Total Pageviews

Thursday 25 May 2017

राजे, सांभाळा…!


May 26, 2017027 Share on Facebook Tweet on Twitter अग्रलेख ‘‘मी निलंग्यात आहे. एक छोटासा अपघात झाला आहे. आम्हाला कुणालाच काहीच झालं नाही. मला काहीच इजा झालेली नाही. डॉक्टरांनी तपासलं आहे. शुगर, बी.पी. सगळं ठीक आहे. महाराष्ट्राच्या ११.२० कोटी जनतेचा आशीर्वाद माझ्या पाठीशी असल्यानं मी सुखरूप आहे. काळजी करण्याचं कारण नाही…’’ असं, महाराष्ट्राचे ‘लाडके’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी, वृत्तप्रतिनिधी आणि काळजीनं संपर्क साधणार्‍या स्नेह्यांना अत्यंत संयमी आवाजात सांगितलं… लातूरच्या शिवाजी महाविद्यालयाच्या मैदानावरून मुख्यमंत्र्यांचे हेलिकॉप्टर उड्‌डाण करते झाले आणि त्यानंतर मिनिटभरातच ते परत फिरताना दिसले. जखमी पक्ष्याने हवेतच हेलपालटत कोसळावे तसे ते विजेचा खांब आणि तारांमध्ये अडकत खाली कोसळले आणि त्यानंतर मुख्यमंत्री सर्वांशी संवाद साधेपर्यंत महाराष्ट्राच्या काळजाचा ठोका चुकलेला होता. आता या झालेल्या अपघाताची कारणमीमांसा होत राहील. नेमके काय झाले, याचा तपासही करायला हवा. हवेचा दाब अचानक कमी झाल्याने पायलटने हेलिकॉप्टर परत घेण्याचा निर्णय घेतला आणि त्याला ते सुरक्षित जमिनीवर विसावण्याचीही संधी मिळाली नाही. जे झाले ते अतिशय धक्कादायकच होते. खरेतर हे हेलिकॉप्टर अत्यंत महत्त्वाच्या व्यक्तींच्याच तैनातीत असणारे, जगभरात विश्‍वासू ठरलेले ‘सिरकॉस्की व्हीटी’ बनावटीचं आहे. अडीच तासांत ते ८०० किलोमीटरचा प्रवास करू शकते आणि मुख्यमंत्र्यांच्या दिमतीला असलेले हे हेलिकॉप्टर अगदी तीन-चार वर्षेच जुने होते. अत्यंत निष्णात असे पायलट या हेलिकॉप्टरच्या संचालनासाठी असतात. आणिबाणीच्या प्रसंगात लॅण्डिंग करण्याचे कौशल्य त्यांना पुरेपूर शिकविलेले असते… तरीही आणि तरीही हे असले प्रसंग उद्भवतातच. देवेंद्र फडणवीस यांची गेल्या तीन वर्षांची कारकीर्द अत्यंत झपाटलेपणाने काम करणार्‍या नेत्याची आहे. शपथविधीनंतर त्यांनी उसंतच घेतलेली नाही. उद्योगापासून शेतशिवारांपर्यंत, समृद्धी मार्गापासून पांदण रस्त्यांपर्यंत आणि उद्योगांना आवश्यक असलेल्या विजेपासून शेताला लागणार्‍या सिंचनाच्या सोयींपर्यंत… सगळीकडेच या नेत्याची जागरूक करडी नजर सतत फिरत असते. सुरुवातीच्या काळात साधे मंत्री असण्याचाही अनुभव नसलेल्या या नेत्याकडून आपण काय अपेक्षा करायच्या? अशी उपहासिक संभावना विरोधकांनी केली. उच्चभ्रू वर्गातील या नेत्यांना वंचितांच्या प्रश्‍नांना काय भिडता येणार, असा उपहासही करण्यात आला. मात्र, पहिल्याच अधिवेशनात फडणविसांनी त्यांच्यातला मुरलेला राजकारणी आणि जनतेप्रती जाणतेपण दाखवून दिले. ‘‘१५ वर्षांच्या सत्तेत तुम्ही काय केले?’’ असा थेट सवालच त्यांनी केला. नंतर प्रशासनावरील पकड घट्‌ट केली. दिल्लीत वजन असलेला अन् पंतप्रधान मोदींचा अत्यंत लडका मुख्यमंत्री, असा त्यांचा लौकिक आहे. फडणवीस दिल्लीत, राज्याचा एखादा प्रश्‍न घेऊन गेले आणि तो धसास लावून आले नाहीत, असे आजवर झालेले नाही! नुकतीच त्यांनी तुरीच्या खरेदीच्या समस्येचेही अशीच सोडवणूक केली. दरम्यानच्या काळात १० महानगरपालिका आणि २३ जिल्हा परिषदांच्या निवडणुकांचा धुराळा उडाला होता. त्यातही कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेस हे ग्रामीण जनतेचे स्वयंघोषित प्रतिनिधी असलेले पक्ष धुळीस मिळाले अन् मग विरोधकांना, त्यांचा गावकुसात पक्का आहे, असा वाटणारा पाया ठिसूळ होतो आहे, नव्हे झालेलाच आहे, याची जाणीव झाली. त्यांना मग शेतकर्‍यांचा कळवळा आला. उत्तरप्रदेशच्या अपयशाची जखम ताजीच होती आणि तिथे