Total Pageviews

Friday, 19 May 2017

गुजराती समाज लष्करात का नाही?-शशिकांत सावंत

गेल्या आठवड्यात ‘गुजराती लोकांमध्ये हुतात्मे आहेत का?’ असा उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी प्रश्न विचारला होता. त्यांनी असेही विचारले आहे की, किती गुजराती माणसे देशासाठी लढली आणि शहीद झाली? या त्यांच्या बोलण्याला संदर्भ होता तो काश्मिरी अधिकारी लेफ्टनंट उमर फैयाज खोऱ्यामध्ये लढताना मरण पावल्याचा. अखिलेश यादव यांच्या प्रश्नांचे उत्तर असे आहे की, गुजरातमधील काही माणसे शहीद झाली आहेत; पण खूप मोठ्या प्रमाणावर नाहीत. याचे सरळ सरळ कारण हे आहे की देशातील इतर ठिकाणांहून जशी माणसे सैन्यात भरती होतात तितक्या प्रमाणात गुजरातमधून होत नाहीत. याबद्दल मी २००९मध्ये थोडे संशोधन केले होते. त्या वेळी माझ्या लक्षात आले की, त्या वर्षी देशातील दहा लाख सैनिकांमध्ये केवळ ७१९ गुजराती माणसांनी सैन्यामध्ये नोंदणी केली होती. हा आकडा सर्वाधिक होता आणि गुजरातमधून इतर वर्षी गेलेल्या सैनिकांच्या आकड्यापेक्षा जास्त होता. याचे कारण गुजरातमध्ये याबद्दलचे एक जागृती अभियान चालवण्यात आले होते. यापूर्वीच्या दोन वर्षांत म्हणजे २००७-०८ मध्ये गुजरातमधील सैन्यभरतीची संख्या २३० होती. गुजरातची लोकसंख्या सहा कोटींपेक्षा अधिक आहे. पण गुजराती लोकांपेक्षा जास्त सैनिक, परदेशातून भारतीय सैन्यात आले आहेत. नेपाळ हे आपल्या शेजारचे राष्ट्र आहे आणि ते गुजरातच्या अर्ध्या आकाराचेही नसेल, तरीही गुजराती लोकांपेक्षा अधिक सैनिक त्या देशाने भारतीय सैन्यात पाठवले आहेत. खरे तर त्यांच्या सैनिकांमधून बनलेली गुरखा रेजिमेंट ही जगभरातील कुठल्याही लढाऊ सैन्यापेक्षा कार्यक्षम मानली जाते. या उलट गुजरातला सैनिकी पराक्रमाची कुठली परंपराच नाही. भारतीय सैन्यातील प्रवेश आणि पाकिस्तानमधील प्रवेश याच्यामध्ये खूप अंतर आहे. मिर्झा गालिबने असे म्हटले आहे की, सौ पुस्थ है पेशाये आबा चीपाहगरी (शंभरहून अधिक पिढ्यांत माझ्या कुटुंबात सैनिकी पेशाची परंपरा आहे.) कुठलाही गुजराती समूह असे विधान करू धजणार नाही. उलट मराठा, पंजाबी आणि गुरखा या समाजातील माणसे हे वाक्य सहज म्हणू शकतील. याचा संबंध शौर्याशी नाही, तर खरी गोष्ट अशी की, याचा संबंध परंपरा आणि संधीशी आहे. ब्रिटिशांनी जिथे जिथे सैनिकांना युद्धबंदी केले त्याच्यातूनच आपली लढवय्या सैनिकांची फौज तयार केली. याला काही अपवाद आहे. ब्रिटिशांनी पंजाबी हिंदू, मुस्लिम, शीख अशा सैनिकांवर १८५७च्या उठावानंतर मोठ्या प्रमाणात लक्ष केंद्रित केले. हा उठाव प्रामुख्याने बंगाली सैन्याने केला होता. यामधील पंजाबी हे प्रामुख्याने जाट होते. (कोणी तरी नेमकेपणाने यावर बोट ठेवले आहे की, पाकिस्तानचे लष्करप्रमुख झिया उल हक हे प्रामुख्याने न लढणाऱ्या अरायण समुदायातून आले होते) पण प्रामुख्याने उठावापूर्वीच सैनिकांना प्रवेश देणे सुरू झाले होते. मी बंगळुरूमध्ये एका लष्करी विभागात राहतो. तेथे मद्रास रेजिमेंट उभी राहिली. या रेजिमेंटने १७८० पासून भारतीय लष्कराला सेवा दिली आहे. जेव्हा अशी परंपरा निर्माण होते तेव्हा ती पित्यापासून मुलापर्यंत चालवली जाते. जेथे असा इतिहास नसतो तेथे अशा परंपरा तयार होऊ शकत नाहीत. गुजरातमधील काही जाती लढाऊ आहेत आणि याच जातीतील लोक सैन्यामध्ये प्रवेश घेतात. यामध्ये दरबार नावाची राजपूत जात आहे, ज्यामध्ये जाडेजा आणि सोलंकी आडनावाची