डॉ. अनिल काकोडकर, ज्येष्ठ अणुवैज्ञानिक
केंद्रीय मंत्रिमंडळाने 700 मेगावॅट क्षमतेच्या 10 भारतीय बनावटीच्या अणुभट्ट्यांची उभारणी करण्याचा निर्णय नुकताच घेतला आहे. हा निर्णय अत्यंत स्वागतार्ह आणि अभिनंदनीय आहे. ऊर्जेचा दरडोई वापर हे संपन्नतेच्या मोजमापाचे एक जगन्मान्य एकक आहे. ऊर्जेचा वापर वाढला की, जीवनमान उंचावते. जीवनमानाचा स्तर उंचावलेल्या समाजाकडून ऊर्जेची मागणीही वाढते. म्हणजेच प्रगतीसाठी ऊर्जेची उपलब्धता वाढविण्याचे आव्हान पेलणे आवश्यक आहे. मात्र, हे आव्हान पेलताना प्रश्नत उरतो तो ऊर्जावाढीसाठी आवश्यक असलेल्या स्रोतांचा. त्याला काही मर्यादा आहेत. तेल आणि कोळसा या भूगर्भातील स्रोतांवरचे परावलंबित्व कमी करण्यासाठी आणि ऊर्जेची भविष्यकालीन गरज भागविण्याच्या दृष्टीने औष्णिक ऊर्जेकडून अणू व सौरऊर्जेकडे वळणे क्रमप्राप्त आहे. सध्या देशात असलेले कोळशाचे साठे 10 वर्षे पुरतील इतकेच आहेत. तेल किंवा जलविद्युत यांचा वाटा 5 टक्के इतका कमी आहे. त्यामुळेच अणुऊर्जा आणि सौरऊर्जेला पर्याय नाही. औष्णिक ऊर्जा प्रकल्पांमधून मोठ्या प्रमाणात प्रदूषण होते. कोळशाच्या ज्वलनामुळे कार्बन डाय ऑक्साईड आणि कार्बन मोनोक्साईड हे ग्रीन हाऊस वायू हवेत मिसळतात. ग्लोबल वॉर्मिंगचा सामना करायचा असेल, तर आपल्याला ऊर्जेसाठी ‘फॉसिल इंधना’कडून ‘नॉनफॉसिल इंधना’कडे जाणे आवश्यक आहे. अन्य कोणत्याही नॉनफॉसिल इंधनांपेक्षा (सौर, जल, पवन इ.) अणू इंधनापासून ऊर्जानिर्मिती करणे अधिक सुलभ आणि स्वस्त आहे.
आगामी 50 वर्षांचा विचार करायचा झाल्यास आण्विक आणि सौरऊर्जेच्या निर्मितीचे देशातले आदर्शवत प्रमाण 50-50 टक्के असायला हवे. हे उद्दिष्ट गाठायचे असेल, तर संशोधनावर सर्वाधिक लक्ष देणे आवश्यक आहे. सौरऊर्जा ही जवळपास पुढील 4.5 अब्ज वर्षे आपणास मिळत राहील, हे जरी खरे असले तरी ही ऊर्जा 24 तास उपलब्ध नसते. हायड्रोजन निर्माण करण्याच्या प्रक्रियेमुळे आपण ही ऊर्जा साठविण्याची व्यवस्था करू शकतो. दुसरे म्हणजे, सौरऊर्जा ही मुबलक प्रमाणात गोळा करावयाची झाल्यास खूप मोठे क्षेत्रफळ आवश्यक आहे. कारण, उन्हाचे तापमान खूप कमी असते. याउलट अणुशक्ती ही एक अतिप्रखर अशी शक्ती आहे. थोडीशी साधने वापरून थोड्या जागेत आपण मुबलक वीज निर्माण करू शकतो. आज जरी युरेनियमपासून आपण वीजनिर्मिती करत असलो, तरी उद्या थोरियमपासून अधिक मुबलक प्रमाणात आपण वीजनिर्मिती करू शकू. अणूच्या एकमेकांतील संमीलनाने (फ्यूजन) आता वीज निर्माण करण्याची शक्यता फार जवळ आलेली आहे. हे जर झाले, तर अणुऊर्जेची उपलब्धता आपल्या ऊर्जेच्या गरजा भागविण्याच्या दृष्टीने पुढील हजारो वर्षे पुरेल इतकी होऊ शकेल. भारतही या कार्यक्रमात मागे नाही. अणुऊर्जेसाठी आपल्याकडे युरेनियम कमी असला, तरी थोरियम या दुसर्याथ किरणोत्सारी पदार्थाच्या मुबलक खाणी भारतात आहेत. त्यामुळे अणुऊर्जेसाठी थोरियमला केंद्रस्थानी ठेवून तंत्रज्ञान विकसित केल्यास इंधनाच्या खर्चात मोठी बचत होईल. आज विकासासाठी विजेची अधिक गरज आहे. त्यामुळे इतर पर्याय पुरेसे नाहीत. थोरियमच्या सहाय्याने केले जाणारे अणुऊर्जेचे उत्पादन आणि सौरऊर्जा यांच्या मदतीने आपण देशाच्या ऊर्जेची गरज भागवू शकतो. भारताने तांत्रिकदृष्ट्या चांगली प्रगती केली असून, वीजनिर्मितीवर भर दिला पाहिजे.
