखोरांना थंड करून दाखवले. त्यावरून गदारोळ चालू झाला असताना, लष्करप्रमुख बिपीन रावत यांनी त्या गोगोईला सन्मानपत्र देऊन आपला इशारा साफ केला होता. नंतर खुद्द गोगोईला त्याची अशा कृतीमागची भूमिका मांडण्याची संधी देण्यात आली. त्यानेही स्थिती कशी चमत्कारिक होती व साध्य काय करायचे होते, त्याचे स्पष्टीकरण दिले. तिथेच हा विषय संपायला हवा होता. पण, काही अतिशहाण्यांना थप्पड खाऊनच अक्कल येत असते. बहुधा त्यामुळेच खुद्द लष्करप्रमुखांना या आघाडीवर पुढे यावे लागले. त्यांनी अतिशय स्पष्ट शब्दात आपल्या भावना व भूमिका मांडल्या आहेत. त्यामुळे कोणाचे समाधान होवो किंवा न होवो. पण, काश्मिरातील घडामोडींचा बंदोबस्त आता कशाप्रकारे होणार आहे, त्याचा संकेत साफ मिळालेला आहे. यापुढे प्रत्येक बाबतीत अपवाद मानूनच लष्कर काश्मीरचा प्रश्न सोडवणार आहे.
पहिली गोष्ट अशी लक्षात घेतली पाहिजे, की काश्मिरात चालू आहे ती निव्वळ दंगल आहे आणि ती दंगलीप्रमाणेच हाताळावी लागेल. दंगलखोरांशी कधी संवाद वा चर्चा होऊ शकत नाही. एकदा अशा लोकांशी संवाद करायचा हे तत्त्वत: मान्य केले, मग दरोडेखोर व शत्रूशीही तडजोड करावी लागेल. पूर्वीच्या काळात किल्ल्याला वा नगराला वेढा देऊन शत्रूचे सैन्य बसलेले असायचे. मग त्यामुळे रसद तोडली जायची आणि खायला प्यायला काही उरले नाही म्हणून आपली सत्ता निकामी ठरल्याचे मान्य करीत राजाच शरण यायचा. तो तहाची बोलणी करायला पुढाकार घ्यायचा. आज काश्मिरात जे काही चालू आहे, त्यात तसूभरही वेगळा प्रकार नाही. तिथे भारतीय सेनेने तळ ठोकलेला आहे. पण, तिने आपल्याला वेठीस धरणार्यांना रोखायचे नाही, चोपायचे नाही अशी भूमिका घेऊन उपयोगाचे नाही. फुटीरवादी किंवा तथाकथित आझादीवाल्या लोकांची काय मागणी आहे? पाकिस्तानशी बोलणी करा. त्यात फुटीरवाद्यांना सहभागी करून घ्या. याचा अर्थ असा, की काश्मीर प्रदेश भारताचा नसल्याची भूमिका मान्य करून तो व्यापणार्या शत्रूशी तहाची बोलणी करा. ही मागणी केवळ फुटीरवादी वा आझादीवाले यांचीच नाही. तथाकथित पुरोगामी लोकांचीही आहे. याचा अर्थच त्यांना काश्मीर भारताचा प्रदेश असल्याचे मान्य नाही. तसे असेल तर त्यांनी ते जाहीरपणे सांगावे. पण, इथे शब्दांचा खेळ चालू असतो. आझादी वा काश्मिरी अस्मिता असले शब्द वापरून दिशाभूल केली जात असते. पण, लष्करप्रमुख शब्दांशी खेळत नसतो की त्याचे जवान शब्दाचे बुडबुडे उडवित नसतात. ते जीवाशी खेळत असतात. म्हणूनच काश्मिरातील जी काही समस्या आहे, ती सर्वाधिक भारतीय जवानांच्या जिव्हाळ्याची समस्या आहे. त्यात सर्वाधिक ऐकले पाहिजे ते भारतीय सेनादलाचे व सुरक्षा दलाचे! त्यांना काय वाटते याला कुठल्याही काश्मिरीपेक्षा अधिक महत्त्व आहे. 1971 च्या युद्धात भारताने पाकिस्तानचा मैलोगणती प्रदेश कब्जात घेतलेला होता. पण, भारत सरकारने त्यावरचा अधिकार सोडला आणि भारतीय सेना बिनातक्रार तो प्रदेश सोडून माघारी आलेली होती. आजही भारतीय सेनेला काश्मीर सोडून माघारी यायला क्षणाचाही विलंब लागणार नाही. पण, जर त्यांच्या जीवाशी तिथे कोणी खेळणार असेल, तर त्याच्या दाढीला हात लावून खाजवणेही त्याला शक्य नाही. अशा कोणालाही तिथल्या तिथे धडा शिकवणे भाग आहे आणि लष्करप्रमुख रावत असोत की मेजर गोगोई असोत, त्यांनी त्याची स्पष्ट कृतीतून ग्वाही दिलेली आहे. ज्यांना त्यात खोट दिसत असेल त्यांनी तहाची भाषा बोलावी किंवा काश्मीर भारताचा नाही असे साफ बोलण्याची हिंमत करावी. शब्दाचे बुडबुडे तिथे कामाचे नाहीत. इतके स्पष्ट बोलण्याची हिंमत दाखवली म्हणून म्हणावे लागते, भले शाब्बास जनरल
No comments:
Post a Comment