माणसे असतात. म्हणजे थोडक्यात शहिदांची संख्या शून्य नसेल, काही तरी असणारच. गुजरातने आजवर खूप कमी सैनिक दिले आहेत याचे एक कारण असे की, त्यांनी कधी युद्ध पाहिलेले नाही. अल्लाउद्दीन खिलजीने १२९७ मध्ये गुजरात काबीज केला. यानंतर गुजरातमध्ये फारशा लढाया झाल्या नाहीत. आणि नंतर ज्या झाल्या त्याच्यात मराठ्यांनी बराच भाग काबीज केला आणि आजही बडोद्यावर त्यांची हुकुमत आहे. गुजरातच्या उत्तरेकडील मुस्लिम सरदारांमध्ये आपापसात युद्ध चालू असे; पण अकबराने अहमदाबाद काबीज केले व गुजरात मुघलांच्या हातात गेला. नंतर इंग्रजांनी गुजरातवर ताबा मिळवला. सुरतपासून सुरुवात केली. आणि या लढायांमध्ये गुजराती लोकांचा फारच कमी सहभाग होता, मग ते हिंदू असो की मुस्लिम किंवा पारशी. सैन्यात जाण्यात गुजराती मंडळींना रस नसण्याचे आणखी एक कारण होते, ते म्हणजे गुजरातमध्ये व्यापारी परंपरा खूप मोठी आहे. असा समाज वास्तवाला महत्त्व देतो; पण प्रतिष्ठेला फार महत्त्व देत नाही. त्यामुळे गुजरातने खूप मोठ्या प्रमाणावर उद्योजक दिले आहेत. आणि प्रतिष्ठेचा बाऊ न करता लवचिक तडजोड करायची या वृत्तीमुळे गुजरातने अनेक मुत्सद्दी राजकारणीही दिले आहेत. स्वातंत्र्यपूर्व काळातील तीन प्रमुख राजकीय नेते म. गांधी, सरदार पटेल आणि जीना गुजराती होते, ही बाब इथे लक्षात घेतली पाहिजे. ही संस्कृती मी ज्या जातीत जन्मलो त्या पाटीदारमध्ये दिसते. आमच्या जातीमध्ये जाट समाजाप्रमाणे स्त्री-पुरुष गुणोत्तर अगदीच कमी आहे, याचे कारण इथे मुलगी असेल तर गर्भपात केला जातो किंवा लहान मुलींना जन्मतःच वाऱ्यावर सोडले जाते. ही एक शरमेची गोष्ट आहे आणि पाटीदारांनी आपली मानसिकता बदलली पाहिजे. पण आमच्या जातीत जाट समाजाप्रमाणे ऑनर किलिंग होत नाही. एकुणात गुजरातमधील व्यापारी जमात प्रतिष्ठेला महत्त्व देत नाही. त्यामुळे अखिलेश यादव यांच्या विधानामुळे लोक कितीही चिडोत; पण त्यांचे विधान तथ्य आणि वास्तवावर आधारित आहे. पण प्रश्नाच्या इतर गोष्टींकडे लक्ष द्यायला हवे. लष्करात जाऊन शौर्य गाजवणे याला एक परंपरा असते. अकारण एकाएकी उठून कोणी लष्करात जात नाही. तसेच एकाएकी कोणी व्यवसाय- उद्योग करायला लागत नाही. या दोन्ही परंपरा वेगळ्या आहेत. मराठा, पंजाबी समाजावर आक्रमणे झाली आणि त्याच्या बचावार्थ शतकानुशतके त्यांनी प्रतिकार केला. त्यासाठी सैन्यात प्रवेश घेतला. एकदा एका पिढीने शौर्य गाजवल्यावर पुढच्या पिढ्या तो वारसा पुढे नेऊ पाहतात आणि त्यातूनच परंपरा तयार होते. अशा परंपरेमुळे गुजराती समाजात व्यवसाय करण्यास लागणारी कौशल्ये आत्मसात करावी, अशी मानसिकता निर्माण झाली. जी पिढी व्यवसाय करते आहे, उद्योग करते आहे त्याच्या पुढच्या पिढ्यांना अर्थातच व्यवसाय उद्योग करणे सोपे गेले. साहजिकच ती परंपरा त्यांच्या घरात निर्माण झाली आणि गुजराती समाजाची ती प्रमुख ओळख बनली. हा सारा इतिहास नीट लक्षात घेतला तर दोन्ही परंपरांमधील फरक लक्षात येईल. म्हणूनच अखिलेश यादव यांचे वक्तव्य त्यासंदर्भात पाहायला हवे. एकंदरीत गुजराती लोकांनी आपल्यामध्ये हुतात्म्यांची परंपरा नाही याबद्दल अस्वस्थ होण्याचे काहीही कारण नाही. ते देशाची सेवा इतर अनेक प्रकारे करत असतात, शिवाय या देशाचा सर्वात मोठा हुतात्मा गुजराती लोकांमधून आल्याचा दावा ते करू शकतात आणि त्या हुतात्म्याचे नाव आहे महात्मा गांधी. अनुवाद : Next Article

No comments:

Post a Comment