Total Pageviews

Tuesday 23 May 2017

प्रत्येक नागरिकाने ‘सैनिक’ बनणे अनिवार्य!- जयेश राणे अतिरेकी, नक्षलवादी हे सैनिक आणि पोलिसांवर आक्रमण करत आहेत. हिंदुस्थानात अशांती पसरवण्यासाठी या माध्यमांतून त्यांचे प्रयत्न सुरूच आहेत. काही दिवसांच्या अंतराने वा सलग काही दिवस हल्ले चालू आहेत. गेल्या काही दिवसांत यात झालेली वाढ जेवढी चिंताजनक आहे, तेवढीच बिकट स्थितीवर चिंतन करून थेट कृती करण्यास भाग पाडणारी आहे.


पाकिस्तानशी युद्धच करा असे देशातील जनता टाहो फोडून सांगत आहे. तरीही आजपर्यंत या जनतेचा आवाज ऐकला गेलेला नाही. एका बाजूने देश विविध क्षेत्रांत प्रगती करत आहे, तर दुसऱ्या बाजूने शत्रूकडून होणाऱ्या हल्ल्यांमुळे पिचत आहे. त्यामुळे देशाची प्रगती शत्रूच्या कारवायांपुढे झाकोळली जात आहे. हिंदुस्थानच्या प्रगतीने पोटशूळ उठणारे शत्रू देशाला कधीच स्वस्थ बसू देणार नाहीत. ते कुरापती काढत राहून प्रगतीस गालबोट लावण्याचे काम करीतच राहणार. हिंदुस्थानवर आक्रमणांची टांगती तलवार कायम कशी राहील याचे व्यवस्थित नियोजन शत्रू करत आहेत, हे त्यांच्या आक्रमणांवरून कळते. शत्रूशी युद्ध केल्यास देशाच्या अर्थव्यवस्थेस धोका पोचेल, देश काही दशके मागे जाईल, त्यावेळी देशांतर्गत सुरक्षा कशी राखायची असे अनेक प्रश्न हिंदुस्थान सरकारसमोर असतील. अर्थात प्रश्न आहे तिथे उत्तर आहेच. याबाबत अमेरिकेपेक्षा उत्तम उदाहरण नाही. हा देश प्रगतीची उंच शिखरे सर करतच आहे, सोबतच जगाची डोकेदुखी ठरलेल्या जिहादी आतंकवादाची पाळेमुळे खणून काढण्यासाठी त्यांच्यावर सतत आक्रमण करून त्यांना नामोहरम करत आहे. हिंदुस्थानी सैन्य पाकिस्तानच्या कुरापतींना वेळीच चोख उत्तर देत असले तरी असे कधीपर्यंत सुरू राहणार, हा प्रश्न देशवासीयांना सतावतो आहे. आयुष्यातील वाईट काळ लवकर संपावा असे प्रत्येकास वाटत असते. अतिरेक्यांच्या माध्यमातून राष्ट्रावर काही दशके कायम असलेल्या वाईट काळाचा पगडा दिवसेंदिवस अधिक घट्ट होत आहे. तेव्हा प्रति आक्रमण करूनच या शत्रूला जगाच्या नकाशावरून नष्ट करावे लागणार आहे. तरच हे राष्ट्रीय संकट दूर होणार आहे. दहशतवाद्यांच्या मार्फत देशाच्या सुरक्षा यंत्रणांना लक्ष्य केले जात आहे. जिथे सैनिक, पोलीसच सुरक्षित नाहीत तिथे नागरिकांची सुरक्षा कोण करणार? असा संदेश त्या यंत्रणांवरील हल्ल्यांच्या माध्यमातून देशामध्ये सतत जात राहील असे पाहिले जात आहे. सैनिक आणि नागरिकांवर असुरक्षिततेचा मानसिक दबाव ठेवण्यासाठी शत्रू खेळत असलेल्या डावपेचांना हरताळ फासायला हवा. अर्थात हे फक्त सरकारचे एकट्य़ाचे काम नाही. जनतेनेही आपली जबाबदारी पार पाडली पाहिजे. त्यासाठी देशातील नागरिकांना सैन्यासोबत राहणे अत्यावश्यक आहे. शत्रूचा कशा प्रकारे पाडाव करता येतो याचे कैक दाखले हिंदुस्थानी वीर, राजे-महाराजे आणि राणी यांच्या पराक्रमी कर्तृत्वातून अनुभवले आहेत. ते कर्तृत्व जागृत करण्यासाठी त्यांच्या पराक्रमी गाथांचा गांभीर्याने अभ्यास होण्याची नितांत गरज भासत आहे. आपले सैनिक देशाचे रक्षण करतच आहेत, पण आज अशी स्थिती आहे की, नागरिकांनाही शत्रूसोबत लढण्यास सिद्ध राहावे लागणार आहे. म्हणजेच नागरिकांनाही सैनिकच बनावे लागणार आहे. सवाशे कोटी लोकसंख्या असलेल्या हिंदुस्थानने याविषयी जागृती करण्यासाठी काय करता येईल याचा अभ्यास केला पाहिजे. देशाच्या विविध क्षेत्रांतील प्रगतीत वृद्धी व्हावी यासाठी चोहोबाजूंनी प्रयत्न सुरू आहेत. आता देशांतर्गत सुरक्षा सक्षम करण्यासाठी नागरिकांना कसे प्रोत्साहित करता येईल हे पाहणे अनिवार्य झाले आहे. दिवसेंदिवस सीमेवरील संघर्षात होणारी वाढ त्या आवश्यकतेकडे लक्ष वेधते. त्यामुळे शत्रूच्याही लक्षात येईल की, हिंदुस्थानचे सैनिकच नाहीत तर त्यांचे नागरिकही लढण्यास सज्ज आहेत. परिणामी शत्रूचे कंबरडे मोडण्यासाठी सैन्यास अधिक हिंमत मिळेल. याप्रकरणी गंभीरतेने विचार झाला पाहिजे. सीमेवर जसा धुमाकूळ घालण्यात येत आहे तसाच देशात पसरलेल्या अतिरेक्यांच्या जाळ्याच्या सहाय्यानेही घालण्याचे शत्रूचे मनसुबे त्यामुळे धुळीस मिळतील. त्यामुळे देशात लपून बसलेले पाकिस्तानी, बांगलादेशी घुसखोर यांच्या मुसक्या आवळणे शक्य होईल. राष्ट्रसेवा हे केवळ सैनिकांचे दायित्व नाही तर ते देशातील प्रत्येक नागरिकाचे दायित्व आहे

No comments:

Post a Comment