काँग्रेस आघाडी सरकारच्या काळात राज्याचे क्रीडा धाेरण तयार होत असताना त्यांच्याबरोबर काम करण्याची संधी मिळाली. क्रीडा धोरण कसे असावे, याचा मसुदा बाम सरांच्या मार्गदर्शनाखाली तयार झाला. एखाद्या विषयाच्या खोलाशी जाऊन अभ्यास करावा, त्यासाठी कितीही मेहनत घ्यायला लागली तरी चालेल, हे बाम सरांचे कायम धोरण राहिले. यामुळे या धोरणावर काम करणाऱ्या आदिल सुमारीवाला, दिलीप वेंगसरकर, प्रदीप गंधे या साऱ्या आंतरराष्ट्रीय खेळाडू व संघटकांना सरांबाबत प्रचंड आदर होता. सरांनी सांगितलेल्या मार्गदर्शक तत्त्वानुसार शेवटी क्रीडा धोरण तयार झाले, मात्र सरांनी आखून दिलेल्या धोरणानुसार काम झाले नाही, हे राज्याचे दुर्दैव! पण, सर यामुळे कधी निराश झाले नाहीत. आपल्या सर्वांना अजून खूप काम करायचे आहे, असे सांगत ते प्रत्येकाला निराशेच्या डोहातून बाहेर काढण्याचे काम करीत, हेच सरांचे मुख्य वैशिष्ट्य होते.
ज्यावेळी भारतात तज्ज्ञ क्रीडा मानसोपचार तज्ज्ञ नव्हते त्यावेळी १९९० मध्ये त्यांनी खेळाडूंना मानसिकरीत्या खंबीर बनवण्याचे काम केले. त्यांनी घडवलेल्या खेळाडूंच्या यादीवरून एक नजर टाकली तरी सरांचे काम किती मोठे होते हे दिसून येते. क्रिकेटपटू राहुल द्रविड, नेमबाजीतले आॅलिम्पियन पदक विजेते अभिनव बिंद्रा, गगन नारंग तसेच नेमबाजीतल्याच जागतिक पदक विजेत्या अंजली भागवत, सुमा शिरूर, अंजली देशपांडे, अनुजा तरे असे एकापेक्षा एक सरस खेळाडू त्यांच्या तालमीत तयार झाले. १९९० च्या सुमारास मुंबई, नवी मुंबईतील काही काॅलेज तरुणी वरळीला महाराष्ट्र रायफल शूटिंगच्या रेंजवर नेमबाजी सरावाला येत असत. मध्यमवर्गीय घरातील या मुलींच्या हातात बंदुका होत्या. मात्र आवडीपलीकडे त्यांना नेमबाजीचा फारसा गंध नव्हता. अशावेळी प्रशिक्षणाव्यतिरिक्त मानसिक तंदुरुस्तीचे धडे घेण्याचे काम सरांनी आवडीने आपल्याकडे घेतले. पोलिस महासंचालकपदी असलेला हा माणूस वरळीच्या रेंजवर येत असे तो पोलिसी जोडे बाहेर काढून. खेळाडूंबरोबर ते त्यांच्या वडीलधाऱ्या माणसासारखे होऊन जात. अंजली भागवत व सुमा शिरूर सांगतात, दर मंगळवारी बाम सरांचे एक तासाचे व्याख्यान असायचे. सर फक्त मेंटली फिटनेसवर भर देत नसत तर,आम्हा खेळाडूंकडच्या रायफली, पिस्तूल चांगल्या दर्जाच्या आहेत की नाही याची ते काळजी घेत. तसेच स्पर्धांसाठी आमच्याकडे पुरेसे पैसे आहेत की नाही, याचीही त्यांना चिंता असे. आमच्या बऱ्याच जणींकडे ते नसायचे. घरचे खेळासाठी पाठिंबा देत, पण नेमबाजीसारख्या आर्थिकदृष्ट्या अतिशय महागड्या खेळाचा खर्च भागवण्याइतकी ऐपत आमची नव्हती. अशावेळी सर स्वत: निधीही जमवण्याचे काम करत. त्याचमुळे राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये सहभागी होण्यासाठी आम्हाला त्यांची खूप मदत झाली. ते अाम्हा मुलींचे जणू वडीलच होते.
मराठी नेमबाज मुलींना मिळालेल्या यशानंतर भारतात महिलांमध्ये नेमबाजीची मोठी फौज तयार झाली. आज भारतीय नेमबाज जागतिक पातळीवर आपल्या यशाचा डंका वाजवत आहेत, त्याचा पाया बाम सरांनी घातला. याबाबतीत सुमाने सांगितलेली आठवण फारच स्फूर्तिदायक आहे. २००४ च्या अथेन्स आॅलिम्पिकमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी सुमा शिरूरला एक शेवटची संधी होती. आॅलिम्पिकपूर्वी जागतिक तसेच जागतिक पातळीवरील स्पर्धांमध्ये पात्रतेचा एक निकष असतो तो पार केला तरच आॅलिम्पिकमध्ये प्रवेश मिळतो. सुमाचे पहिले काही प्रयत्न अयशस्वी ठरले होते. मलेशियातील स्पर्धेत तिला शेवटची संधी होती. मात्र यासाठी तिला अव्वल कामगिरी करावीच लागणार होती. अशा अतिशय बिकट क्षणी सरांनी तिला विश्वासात घेतले अाणि सांगितले तुला ४०० पैकी ४०० गुण मिळवावे लागतील आणि विश्वविक्रम करतच तू अथेन्सला जायचे. स्पर्धेला उतरताना कसा विचार करायचा, सतत सकारात्मक कसे राहायचे, याविषयी सरांनी तिच्यावर खूप मेहनत घेतली आणि सुमाने सरांच्या मेहनतीचे चीज करत विश्वविक्रम केला. हा विक्रम झाल्यानंतर लगेचच सरांना तिने फोन केला, सर मी लक्ष्य गाठले. त्यावेळी बाम सर पूजा करत होते. ते सुमाला म्हणाले, प्रसाद मिळाला. डॉ. बाम यांचे आयुष्य खेळाडू घडवण्यात गेले. त्यांची ही तपश्चर्या सुरूच असताना मृत्यूने त्यांना गाठले.
- (विशेष प्रतिनिधी, मुंबई ब्युरो)
No comments:
Post a Comment