Total Pageviews

Thursday, 11 May 2017

नवाझ शरीफही अतिरेकीच!


May 11, 2017018 अग्रलेख ••नवाझ शरीफ यांचा खरा चेहरा आता जगापुढे आला आहे. निष्पाप नागरिकांचे बळी घेणार्‍या अतिरेक्यांना जिहादी कारवायांसाठी प्रोत्साहन देण्याकरिता ओसामा बिन लादेनकडून पैसा घेणारे पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ हेही एकप्रकारे अतिरेकीच ठरतात. ••नवाझ शरीफ आणि अल् कैदाचा तेव्हाचा म्होरक्या क्रूरकर्मा ओसामा बिन लादेन याच्याशी पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांचे घनिष्ठ संबंध होते आणि नवाझ शरीफ यांनी ओसामाकडून दीड अब्ज रुपये घेतले होते. या पैशांचा वापर शरीफ यांनी जम्मू-काश्मीर आणि अफगाणिस्तानात जिहादी कारवायांना प्रोत्साहन देण्यासाठी केला होता, अशी जी माहिती समोर आली आहे, ती धक्कादायक आहे. शिवाय, पाकिस्तानचा, त्या देशाचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांचा खरा चेहरा जगासमोर आणणारी आहे. जिहादी कारवायांना प्रोत्साहन देणारे नवाझ शरीफ हेही त्यामुळे अतिरेकीच ठरतात. जे अतिरेक्यांना पैसा देतात, त्यांना शस्त्रास्त्रे पुरवितात, शस्त्रास्त्रे चालविण्याचे प्रशिक्षण देतात आणि निष्पाप लोकांचे जीव घेण्यास प्रोत्साहन देतात, ते अतिरेकी नाहीत तर कोण आहेत? जिहादी कारवायांना प्रोत्साहन देण्यासाठी शरीफ यांनी ओसामा बिन लादेनकडून पैसा घेतल्याचा आरोप करीत शरीफ यांच्याविरुद्ध खटला भरणार असल्याचे पाकिस्तान तेहरिक-ए-इन्साफ या पार्टीचे नेते इम्रान खान यांनी म्हटल्याने भारताची बाजू आणखीच मजबूत झाली आहे. इम्रान खान हे पाकिस्तानी क्रिकेट संघाकडून खेळलेले वेगवान गोलंदाज होते. आता ते राजकारणात सक्रिय आहेत. त्यांनी खटला भरल्यास शरीफ अडचणीत सापडतील हे जरी खरे असले तरी पैसा घेतल्याचे पुरावे कोर्टासमोर आले नाही तर शरीफ पुन्हा मोकाट सुटतील, यात शंका नाही. पण, म्हणून त्यांच्याबाबत जी माहिती समोर आली आहे ती असत्य ठरेल असे होणार नाही. शरीफ यांनी लादेनकडून घेतलेल्या पैशांचा वापर बेनझीर भुट्टो यांचे सरकार उलथून टाकण्यासाठीही केला होता, ही बाबही समोर आल्याने शरीफांचा काळा चेहरा उघड झाला आहे. गेल्या कित्येक वर्षांपासून पाकिस्तान भारतात अतिरेकी पाठवत आहे, हे अतिरेकी आमच्या देशातील निष्पाप नागरिकांचे आणि जवानांचे बळी घेत आहेत, ही बाब भारताने आंतरराष्ट्रीय समुदायाच्या निदर्शनास आणून दिल्यानंतरही त्याचा उपयोग झालेला नाही. स्वत:ला बलाढ्य समजणारी आणि दहशतवादाविरुद्ध एकजूट होण्याचे आवाहन करणारी अमेरिका शरीफसारखा अतिरेकी नेतृत्व करीत असलेल्या पाकिस्तानला सातत्याने वाढीव आर्थिक मदत करीत आहे, ही बाब काय दर्शविते? दहशतवादाच्या लढाईत अमेरिकेची भूमिका दुटप्पी असल्याचेच आजपर्यंत दिसून आले आहे. भारतात अशांतता निर्माण करायची असेल तर त्यासाठी सशस्त्र प्रशिक्षित अतिरेकी पाठवावे लागतील अन् त्यासाठी पैसा लागेल हे माहिती असल्याने शरीफ यांनी लादेनशी मैत्री केली आणि त्याच्याकडून घेतलेल्या पैशांतून भारतात घातपात कारवाया घडवून आणल्या. लादेनलाही भारतात शिरकाव करायचा असल्याने त्यानेही शरीफांना पैसा पुरविला. पण, लादेनच्या दुर्दैवाने त्याला भारतात शिरकाव करता आला नाही, हा भाग वेगळा. त्या वेळी जर लादेनने भारतात शिरकाव केला असता तर परिस्थिती आज आहे, त्यापेक्षाही भीषण झाली असती, हे लक्षात घेतले पाहिजे. नवाझ यांचे आडनाव जरी शरीफ असले तरी आडनावाला साजेसे ते कधीच वागले नाहीत. