भारताचे वायुदलप्रमुख एअर चीफ मार्शल बी. एस. धनोआ यांनी वायुदलातील सर्वच अधिकारी व लढाऊ विमानांच्या चालकांना कोणत्याही आकस्मिक प्रसंगाचा मुकाबला करण्यासाठी दक्ष आणि सज्ज राहा, असे आवाहन केले आहे. हे आवाहन त्यांनी वैयक्तिक रीत्या देशभरातील बारा हजार अधिकार्यांना पत्र पाठवून केले आहे. यापूर्वी फक्त दोनच अधिकार्यांनी अशी वैयक्तिक पत्रे आपल्या अधिकार्यांना पाठविली होती. पहिले, फील्ड मार्शल जनरल करिअप्पा यांनी १ मे १९५० आणि आणि दुसरे, जनरल के. सुंदरजी यांनी १ फेब्रुवारी १९८६ रोजी अशी पत्रे पाठविली होती. आता वायुदलप्रमुख धनोआ यांनी असे पत्र का पाठविले असावे, अशी कोणती आणिबाणीची स्थिती निर्माण होण्याची चिन्हे आहेत, यावर संरक्षण दलातील वरिष्ठ निवृत्त अधिकार्यांनी आपापले मत, वृत्तवाहिन्या आणि अन्य प्रसिद्धिमाध्यमांवर व्यक्त केले आहे. वायुदलप्रमुख धनोआ यांनी आपल्या पत्रातून सध्याच्या भारताच्या आसपासच्या देशातील परिस्थितीचा उल्लेख केला आहे. त्याची विस्तृत कारणमीमांसाही त्यांनी केली आहे. प्रामुख्याने पाकिस्तान-प्रायोजित वाढत्या दहशतवादी घटना आणि काश्मीर खोर्यात निर्माण झालेली अशांतता यावर त्यांचा प्रामुख्याने रोख आहे. चीनकडून पाकिस्तानला मिळणारी मदत पाहता, आपल्या वायुसेनेने अत्याधुनिक तंत्रज्ञानाने परिपूर्ण साधनांचा अभ्यास करणे गरजेचे आहे. शत्रूंशी ताकदीने मुकाबला करण्यासाठी आम्हाला आमच्याजवळ असलेल्या सर्वांगीण क्षमतांचा वापर करण्याशिवाय आता पर्याय नाही. अशी आणिबाणीची परिस्थिती निर्माण झाल्यास आमच्या वायुसैनिकांनी सर्व अत्याधुनिक साधने आणि व्यूहरचनेसोबत तयार असले पाहिजे. असे झाले तरच आम्ही यावेळचे युद्धही जिंकू शकू. धनोआ यांनी पत्रात हेही म्हटले आहे की, अनेक अधिकार्यांची मोक्याच्या जागी नेमणूक व पदोन्नती देताना त्यांना झुकते माप देण्याच्या काही घटना नजरेस आल्या आहेत. हे व्हायला नको. वायुसैनिकांची नेमणूक ही त्यांच्या क्षमतेवर, ज्ञानावर, अनुभवावर असली पाहिजे, असे त्यांनी सूचित केले आहे. पत्रातील हा सारा मजकूर बघितल्यास, धनोआ यांना हे पत्र पाठविण्याची गरज का भासली असावी, याची कल्पना येऊ शकते. अलीकडे भारत आणि पाकिस्तानच्या संबंधांत कधी नव्हे एवढी कमालीची कटुता निर्माण झाली आहे. त्यामागे पाकिस्तानकडून वारंवार होणारा शस्त्रसंधीचा भंग, पाकिस्तानात प्रशिक्षण देऊन भारतात दहशतवादी कारवाया करण्यासाठी पाठविण्यात येणारे अतिरेकी, त्यांच्याकडून सातत्याने लष्करी ठाणी आणि आमच्या सैनिकांवर, त्यांच्या ताफ्यावर होणारे हल्ले, काश्मिरातील फुटीरवादी संघटनांना गडगंज पैसा पुरवून दगडफेक करण्यास प्रवृत्त करण्याच्या घटना… अशी कितीतरी कारणे आहेत. ताजी घटना म्हणजे, भारतीय नागरिक कुलभूषण जाधव यांना एकतर्फी देण्यात आलेली फाशीची शिक्षा. त्याविरुद्ध भारताने आंतरराष्ट्रीय न्यायालयात धाव घेऊन जाधव यांच्या फाशीवर मिळविलेली स्थगिती, पाकिस्तानी लष्करप्रमुखांकडून भारताला सतत दिल्या जाणार्या धमक्या, हाफीज सईदसारख्या कुख्यात दहशतवाद्याला पूर्णपणे दिलेली मोकळीक… अशा आणखी बर्याच घटनांमुळे भारत आणि पाकिस्तानचे संबंध तणावपूर्ण झाले आहेत. जाधव यांच्या शिक्षेच्या बाबतीत आपण