भारताने 1974 मध्ये आणि 1998 ला केलेल्या अणुचाचण्यांनंतर संपूर्ण जगात भारताकडे एका वेगळ्या दृष्टिकोनातून पाहिले जाऊ लागले. त्यानंतर आपल्यावर लादण्यात आलेल्या निर्बंधांनंतरही भारताची अणुऊर्जा क्षेत्रातील प्रगती सुरूच होती. मात्र, आता त्यात आणखी गती आली पाहिजे. सध्या उपलब्ध असणार्या् तंत्रज्ञानाचा वापर त्यासाठी होणे आवश्यक आहे. अणुऊर्जा ही काळाची गरज बनली असून, अणुऊर्जेच्या वापराने आयात होणार्याल इंधनावरील भरमसाट खर्च टळण्याबरोबरच देशाची अर्थव्यवस्थाही वेगाने पुढे सरकेल.
आज भारताची गणना अणुतंत्रज्ञानात जगातील अत्यंत पुढारलेल्या देशांत होते. आपले हेवी वॉटर रिअॅाक्टरचे तंत्रज्ञान जागतिकस्तरावर प्रगत मानले गेलेले आहे. या तंत्रज्ञानाच्या आधारावर आपण आज आपली अणुकेंद्रे निर्माण करीत आहोत व त्यांचा वापर व्यापारीदृष्ट्या अत्यंत सफलपणे चालू आहे. फास्ट ब्रीडर रिअॅीक्टरचे तंत्रज्ञानही आपण विकसित केलेले आहे. आता आपण आपल्या स्वयंपूर्ण भारतीय तंत्रज्ञानाच्या आधारे मुबलक अणुवीज निर्माण करण्यास समर्थ आहोत.
पर्यावरणाच्या दृष्टीने अणुवीज केंद्रातून कोणत्याही प्रकारचा अपाय संभवत नाही. आज आपण देशात 20 अणुवीज केंद्रे चालवत आहोत. या केंद्रांभोवतीच्या पर्यावरणाचा अभ्यास, त्यासाठी उभारलेल्या खास प्रयोगशाळांत केला जात आहे. या अनुभवावरून अणुवीज केंद्रांचा पर्यावरणावर नगण्य प्रभाव पडतो, असे आपण ठामपणे सांगू शकतो. अणुवीज केंद्रे स्वच्छ वीजनिर्मिती तर करतातच; पण त्याचबरोबर केंद्राच्या परिसरात बराच आर्थिक व सामाजिक विकास त्यामुळे साध्य होतो, असा आजवरचा अनुभव आहे. त्यामुळे अणुऊर्जेबाबतचा बागुलबुवा निरर्थक आहे. अणुऊर्जा ही कमी खर्चात उपलब्ध होते. आज जगाच्या गरजेच्या 16 टक्के वीज ही अणुऊर्जा प्रकल्पांद्वारे उपलब्ध होते आहे. फुकुशिमा दुर्घटना, चेर्नोेबिल दुर्घटना होऊनही औद्योगिक वापराच्या ऊर्जेमध्ये अणुऊर्जा वापरात सर्वात कमी धोके आणि जोखीम आहे. हवामान बदलामुळे होणारे परिणाम, आणखी तत्सम इतर गोष्टी विचारात घेतल्या, तरी अणुऊर्जेचा लाभ, फायदा जास्तच आहे. केंद्र शासनाने घेतलेला ताजा निर्णय हा अणुवीज कार्यक्रमांची गती वाढवण्याच्या दिशेने सुरू झालेला नवा अध्याय ठरावा, अशी दमदार पावले सातत्याने टाकत राहणे आवश्यक आहे.
May 21 2017 2:48AM
No comments:
Post a Comment