वचन दिल्यानुसार भाजपाने शेतकर्‍यांना एक लाखापर्यंतच्या कर्जाची माफी दिली. विरोधकांच्या हातात कोलीतच सापडले. उत्तरप्रदेशात मते मागायची असल्याने कर्जमाफी केलीत, आता महाराष्ट्रातही करा म्हणून विरोधी नेते रस्त्यावर उतरले. अवसान गळण्याच्या काळात सावरण्याचा हा प्रकार आहे. सत्ताविहिनतेचे चटके सहन होत नसल्याने, उन्हातान्हात शेतकर्‍यांच्या कर्जमुक्तीचे पथनाट्य विरोधकांनी खेळणे सुरू केले. ‘चांदा ते बांदा’ त्यांनी महाराष्ट्र पिंजून काढला… कर्जमुक्तीपेक्षा शेतकर्‍यांना पाणी, वीज आणि पुरेसे अर्थसाहाय्य, शेतमालाला भाव असे दिले पाहिजे, हे मुख्यमंत्र्यांचे मत शेतकर्‍यांच्या दीर्घकालीन हिताचे आहे. त्यांचा कर्जमाफीला विरोध असण्याचे काहीच कारण नाही, मात्र त्याहीपेक्षा शाश्‍वत असे उपाय बळीराजासाठी करायला हवेत, असे मुख्यमंत्र्यांना वाटते आणि ते योग्य आहे. यंदा तुरीवरून मोठा गहजब करण्यात आला. मात्र, तूर खरेदीबाबत शेतकरी समाधानी आहेत. विरोधक असे कर्जमाफीच्या नावाने फिरत असताना मुख्यमंत्री थेट शेत-शिवारात शिरले. विदर्भासह महाराष्ट्रात त्यांनी जलयुक्त शिवारच्या कामांची जातीने पाहणी केली. मोठ्या धरणांच्या नावाने कोट्यवधीची कंत्राटे देऊन कामे होण्याच्या आधीच बिले काढणारे आधीचे सत्ताधारी, धरणात पाणी नाही तर मी काय त्यात… का? असा सवाल करणारे आधीचे सत्ताधारी आणि अत्यंत कमी खर्चात गावशिवार जलयुक्त करण्यासाठी रानोमाळ फिरणारा मुख्यमंत्री, यातील फरक महाराष्ट्रातील जनतेला कळत नाही का? जलयुक्तसारख्या योजनांनी ग्रामीण भागातील सिंचनाचा अन् पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न बर्‍याचअंशी सोडविला आहे. त्यासाठी आपणच जातीने नजर ठेवली पाहिजे, असे मुख्यमंत्र्यांना वाटते आणि त्यासाठी ते फिरतात. आता ते शिवार-संवादासाठी लातुरात गेले होते. थेट राज्याचा नेताच धुर्‍यावर येऊन आपल्याशी बोलतो, आपल्या कौलारू, बसक्या घरात रात्री थांबतो, मांडीला मांडी लावून जेवतो, ही जागरूकता ठेवण्यासाठी देवेंद्र फणडवीस सतत फिरत असतात. त्यांची ही व्यग्रता किती आवश्यक आहे, असा सवाल, अशा काही घटना घडल्या की मनात येतो. शासन आणि प्रशासन, पक्ष आणि कार्यकर्ते यांच्यात सतत ऊर्जा प्रज्वलित ठेवण्यासाठी नेता उत्साही आणि ऊर्जावान असलाच पाहिजे. हे खरेच असले तरीही त्याने असे सतत धावत असावे, असेही नाही. अर्थात, पहिल्या तीन वर्षांत आपापली खाती सांभाळणारे सहकारी तयार होणेही शक्य नसते. तरीही या व्यग्रतेला कुठेतरी लगाम घालायला हवा. सततच्या निवडणुका, दौरे अन् कार्यक्रमांच्या भाऊगर्दीत अन् वेगवान धावपळीत हे असले धोके उद्भवतात. नकार देता येत नाही अन् होकार सांभाळता येत नाही, अशी अवस्था होते. होकार दिला की आकार येतो अन् नकार देता आला की ॐकार निर्माण होतो. आकारातला ॐकार सांभाळायचा असेल, तर होकार आणि नकारातले संतुलन सांभाळावे लागते. राजकारणात आता गतिमान प्रवासी साधनांचा वापर अगदी तळापर्यंत होऊ लागला आहे. सार्वत्रिक निवडणुकात तर किरायाने विमाने आणि कॉप्टर्स देणार्‍या कंपन्यांची चलती असते. गेल्या २०१४ च्या निवडणुकीत देशातील अशा १३० कंपन्यांनी ५२० चार्टर्ड विमाने आणि कॉप्टर्स हवेत सोडली होती. त्यांचे एका तासाचे भाडे ७५ हजारावर होते. काळाची ही मागणी असली, तरीही काळापासून सावध राहून त्याला प्रतिसाद द्यायला हवा. प्रत्येक ठिकाणी मुख्यमंत्रीच हवेत, या मागणीला पायबंदही घातला जायला हवा. देवेंद्र फडणविसांसारखा कर्ता नेता नशिबानेच लाभत असतो. महाराष्ट्र त्यांची काळजी घेणारच आहे, घेतोही आणि त्यांनीदेखील स्वत:ला सांभाळायला हवे…

No comments:

Post a Comment