आंतरराष्ट्रीय न्यायालयाचा निकाल मानणार नाही, अशी पाकिस्तानची दर्पोक्ती! या सर्व घटना भारताच्या सुरक्षेसाठी चिंता वाढविणार्या आहेत. त्यामुळे धनोआ यांनी आपल्या वायुदल अधिकार्यांना सज्ज राहण्यास सांगितले आहे. भारताचा फार जुना अनुभव आहे. पाकिस्तानची एखाद्या मुद्यावर नाचक्की झाली की, तो मग त्या विषयाकडून लक्ष वळविण्यासाठी मिनी युद्धाचा आधार घेतो. नुकत्याच उघड झालेल्या एका घटनेत, काश्मीर खोर्यातील एक विघटनवादी संघटना हुरियतचा स्थानिक कमांडर नईम खान याने, एका वाहिनीने केलेल्या स्टिंग ऑपरेशनमध्ये अनेक धक्कादायक बाबींची कबुली दिली आहे. आम्हाला लष्कर आणि पोलिसांवर दगडफेक करण्यासाठी पाकिस्तानकडून सतत पैसा येत असतो. काश्मीर खोर्यात सतत अशांत वातावरण राहावे, असे पाकिस्तानकडून सांगितले गेले आहे. आमचे पाकिस्तानच्या अनेक नेत्यांसोबत, भारतातील पाकिस्तानच्या दूतावासासोबतही संबंध असल्याचे रहस्योद्घाटन या नईम खानने केले आहे. यामुळे काश्मीर खोरे आणि पाकिस्तानात एकच खळबळ उडाली आहे. या वाहिनीवर मुलाखत देण्यासाठी दोषी धरून, हुरियत प्रमुख सय्यद अली शाह गिलानी यांनी त्याला संघटनेतून निलंबित केले आहे. सध्या काश्मीर खोर्यात सय्यद अली शाह गिलानी संस्थापित तहरिक-ए-हुरियत, जम्मू-काश्मीर लिबरेशन फ्रंटचा नेता यासीन मलिक, जम्मू ऍण्ड काश्मीर डेमोक्रेटिक फ्रीडम पार्टीचा नेता शब्बीर अहमद शाह, ऑल पार्टी हुरियत कॉन्फरन्सचा मीरवैज उमर फारुख, हाफीज सईदचा प्रशंसक मसरात आलम व आसिया अंद्राबी हिजी दुख्तरान-ए-मिल्लत अशा सहा संघटना कार्यरत आहेत. या सगळ्या संघटनांना विविध कामांसाठी पाकिस्तान पैसा पुरवितो, अशी कबुली नईम खान याने दिली आहे. या सर्वांचेच कुख्यात हाफीज सईद याच्यासोबत घनिष्ठ संबंध आहेत. यासीन मलिक हा तर तीन वर्षांपूर्वी दहशतवादी हाफीज सईद याच्यासोबत व्यासपीठावरदेखील बसला होता आणि त्याने हाफीज सईद याच्या कारवायांचे खुले समर्थन केले होते. आसिया अंद्राबी ही हाफीजची प्रशंसक असून, महिलांच्या हातात दगड देण्याची जबाबदारी ही महिला अतिरेकी पार पाडीत असते. नईम खानने पाकिस्तानातून येणार्या पैशाचा सर्वात मोठा ओघ हा गिलानीकडे येतो, अशीही माहिती दिली आहे. आता राष्ट्रीय तपास संस्थेचे (एनआयए) अधिकारी नईम खान आणि गाझी जावेद बाबा यांची चौकशी करण्यासाठी श्रीनगरात दाखल झाले आहेत. काश्मीरमध्ये अशांतता निर्माण करण्यास या सर्व संघटना कारणीभूत असल्याचा आरोप लष्कर आणि राज्याच्या पोलिस दलाने केला आहे. राज्यपालांचा अहवालही प्राप्त झालेला आहे. एनआयएने स्टिंग ऑपरेशन करणार्या वाहिनीकडून फिल्म मिळविली असून त्याचाही अभ्यास सुरू आहे. काश्मीर खोर्यात कायम शांतता निर्माण करायची असेल, तर या सहाही पाकिस्तान समर्थक संघटनांवर बंदी घातली पाहिजे आणि त्यांच्या सर्व नेत्यांना अटक केली पाहिजे. देशात असंतोष धुमसत आहे. पाकिस्तान आणि नवाज शरीफचे पुतळे जाळले जात आहेत. या असंतोषाला पूर्णविराम देण्याच्या विचारात सध्या केंद्र सरकार असल्याचे दिसत आहे. त्यातील पहिले पाऊल म्हणजे, एनआयएकडून विघटनवादी संघटनांच्या नेत्यांची चौकशी! यानंतर काय कारवाई होते, याची उत्सुकता सर्वांनाच लागली आहे…
No comments:
Post a Comment