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा द्यायला लाहोरला गेले होते. पण, त्यानंतर लागलीच शरीफ यांनी आपला बदमाश चेहरा भारताला दाखवून दिला. मोदी त्यांना शुभेच्छा देऊन परत येत नाहीत तोच अतिरेक्यांनी भारताच्या लष्करी तळावर हल्ला केला अन् आपला खरा चेहरा हा दहशतवादीच आहे, हे दाखवून दिले. तेव्हापासून तर आतापर्यंत पाकिस्तानकडून सातत्याने घातपाती कारवाया सुरूच आहेत. गेल्याच आठवड्यात पाकमधून आलेल्या अतिरेक्यांनी आमच्या दोन जवानांचा शिरच्छेद केला. आता कालपरवा त्यांनी आमच्या उमर फैयाज नावाच्या लेफ्टनंट दर्जाच्या अधिकार्‍याची गोळ्या घालून हत्या केली. मध्यंतरी सर्जिकल स्ट्राईक करून भारताने पाकला धडा शिकवण्याचा प्रयत्न जरूर केला. पण, त्या सर्जिकल स्ट्राईकनंतर पाकचे शेपूट आणखी वाकडे झाले असल्याचे दिसते आहे. आता पुन्हा एकदा सर्जिकल स्ट्राईक करून पाकिस्तानला लुळेपांगळे करण्याची गरज आहे. पाकने हल्ला केला की, प्रत्येक वेळी नुसता निषेध नोंदवून काम भागायचे नाही. पाकने आमच्या एका जवानाला मारले तर पाकचे दहा अतिरेकी आणि जवान मारले पाहिजेत. ज्या घटना घडत आहेत, त्यामुळे देशभर संतप्त भावना आहेत. देशभर आक्रोश आहे. या आक्रोशाची दखल घेत भारत सरकारने आमच्या सुरक्षा दलांना आदेश देण्याची गरज फक्त आहे. एकदा का आदेश प्राप्त झाला तर आमचे शूर जवान पाकिस्तानची हद्द ओलांडून लाहोरपर्यंत धडक देऊ शकतात, हे १९७१ च्या युद्धात सिद्ध करून दाखविले आहे. आज तर भारताची लष्करी ताकद आणखी वाढली आहे. आता गरज आहे ती राजकीय इच्छाशक्ती प्रदर्शित करण्याची. भारतासमोर पाकिस्तान एखाद्या मच्छरासारखा आहे. या मच्छराची कानाजवळ होणारी गुणगुण आता सहनशक्तीपलीकडे गेली आहे. ही बाब लक्षात घेता या मच्छराला मारणे गरजेचे झाले आहे. त्यासाठी मग कीटकनाशक वापरायचे की रॅकेटचा वापर करायचा, हे आता सरकारने ठरवायचे आहे. पाकिस्तानविरुद्ध लढण्यासाठी सरकारने कोणताही निर्णय घेतला तरी देशातील जनता सरकारसोबत राहील, याची खात्री आमच्या राज्यकर्त्यांनी बाळगली पाहिजे. पाकिस्तान सातत्याने अतिरेक्यांना मदत करीत आला आहे आणि ही बाब भारताने आंतरराष्ट्रीय समुदायाच्या निदर्शनास आणूनही दिली आहे. असे असतानाही आंतरराष्ट्रीय समुदाय पाकविरुद्ध कारवाई करणार नसेल तर भारत सरकारनेही आंतरराष्ट्रीय समुदाय काय म्हणेल याची चिंता करत बसण्याची गरज नाही. मुंबईत १९९३ साली झालेल्या साखळी बॉम्बस्फोट मालिकेत शेकडो निष्पाप नागरिकांचे बळी गेले. त्यासाठी जबाबदार असलेला कुख्यात गुंड दाऊद इब्राहिम याला पाकने आश्रय दिला आहे, हे सर्वविदित असतानाही पाकिस्तान सातत्याने या विषयावर जगाची दिशाभूल करीत आला आहे. त्यामुळे आता पाकचा फार विचार न करता १९७१ साली केली होती, त्यापेक्षाही भीषण लढाई करून पाकला नेस्तनाबूत करण्याची वेळ आली आहे. तोंडी निषेध करून पाकिस्तानवर काहीही परिणाम होत नाही, हेही अनेकदा सिद्ध झाले आहे. वर्षभरापूर्वी पाकिस्तानने कुलभूषण जाधव या भारताच्या माजी नौदल अधिकार्‍याचे इराणमधून अपहरण केले अन् त्याला पाकिस्तानात नेले. तिथे नेऊन त्याच्यावर अनन्वित अत्याचार केले. त्याला भारतीय हेर ठरवून एकतर्फी खटला चालविला अन् त्याला फाशीची शिक्षाही सुनावली. त्यानंतर भारतभर प्रचंड आक्रोश झाला. तीव्र जनभावना लक्षात घेत भारत सरकारने वेगाने हालचाली केल्या आणि आंतरराष्ट्रीय न्यायालयात धाव घेतली. परवाच हेग येथील आंतरराष्ट्रीय न्यायालयाने जाधव यांच्या फाशीला स्थगिती दिली आहे. हा भारताचा मोठा कूटनीतिक विजय मानला पाहिजे. असे असले तरी गाफील राहून चालायचे नाही. मध्यंतरी अशी बातमी होती की, पाकने कुलभूषण जाधव यांची आधीच हत्या केली असावी. पण, त्याबाबत ठोस कोणतीही माहिती समोर आली नव्हती. त्यामुळे पाकिस्तानवर आंधळेपणाने विश्‍वास न ठेवता भारताने कुलभूषण जाधव यांचा ठावठिकाणा शोधून काढत शरीफ यांचा बुरखा फाडला पाहिजे

No comments:

Post a Comment